योगसाधना – २६१ योगमार्ग – राजयोग स्वाध्याय – ८८

0
133

– डॉ. सीताकांत घाणेकर

आज २१ जून. विश्‍वातील सर्वांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. कारण सन २०१५ म्हणजे मागील वर्षी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला गेला. शेकडो राष्ट्रांतील करोडो व्यक्तींचा या सोहळ्यात सहभाग होता.
युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीत याबद्दल ठराव सर्व राष्ट्रांच्या संमतीने व एकमताने पास झाला. कदाचित अपवादात्मक ही घटना असेल की एका ठरावाला सर्वांनी आनंदाने संमती दिली.
योग दिवसाचा मुख्य संदेश ः
* ऐक्य व शांतीसाठी योग!
मला तर वाटते की ज्या कुणी हा संदेश दिला असेल त्याला योगशास्त्राबद्दल संपूर्ण माहिती आहे. त्यांचा या विषयावर सखोल अभ्यास आहे. खरेंच, इथे ईश्‍वरी संकेतसुद्धा दिसतो. कारण विश्‍वाला या क्षणी या ऐक्याची व शांतीची आत्यंतिक गरज आहे.
सर्व भारतीयांसाठी ही घटना फारच अभिमानास्पद आहे. तसे पाहिले तर आपल्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी या संदर्भात विविध घोषणा केल्या होत्या.
* वसुधैव कुटुंबकम्!
– या वसुधेवर म्हणजे पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी – फक्त मानवच नव्हे – एका वैश्‍विक कुटुंबासारखे आहेत. त्यांनी सर्वांचे ऐक्य साधून सुखशांतीने रहावे.
यासाठी त्यांनी दुसरी एक चांगली घोषणा केली.
* कृण्वंतो विश्‍वं आर्यं!
– सर्व विश्‍वांतील मानवजातीला आर्य करावे. इथे आर्य हा ‘जातीवाचक’ शब्द नाही तर तो ‘गुणवाचक’ शब्द आहे. आर्य म्हणजे – ज्ञानी, सुशिक्षित, सुसंस्कृत!
किती दूरदृष्टी दिसते या महापुरुषांची! सर्वजण एका कुटुंबासारखे राहिले व सगळे सुसंस्कृत झाले तर ऐक्य व शांती आपोआपच अभिप्रेत आहे. योगशास्त्राचा सास्त्रशुद्ध अभ्यास करताना लक्षात येते ती योगसत्र सुरू करताना पहिली प्रार्थना…
* ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै|
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः!…(सामवेद)
वरील प्रार्थना सामवेदातील आहे. भगवंताकडे मागणी आहे…
* आम्हा दोघांचे रक्षण कर, भरण-पोषण कर. दोघांना बरोबर शक्ती प्राप्त होऊ दे. आमची विद्या तेजस्वी असू दे. आम्ही एकमेकांचा द्वेष करू नये. (त्रिलोकांत ) स्वर्ग-पृथ्वी-पाताळात शांती असू दे.
आश्रमात विद्यार्जन करताना ही प्रार्थना विद्यार्थी आपल्या गुरुंकडून प्रथम शिकत असत. म्हणून इथे दोघे म्हणजे गुरु व शिष्य. पण ही प्रार्थना सर्वांसाठी आहे.
या प्रार्थनेचा गर्भितार्थ पाहता सहज लक्षात येईल की दोघांचे ऐक्य अपेक्षित आहे. दोघे एकमेकांसाठी प्रार्थना करतात. तसेच शेवटी विश्‍वशांतीची अपेक्षा ठेवतात.
अशीच एक दुसरी प्रार्थना आहे.
* ॐ असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय | ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
– इथे प्रभुकडे विनंती आहे. मला असत्याकडून सत्याकडे न्यावे. (अज्ञानरुपी) काळोखाकडून (ज्ञानरुपी) प्रकाशाकडे न्यावे. मृत्यूकडून अमरत्वाकडे न्यावे. सर्वांना शांती लाभू दे.
इथेसुद्धा जीवनाचे तत्त्वज्ञान पुरेपूर भरलेले दिसते. त्याचबरोबर एक अत्यंत अर्थपूर्ण व भावपूर्ण प्रार्थना म्हणजे…
* सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः|
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्‍चित दुःखभाग्‌भवेत्‌॥
– हे विश्‍वकर्ता, सर्वांना सुखी ठेव. विविध तर्‍हेच्या पिडांपासून त्यांची सुटका कर. स्वतःचे कल्याण कशात आहे याचे ज्ञान सर्वांना होऊ दे. कुणालाच दारिद्य्रात ठेवू नकोस.
हीच तर भारतीय तत्त्वज्ञानाची महत्ता व पवित्रता आहे. आम्ही सर्वांसाठी म्हणजे अवघ्या प्राणिमात्रांसाठी प्रार्थना करतो. आमच्या मागणीत संकुचित दृष्टी नसते.
विश्‍वाकडे चौफेर नजर फिरवली तर एक महाभयंकर दृश्य दिसते.
– व्यक्तीचे व कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडले आहे.
– अनेक ठिकाणी मारामार्‍या, खून, आत्महत्या, दंगे, लढाया, आतंकवाद, लांचलुचपत, प्रदूषण दिसते.
– त्यांत भर म्हणून नैसर्गिक समस्या- दुष्काळ, वादळे, अतिवृष्टी, भुकंप, विविध रोगराई वाढतातच आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकच नाही तर समाजातील विद्वान व धुरीणदेखील चिंतेत आहे. सर्वांचा एकच प्रश्‍न – हे का घडते? आणि याला उपाय काय?…
मला वाटते की योगशास्त्र हा या समस्यांसाठी उत्कृष्ट व एकमेव पर्याय आहे. पण या विषयाचा अभ्यास शास्त्रशुद्ध व सखोल हवा. सर्व योगमार्ग व त्यांतील प्रत्येक पैलुबद्दल विस्तृत माहिती हवी.
आपल्या ज्ञानी ऋषींनी वरील सर्व विषयांवर चिंतन करून आम्हा भारतीयांना सुंदर असे विविध योगमार्ग दिलेले आहेत- प्रामुख्याने ज्ञान, कर्म, भक्ती, राज (अष्टांग). स्वतः प्रभुश्रीकृष्णाने अवतार घेऊन पूर्णयोगशास्त्र श्रीमद्भगवद्गीतेच्या रूपाने वेद-उपनिषदांच्या साररूपात दिले आहे. या सर्वांचा अभ्यास अपेक्षित आहे.
आपल्याला दिसत असलेली विविध संकटे बहुधा मानवनिर्मितच आहेत. अज्ञानामुळे किंवा विपरीत ज्ञानामुळे संपूर्ण मानव समाज (काही अपवाद सोडून) आत्मकेंद्री, स्वार्थी झाला आहे. स्वतःला विश्‍वाचा स्वामी समजायला लागला आहे. आपल्या मूर्खपणातून निसर्गाला जिंकू पाहात आहे. मुख्यतः मानवाला अत्यंत आवश्यक गोष्ट करायला हवी, ती म्हणजे त्याने निसर्गाबरोबर राहायला शिकले पाहिजे. त्याच्याबरोबर सहकार्य करायला पाहिजे. आपले सर्व ऋषी हेच करत होते. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जात असे. म्हणजेच निसर्गाबरोबर ऐक्य साधले जात होते. शांती आपोआप मिळत असे.
अनेक संत-महापुरुषांनी योगशास्त्राचा प्रचार, प्रसार विविध तर्‍हेने केला. आजसुद्धा अनेक संस्था या संदर्भात सुंदर कार्य विश्‍वभर करत आहेत. या सर्वांत स्वामी विवेकानंदांचे कार्य प्रशंसनीय आहे. स्वामीजींनी एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी जगभर वेदांत व योग यांचे बीज पेरले होते. हळूहळू त्याचे रोपटे वाढतच होते आणि आता त्याचा वटवृक्ष होतो आहे.
एका घटनेत मला ईश्‍वरी संकेत दिसतो- स्वामी विवेकानंदांचे पूर्वाश्रमीचे नाव होते नरेन्द्र. युनायटेड नेसन्सच्या जनरल असेंब्लीत योगशास्त्राबद्दल ठराव मांडणारे होते – आपल्या भारताचे प्रधानमंत्री – नरेंद्र मोदी. स्वामी विवेकानंद तर विश्‍वविख्यात योगमहर्षी होतेच. पण माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदीसुद्धा योगसाधक आहेत. दोन नरेंद्र इथे दिसतात.
काही का असेना, कुणामुळेही का असेना… विश्‍वाचे ऐक्य व विश्‍वशांती सर्वांसाठी अत्यावश्यक आहे. त्यासाठी तरी विश्‍व एकजूट होत आहे. आपल्या भारतीयांचेही ते आद्य कर्तव्यच आहे की प्रत्येकाने ‘योगाभ्यास’ करून योगसाधना करावी. जसा स्वाध्याय आळस न करता नियमित करायचा असतो तशीच योगसाधना जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवी.
बालपणी एक प्रार्थना म्हणत असू…
* सदा सर्वदा योगाभ्यास करु या.
– आपण वैश्‍विक ऐक्य व शांतीच्या मोठ्या गोष्टी बोलतो. पण सुरुवात करुया स्वतःपासून. वेदाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे पाच कोश आहेत- अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञान(बुद्धी)मय, आनंद(आत्मा)मय कोश.
या पाचही कोशांचे ऐक्य आवश्यक आहे. ‘प्रत्येकाने आपले जीवन सूक्ष्म दृष्टीने बघितले तर इथेच सर्व गडबड व बेशिस्त आहे. शरीर व इंद्रिये मनाच्या स्वाधीन असायला पाहिजे. मनावर बुद्धीचे नियंत्रण अपेक्षित आहे. बुद्धी सद्सद्विवेक बुद्धी असली पाहिजे. पण अपवाद सोडले तर असे दृश्य सहसा दिसत नाही, तथाकथित विद्वानांमध्येसुद्धा!
कठोपनिषदातील एक श्‍लोक येथे फारच उपयोगी वाटेल.
* आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु|
बुद्धिं तु सारथी विद्धि मनः प्रग्रहमेव च|
इन्द्रियाणि ह्यानादुर्विषयास्तेषु गोचरान्‌॥
इथे शरीररुपी रथ व इंद्रियरुपी घोडे यांच्यावर मनाचा लगाम व बुद्धीचे सारथ्य अपेक्षित आहे. तरच रथाचा स्वामी म्हणजे आत्मा शांतीचा अनुभव घेऊ शकेल. सुरक्षित राहून इच्छित ठिकाणी पोहचू शकेल.
महाभारतातील अर्जुनाच्या रथाचा सारथी तर स्वतः योगेश्‍वर कृष्णच होता. याचाच गर्भितार्थ म्हणजे बुद्धी दैवी असली तर सर्वांचे ऐक्य साधेल व शांती आपोआप मिळेल. स्वतःतील पंचकोशांचे ऐक्य साधल्यानंतर कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, वैश्‍विक ऐक्य सहज लाभेल. त्यामुळे आपोआप शांती मिळेल. हीच तर वैश्‍विक योग दिवसाची घोषणा आहे. मग लागू या ना आपण सर्व कामाला… तो सुंदर अत्यावश्यक दिवस साजरा करण्यास!