झिम्माड पावसाची वाट पाहणारी सृष्टी

0
475

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

पावसाळा आला की निर्माण झालेल्या वातावरणामुळे, बदललेल्या आसमंतामुळे आणि चैतन्यलहरींमुळे पंचसंवेदनांचे विश्‍व मनात जागे होते. मागच्या आठवणी स्मरणोज्जीवित होतात. मन तरल होते. चित्तवृत्ती प्रसन्न होतात. पावसाविषयीच्या अनेक रमणीय कल्पना माणसाच्या मनात जाग्या होतात…

पंचमहाभूतांमधील जलतत्त्वाचे महत्त्व नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. प्राणिमात्रांचे जीवन पाण्यावर अवलंबून असते. संस्कृतमध्ये पाण्याला जीवन म्हणतात. ‘जीवो जीवस्य जीवनम्‌|’ हे वचन त्यातून आलेले आहे. कालिदासाने तर वर्षाऋतूचा गौरव करताना त्याला उद्देशून ‘प्राणिमात्रांचा प्राणहेतू’ असे संबोधले आहे. भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती आहे. कृषिप्रधान संस्कृतीला जोडून गोपालन संस्कृती ही आलीच. दोन्ही बाबी एकमेकींना पूरक आहेत. जी भूमी ‘सुजलाम्’ असते ती ‘सुफलाम्’ आणि ‘सस्यश्यामलाम्’ असणार हे तर निश्‍चितच. पावशा पक्ष्याच्या आर्त स्वरात ‘पेर्तेव्हा’चा मंत्र असतो, असा संकेत आहे. तोच स्वर पकडून कविवर्य अनिलांनी आपल्या कवितासंग्रहाला ‘पेर्तेव्हा’ हे नाव दिले होते.

जून महिना सुरू झाला की पहिल्या आठवड्यात पावसाची चाहूल लागते. माणसांच्या जीवनाला, प्राणिजीवनाला आणि समस्त सृष्टीला आवश्यक असणारा पाऊस धरतीतलावर कोसळतो तेव्हा सर्वत्र आनंदाची लहर पसरते. पावसाविषयीच्या अनेक रमणीय कल्पना माणसांच्या मनात असतात. प्राणिमात्रांच्याही मनात पावसाविषयी ममत्व असते. मात्र त्यांच्याकडे वाणी नसते. पण आनंदाचे कल्लोळ व्यक्त करण्याची त्यांची म्हणून स्वतःची भाषा असतेच. मातीच्या गर्भातून येणारा मंद सुगंध ही वसुंधरेच्या अंतर्मनातील आनंदाची अभिव्यक्ती असते. पाऊस पडून गेल्यावर अवघ्याच दिवसांत तिच्या पृष्ठभागावर छोटे-छोटे पोपटी लालस रंगाचे तृणांकुर दिसायला लागतात, हेदेखील आनंदाचे रोमांचच असतात. पर्जन्यानुभूती ही आनंदाची अनुभूती असते. आजवर कितीतरी कवींनी आपल्या प्रतिभेच्या विलसितांमधून या आनंदाची अभिव्यक्ती केलेली आहे. वाल्मिकींच्या रामायणातदेखील वर्षावर्णने आढळतात. कालिदासाचा उल्लेख यापूर्वीच येऊन गेलेला आहे. पाऊस जसा तना-मनाला आल्हाद देतो; त्याप्रमाणेच पावसाविषयीच्या अनेक कविता आपल्याला आनंद देतात. पावसाळा आला की निर्माण झालेल्या वातावरणामुळे, बदललेल्या आसमंतामुळे आणि चैतन्यलहरींमुळे पंचसंवेदनांचे विश्‍व मनात जागे होते. मागच्या आठवणी स्मरणोज्जीवित होतात. मन तरल होते. चित्तवृत्ती प्रसन्न होतात.
बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, वसंत सावंत, ना. धों. महानोर आणि अलीकडचे नलेश पाटील यांनी पर्जन्यानुभूतीची नितांत रमणीय चित्रे रेखाटली. रसिकतेचे आणि सर्जकतेचे पोषण करणार्‍या त्यांच्या कविता आहेत. पावसाळी कवितांमधून केवळ स्वप्नाळू विश्‍वाचेच चित्रण होते असे नाही. अलीकडे बर्‍यापैकी स्वप्न-वास्तवाच्या हिंदोळ्यावरचे आणि दाहकतेच्या पार्श्‍वभूमीवरचे पावसाचे चित्रण कवितेतून यायला लागले आहे. दलित संवेदनशीलतेच्या कवितांतून या वास्तवाचा वेध घ्यायला सुरुवात झाली. आज वास्तव टाळून कवी-लेखकांना आपल्या साहित्याची भूमी नांगरताच येत नाही. वास्तवतेच्या अटळतेचा टिळा लावूनच या प्रदेशात वावरावे लागते, तेव्हाच तो त्यात खर्‍या अर्थाने दृढपणे उभा राहू शकतो.
पावसाने निर्माण केलेल्या रमणीयतेविषयी या टिपणातून लिहायचे नाही. पावसाचे आजचे वास्तव काय आहे याचा संदर्भ मनामध्ये बाळगूनच येथे लिहायचे आहे. पूर्वीसारख्या जून-जुलै या महिन्यांत पावसाच्या मुसळधार सरी आताशा कोसळत नाहीत. अशा वेळी बा. भ. बोरकरांच्या ‘सरिंवर सरि आल्या ग’ या कवितेतील काव्यानुभव आज खर्‍या अर्थाने अनुभवता येत नाही. शालेय वयात शांता शेळके यांच्या ः
पावसाच्या धारा येती झरझरा
झाकोळले नभ सोसाट्याचा वारा
या ओळी किती प्रत्ययकारी वाटायच्या. या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत कोण? आपणच ना? अशी अंतर्मुखतेची जाणीव मनात जागी होते. पर्यावरणविनाश हे सर्वांना बोचणारे शल्य आहे. सर्व क्षेत्रांत वावरणारी संवेदनशून्यता ही क्लेशदायक आहे. विषुववृत्तीय प्रदेशात, पश्‍चिम घाटाच्या घनदाट जंगलात रात्रंदिन कोसळणार्‍या पावसाच्या थैमानाच्या अनेक आठवणी गतपिढीतील माणसांच्या मनात आहेत. पण आजकाल पाऊस किती लहरी, किती अनियमित झालेला आहे? जून महिन्याचा मध्यावधी झाला तरी आभाळ काळ्या मेघांनी ओथंबून येत नाही. काही येतात आणि हुलकावणी देऊन निघून जातात. आपण वृक्षसंहार केला. त्याने पुरा आत्मघात झाला. मोसमी पाऊस आज येईल, उद्या येईल म्हणून सारेजण वाट पाहतात, पण निराशाच पदरी येते. पावसाच्या धारा कोसळण्याऐवजी घामाच्या धारा सर्वांगातून वाहू लागतात. देशावरील, मराठवाड्याकडची आणि आपल्या देशातील अनेक भागांमधील पावसाची होणारी ही परवड ऐकून तोंडचे पाणी पळते. वृत्तपत्रांतून, दूरदर्शन वाहिन्यांमधून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्‍यांचे दीनवाणे चेहरे उभे राहतात. पण अशा निराशेच्या वेळीदेखील रवींद्रनाथांच्या ‘वसुंधरा’ या कवितेतील काही ओळी मनाला दिलासा देतात ः
…शून्यात पाहात राहातो मात्र विषादव्याकुळ.
फिरून घे मला या समग्रतेत
अंकुरते, उमलते, मोहरते जीवन जेथून रात्रंदिस
शतसहस्र रूपांनी
झंकारते हर्षनृत्य असंख्य तरंगांतून,
होते प्रवाहित चित्त भावस्रोतांत,
घुमते बासरी छिद्राछिद्रांतून;
आहेस उभी तू श्यामल कामधेनु,
दोहतात तुला सहस्र बाजूंनी
तरुलता पशुपक्षी किती अगणित
तहानलेले प्राणी सारे;
बरसतो आनंदरस कितीक रूपांनी
ध्वनित होतात दशदिशा कल्लोळगीतांनी
समग्रतेचा तो वैचित्र्यपूर्ण आनंद अवघा
चाखीन एकाच क्षणी एकत्र येऊन सर्वांसमवेत.
जोर मिळवून माझ्या आनंदाची
होणार नाही का अधिक श्यामल तुझी अरण्यराजि?
संचारणार नाही का नवीन किरणकंपन
प्रभातकालीन प्रकाशात?
मुग्ध भावांनी माझ्या आकाश-पृथ्वीतल
होतील विचित्र हृदयाच्या रंगांनी-
पृथ्वीची आशा-निराशा, तिचे स्वास-निःश्‍वास, सुख-दुःखाच्या संमिश्र संवेदना कविमनाने येथे आत्मानुभूतीमध्ये मुरवून घेतलेल्या आहेत. त्यातून नव्याने जगण्याची आणि कवितेतून फुलण्याची अंतःप्रेरणा कवीला प्राप्त होते ः
दर्शनाने ज्याच्या स्फुरेल कविता कवीच्या मनात,
स्पर्शील भावावेग प्रेमिकांच्या नेत्रयुगलांना,
स्फुरतील गीते अवचित पक्ष्यांच्या मुखांना
हे वसुदे, सहस्रांच्या सुखांनी
रंगले आहे तुझे सर्वांग
नवनिर्माणासाठी सृष्टीला पाऊस हवाहवासा वाटत असतो. तिची चित्रलिपी नवोन्मेषांसह अनुभवायची असेल तर पाऊस हवा. सृष्टीची ही असोशी अनेक पद्धतींनी व्यक्त होत असते. दुष्काळाची भीती तर सर्वांना छळत असते. इंद्रजित भालेराव आपल्या भूमीचे आक्रंदन समर्पक शब्दांत व्यक्त करतात ः
रक्तामध्ये अंश मातीचाच
अशा शेतामधी पेटला वणवा
पाण्याची वाणवा आधिचीच
पेटला वणवा जळताहे माती
हिरवीशी नाती करपली
दाबलेला कढ मनात मावेना
जळाल्या भावना मातीसंगे
पावसाच्या अभावी कृषिजीवन उद्ध्वस्त झाल्याची शोकार्तता इंद्रजित भालेरावांसारखा कृषिसंस्कृतीत वाढलेला कवी शब्दांत मांडतो, तेव्हा तिला स्वानुभूतीचा स्पर्श असतो. आपल्या देशातील कृषिजीवनाच्या शोकांतिकेचा अंतःसूर तिच्यातून व्यक्त होतो.
मौखिक परंपरेतून आलेली बहिणाबाई चौधरी करुणाघनाकडे प्रार्थना करताना मिताक्षरांतून जे काही बोलते, त्या बोलांतून भारतीय मनच बोलत असते ः
देवा पाऊस पाऊस
तुज्या डोयातले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास
बहिणाबाईंच्या या शब्दांवर पुन्हा भाष्य करण्याची गरज भासत नाही.
देवाचेही मन हे शब्द ऐकून त्याच्या डोळ्यांतून आसू ओघळण्याची आणि धरतीतलावर अनंतधारांनी कोसळण्याची शक्यता निर्माण होते. शेवटी घनच तो! करुणा हा त्याचा स्थायिभाव.