महापौरांसह सहाजण बुडताना बचावले

0
87

>> सांतइनेज नाला स्वच्छतेच्या पाहणीवेळी दुर्घटना

 

काल सकाळी सांतइनेज नाल्याच्या स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेलेले पणजी महापालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्यासह एकूण सहाजण ‘डी-व्हिडींग मशीन’ उलटल्याने पाण्यात बुडाले. सुदैवाने सहाहीजण खोल पाण्यात न बुडाल्याने या दुर्घटनेतून बचावले. दुपारी बारा वाजता ही दुर्घटना घडली.

महापौर फुर्तादो, इन गोवाचे पत्रकार अनील लाड, गोवन वार्ताचे क्रांतीराज सम्राट, माजी नगरसेवक बेंतू लॉरेन्स, यंत्र चालक व मदनीस मिळून सहाहीजण मशीनवर होते. एका बाजूने चौघांचे व दुसर्‍या बाजूने दोघांचे वजन झाल्याने मशीन उलटले व सर्वजण नाल्यात बुडाले. महापौर फुर्तादो बराच वेळ पाण्यात गटांगळ्या खात होते.
पाण्यात पडलेल्या मदतनिसाने महापौरांना बुडालेल्या मशीनमधून ढकलल्याने ते वर आले. सर्वजणांच्या पोटात दुर्गंधीयुक्त पाणी गेल्याने त्यांची तारांबळ उडाली. मशीन नाल्याच्या मध्यभागी न उलटल्याने अनर्थ टळला.
या दुर्घटनेत लाड यांचा कॅमेरा, महापौरांचा मोबाईल व चष्मा पाण्यात गेला. हे मशीन ऑपरेटर व मदतनीस मिळून दोघांचे वजन पेलू शकते. वजन जास्त झाल्यामुळेच वरील अपघात घडला.
आपण महापौर फुर्तादो यांना मशीनवर न जाण्याचा सल्ला दिला होता. ऑपरेटर व मदतनीस वगळता अन्य लोकांना मशीनवर उभे करणे चुकीचे होते. त्यामुळेच हा अपघात घडल्याचे ताळगावच्या आमदार झेनिफर मोन्सेर्रात यांनी सांगितले.
या अपघातामागे मशीनचा दोष नसल्याचे मशीन मालकांचे म्हणणे आहे. फुर्तादो यांनी तपासणीसाठी पत्रकारांना बोलावले होते. काही पत्रकारांनी मशीवर जाण्याचे धाडस न करता नाल्याच्या तटावर उभे राहून नाला सफाईचे प्रात्यक्षिक पाहण्याचे पसंत केल्याने ते या दुर्घाटनेतून बचावले.
वरील अपघात घडण्यापूर्वी महापौर आपल्या नेहमीच्या अविर्भावात नाला सफाईची पत्रकारांना माहिती देत होते. मात्र, अचानक पाणी वर आले ते पाहून भयभीत झालेल्या महापौरांनी तोल सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मशीन उलटल्याने त्यांच्यासह सर्वजण नाल्यात
पडले.