दोन कारच्या टक्करीत म्हापशात चालक ठार

0
113

गिरी, म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील महामार्गावर काल संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान दोन कार’ध्ये झालेल्या भीषण अपघातात मांगुरहील, वास्को येथील पुंडलिक लमाणी (२८) हा कारचालक जागीच ठार झाला तर दुसर्‍या कारचा चालक श्रीराम पिळर्णकर (२९, सागवाडी – हडफडे) व त्याच्या शेजारी बसलेला दीपेश गवंडी (२८, विर्नोडा, पेडणे) हे दोघे गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडफडेहून गिरीमार्गे डिचोलीला जाणारी जीए-०३-एच्-०४१६ क्रमांकाची पोलो टीडीआय कार ग्रीन पार्क हॉटेलजवळील रस्त्यावर पोचली असता सावंतवाडीहून भरधाव वेगाने येणार्‍या जीए-०६-टी-३३९२ या व्हेगनर पर्यटक टॅक्सीने पोलो कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे व्हेगनरचा चालक पुंडलिक जागीच ठार झाला, तर दुसर्‍या कारमधील चालक व गाडीत बसलेले गंभीर जखमी झाले. जोरदार टक्करीमुळे दोन्ही कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.
मयत लमाणी हा मांगुरहील, वास्को येथील संतोष पुजारी यांची पर्यटक कारगाडी चालवत होता. काल तो पर्यटकांना पोचवण्यासाठी वास्कोहून सावंतवाडीला गेला होता. संध्याकाळी तो परतत असताना हा अपघात घडला. धो धो पडत असलेल्या पावसामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटून तो विरुद्ध दिशेला गेल्याने पोलो कारला धडक बसली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्तविली आहे.
या अपघाताचा माहिती मिळताच म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गडकर, विजय चोडणकर, हवालदार सतीश नाईक, सुशांत चोपडेकर यांनी पंचनामा केला.