शैली ः ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांची

0
484

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

उज्ज्वल पत्रकारिता, ज्वलंत राष्ट्रभक्ती आणि प्रतिभासंपन्न लेखणी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांचा उल्लेख केला जातो. आधुनिक कालखंडात राष्ट्रवादाची जडणघडण करणार्‍यांमध्ये अग्रक्रमाने त्यांची गणना केली जाते. अशा या प्रज्ञावंताची उद्या २७ रोजी जयंती. त्यानिमित्त-

उज्ज्वल पत्रकारिता, ज्वलंत राष्ट्रभक्ती आणि प्रतिभासंपन्न लेखणी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांचा गौरवाने उल्लेख होत आलेला आहे. आधुनिक कालखंडात राष्ट्रवादाची जडणघडण करणार्‍या प्रज्ञावंतांमध्ये अग्रक्रमाने त्यांची गणना केली जाते. लोकमान्य टिळकांप्रमाणेच जहाल मताचे ते पुरस्कर्ते होते. त्यांच्या ‘काळ’ या वृत्तपत्रातून व्याजोक्तिपूर्ण आणि वक्रोक्तिपूर्ण स्वरूपाचे जे अग्रलेख लिहिले गेले त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अक्षरशः हादरे बसले. ‘काळा’तील अग्रलेख ब्रिटिश सत्तेने जप्त केले. राजकीय रोषास ‘काळ’कर्ते कारणीभूत ठरले. परंतु त्यांनी आपली अभंग जिद्द कायम ठेवली. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचे मूल्यमापन करताना केवळ एक झुंजार वृत्तीचे संपादक आणि प्रमत्त प्रतिभेचे साहित्यिक म्हणून चालणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. त्यांच्याकडे उच्च दर्जाची रसिकता होती. ‘स्वातंत्र्य’ या मूल्यावर त्यांची अनन्यसाधारण निष्ठा होती. रूढ अर्थाने त्यांना राजकारणी पुरुष म्हणता येणार नाही. संस्कृत वाङ्‌मयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. जागतिक इतिहासाचे त्यांनी परिशीलन केले होते. तर्कसंग्रहासारख्या किंवा पाणिनीच्या सूत्रांसारख्या रूक्ष विषयांवर त्यांनी विद्वत्तापूर्ण विवेचन केले होते. दुसरीकडे स्वतः चित्रकार नसताना त्या काळातील ‘ओलेती’ आणि ‘प्रणयिनीचा मनोभंग’ या चित्रांवर त्यांनी रसग्रहणे लिहिली होती. ते नाटककार, कादंबरीकार आणि लघुकथालेखक होते. मर्मदृष्टी असलेले विचारवंत होते.
या प्रज्ञावंताची आणि प्रतिभावंताची जडणघडण कशी झाली हे संक्षेपाने जाणून घेतल्याशिवाय त्यांच्या शैलीसंबंधी लिहिता येणार नाही. २७ जून १८६४ मध्ये महाड येथे त्यांचा जन्म झाला. २७ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांना मृत्यू आला. अवघे पासष्ट वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्यांचे माध्यमिक शिक्षण रत्नागिरी आणि पुणे येथे झाले. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी नव्या पिढीमध्ये राष्ट्रीय वृत्ती निर्माण करण्यासाठी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ स्थापन केले. परांजपे यांचे शिक्षण या नामवंत शिक्षणसंस्थेत झाले. त्यांच्या भावी कर्तृत्वाची ती गंगोत्री ठरली. स्वार्थत्यागपूर्वक देशसेवा करण्याचे संस्कार त्यांच्यावर येथेच झाले. १८८४ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तम यश मिळवून उत्तीर्ण झाले. संस्कृतची नाना शंकरशेट शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिले विद्यार्थी. डेक्कन कॉलेजमधून १८९० साली ते बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८९२ साली एम.ए.च्या परीक्षेत त्यांना उज्ज्वल यश प्राप्त झाले. ‘भगवानदास’ आणि ‘झाला वेदान्त’ या संस्कृत विषयाच्या शिष्यवृत्त्या त्यांना प्राप्त झाल्या. विद्यार्थिदशेपासून आदर्श जीवन जगण्याचा त्यांनी निदिध्यास बाळगला. अर्ज-विनंत्यांनी राष्ट्राचे स्वातंत्र्य मिळत नसते. झुंजार वृत्तीने संघर्ष करून ते मिळवावे लागते हा मूलमंत्र त्यांना इतिहासग्रंथांच्या अवगाहनातून मिळाला. तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या मुशीतून शि. म. परांजपे यांच्या मनाचा राष्ट्रवादी पिंड निर्माण झाला. जाज्वल्य मनोवृत्तीचा उगम झाला. दोन वर्षे त्यांनी महाराष्ट्र कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर मात्र त्यांनी लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे व्याख्याने, प्रवचने आणि कीर्तने यांद्वारा लोकजागृतीचे कार्य केले.
शि. म. परांजपे यांनी १८९८ साली ‘काळ’ हे साप्ताहिक सुरू केले. ‘‘लोकांत दृढमूल व रूढ झालेल्या कित्येक राजकीय कल्पनांच्या उच्छेदनासाठी ‘काळ’चा जन्म झाला आहे,’’ असे त्यांनी निर्धारपूर्वक जाहीर केले. अग्रलेखासाठी एखादा विषय चिंतनपूर्वक योजून ते त्याला अभ्यासाची जोड देत. विदग्ध लेखणीचा त्याला स्पर्श असे. १८९८ ते १९०८ या दहा वर्षांच्या काळात त्यांनी हे लेखन केले. अग्रलेखाच्या जोडीला ‘पत्रकर्त्याचे स्फुट विचार’ ते मांडत असत. एकशे आठ वर्षांचा काळ लोटला. आजही त्यांचे लेखन आस्वाद्य वाटते ते त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे. त्या शैलीचा येथे संक्षेपाने विचार करायचा आहे. त्यांच्या विदग्ध रसवृत्तीचे दर्शन घडविणारे लेख मराठी साहित्यविश्‍वात गाजलेले आहेत. ‘शिवाजीचे पुण्याहवचन’ व ‘शिवाजीची एक रात्र’ या लेखांतून त्यांचे उत्कट स्वातंत्र्यप्रेम प्रकट झालेले आहे. ‘गरिबांची उपासमार’, ‘संपत्तीचा दुरुपयोग’, ‘दुष्काळाला कारण कोण?’, ‘पावसाने अतिशय घाण केली’, ‘एका खडी फोडणाराची गोष्ट’ आणि ‘एका शेतकर्‍याचा उद्धार’ या लेखांतून मजूर व शेतकरी यांचे दुःख त्यांनी मुखर केले. ‘भासाची भवितव्यता’ आणि ‘कालिदासाने न लिहिलेले शाकुंतल’ या लेखांमधून त्यांच्या सर्जनशील समीक्षागुणांचे दर्शन घडते. त्यांचे साहित्यविषयक लेख ‘साहित्यसंग्रहा’च्या तीन भागांत प्रकाशित झालेले आहेत. ‘मोरोपंतांची भगवद्गीता’, ‘श्री नामदेवकृत ज्ञानेश्‍वरांची समाधी’, ‘सोपानदेवांची आळ’, ‘प्रियदर्शिका’ व ‘नागानंद’ ही नाटके कोणाची? व ‘विष्णुसहस्रनाम’ या विषयांवरील लेखांतून त्यांची चिकित्सक वृत्ती दिसून येते. ‘मराठ्यांच्या लढायांचा इतिहास’मधून त्यांनी मराठ्यांच्या पराभवाची मीमांसा परखडपणे आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने केली आहे. ‘फक्त अर्धा उपास’ या शीर्षकामधून विषय कोणता हे सुरुवातीला कळत नाही. त्यांच्या उपहासगर्भ लेखनाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. विलायतेमधील ‘मॅन्शन फंडा’ला खो घालण्यात आला. त्या खोडसाळपणाच्या दुष्कृत्यावर कोरडे ओढण्यासाठी शि. म. परांजपे यांनी हा लेख लिहिला आहे. या लेखात सरकारवर मर्मभेदक टीका केली आहे. ते जाणून घेण्यासाठी मूळ लेख वाचायला हवा. ‘ग्रीस देश कसा स्वतंत्र झाला’ या तीन लेखांची माला त्यांनी गुंफली. ती अंतर्मुख करणारी आहे. हा लेख उपरोधिक शैलीत लिहिलेला नाही. आपला देश व ग्रीस देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास या लेखातून मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर ग्रीस देशावर राज्य करणारे तुर्क आणि आपल्या देशावर वर्चस्व गाजविणारे इंग्रज यांच्या राज्यपद्धतीतील साम्य व भेद दाखविण्यात आले आहेत. नंतर ग्रीक लोकांच्या समर्पित वृत्तीविषयी लिहिले आहे. ‘मनापुढे खरा व स्पष्ट उद्देश असला पाहिजे’ हा लेख तात्त्विक विचारांना चालना देणारा आहे. देशात अनेक संस्था निर्माण होतात, अनेक चळवळी होतात, वाङ्‌मय निर्माण होत असते. पण या सर्वांपासून विशिष्ट फलप्राप्ती व्हावी असा मनोदय असल्यास आपले उद्दिष्ट आपल्या मनापुढे तरी अगदी स्पष्ट असले पाहिजे. नाहीतर एका हेतूने चळवळ सुरू करावी, तिच्यात जोम चढण्यासाठी निराळ्याच साधनांचा अवलंब करावा आणि त्यामुळे त्या चळवळीचे पर्यवसान भलतेच व्हावे, असा प्रकार घडत असतो.
शि. म. परांजपे यांनी रामदासांच्या ‘दासबोध’ या ग्रंथाचा आणि रामदासांच्या एकंदर शिकवणीचा परामर्श घेऊन एका विस्मृत ठेव्याचे महत्त्व प्रतिपादन केले. त्यांच्या लेखनात अशी विषयांची विविधता आहे. विपुलता आहे. त्यांतील विचारांचा मागोवा थोडक्यात घेणे ही सर्वस्वी अवघड गोष्ट आहे. आता त्यांच्या शैलीचे काही नमुने सादर करणे आवश्यक वाटते.
‘या हिंदुस्थानचे ते पूर्वीचे सुख कुठे गेले’ याविषयीचा अंतर्मुख करणारा विचार शि. म. परांजपे यांनी विचारला. हा लेख वाचताना ‘गद्यं कविनाम् निकषं वदन्ति’ या वचनाचा पदोपदी प्रत्यय येतो. या लेखात शि. म. परांजपे लिहितात ः
‘‘मानस सरोवरात आकंठ बुडालेले असून आपण प्रत्यही हताश होत आहेत. अन्नपूर्णेच्या सन्निध असून आपण उपाशी मरत आहोत. सूर्याची आपल्यावर कृपादृष्टी असतानाही आपण थंडीने कुडकुडत आहोत. अश्‍विनीकुमार आपल्याला अनुकूल असूनही आपण व्याधिग्रस्त झालो आहोत. आणि अमृताच्या डोहात पोहत असतानाही आपण मरणोन्मुख झालो आहोत. अशी आपल्या राष्ट्राची स्थिती कोणी केली? ते आपले सुख काय झाले? ते आपले पूर्वीचे सुख आपल्याला फिरून मिळेल काय?’’
१७८१ साली सत्तरीतील राणे व सरदेसाई यांनी बंड करून त्या भागातील परकीय सत्तेचा अधिकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंबंधीचा ‘उच्च पर्वताच्या उच्च शिखरावर’ हा अप्रतिम शैलीत लिहिलेला लेख मुळातून वाचावा असा आहे.
कर्झनशाहीने हिंदुस्थानात जे थैमान घातले होते त्या पार्श्‍वभूमीवर १५ जुलै १९०४ रोजी त्यांनी लिहिलेला ‘एक ऐतिहासिक पदार्थसंग्रहालय’ हा अग्रलेख अत्यंत जळजळीत स्वरूपाचा आहे. उपहास आणि उपरोध या आयुधांनी तो युक्त आहे. त्यातून त्यांचे लेखन विचारांच्या दृष्टीने किती क्रांतदर्शी, भावनेच्या दृष्टीने किती ओथंबलेले आणि अभिव्यक्तीच्या अंगाने किती समृद्ध याचा एकत्रितपणे अनुभव घेता येतो. या लेखाचा शेवट करताना ते म्हणतात ः
‘‘गुहेच्या समोरील पुष्करिणीत दररोज स्नान करावे, सूर्याने झाडावर शिजविलेल्या अन्नाचे पक्ष्यांच्या बरोबर सेवन करावे, स्वच्छ झर्‍यांचे निर्मळ पाणी प्यावे आणि बाकीचा वेळ पैगंबराच्या चिंतनात घालवावा, अशा रीतीने त्याने आपल्या आयुष्याचे बाकी राहिलेले दिवस घालविले व अखेरीस त्याचा देह ज्या पंचमहाभूतांपासून निर्माण झाला होता त्यामध्ये तो पुनरपि लय पावता झाला. त्याचे थडगे त्या पुष्करिणीच्या जवळ पुष्कळ दिवसपर्यंत कायम होते. परंतु आता त्या थडग्याचे दगडही तेथे उतरलेले नाहीत! फक्त ती गुहा, ती पुष्करिणी व ती वनश्री, एवढे मात्र अजून तेथे कायम आहे!’’
‘सह्याद्रीच्या तावडीत सापडलेली कल्पनाशक्ती’ या लेखात काव्यात्मकता भरून राहिलेली आहे. मुळात तो अग्रलेख आहे. पण परांजपे यांच्या प्रतिभाबलाने या लेखनाला शाश्‍वत मूल्य आहे. अथपासून इतिपर्यंत या लेखात काव्यच आहे. त्यातील मधू कसा सेवन करावा या विचाराने आपण प्रश्‍नांकित होतो. सुरुवातीला वाक्य आलेले आहे- ‘हा पर्वत परमेश्‍वराने हिंदुस्थानला हिंदुस्थानच्या स्वतंत्रतेसाठी दिलेला आहे.’ एके ठिकाणी ते म्हणतात ः
‘‘अशा उदात्त आणि रम्य प्रदेशामध्ये जो कोणी जाईल तो कवी होऊन माघारा येईल. अशी ठिकाणे ही कवितेच्या वास्तव्याची ठिकाणे होत. या ठिकाणी परमेश्‍वराने आपल्या हाताने मोठमोठ्या अक्षरांनी सुंदर काव्ये लिहून ठेवलेली आहेत. तेथे जावे आणि ती वाचावी. आंधळ्या मनुष्याला या जगात जर काही खरे दुःख असेल तर हेच की, त्याला या अपौरुषेय वेदांतील ऋचा आपल्या डोळ्यांनी वाचता येत नाहीत. अशा ठिकाणाहून जे लोक नेहमीच राहतात ते धन्य होत. आपण एखादे वेळी तेथे गेलो तर आपल्याला इतका आनंद होतो, मग जे लोक नेहमी त्या अप्रतिम देखाव्यांचा उपभोग घेत असतात त्यांचे भाग्य काय वर्णावे? ते सृष्टिदेवतेचे खरे खरे उपाध्ये होत. ते सृष्टिदेवतेची प्रातःकाळची अपूर्व टवटवी पाहतात, ते सायंकाळचा शांतपणा आपल्या शांत अंतःकरणामध्ये साठवून घेतात आणि मध्यान्ह रात्री कदाचित आपल्या चुकलेल्या गाईला किंवा वासराला शोधण्याकरिता जाता जाता मध्येच लागलेल्या एखाद्या उंच कड्यावर क्षणभर उभे राहून आपल्या सभोवती सृष्टिदेवता गाढ आणि स्वस्थ झोपेचा अनुभव घेत असलेली पाहतात!’’
‘वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि’ असे हे शि. म. परांजपे यांचे संवेदनशील मन त्यांच्या अभिजात शैलीत प्रकट झाले आहे. त्यांचे हृदय कवीचे नाही असे कोण म्हणू शकेल?