‘फायटर’ महिलांची गरूडझेप!

0
218

हेमंत महाजन(निवृत्त ब्रिगेडियर)

देशातील तीन महिला वायुसेनेत लढाऊ विमानांच्या पायलट बनल्या आहेत. सरकारचा या निर्णय सैन्यदलांच्या ङ्गायटर स्ट्रीममध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. आता इतर सशस्त्र दलांमध्येही महिलांना लढाऊ विमानांच्या पायलट म्हणून महिलांना संधी मिळायला हवी…

देशात प्रथमच तीन महिला वायुसेनेच्या लढाऊ विमानाच्या पायलट बनल्या आहेत. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या तीन महिलांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वायुसेनेने नुकतेच ‘कमिशन’ दिले. हैदराबादच्या डिंडिगल भागात असलेल्या वायुसेनेच्या अकादमीत प्रशिक्षण घेतल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना भारतीय वायुसेनेत कमिशन दिले. लढाऊ विमानात पायलट म्हणून प्रथमच कमिशन मिळालेल्या महिला म्हणून या तिघींना मान मिळाला आहे. सर्व अडथळे पार करून भारतीय वायुसेनेच्या इतिहासात आपले नाव कोरणार्‍या अवनी, भावना आणि मोहना या तिघींना कर्नाटकातील बिदर येथे तिसर्‍या स्तराचे प्रशिक्षण दिले जाईल आणि नंतर सुखोई आणि तेजस यांसारख्या लढाऊ विमानांचे सारथ्य त्यांच्याकडे सोपविले जाईल.
मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी असणार्‍या अवनीच्या परिवारातील सदस्यही लष्करात अधिकारी आहेत आणि हे ध्येय साध्य करण्याची प्रेरणा अवनीला तिच्या लष्करातील भावाकडून मिळाली. आकाशात उडण्याचे स्वप्न अवनीने नेहमीच पाहिले होते आणि त्यामुळेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ती फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाली. बिहारच्या दरभंगामध्ये राहणारी भावनासुद्धा लहानपणापासून विमानातून उड्डाण करण्याचे स्वप्न रंगवीत होती. प्रथम स्तरावरील प्रशिक्षण पार पाडल्यानंतर भावनाने लढाऊ श्रेणीच्या विमानाची निवड केली. तिचे वडील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये अधिकारी असून, भावनाला लढाऊ विमानाचे पायलट बनावे, असे ङ्गार पूर्वीपासून वाटत होते. राजस्थानच्या झुंझुनू येथील रहिवासी मोहना हिचे आजोबा एव्हिएशन रिसर्च सेंटरमध्ये फ्लाइट गनर होते, तर तिचे वडील आयएएङ्गमध्ये वॉरंट अधिकारी होते. देशसेवेचा कुटुंबाचा वारसा पुढे चालविण्यास मोहना उत्सुक आहे.
ङ्गायटर स्ट्रीममध्ये महिलांना सहभागी करण्याचा निर्णय केंद्राने प्रदीर्घ काळ विचारविनिमय केल्यानंतर घेतला आहे. महिलांना या श्रेणीत समाविष्ट करून घेतले जाईल, अशी घोषणा वायुसेनेच्या ८३ व्या स्थापनादिनी वायुसेना प्रमुख अरुप साहा यांनी केल्यावर महिलांच्या सहभागाची आशा पल्लवित झाली होती. वायुसेनेत महिला अधिकार्‍यांची संख्या सद्यःस्थितीत १३०० आहे. यात महिला पायलट संख्येने कमी आहेत; परंतु ज्या पायलट आहेत, त्या महिलाही मिराज, सुखोई, मिग किंवा जगुआर अशी लढाऊ विमाने चालवीत नाहीत. या महिला केवळ वाहतूक करणारी विमाने आणि हेलिकॉप्टरच्या उड्डाणांमध्ये पारंगत आहेत. महिलांचा सहभाग वायुसेनेत साडेआठ टक्के आहे. तीनही सशस्त्र सेनादलां मधील ही सर्वाधिक संख्या आहे. वायुसेनेच्या सात विभागांत महिला काम करतात. आता त्या ङ्गायटर पायलट बनल्या असून, संरक्षणविषयक तज्ज्ञांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पूर्वी अशा स्वरूपाचा निर्णय घेण्याची गरज किंवा आवश्यकता कधी भासली नाही. ज्यावेळी ङ्गायटर विमान शत्रूकडून नष्ट करण्यात येते, तेव्हा पायलट शत्रूच्या हाती सापडतो. अशा वेळी शत्रूच्या सैनिकांकडून त्याचे अनेक प्रकारे हाल केले जातात. महिलांच्या बाबतीत याच गोष्टीचा विचार केला गेल्या मुळे निर्णय घेण्यास उशीर लागला.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही याच गोष्टीबाबत चिंता व्यक्त केली होती. लढाऊ वैमानिकाच्या प्रशिक्षणावर १३ कोटी रुपयांचा खर्च होतो. जर महिलांनी हे प्रशिक्षण घेतले, तर लग्नानंतर त्यांना मुले-बाळे झाल्यावर हा खर्च वाया जाईल, असेही ते म्हणाले होते. परंतु याच संरक्षण मंत्रालयाचा दृष्टिकोन आता बदलल्याचे दिसत आहे.
वायुसेनेत महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याचा निर्णय २०१० मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता. यापूर्वी महिलांचा सेवाकाळ कमी होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महिलांना लढाऊ विमानात पायलट म्हणून सेवा बजावण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतल्यानंतर महिलांचा सहभाग नाही, असे वायुदलातील एकही क्षेत्र शिल्लक उरलेले नाही. यापूर्वी वायुसेनेच्या सात विभागांत म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टर, नेव्हिगेशन, एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग, प्रशासन, लॉजिस्टिक्स, अकाउंट्‌स तसेच शिक्षण आणि हवामान विभागात महिलांना भरती होण्याची संधी दिली जात होती. वायुसेनेने महिलांसाठी आपले दरवाजे १९९० च्या दशकाच्या सुरुवातीलाच उघडले होते. तेव्हापासून आजतागायत महिलांनी वायुसेनेत विविध प्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. वायुसेनेत सध्या १५०० महिला अधिकारी आहेत. यातील ९४ महिला पायलट आणि १४ नेव्हिगेटर आहेत. साडेआठ टक्के महिला अधिकारी-कर्मचारी असणार्‍या वायुसेनेला आता महिला ङ्गायटर वैमानिक लाभल्या आहेत.
आधीच्या सर्व टप्प्यांतील परीक्षांप्रमाणेच लढाऊ विमानाच्या परीक्षेतही त्या यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्या आहेत. वायुसेनेने हे पाऊल उचलल्यानंतर आता लष्कर आणि नौदलानेही महिलांना युद्धकाळातील जबाबदार्‍या सोपविण्यासाठी पावले उचलायला हवीत. पुरुषांप्रमाणेच महिलाही सशस्त्र सेनेच्या कोणत्याही विभागात काम करू शकतात. सोपविली जाईल ती जबाबदारी पेलू शकतात. ङ्गक्त त्यांना संधी मिळण्याची गरज आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायला उशीर लावला; परंतु अखेर उत्तम निर्णय घेतला, असेच म्हणावे लागेल. पुरुषांचे अधिपत्य असलेल्या आणखी एका क्षेत्रात चमकदार कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान महिलांनी स्वीकारले आहे.