हीच वेळ नैतिक धाडस पणाला लावण्याची!

0
132

१४ मे २०१६ या दिवशी विष्णू सुर्या वाघ यांना आकस्मिकपणे हृदयविकाराचा झटका आला आणि गंभीर अवस्थेत त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीची अँजियोप्लास्टी केली. हृदयविकारामुळे गेला महिनाभर वाघांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. साहजिकच दर रविवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे ‘मनस्वी’ हे सदरही ‘नवप्रभा’त येऊ शकले नाही. सुदैवाने वाघ यांची प्रकृती आता सुधारली आहे व पुनश्‍च ‘नवप्रभा’च्या वाचकांसाठी ते रूजू झाले आहेत. गोव्यात सध्या गाजणारा शैक्षणिक माध्यम विषय, सरकारचा निर्णय, भाभासुमंचा आक्रमक पवित्रा आणि दस्तुरखुद्द वाघ यांची मनोभूमिका हे सारे पैलू उलगडून दाखवणारा हा त्यांचा लेख.
– संपादक

विष्णू सुर्या वाघ

बरोब्बर पाच वर्षांपूर्वीची गोष्ट.
१८ जून २०११ या दिवशी, पणजीतील आझाद मैदानाच्या बाहेर, दिगंबर कामत यांच्या सरकारविरुद्ध असंतोषाची पहिली ठिणगी पडली. प्राथमिक शिक्षण माध्यमाबाबत दिगंबर सरकारने घेतलेल्या इंग्रजीधार्जिण्या निर्णयाचा निषेध करणारे भाषाप्रेमींचे आंदोलन त्या दिवसापासून सुरू झाले. पोलिसांनी आझाद मैदानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गोवा क्रांतिदिनाचा कार्यक्रम भाषाप्रेमी उधळून लावतील अशी भीती सरकारला वाटली होती. प्रत्यक्षात आम्हाला करायची होती ती शांततापूर्ण निदर्शने. पण लोकशाहीतले तेवढेसुद्धा स्वातंत्र्य आम्हाला सरकारने घेऊ दिले नाही. दिगंबरविरोधी घोषणा सुरू होताच आंदोलकांची धरपकड करण्यात आली. आधीच तैनात ठेवलेल्या पोलिसी गाड्यांमध्ये आम्हाला कोंबण्यात आले. एका पोलीस अधिकार्‍याने तर राजदीप नाईकच्या नरड्यालाच हात घातला. पुंडलिक नायकांना गुन्हेगारासारखे फरफटत नेले. मोठ्या हुशारीने ताब्यात घेतलेल्या भाषाप्रेमींना वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कोंबण्यात आले. आमची रवानगी आगशीला झाली. तिथे दिवसभर कोंडून ठेवल्यानंतर सायंकाळी सुटका झाली. तोपर्यंत आमची विचारपूस करायला मनोहर पर्रीकर आगशी पोलीस स्थानकावर येऊन ठेपले होते. आम्ही सुटून बाहेर आलो तेव्हा पोलिसांच्याच गाडीतून आम्हाला पणजीपर्यंत पोचवण्यात आले. आगशीला येताना पर्रीकर विरोधी पक्षनेत्याच्या गाडीतून आले होते. पणजीला येतेवेळी आमच्यासोबत बसमध्ये बसून आले. गाडी पाठीमागून आली. ‘‘दिगंबराक सारखो धडो शिकवपाक जाय!’’ हे त्यांचे बसमधले उद्गार!
पुढे आंदोलनाचा जोर वाढला. मोर्चे, निदर्शने इत्यादींना प्रारंभ झाला. कला अकादमीची त्यावर्षीची भजन स्पर्धाही रद्द झाली. मी व देविदास आमोणकर आम्ही दोघांनी सरकारने दिलेले युवा पुरस्कार परत केले. राजदीप नाईकने आपल्याला जाहीर झालेला पुरस्कार नाकारला. ‘इफ्फी’च्या काळात आम्ही गनिमी काव्याने ‘ब्लॅक कार्पेट’सारखी आंदोलने करून दिगंबर कामतांच्या नाकी नऊ आणले. पुढे निवडणुका झाल्या आणि गोमंतकीय मतदारांनी मनोहर पर्रीकरांचे दिगंबर कामतीला धडा शिकवण्याचे स्वप्न पूर्ण केले.
पर्रीकरांकडून वचनभंग!
आता खरे तर जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पर्रीकरांची होती. भाषाप्रेमींच्या आंदोलनात ‘इंग्लीश व्हाय? मायभास जाय!’ अशा घोषणा लिहिलेले काळ्या रंगाचे टी-शर्टस् त्यांनीच बनवून दिले होते. पण हातात सत्ता आली आणि पर्रीकर आपले अभिवचन विसरले. मराठी व कोकणीमधूनच प्राथमिक शिक्षण देणार्‍या शाळांना सरकारी अनुदान हे तत्त्व त्यांना राजकीय दृष्टीने अडचणीचे वाटू लागले. मग त्यांनी तथाकथित तज्ज्ञांची एक समिती करून विचारविनिमय करण्याचे नाटक केले. मध्यंतरी डायोसिजन संघटनेच्या ज्या सव्वाशे शाळांनी कोकणी माध्यम बदलून इंग्रजीची कास धरली होती, त्या सर्व शाळांना सरकारी संरक्षण मिळेल असा वटहुकूम काढला. सरकारी समितीवरचे धुरीण त्यावेळी गप्प राहिले. पर्रीकर कालापव्यय करून आपला मामा करतील याची सुतराम शंका त्यांना आली नाही. पुढे शैक्षणिक माध्यमाचा प्रश्‍न अर्धवट टाकून ते दिल्लीत रवाना झाले. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचे भिजलेले घोंगडे येऊन पडले ते बिचार्‍या लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या खांद्यावर. आजही या घोंगड्याचे ओझे मुख्यमंत्र्यांना वाहावे लागत आहे.
या लेखाच्या सुरुवातीला मी नमूद केलेल्या त्या घटनेनंतर काल पाच वर्षांनी पुन्हा क्रांतिदिन साजरा झाला. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी एकोणीस ठिकाणी लाक्षणिक उपोषणे केली. भाभासुमंच्या लढ्याचे नवीन पर्व कालपासून सुरू झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. भाभासुमंच्या व्यासपीठावरून आणि प्रा. सुभाष वेलिंगकरांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संपूर्ण यंत्रणा आज गोव्यातील भाजपप्रणीत सरकारच्या विरोधात वावरते आहे. आंदोलनाची तलवार म्यानातून उपसली गेली आहे. आता माघारी फिरणे सर्वथा कठीण. मे महिन्याअखेरीस सरकारने भूमिका बदलली नाही तर नवीन पर्याय शोधण्याची घोषणा अगोदरच झाली आहे. त्यामुळे हा पर्याय कोणता असेल याची उत्सुकता सर्वांना लागून राहिल्यास नवल नाही.
निवड कशाची करायची?
भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटाचा मीही एक सदस्य आहे. पक्ष म्हणून भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाभासुमंच्या चळवळीत कोणत्याच आमदाराने सहभागी होऊ नये असाही फतवा अप्रत्यक्षपणे जारी करण्यात आला आहे. एका अर्थी पक्षाच्या आमदारांना आता पक्ष किंवा तत्त्व यापैकी काहीतरी एक निवडावे लागेल. यातून माझीही सुटका नाही हे मला ठाऊक आहे. पण उद्या यदाकदाचित असा पेचप्रसंग माझ्यापुढे उभा राहिलाच तर मी नक्कीच तत्त्वाची निवड करीन. हा निर्णय पूर्ण विचारांती घेतला आहे. मी राजकारणात असलो तरी निर्ढावलेल्या राजकारण्यांसारखे वागणे मला शक्य नाही. कारण मी एक सर्जनशील लेखक व कलावंत आहे. लेखक म्हणून माझ्या काही जबाबदार्‍या आहेत. यातली प्रमुख जबाबदारी आहे ती माझी लेखनप्रतिभा ज्या भाषांतून आविष्कृत होते, त्या भाषांचे संरक्षण करण्याची. कोकणी व मराठी या दोन्ही माझ्या भाषा आहेत असे मी मानतो. माझ्या व्यक्तित्वाची जडणघडण या भाषांनी केली आहे. त्यांचे ऋण मला नाकारता येणार नाही. राजकारणातील मतांचे हिशेब लक्षात धरून मी माझ्या भाषांशी द्रोह करू शकत नाही. त्यापेक्षा राजकारणापासून संन्यास घेणे मी पसंत करीन.
बहुमताचा बागुलबुवा
मान्य आहे की आजची लोकशाही बहुमताच्या आधाराने चालते. गोव्यात राहणार्‍या ६० टक्के जनतेला आपल्या मुलांनी प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून घ्यावे असे वाटत असल्याचा निष्कर्ष शैक्षणिक आकडेवारीचा आधार घेऊन आमच्या एका पत्रकार मित्राने काढला आहे. या पत्रकार मित्राला कोणता ‘संदेश’ यातून द्यायचा आहे त्याचे त्यालाच ठाऊक. पण निखळ आकडेवारी हा सत्यासत्यतेचा निकष असू शकत नाही. जग आज देखाव्याला भुलते. मग तो देखावा भंपक का असेना! इंग्रजी माध्यमाची ओढ हा असाच एक देखावा आहे. जवळजवळ ९० टक्के ख्रिस्ती समाज आणि हिंदूमधील किमान ५० टक्के जनता या देखाव्याला भुलली आहे. पण या लोकांना इंग्रजी माध्यम हवे म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारने अनुदान द्यायला हवे या मागणीत अर्थ नाही. तसेच जर असेल तर मग कोकणी ही राजभाषा म्हणून हवीच कशाला? राजभाषा म्हणून सरकारने घोषित केलेली कोकणी ही फक्त नागरी लिपीतील कोकणी आहे. गोव्यातील ख्रिस्ती बांधव ‘कोंकणी आमची मायभास’ म्हणून सांगतात. तियात्रांतून कोकणी भाषेच्या जैताची कांतारा गातात. मराठीला, मराठीप्रेमींना शिव्या घालतात. पण जी कोंकणी त्यांना अभिप्रेत आहे ती रोमी लिपीत लिहिली जाणारी कोंकणी आहे. २४ टक्के ख्रिश्‍चन बाजूला केले तर ६४ टक्के उर्वरित हिंदूंमधले जवळजवळ ९० टक्के लोक कोकणीच बोलतात. पण सर्वांचा व्यवहार मात्र कोकणीतून होत नाही. त्यांच्या वाचनात प्रामुख्याने मराठी वर्तमानपत्रे असतात. म्हणून बहुधा असेल, गेल्या पाच वर्षांत गोव्यातील मराठी दैनिकांची संख्या दुप्पटीने वाढली आणि पंचवीस वर्षे रडत-रखडत चाललेले एकमेव कोकणी दैनिक बंद पडले. ते बंद झाले म्हणून मराठीप्रेमींना आनंदाच्या उकळ्या फुटाव्या अशातला भाग नाही. पण गोमंतकीयांची एकमेव संपर्कभाषा म्हणून जिचा बोलबाला होतो त्या भाषेतले दैनिक बंद पडावे हा केवळ दैवदुर्विलास नव्हे तर फक्त कोकणीचा आग्रह धरणार्‍या महाभागांचा दळभद्रेपणा आहे, असे म्हणावे लागेल. आता मी ऐकलेय की गोव्यातला एक आघाडीचा उद्योगसमूह नवीन कोकणी दैनिक काढण्याच्या तयारीत आहे. पण तेही चालेल याची शाश्‍वती नाही. कारण गोमंतकीय जनतेने अजूनही ‘भाषा’ म्हणून कोकणीचा स्वीकार केलेला नाही हे कटू असले तरी ढळढळीत वास्तव आहे.
इंग्लीशनेही यातना भोगल्या!
भाषा एकाएकी जन्माला येत नसते. कुठलीही भाषा ‘भाषा’ म्हणून आकाराला येण्याआधी बोलीच असते. आज जगभर पसरलेली इंग्लीश भाषा एकेकाळी इंग्लंडमधल्या सामान्य जनतेची बोलीभाषा होती. इंग्लंडच्या राजघराण्याची भाषा मात्र फ्रेंच होती व त्यामुळे राजकारभाराची आणि संपर्काची भाषादेखील फ्रेंच हीच होती. इंग्लंडमध्ये बायबलसुद्धा फ्रेंच भाषेतूनच वाचले जात होते. पण आपल्या बोलीचा अभिमान बाळगणार्‍या काही धर्मोपदेशकांनी धर्माचा विचार हा लोकभाषेतून प्रसारित झाला पाहिजे असा निर्धार करत इंग्लीश बोलीतून बायबलचे भाषांतर केले. बायबलच्या कितीतरी प्रती हाताने लिहून काढल्या. लोकांच्या भाषेतील हे बायबल लोकप्रिय झाले. ब्रिटिश राजसत्तेने व धर्मसत्तेने इंग्लीशला दडपण्याचे अतोनात प्रयत्न केले. बायबलच्या इंग्लीश हस्तलिखिताच्या हजारो प्रती जप्त केल्या व लंडनच्या चौकात त्यांची होळी केली. असे म्हणतात की बायबलच्या हस्तलिखितांना लावलेली ही आग एक आठवडाभर धुमसत होती. एवढे अनन्वित अत्याचार सोसूनदेखील इंग्लीश भाषा जगली. नुसती जगली नाही तर जगभर फोफावली. सुरुवातीला ही भाषा अत्यंत क्लीष्ट होती. शेक्सपियरच्या काळातील इंग्रजीचे नमुने पहा म्हणजे लक्षात येईल. या प्रकारच्या इंग्लीशला ‘व्हिक्टोरियन इंग्लीश’ म्हणत असत. पुढे ती सोपी होत गेली व सामान्य माणसाच्या बोलण्यात येणारी इंग्रजी लेखनासाठी वापरण्यात येणारी रूढ भाषा बनली.
बहुजनांची कोकणी कुठे आहे?
कोकणीच्या बाबतीत मात्र दुर्दैवाने तसे झालेले दिसत नाही. सर्व गोमंतकीय कोकणी बोलतात हे सत्य कोणीही नाकारणार नाही. मग जेव्हा भाषा म्हणून कोकणीला पुढे करण्यात आली तेव्हा सर्व गोमंतकीयांनी तिला का स्वीकारली नाही असा प्रश्‍न निर्माण होतो. याचे उत्तर एकच आहे की, भाषा म्हणून ज्या कोकणीला पुढे करण्यात आले ती कोकणी गोमंतकातील बहुजन समाजाला कधीच आपली वाटली नाही. पाठ्यपुस्तकांतून आढळणारी, कथा- कविता- कादंबरी- नाटकांतून वापरली जाणारी कोकणी ही गोमंतकीय लोकसंख्येच्या केवळ तीन टक्के असणार्‍या बामणांच्या घरात बोलली जाणारी कोकणी आहे. बहुजनांना ती आपली वाटत नाही आणि यापुढेही वाटणार नाही. आयलो, म्हर्‍यान, पेल्यान, ताजेकडेन, म्हजेकडेन हे शब्द वापरणारी भास गोंयकार बहुजनांची नव्हे. त्यामुळेच तिला लोकांनी स्वीकारलेली नाही.
मी केलेले हे विधान अनेक कोकणीवाद्यांना आवडणार नाही याची मला कल्पना आहे. पण ही वस्तुस्थितीही कोणाला नाकारता येणार नाही. भाषा म्हणून कोकणीचा स्वीकार आपण केला तर किमान त्या भाषेचा वापर व्हायला हवा. ख्रिस्ती समाजाला कोकणी हवी, पण नागरी लिपितली नको. हिंदूंना कोकणी हवी पण लिखित संपर्कासाठी नको. एवढे सगळे असूनदेखील माझे वैयक्तिक मत आहे की कोकणीने वाढायला हवे, पुढे जायला हवे, पण मराठीचा दुस्वास करून नव्हे, तर मराठीचा आधार घेऊन.
मराठीचा द्वेष कशाला?
परवा मी फ्रांसिस द तुयेंचा ‘क्वेश्‍चन मार्क’ हा तियात्र बघायला गेलो. या तियात्रात भाजपा सरकारची, मुख्यमंत्री पार्सेकरांची आणि मराठी भाषेची यथेच्छ टवाळी करण्यात आली आहे. मनोहर भिंगी हा कलाकार या तियात्रात पार्सेकरांची भूमिका करतो. त्याला तियात्रातली अनिता नावाची कलाकार प्रश्‍न करते ः ‘‘गोंयकारांली भास खूंयची रे सर?’’ त्यावर पार्सेकर उद्गारतात- ‘‘कोंकणी!’’ मग ही अनिता प्रश्‍न करते- ‘‘तोंहें जाल्यार तुज्या सरकारान कोंकणी स्कुलांचेर फोकोत तीन कोटी रुपया आनी मोराटी इश्कॉलांचेर पोंधरा कोटी रुपया कोशे घायले हें तू सांगशी? गोंयकारांची भास कोंकणी जाल्यार हिंगा मोराटी कित्याक?’’
अनिताच्या या प्रश्‍नाला प्रेक्षक शिट्या व टाळ्या वाजवून प्रचंड दाद देतात. तियात्रातला पार्सेकर उत्तर देत नाही. पार्सेकरांच्या जागी मी असतो तर अनिताला सांगितले असते- ‘‘बाय गो, आम्हा हिंदू लोकांना मराठी का जवळची वाटते हे तुला कधीच कळणार नाही. कारण गोव्याचा इतिहासच तुम्ही कधी समजून घेतलेला नाही. चारशे वर्षांपूर्वी या गोव्यात तुमच्याच फादर स्टीफनने मराठीतून ‘ख्रिस्त पुराण’ लिहिले आणि आंतोन द क्रुवाने मराठीतूनच ‘पीटरपुराण’ लिहिले हे तुमच्या बापजाद्यांनी तुम्हाला कधीच सांगितले नाही. तुम्ही चर्चमध्ये फक्त शेरमांव ऐकायला जाता. आमच्या देवळात जाऊन संतांचे अभंग तुम्ही कधी ऐकलेच नाहीत. तुम्ही फक्त तियात्र ‘चोयला’, पण गोव्याच्या गावागावांत होणारे संगीत नाटक आयुष्यात तुम्ही पाहिले नाही. तुम्हाला काय कळणार मराठीचे गोमंतकातील महत्त्व?’’
ही परिस्थिती केवळ ख्रिस्ती जनतेची नाही. हिंदूंमधील उच्चभ्रू आणि स्वतःला सुशिक्षित व प्रतिष्ठित मानणारा वर्गही त्याच वाटेवरून जात आहे. इंग्रजी ही आज जगाची भाषा बनली आहे म्हणून बालपणापासून आमच्या मुलांना उत्तम इंग्रजी आले पाहिजे. त्यासाठीच आम्ही त्यांना केजीपासूनच इंग्लीश शाळेत घालणार हा त्यांचा युक्तिवाद. जणू काही यांची मुले चौथीतून बाहेर पडताक्षणीच कुठल्यातरी कंपनीत चीफ एक्झिक्यूटिव्ह म्हणून कामाला लागणार आहेत!
कोकणीला हवी मराठीची साथ!
गोव्यात भाषा माध्यमावरून निर्माण झालेल्या या आजच्या गोंधळाला सर्वथा मराठीचा द्वेष करणारे कोकणीवादी कारणीभूत आहेत. मराठीबद्दल सौहार्दाची भूमिका घेऊन कोकणीचा झेंडा त्यांनी फडकवला असता तर आजची ही पाळी उद्भवली नसती. राजभाषा आंदोलनात कोकणी प्रजेचो आवाजच्या म्होरक्यांनी ख्रिस्ती बांधवांच्या मनात मराठी व महाराष्ट्रद्वेषाची बीजे पेरली आणि फक्त कोकणीला राजभाषा म्हणून मान्यता प्राप्त करून घेतली. आज तोच समाज नागरी कोकणीच्या विरोधात आहे आणि कट्टर कोकणीवाद्यांनाही ‘कोकणी व मराठीतूनच प्राथमिक शिक्षण द्यायला हवे’ ही मागणी आज रेटावी लागत आहे. मराठीप्रेमींचे पाठबळ आहे म्हणून भारतीय भाषा सुरक्षा मंच आज मांद्रे, मये, साखळी, शिरोडा अशा मतदारसंघांत सभा घेऊ शकला हे मंचाच्या धुरिणांनी लक्षात घ्यायला हवे.
गोव्यातील बहुसंख्य पालकांना इंग्रजी हवी म्हणून इंग्लीश प्राथमिक शाळांचे अनुदान चालू ठेवणार ही सरकारची भूमिका बहुमताच्या दृष्टिकोनातून तर्कसंगत असली तरी ती सांस्कृतिक नीतिमत्तेत धरून नाही. मुलांच्या वाढीची एक नैसर्गिक प्रक्रिया असते. बालक जेव्हा जन्माला येते तेव्हा सुरुवातीला त्याला आईचेच दूध पाजले जाते. नंतर गाईचे दूध त्याला पाजतात. त्यानंतर पेज भरवतात. भात त्यानंतर येतो. पण एखादा हट्टी पालक ‘मला चिकन आवडते, त्यामुळे माझ्या बालकालाही चिकन हवे’ असे गृहीत धरून जन्मतेवेळीच त्याला ‘चिकन सूप पाजा’ असा आग्रह धरू लागला तर डॉक्टर त्याचे म्हणणे मानून घेतील का? डॉक्टर सोडा, आई तरी आपल्या नवर्‍याचे ऐकेल का? प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न हा याच कोटीतला आहे. मुलांना प्राथमिक ज्ञान त्यांच्या परिसर भाषेतून घेऊ द्या, त्यानंतर वाटेल तेवढ्या भाषा शिकवा हा शिक्षणाबद्दलचा जागतिक सिद्धांत आहे.
भाभासुमंच्या या आंदोलनातून नाही म्हटले तरी एक गोष्ट चांगली झाली. ती म्हणजे, नेहमी एकमेकांची पिसे काढणारे कोकणीमोगी व मराठीप्रेमी एकत्र आले. त्यांच्या विरोधात चर्चप्रणीत डायोसिजन संस्था उभी ठाकली आहे. कॅथलिकांच्या मतांवर डोळा असल्यामुळे सरकारने डायोसिजनची तळी उचलून धरली आहे. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची ही प्रवृत्ती पक्षाला फायदेशीर ठरेल की नाही हे येणार्‍या निवडणुकीत कळेलच, पण दिगंबरना नाकारून मनोहरना आणताना ज्या अपेक्षा लोकांनी बाळगल्या होत्या त्या मात्र धुळीस मिळाल्या, अशी आजची परिस्थिती आहे.
अंतिम निर्णयाची वेळ
यापुढे भाभासुमं आता कदाचित अधिक कडवटपणे सरकारच्या विरोधात उभा ठाकेल. कदाचित हा संघर्ष तीव्र होईल. कदाचित कुणीतरी मध्यस्थी करून समझोताही घडवून आणील. या परिस्थितीत प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. पक्षातले सगळे आमदार आपापल्या मतदारसंघाचा विचार करून अळीमिळी गूपचिळी भूमिका स्वीकारून गप्प आहेत. पण मला ते शक्य नाही. माध्यमविषयक आंदोलनातून मी कॉंग्रेस पक्षाचा त्याग केला. त्या आंदोलनाला भाजपाचा, खास करून मनोहर पर्रीकरांचा पाठिंबा होता म्हणून कॉंग्रेसला धडा शिकवण्यासाठी मी भाजपात आलो. सांत आंद्रेसारख्या कठीण मतदारसंघातून उमेदवारी घेतली. सांत आंद्रे हा ख्रिस्तीबहुल मतदारसंघ. मी मराठीप्रेमी म्हणून सर्वज्ञात. शिवाय माध्यम आंदोलनातील सहभागामुळे डायोसिजन परिवाराच्याही नजरेतून उतरलेलो. त्यामुळे सांत आंद्रेत जिंकणे कठीणच होते. माझ्या एका पत्रकार मित्राने व्हॉट्‌सऍपवरील आपल्या ब्लॉगमध्ये कळंगुट, हळदोणा, वास्को, कुठ्ठाळी व सांत आंद्रे हे पाच मतदारसंघ चर्चच्या कृपेमुळे भाजपला मिळाले असा जावईशोध लावला आहे. परवाच मी तो ब्लॉग वाचला. वाचून करमणूक झाली. माझ्या विजयात चर्चची काडीचीही मदत मला झाली नाही. झाली असती तर आगशी, गोवा वेल्हा, भाटी व शिरदोण परिसरात मला मतांची आघाडी मिळाली असती. पण डोंगरी, नेवरा, कुडका, पाळे, बांबोळी, गवाळी, मौळा इथल्या जनतेने मला विजयी केले. गोव्याची मूळ संस्कृती आणि गोंयकारांची निज अस्मिताय यांचा अभिमान बाळगणारी ही जनता आहे. या जनतेच्या आशीर्वादानेच कोकणी-मराठीची बाजू मी घेतली. यापुढेही घेईन. सार्वजनिक जीवनात कधीतरी असा एखादा क्षण येतो ज्यावेळी आपले नैतिक धाडस पणाला लावावे लागते. मला वाटते तो क्षण आता जवळ आला आहे.