॥ गीतेतून॥ ॥ सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति॥

0
445

– प्रा. रमेश सप्रे

छोट्या रसिकांच्या त्या प्रश्‍नानं आम्ही सारे विचारात पडलो. ‘देवसुद्धा एका घरात का राहत नाही?’ ‘म्हणजे रे?’ या आमच्या प्रश्‍नावर तो म्हणतो कसा? ‘आजोबांच्या गोष्टीत विष्णू वैकूंठात तर शंकर कैलासावर राहतो.’ रसिकच्या प्रश्‍नात जिज्ञासा होती तशीच एक व्यथाही होती. नुकतंच त्याचं खेळतं नाचतं एकत्र कुटुंब विभक्त झालं होतं. तीन भावांची तीन घरं झाली होती. पूर्वी त्याच्याबरोबर खेळायला भावंडही होती. गोष्टी सांगायला आजोबा होते… सर्वांना गाणी म्हणत निजवायला आजी होती. आता तो काहीसा एकटा पडला होता. त्याच्या प्रश्‍नातला ‘देवसुद्धा’ या शब्दातला ‘सुद्धा’ ही खंत व्यक्त करणारा होता. लहान मुलांच्या मनातही विचारांचा गोंधळ, भावनांचा कल्लोळ असतोच. मुख्य म्हणजे अनेक वेळा त्याला त्याच्या स्वतःच्या जीवनाचा संदर्भ असतो.
खरंच ब्रह्मदेवाचा सत्यलोक, रामाचा साकेत तर कृष्णाचा गोलोक असे उल्लेख पौराणिक कथातून येतात. त्यांचा अर्थ विशिष्ट प्रदेश असा असतो का? कैलास हिमालयात आहे असं सांगितलं जातं, मग वैकुंठ? स्वर्गात….तर स्वर्ग कुठे?…. अवकाशवीरांना, गिर्यारोहकांना, खगोलशास्त्रज्ञांना, निरनिराळ्या मानवनिर्मित अवकाशयानांना नि दुर्बिणींना हे लोक कुठेच कसे दिसले नाहीत? कसे सापडले नाहीत?…. असे प्रश्‍न हाच रसिक पुढे मोठा झाल्यावर विचारणार आहे.
काय आहे या प्रश्‍नाचं उत्तर? …देव निश्चित कुठे राहतात? गीता हा ग्रंथ आधीच्या ग्रंथांचं सार व नंतरच्या ग्रंथांचा स्त्रोत (उगम) आहे असं म्हटलं जातं. ते अनेक दृष्टींनी खरं आहे. म्हणूनच गीता हा सर्वांचा सर्व काळासाठीचा ग्रंथ आहे. या अर्थानं तो विश्‍वग्रंथच आहे. ‘देव’ या कल्पनेबद्दल गीतेत अनेक ठिकाणी वर्णन आहे. चर्चा आहे. मुख्य म्हणजे साक्षात भगवान हे सर्व सांगताहेत.
देव, देवता, दैवतं अनेक आहेत. तेहतीस कोटी देवांची कल्पना आहेच. पण यात प्रतीकात्मक अर्थ आहे त्यावर चिंतन केलं की आपला गोंधळ होत नाही. त्यासाठी मार्गदर्शनही ‘गीता’ आपल्याला करते. लोकांच्या समजुतीत, श्रद्धेत देव अनेकानेक आहेत. त्यांची रूपं, मूर्ती, मंदिरं, उपासना ग्रंथ, उपासना पद्धती, मंत्र निरनिराळे आहेत. पण ‘अनेकतेमध्ये एकता’ किंवा ‘विविधतेत एकात्मता’ हे मूळ सूत्र ‘गीता’ ठामपणे सांगते.
भगवंत ‘ईश्‍वर’ शब्द वापरतात. या अनेक देवतांमधील एका देवत्वासाठी, म्हणजेच देव अनेक असले तरी देवत्व-दिव्यत्व-एकच आहे. जे निर्गुण-निराकार-अमृत आहे. निर्गुण म्हणजे गुण नसलेलं व निराकार म्हणजे आकार नसलेलं असा नकारात्मक अर्थ नाही तर निर्गुण म्हणजे आपल्याला ज्ञात (माहीत) असलेले सारे गुण शिवाय अज्ञात म्हणजे माहीत नसलेले गुणही असलेलं… त्याचप्रमाणे निराकार म्हणजे अस्तित्वात असलेले सर्व आकार शिवाय आज अस्तित्वात असूनही आपल्याला माहीत नसलेले आकार असलेलं असं दिव्यत्व! याला ‘ईश्‍वर’ खरं तर ‘परमेश्‍वर (परम ईश्‍वर)’ म्हणणं योग्य ठरेल. कारण विशेषतः दक्षिण भारतात ‘ईश्‍वर’ शब्द शंकरासाठी वापरला जातो. आपल्या सर्व प्रमुख शिवलिंगांची किंवा शिवक्षेत्रांची नावं ‘ईश्‍वर’ शब्दानं संपतात. उदा. ॐकारेश्‍वर, नर्मदेश्‍वर, महाकालेश्‍वर, रामेश्‍वर, विश्‍वेश्‍वर इ.
भगवंत ईश्‍वर शब्द सार्‍या देवांच्या पलीकडे असलेलं एकमेव, अंतिम (परम) तत्त्व किंवा चैतन्य या अर्थानं वापरतात. परमात्मा, परब्रह्म या शब्दाचा अर्थही हाच आहे. मग देव निरनिराळ्या लोकात राहत असले तरी मूळ स्वरुपात, शक्तिरुपात ते एकच आहेत. ‘सर्वव्यापी’ आहेत. तरीही त्या चैतन्याला कोणतं तरी निवासस्थान असेल ना?
परमेश्‍वर सार्‍या विश्‍वाला व्यापूनही ‘दंशागुळे (दहा बोटं)’ उरतो. तो अनंत असतो. सद्गुरुसुद्धा ‘अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक’ असतात. सर्व विश्‍वांना व्यापूनही उरतात. सगळीकडे – कणाकणात, अणुरेणूत परमेश्‍वर आहे तर तो सर्व प्राणिमात्र नि निर्जीव पदार्थातही हवाच यालाच भगवंताचे शब्द आहेत-
ईश्‍वरः सर्व भूतानां हृदादेशेऽर्जुन तिष्ठति|
भ्रामयन् सर्वभूतानि मंत्रारूढानि मायया॥
ईश्‍वर (परमेश्‍वर) सर्व चरअचर वस्तूंच्या हृदयात असतो. स्थिर (स्थित) असतो (तिष्ठति). गंमतीनं या संदर्भात असं चिंतन करता येईल. आपण आपले पत्ते (ऍड्रेसेस) सुद्धा निरनिराळे देत? निवासी (रेसिडेन्शल), कामाचा (ऑफिशल), प्रवासातला (इन ट्रान्झिट) पत्ता सांगत तसे भगवंताचेही पत्ते आहेत. ज्ञानोबा माऊलीच्या शब्दात-
‘तो’ मी वैकुंठी नसे| वेळू एक भानुबिंबी न दिसे|
वरी योगियांचीहि मानसे| उमरडोनि जाय॥
म्हणजे तो मी (परमेश्‍वर) एक वेळ वैकुंठात नसेल,एक वेळ सूर्यबिंबातही दिसणार नाही (सूर्य अस्ताला गेल्यावर); इतकंच काय पण समाधी अवस्थेत असलेल्या योग्यांच्या मनात असलेला मी त्यांची समाधी उतरली किंवा विचलित झाली की त्यांच्या मनातूनही निसटून जाईन. पण मला जर कधीही निश्चित पहायचं असेल, तर-
परी तयांपाशी पांडवा| मी हारपला गिंवसावा
जेथ नामघोषु बरवा| करिती माझा ॥
म्हणजे जेथं माझा नामगजर, अखंड नामघोष चालू आहे तिथं मी असतोस असतो. म्हणूनच विठ्ठल विठ्ठल गजरानं अखंड दुमदुमत असलेल्या पंढरीत तो अठ्ठावीस युगं कमरेवर हात ठेवून उभा आहे. हा त्या विठ्ठलाचा (म्हणजे सर्व देवांचा) फिरता पत्ता आहे. परमभक्त नारदांना भगवंत याच शब्दात सांगतात-
नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये न च|
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामी नारद॥
जिथं जिथं भक्त भजन-गायन-कीर्तन-नामसंकीर्तन करत असतात, तिथं तिथं मी असतोच. म्हणजे वैकुुंठ, कैलास हे निवासी पत्ते झाले. भक्तांचं गायन भजन हा प्रवासी पत्ता झाला, आता राहिला कायमचा (शाश्‍वत – पर्मनंट) पत्ता. तो भगवंत सांगताहेत सर्व निर्माण झालेल्या सजीव-निर्जीव, चर-अचर पदार्थांचं हृदय (भूतानां हृद्देशे)! सजीवांना हृदय असतं. पण निर्जीवांना? याचं उत्तर – प्रत्येक वस्तूला एक शक्तियुक्त केंद्र (न्युक्लियस) असतं. जड पदार्थातून (मॅटर) प्रचंड अशी शक्ती (एनर्जी) तयार होऊ शकते कारण मी त्याच्या आत (हृद्देशे) – अंतर्यामी – असतोच. ती शक्ती म्हणजे परमेश्‍वर जो एकच एक (एकमेव) असतो, दुर्दैव म्हणजे आपल्याला या आतल्या भगवंताचं झान नसतं. जाणीवही नसते. आत वळून आपण पाहण्याचा प्रयत्नही करत नाही. अंतर्मुख होऊन कधी विचारही करीत नाही, नाम-ध्यान-अनुसंधान (म्हणजे नित्यस्मरण त्या एकमेव भगवंताच्या अस्तित्वाचं नि प्रभावाचं स्मरण) आपण करत नाही त्यापेक्षा बाह्य मूर्ती – तिची पूजा, मंदिरं, उत्सव, पालखी, प्रदक्षिणा यासारख्या गोष्टीत आपण रमतो. देव शोधण्याचा प्रयत्न करीत नाही. ही बाहेरची (बहिरंगी) उपासना आवश्यकच आहे पण परमेश्‍वराचं स्वरूप जाणून त्याच्याशी एकरूप होऊन अखंड आनंदात राहण्यासाठी अंतरंगीची मौन, सूक्ष्म उपासना आवश्यक आहे. पण फारच थोडे लोक अशा उपासनेत रमतात नि भगवंत प्राप्तीच्या आनंदात – अनुभावात रंगून जातात. याचं कारण काय?
भगवंतच पुढे सांगतात – ‘भ्रामयन् सर्वभूतानी यंत्रारूढानि मायया॥
सर्व प्राणिमात्रांची शरीरं ही यंत्रं आहेत. वाहनांसारखी यंत्र, यांना परमेश्‍वर अखंड फिरवत असतो. (भ्रामयन्) असं फिरवण्यासाठी वाहनांना जसं पेट्रोल, डिझेल अशी इंधन-शक्ती लागते तशी परमेश्‍वराची शक्ती आहे – माया, म्हणजे वस्तूचं, परमेश्‍वराचं सुद्धा नीट ज्ञान न होता भ्रम निर्माण होऊन सत्यस्वरूप कधी कळतच नाही. एका परमेश्‍वराला सोडून अनेकानेक देवदेवतांच्या मागे माणूस धावतो नि स्वतःची फसवणूक करून घेतो.
भगवंताची इच्छा अर्थाचत सर्वांनी सत्यज्ञान मिळवून आनंदात राहावं हीच आहे. यासाठी ते आग्रहानं सांगतात-
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत|
तत् प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्यसि शाश्‍वतम्‌॥
म्हणजे त्या सर्वांच्या अंतर्यामी (हृदयात) असलेल्या परमेश्‍वरालाच (तम् एव) शरण जा. त्याला सर्वस्व समर्पण कर. आतल्या परमेश्‍वराला ‘सर्व’ कसं अर्पण करायचं? स्पष्ट आहे. ते ‘त्याचं’ म्हणून त्याचा उपभोग घ्यायचा. आपली संपत्ती त्या परमेश्‍वराची आहे यात घर, वाहनं, पैसा हे जसं आलं तशीच आपली बुद्धी, कला, कल्पनाशक्ती, हे सारं त्याचंच आहे म्हणून दान-त्याग भावनेनं वापरायचं. आपला ‘स्व’ म्हणजे अहंकार यातूनच त्याला अर्पण केला जाईल. मग जीवन म्हणजे ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ असं होऊन जाईल.
अशा आतल्या देवाचा प्रसाद म्हणजे कृपा (तत् प्रसादात्) अत्यावश्यक असते. ती आपली निष्ठा यातून ही आतल्या परमेश्‍वराची कृपा व्यक्त होते. बाहेरून कितीही जप-तप-व्रत-तीर्थयात्रा अशी ‘साधनं’ केली तरी या आतल्या ‘साधने’ची जोड नसेल तर परमेश्‍वराचा म्हणजेच शांतीचा – मुक्तीचा – आनंदाचा अनुभव कधीही येणार नाही.
परमशांती नि शाश्‍वत स्थान म्हणजे परमेश्‍वराचं परमधाम – नित्य निवासस्थान!
हा विचार भगवंतांना एवढा महत्वाचा वाटतो की त्यांच्या समुपदेशनाचा हा कळच बिंदू (क्लायमॅक्स) आहे. हे त्यांच्याच शब्दात व्यक्त होतं –
इति ते ज्ञानं आख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया|
विमृश्य एतत् अशेषेण, यथेच्छसि तथा कुरु॥
म्हणजे – याप्रकारे गुपितातील गुपित असं रहस्यमय ज्ञान (किंवा ज्ञानरहस्य) मी तुला सांगितलं. यावर तू संपूर्णतः, चांगला विचार कर (विमृश्य एतत् अशेषेण) आणि मग तुला हवे ते कर. (म्हणजे युद्ध कर अथवा करु नकोस.)
अशारीतीनं आपल्या समुपदेशनाचा शेवट (इति ते ज्ञानं आख्यातं) करताना भगवंतानं अर्जुनाला ‘तुला योग्य वाटतं त्याप्रमाणे कर.’ असं स्वातंत्र्य दिलं, पण त्याबरोबर हेही ठासून सांगितलं की सत्य ज्ञानाच्या सर्व पैलूंचं, रहस्यांचं कथन तुला केलंय त्यावर नीट, सखोल विचार कर हे सांगायलाही भगवंत विसरले नाहीत.
अखेर अर्जुन हा आपला प्रतिनिधी आहे. मोह, भ्रम, विचारांचा गोंधळ, मनाची चलबिचल, निर्णयाची अस्थिरता, निश्चयाचा अभाव या दृष्टीनं आपण सारे अर्जुनच! पण अर्जुनाइतके आपण शुरवीर नाही आहोत अन् आपल्या समोर भगवान् श्रीकृष्णही नाही आहे. असं असलं तरी एका बाबतीत आपण भाग्यवान आहोत. आपल्याजवळ गीता आहे, भगवंताची वाणी त्याची विचारसरणी आपल्याकडे आहे – कायम स्वरुपात आहे. आपणही गीतेचा नुसता उच्चार करण्यापेक्षा नीट विचार करून त्यानुसार आचार केला पाहिजे. भगवंताला हेच अपेक्षित आहे. अर्जुनासाठी श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरचा ‘रथसारथी’ होता. आपल्यातील अर्जुनासाठी भगवान (श्रीकृष्ण) ‘पार्थसारथी’ आहे. आपल्या मन-बुद्धी-जीवनाचा रथ चालवणारा ‘पार्थसारथी’! त्याला सर्वभावे मनोभावे शरण जाऊ या.