योग ः तंत्र नव्हे मंत्र

0
288

– प्रा. रमेश सप्रे

सध्या आपण आरोग्याच्या-जीवनाच्या दृष्टीनं चांगल्या (सात्त्विक) गोष्टींपासून तोडले जात आहोत आणि घातक (तामस) गोष्टींशी जोडले जात आहोत. आपला आहार, विहार, कुटुंब, निसर्ग, नातेसंबंध अशा जीवन घडवणार्‍या, ‘स्वास्थ्य’ सांभाळणार्‍या गोष्टींपासून तुटून आत्मघात करून घेत आहोत. अशावेळी ‘योग’ ही केवळ व्यायामाची पद्धती किंवा उपचार पद्धती न राहता एक जीवनसरणी बनते. हीच खरी आजच्या काळाची गरज आहे. खरंच, ‘योगजीवनशैली’ हा खरा मंत्र आहे.
काही वर्षांपूर्वी ‘योगा’ असा आंग्ल (इंग्रजी) उच्चार असलेला शब्द आता त्याच्या मूळ संस्कृत स्वरूपात ‘योग’ म्हणून प्रतिष्ठित झालाय. हेही नसे थोडके!

आता ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा होतोय. आजचाच २१ जून हा तो दिवस. खरंच जगभर आता योगजागृती झालेली आहे. आपला प्रिय भारत सार्‍या जगाला काय देऊ शकतो याचा अभिमानदायी प्रत्यय आपल्याला येऊ लागलाय. यात गंमतीचा भाग म्हणजे अलीकडच्या काळातली योगाची लोकप्रियता आधी परदेशी जाऊन- मान्यता पावून आपल्याकडे पुन्हा नव्यानं रुजू झालीय- खरं तर रुजू लागलीय. अशा अर्थात इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या आपण निर्यात केल्या व नंतर आयात करून (इंपोर्टेड) त्यांना आपलंसं करू लागलो. याचं एक सन्माननीय उदाहरण म्हणजे शाकाहार!
कोट्यवधी लोक शाकाहारी असलेल्या आपल्या देशातील उच्चभ्रू श्रीमंत, अतिशिक्षित लोकांना आता शाकाहार प्रतिष्ठेचा वाटू लागलाय. कालाय तस्मै नमः!
तर योगाची मनाच्या संतुलनासाठी अन् मनबुद्धीच्या नियंत्रणाखाली देहइंद्रियांना आणण्यासाठी प्रभावी उपयुक्तता अलीकडच्या काळात पाश्चात्त्य देशांना कळली त्याचा इतिहास मनोरंजक आहे.
व्हिएतनाम युद्धातून माघारीची नामुष्की अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला स्विकारावी लागली. हजारो सैनिक मायदेशी परतले. त्यावेळी त्यांची अवस्था कशी होती? एखाद्या विकृत नरपशूसारखी. अनेक सैनिकांचं मनबुद्धीवर नियंत्रण राहिलं नव्हतं. त्यांच्यातली रानटी पशुवृत्ती जागी झाली होती. सामान्य नागरिकांना त्यांच्याकडून सर्व प्रकारचा उपद्रव होऊ लागला. तिकडच्या औषध व उपचारप्रणालीच्या मर्यादा त्यांना जाणवू लागल्या. त्यांना काहीही करून या सैनिकांच्या मनाचं संतुलन साधायचं नि राखायचं होतं. कोणतीही अपारंपारिक उपचारपद्धती त्यांना चालणार होती. त्यावेळी अशा इतर औषधाशिवाय उपचार करणार्‍या (नॉनमेडिसिनल मेडिसिन्) पद्धतींचा अवलंब करून पाहिला. सर्वांत उत्तम नि गुणकारी ठरली योगपद्धती किंवा योगोपचार प्रणाली.
पाश्चिमात्य मंडळींचं एक बरं असतं, कोणतीही गोष्ट प्रभावी वाटली, उपयुक्त ठरली, आवडली की ती स्विकारायची, तिचा अगदी सांगोपांग अभ्यास करायचा. मग ती गोष्ट कोणत्या धर्माची, कोणत्या देशातली, कोणत्या रंगाची (केशरी-हिरवी-निळी-लाल) याचा विचार ते करत नाहीत. अभ्यास करून, आपल्या जीवनसरणीला ती अनुकूल बनवून तिचा निःशंक मनानं स्विकार करतात. या संदर्भात ‘योगाभ्यासा’ला लाभलेलं भाग्य ही आपल्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट ठरली. आता आपणही दैनंदिन जीवनात योगाला महत्त्व देऊन खर्‍या अर्थानं ‘भाग्यवान’ ठरू लागलो आहोत. यानंतर अर्थातच सर्वत्र योगकुटिरं, योग-आश्रम, योगमंदिरं, योगविद्यालयं सुरू झाली. अनेक योगशिक्षक तयार झाले. तसेच योगशास्त्रात प्रवीण असे योगगुरुही निर्माण झाले. एका अर्थानं परदेशी लोकांना जिंकण्यासाठी योग हे प्रभावी साधन ठरलं.
पाश्चात्यांनी योगशास्त्रात विविध प्रयोग केले. त्यांना योगाच्या तत्त्वज्ञानात फार रस नव्हता. योगविषयक तंत्रज्ञान (योगा-टेक्नॉलॉजी) विकसित करायला त्यांनी सुरुवात केली. योगातला मंत्र काहीसा मागे पडला व तंत्राला महत्त्व प्राप्त झालं. उपयुक्ततेच्या दृष्टीनं हे ‘योग्य’ होतं. पण तेवढं ‘योग्य’ (योगशास्त्राला धरून) नव्हतं. एक उदाहरण सांगण्यासारखं आहे. सर्वांत लोकप्रिय योगासन कुठलं असेल तर ‘शवासन’. योगाभ्यासाच्या शेवटी येणार्‍या या आसनाची अनेकजण वाट पाहतात कारण यातून ‘निद्रासनां’त जाण्याची सोय असते ज्याच्यासाठी योगशास्त्रात ‘समाधी’ हा शब्द वापरला जातो. यातील विनोदाचा भाग सोडू या.
पण या शवासनाचे एकूण शरीराच्या, आतील संस्थांच्या (श्‍वसन-पचन- चलनवलन- मज्जासंस्था इ.) आणि मनाच्याही शिथिलीकरणासाठी (रिलॅक्सेशन) व एकूणच मनःशांतीसाठी असलेले लाभ लक्षात घेऊन पाश्चात्त्य योगसाधकांनी प्रयोग करून शवासनांच्या काही पद्धती शोधून काढल्या.
* केंद्रोत्सारी शवासन (सेंट्रिफ्यूगल)- ज्यात हृदय हे जीवाचं – जीवनाचं एक ऊर्जाकेंद्र मानून विचार केलाय. कारण हृदयक्रिया बंद पडली की जीवन संपतं हे सर्वमान्य आहे. यात हृदयापासून क्रमाक्रमानं देहाच्या सर्व भागाचं अचेतनीकरण (निर्जीवीकरण) जाणीवपूर्वक करायचं असतं. हळुहळू सारा देह अचेतन झाल्याची ‘जाणीव’ आपल्याला होते. खूप हलकंमोकळं, शांत वाटतं.
* केंद्राभिगामी (सेंट्रीपेटल) शवासन- यात पायाच्या बोटांपासून मस्तकापर्यंतच्या शरीराच्या सर्व भागातली चेतना (संवेदना) काढून हृदयात केंद्रित करायची असते.
* देहाचे पापुद्रे (किंवा थर) कल्पून केलेलं (लॅमिनेटेड) शवासन- पायापासून मस्तकापर्यंत देहाचे छोटे छोटे पापुद्रे (लॅमिना) कल्पून तिथला प्राण काढून त्याचं विसर्जन हृदयात करायचं असतं.
या फार प्रभावी पद्धती आहेत. देह व मन सैल, शांत करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पाश्चात्त्य लोक प्रयोग करून आधुनिक जीवनशैलीच्या दृष्टीनं योगशास्त्राच्या अभ्यासात परिवर्तन- संशोधन करताहेत. असो.
आजच्या योगदिनानिमित्तानं एका महत्त्वाच्या योगपैलूवर सहचिंतन करुया.
‘योग’ या शब्दाचा मूळ अर्थ आहे जोडणे किंवा सांधणे. ‘संयोग’ म्हणजे ‘जोडणे’ किंवा ‘जुळणे’ आणि ‘वियोग’ म्हणजे ‘तोडणे’ किंवा ‘तुटणे’. सध्या आपण आरोग्याच्या – जीवनाच्या दृष्टीनं चांगल्या (सात्त्विक) गोष्टींपासून तोडले जात आहोत आणि घातक (तामस) गोष्टींशी जोडले जात आहोत. आपला आहार, विहार, कुटुंब, निसर्ग, नातेसंबंध अशा जीवन घडवणार्‍या, ‘स्वास्थ्य’ सांभाळणार्‍या गोष्टींपासून तुटून आत्मघात करून घेत आहोत. अशावेळी ‘योग’ ही केवळ व्यायामाची पद्धती किंवा उपचार पद्धती न राहता एक जीवनसरणी बनते. हीच खरी आजच्या काळाची गरज आहे.
खरंच, ‘योगजीवनशैली’ हा खरा मंत्र आहे.
सध्याचं आपलं जीवन यंत्र-तंत्रानं अधिकाधिक व्यापून जाऊ लागलंय. मंत्र विसरला जातोय, इतकंच नव्हे तर तंत्रानं मंत्रावर कुरघोडी केलेली आहे.
योगाचं तंत्र अनेकांना माहीत आहे. दूरदर्शनवरून किंवा विविध शिबिरातून याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन सुरू असतं. ही चांगली गोष्ट आहे. आज योगाची जी सार्वत्रिक लोकप्रियता दिसून येतेय ती इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वाहिन्यांमुळे शक्य झाली आहे. पण या सर्व गदारोळात योगाचा मंत्र विसरला जातोय.
काय आहे योगाचा मंत्र?
याविषयी उत्कृष्ट व अचूक मार्गदर्शन गीता व महर्षी पतंजलींच्या योगदर्शनात आहे. त्याची एक झलक पाहू या.
भगवंतांनी गीतेत योगाच्या दोन सुंदर व्याख्या सांगितल्याहेत. यातून त्यांनी योगाची संकल्पना व्यक्तिविकास व समाज-कल्याण या दृष्टीनं स्पष्ट केलीय. स्वामी विवेकानंदांनी जो ध्येयमंत्र आपल्या संघटित समाजकार्यासाठी सर्वांना दिला तो म्हणजे- ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च|’ अर्थ उघड आहे. जगाच्या हितातूनच (सेवेतून) माझ्या मुक्तीचा मार्ग जातो. आत्मकल्याणासाठी समाजकल्याणाची पूर्वअट आहे. याची सतत स्मृती राहावी म्हणून त्यांनी ‘रामकृष्ण संघटनेच्या बोधचिन्हात एका ध्याससूत्राचा समावेश केला, ‘तत् नो हंसः प्रचोदयात्‌|’
हे खरं योगाचं कार्य आहे. योग करणार्‍या व्यक्तीला सुरुवातीला ‘योगसाधक’ तर शेवटी ‘योगसिद्ध’ किंवा ‘योगी’ म्हटलं जातं. यासाठी गीतेतलं मार्गदर्शन प्रभावी ठरतं-
* समत्वं योग उच्यते|- म्हणजे सर्वप्रकारच्या समत्वाला (साम्यदशेला) योग म्हणतात.
ःः आरोग्ययोगासाठी – कफ-वात-पित्त यात समस्थिती हवी. विषमस्थिती झाली की आपलं आरोग्य धोक्यात येतं. (हा आरोग्ययोग)
ःः व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी – शरीर-मन-बुद्धी-चित्त यात समतोल. सर्वांच्यात एकसूत्रता, एकवाक्यता (कोऑर्डिनेशन किंवा हार्मनी) हवीच. योगानंच हे साध्य होतं. (हा विकासयोग).
* समाजाच्या खर्‍या प्रगतीसाठी – सर्व समाजगटात सामंजस्य, सहिष्णूता, सहजीवन यातून असा समाज निर्माण होतो. याला विनोबांनी खरा ‘साम्ययोग’ असं म्हटलंय.
* मनःशांतीसाठी – मनन-चिंतन-ध्यान-प्रार्थना यातून निर्माण होणारी साम्य दशा (सम अवस्था, समत्व) एकूणच जीवनात शांती-समाधान-आनंद यांचा वर्षाव करते.
गीतेत भगवंतांनी योगाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू सांगितलाय-
* योगः कर्मसु कौशलम्‌| – सर्व प्रकारच्या कर्मातलं कौशल्य म्हणजे योग. कौशल किंवा कुशलमंगल म्हणजे क्षेम-कल्याण. ज्या कौशल्यानं केलेल्या कर्मातून इतरांचं मंगल (कल्याण) साधलं जातं ते योगकर्म. थोडक्यात आपल्या जीवनात आंतरिक समत्व (शांती) नि बाह्य संतुलन (स्थिर चित्तवृत्ती) असणं आवश्यक आहे. जे योगसाधनेतून साधता येतं. साधायला हवं. त्यासाठी साधनं नकोत, साधना हवी.
महर्षी पतंजलींची योगसूत्र प्रसिद्ध आहेत. तनामनाच्या आरोग्यासाठी नि आरोग्यमय (निरोगी) जीवनासाठी ही सूत्रं आज पूर्वीपेक्षाही अधिक उपयोगी आहेत.
* योगः चित्तवृत्तिनिरोधः| – हे अगदी आरंभी आरंभी आलेलं सूत्र. मनाच्या वृत्ती म्हणजे मनोव्यापार, विचार-भावना-कल्पना, मनाच्या उर्मी-उद्रेक यावर नियंत्रण हवं. त्यासाठी अष्टांगयोगाचा विचार आला आहे. ती सर्वपरिचित आठ अंगं(पैलू) म्हणजे …
* यम * नियम * आसन * प्राणायाम * प्रत्याहार * धारणा * ध्यान * समाधी. या आठ अंगांपैकी आसन व प्राणायामावर खूपच भर देण्यात येतो. इतका की जणू बाकीची अंगं महत्त्वाची नाहीत. यम-नियमांचं पालन अवघड असतं. तर प्रत्याहार-धारणा-ध्यान ही आत, अगदी समाधीच्या अनुभवापर्यंत नेणारी साधनं दुर्लक्षित राहतात.
मनाचा संबंध भावनांशी असतो. भावना कोमल, हळुवार असतात. त्यात अर्पण समर्पणाची, सेवा-त्यागाची अपेक्षा असते. या संदर्भात महर्षी पतंजलींचं सूत्र आहे….
* ईश्‍वरप्रणिधानात् – परमेश्‍वर नावाच्या शक्तीला, चैतन्याला शरणपूर्वक समर्पण करण्यात खरी योगाची सार्थकता आहे. यातून विनयी, नम्र, अनाग्रही व्यक्ती घडते. योगसाधक हा अहंकारी, उद्धट, मदांध नसला पाहिजे. तसं असणं हा योगविद्येचा अपमान आहे. अशी ही परमेश्‍वर नावाची अदृश्य – अव्यक्त – असीम शक्ती आहे तिचं स्वरूप कसं असतं नि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी कोणती उपासना करायला हवी?- पतंजलींच्या शब्दात….
* तस्य वाचकः प्रणवः – याचा अर्थ त्या परमेश्‍वराचं नाव आहे ‘प्रणव’ म्हणजे प्रत्येक क्षणी प्रकर्षानं (तीव्रतेनं) जो नवीन असतो – चिरनूतन असतो तो. हे कधीही जुनं, शिळं जीर्णशीर्ण न होणारं चैतन्य म्हणजे परमेश्‍वर किंवा ‘ॐ’. त्याचं स्मरण ठेवायचं. नामस्मरण करायचं. कसं..?
* तत् जपः तत् अर्थ भावनम् – त्या नामाचा (ॐकाराचा) जप करायचा म्हणजे केवळ शब्दाचा (मंत्राचा) उच्चार करायचा नाही तर त्याचा अर्थ लक्षात घेऊन, त्याच्यावर चिंतन करत भावपूर्णतेनं स्मरण करायचं. ईश्‍वराच्या जपात डोकंही हवं (अर्थ चिंतन) नि हृदयही (भावस्पंदनं)!
पतंजलीची ही सूत्रं योगासनं, प्राणायाम यांच्याद्वारे अंतर्मनाशी जोडणारी, संवाद साधणारी आहे. योगासनं केली जातात पण ही योगसूत्रं विसरली जातात. यासाठी बाहेरून देहाची आसनं करत असताना मन शांत व बुद्धी स्थिर करण्याचा अभ्यास जाणीवपूर्वक केला पाहिजे. यातून चित्ताची प्रसन्नता लाभते. भगवंतांनी गीतेच्या शेवटी याला ‘मनःप्रसाद’ म्हटलंय. शांतीसाठी असा मनःप्रसाद (मनाची प्रासादिक अवस्था) आवश्यक आहे.
युद्धारंभी (गीतेच्या आरंभी) ‘विषाद (शोक, मोह)ग्रस्त’ झालेला अर्जुन भगवंताशी जोडलेला राहिल्याने (अर्जुनविषाद योग) अखेरीस ‘प्रसादयोगा’पर्यंत पोचतो. धर्मयुद्ध जिंकायला व हस्तिनापुरात ‘धर्मराज्य’ सुरू करायला साह्यभूत होतो. हा खरा ‘योगाचाच प्रभाव’ आहे.
समर्थ रामदासांच्या शब्दात- ‘करी वृत्ति जो संत तो संत जाणा|’ पतंजलींचा भरही मनोवृत्तींच्या स्थिरतेवरच आहे. पू. गोंदवलेकर महाराजांना नामस्मरणानं योगाचे सगळे अनुभव येतात का?’ असं विचारल्यावर आत्मविश्‍वासानंच नव्हे तर आत्मप्रचीतीतून त्यांनी दिलेलं उत्तर या संदर्भात महत्त्वाचं आहे.
‘नामस्मरण हा सहजयोग आहे. कष्टानं व प्रयत्नानं योगसाधनेतून मिळणारे अनुभव नामसाधनेतून सहज मिळतात. नाम श्‍वासोच्छ्‌वासासारखं मात्र घ्यायला हवं’. खरंच श्‍वासाचाच प्राण (प्राणायाम) बनतो जो क्रमाक्रमानं धारणा-ध्यान-समाधीपर्यंत घेऊन जातो. ही लिहिण्या-बोलण्याची नव्हे तर करण्या-जगण्याची गोष्ट आहे. समजलं ना?