सृष्टीचा किमयागार मान्सून

0
121

– राजेंद्र पां. केरकर

गोवा-कोकणातल्या शेतकर्‍यांसाठी मान्सूनचा पाऊस एकेकाळी जगण्याचा आधार ठरला होता. परंतु आज शहरीकरणासाठी होणार्‍या बेशिस्त बांधकामामुळे, पर्यटन प्रकल्पांमुळे, मान्सूनातल्या सर्जन-सृजनाच्या आविष्काराला असंख्य अडथळे निर्माण झाले आहेत.

बरेच दिवस रुसलेला मान्सून पुन्हा यावर्षी सक्रिय होणार असल्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत. गेल्या दशकभराच्या तुलनेत यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकर्‍यांबरोबर सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी गायब होणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. ‘मान्सून’ हा अरबी भाषेतल्या ‘मौसम’ या शब्दावरून आलेला असून, भारतीय लोकमानसाने त्याची सांगड पावसाशी घातली आहे. भारतातील बहुतांश प्रदेशातल्या शेतीचे, मानवी जीवनाचे आणि आर्थिक बाबींचे भवितव्य नैऋत्य मान्सूनवर अवलंबून असते. नैऋत्य मान्सूनच्या वार्‍याबरोबर पावसाचे आगमन भारतात होते. नैऋत्य मान्सूनचे वारे हिंदी महासागर व अरबी सागरावरून भारतात पर्जन्यवृष्टीसह प्रवेश करतात. नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या कालखंडात पर्जन्यवृष्टी करतो. २३ सप्टेंबरपासून मान्सून भारतीय उपखंडातून माघार घेतो. आपल्या परतीच्या प्रवासात नैऋत्य मान्सून ईशान्य भारताला आणि पूर्व किनार्‍याला पर्जन्यवृष्टी करतो तो ऑक्टोबर ते डिसेंबर या कालखंडात. दक्षिण अमेरिकेवरून वाहणारे एल निनो व ला निनो हे सागरी प्रवाह मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीवर परिणाम करत असतात.
कमी दाबाच्या प्रदेशात उष्णतेच्या प्रमाणात वृद्धी होते. थारसारख्या वाळवंटात उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते आणि त्यामुळे उन्हाळा सक्रिय असताना बाष्पाने भरलेले वारे भारतीय भूमीतल्या हिंदी महासागर व अरबी सागरावरून वाहू लागतात. त्याद्वारे दक्षिण भारतातून मान्सूनच्या पावसाचे आगमन होते. दक्षिणेकडच्या केरळातल्या कोवालम् येथे मान्सूनच्या पावसाचे पहिले आगमन होते. पश्‍चिम घाटातल्या निसर्गसंपन्न केरळात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यावर गोवा-कोकणातल्या लोकांना पावसाचे वेध लागतात. पश्‍चिम बंगालातील दार्जिलिंग आणि मेघालयातील शिलॉंग परिसरात केवळ भारतातलाच नव्हे तर जगातला जास्त पाऊस कोसळतो. याला कारण, नैऋत्य मान्सूनला बंगालच्या उपसागरातील अतिरिक्त बाष्प मिळते आणि त्यामुळे येथे मुसळधार पावसाच्या कालखंडात विलक्षण ओलावा निर्माण होतो. त्यामुळे सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होणारा मेघालयातील चेरापुंजी मान्सूनच्या वैभवाला हिरवाईने नटून-थटून सामोरा जातो. मान्सूनचा पाऊस जसा ग्रामीण भागात कोसळतो तसाच तो शहरी भागावरही तितक्याच ताकदीने बरसतो. मुंबईसारखे महानगर पर्जन्यवृष्टीनं अंगोपांगी न्हाते आणि त्यामुळे मुंबई आणि तिच्या परिसरातल्या जलस्रोतांना पाणी मिळते. म्हणूनच लक्षावधी लोकांची तहान भागवण्यात हे महानगर सफल ठरले आहे.
मुंबईपाठोपाठ कोलकाता या महानगराला मान्सूनद्वारे दरवर्षी पर्जन्यवृष्टी लाभते. तामिळनाडूतल्या चैन्नई महानगराला मान्सूनद्वारे पर्जन्यवृष्टी होते. पण त्याचे प्रमाण मुंबई आणि कोलकाताच्या तुलनेत कमी असते. तेलंगणाची राजधानी होण्यासाठी सिद्ध झालेल्या हैदराबादला नगण्य पर्जन्यवृष्टी होत असते. गोवा-कोकणच्या भूमीला मान्सूनच्या पावसाचे हजारो वर्षांपासून वरदान लाभलेले असून त्याची प्रचिती इथल्या भूगर्भशास्त्रीय, पुरातत्त्वीय इतिहास आणि लोकसंस्कृतीच्या संचितांतून येते.
गोवा-कोकणातल्या लोकमानसाला मान्सूनचा पाऊस किमयागार भासलेला आहे. पर्जन्यवृष्टी योग्य वेळी, मुबलक प्रमाणात झाली तर वृक्षवेलींचे व्यवस्थित पोषण होईल आणि धान्यांची चांगली पैदासी होऊन सुख-समृद्धीचे आगमन होईल अशी त्यांची पूर्वापार भावना आहे. सूर्य मृग नक्षत्रात आला म्हणजे पर्जन्यवृष्टी होते आणि चित्रा नक्षत्रात गेला म्हणजे पर्जन्यकाळ संपतो असा लोकसमज रूढ आहे. मृगापासून हस्तापर्यंतची नऊ नक्षत्रे पावसाची मानलेली आहेत. नक्षत्रांचे वाहन मंडूक, महिषी व हत्ती असेल तर चांगली पर्जन्यवृष्टी होईल; मयूर, मूषक व गर्दभ ही कमी पर्जन्यवृष्टी सूचक तर जंबूक व मेष ही दुष्काळसूचक आणि अश्‍व हे पर्वतावर होणार्‍या पर्जन्यवृष्टीचे सूचक मानले जाते. गोव्या-कोकणात, त्याचप्रमाणे इतरही बर्‍याच ठिकाणी जी ग्रामदेवताच्या रूपात गजलक्ष्मीची पूजा केली जाते ती मूलतः सुफलनाची देवता म्हणून. लोकसंस्कृतीचे संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मते गजलक्ष्मी संकल्पनेतील ‘गज’ हा मेघाचा प्रतिनिधी असून कालिदासाने आपल्या ‘मेघदूत’ काव्यात केवळ कल्पना म्हणूनच मेघाचे हत्तीशी साम्य वर्णिले आहे असे नव्हे तर आपल्या परंपरेतही हत्ती आणि मेघ यांचे साम्य- नव्हे एकत्व- सर्वत्र स्वीकारलेले आहे. इरा म्हणजे पाणी, अर्थातच ऐरावत म्हणजे इरावान, जलयुक्त मेघ असे मत मांडलेले आहे. गजलक्ष्मीच्या संकल्पनेत लक्ष्मी, पद्मा, पद्मजा, पद्महस्तालक्ष्मी ही धरती असून वर्षणशील गज पाण्याचे प्रतीक आहेत. बुद्धजन्माचे प्रतीक म्हणून तिचे पहिलेवहिले शिल्पांकन सांची-भरहूतच्या स्तूपावर करण्यात आलेले आहे. मान्सूनच्या पावसाचे ढग यांचे प्रतीक असलेली गजलक्ष्मी हिच्या मूर्तीवर हत्तींची चित्रे शेकडो वर्षांपासून गोवा-कोकणात प्रचलित आहेत. ही गजलक्ष्मी गोव्यात गजांतलक्ष्मी, केळंबिका, भावकाई, केळबाय म्हणून परिचित असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग परिसरात तिला भावेश्‍वरी, भावका, भावकाई इत्याची नावे प्रदान केलेली आहेत. सुफलनाची देवता म्हणून तिची आराधना इथल्या लोकमानसात स्वाभाविक ठरलेली आहे.
इथल्या लोकमानसाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेला हा मान्सून त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनातही आदराचे स्थान प्राप्त करण्यास कारणीभूत ठरलेला आहे. मान्सूनच्या पावसाचे आगमन ठरल्याप्रमाणे व्हावे अशी इथल्या लोकमानसाची स्वाभाविकपणे इच्छा असते. त्यामुळे एखाद्या वेळी मान्सूनचे आगमन लांबले तर त्यांच्या शेती-बागायतींचे अस्तित्व धोक्यात येऊन, एकंदर जीवनही संकटग्रस्त होते. त्यासाठी मान्सूनच्या आगमनाची त्यांना प्रतीक्षा असते. मान्सूनपूर्व पावसाच्या मुसळधारपणाला बर्‍याचदा मान्सून समजण्याची चूक होते. परंतु त्यानंतर मात्र ढगांचा गडगडाट करत, विजेचा लखलखाट करत मान्सूनचा पाऊस जेव्हा कोसळू लागतो तेव्हा मृत, त्राणहीन वाटणार्‍या सृष्टीच्या कणाकणात चैतन्याचा संचार होतो. निर्जीव शिलाखंडांवर हिरव्या-पोपटी शेवाळातून जीवनाची प्रचिती येते. ज्या तृणपात्यांनी ग्रीष्मात इतिहासाच्या उदरात गडप होणे पसंत केलेले असते, त्यांच्यातल्या हिरव्या वैभवाचा आविष्कार पावसाचे टपोरे थेंब घडवू लागतात. रानात, माळरानावर असलेल्या जंगली सुरणाच्या कंदाला कोंब फुटतो आणि तांबूस रंगाचे त्याचे दर्शन मनाला तृप्त करते. उन्मळून पडलेल्या झाडाच्या बुंध्यावर पिवळ्या रंगाच्या छटेची उधळण करत बुरशी प्रकट होते.
कुत्र्याची छत्री म्हणून परिचित असलेल्या अळंब्यांचे नानाविध प्रकार कुठे जमिनीतून, कुठे लाकडावर प्रकट होतात. सागवान, माडतीला आलेल्या पुष्पांचा बहर झाडाखाली जणू काही सडाच घालत असतो. मान्सून पावसाचे टपोरे थेंब प्राशन करून कृतार्थ झालेली आमरी सीतेची वेणी, द्रौपदीची वेणी घालण्यास सिद्ध होते. मान्सून पावसाच्या अतिवृष्टीत आमरीच्या पुष्पवैभवाने अलंकृत झालेली माळा विस्कळीत होते. डोंगराच्या कुशीत असलेल्या रानकेळी हिरव्या-पोपटी पानांच्या सौंदर्याने लगडून गेलेल्या असतात. मान्सूनचा पाऊस हा सृष्टीसाठी खरोखरच किमयागार असून मरणासन्न असलेल्या वृक्षवेलींच्या बर्‍याच प्रजातींना जागवत, जोगवत त्याचे होणारे आगमन प्रसन्नतेचा शिडकावा करत असते. रानहळद, आंबेहळदीचा पुष्पोत्सव जागृत करण्याचे काम पावसाद्वारे होते. गोवा-कोकणातल्या शेतकर्‍यांसाठी मान्सूनचा पाऊस एकेकाळी जगण्याचा आधार ठरला होता. परंतु आज शहरीकरणासाठी होणार्‍या बेशिस्त बांधकामामुळे, पर्यटन प्रकल्पांमुळे, मान्सूनातल्या सर्जन-सृजनाच्या आविष्काराला असंख्य अडथळे निर्माण झाल्याने, त्याची किमया आमच्या दृष्टीस मृगजळ ठरणार की काय?