योगसाधना – २५८ योगमार्ग – राजयोग

0
157

– डॉ. सीताकांत घाणेकर

रात्रीच्या जेवणाची वेळही बघायला हवी. आदर्श वेळ म्हणजे रात्री सात वाजता. पण आजच्या जीवनात बहुतेकांना ही वेळ पाळणे अशक्यच आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की जेवढ्या लवकर जेवू तितके चांगले. हल्ली बहुतेक जण घरी उशिरा येतात. तदनंतर दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघतात व नंतर साडे-नऊ किंवा दहा वाजता जेवतात. त्यामुळे जेवणाचे पचन व्यवस्थित होत नाही. कारण ते लगेच झोपायला जातात.

एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व विश्‍वांत अनेक व्यक्ती योगशास्त्राचा अभ्यास करतात व योगसाधनासुद्धा करतात. समाजात वावरताना अशा व्यक्ती पुष्कळवेळा भेटतात. जेव्हा योग या विषयावर चर्चा होते सहज गप्पागप्पांत – तेव्हा त्यातील काहीजण म्हणतात की आपण जे योगशास्त्राचे फायदे सांगता ते सर्वकाही आम्हाला अनुभवता येत नाहीत.

याची कारणे विविध असतील. एक म्हणजे बहुतेकजण फक्त योगतंत्रे करतात आणि तीदेखील निवडक.. काही आसने आणि क्रिया- कपालभाती, भस्त्रिका, प्राणायाम… थोडेजण ध्यान करतात. पण मुख्य म्हणजे ही सर्व तंत्रे अनेकवेळा पुस्तकावरून, डीव्हीडीवरून शिकतात. ही गोष्ट बरोबर नाही. कारण कोणतेही शास्त्र हे गुरूकडूनच शिकायला हवे. तेही योग्य गुरूकडूनच. म्हणजेच योगसाधना शिकण्यासाठी व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेला योगशिक्षकच असला पाहिजे.
काही जणांना विपरीत परिणामही भोगावे लागतात. कारण योगशास्त्र हे दुधारी शस्त्रासारखे आहे. व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने केले तर थोडेतरी फायदे मिळतीलच. पण स्वतःला पाहिजे तसे किंवा समजेल तसे केले तर नक्की विपरीत परिणाम होतील. म्हणून प्रत्येक योगसाधकाने दक्षता बाळगावयास हवी.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे – ज्यावेळी आपण मानतो किंवा म्हणतो की ‘मी योगसाधना करतो’- तेव्हा ही साधना मुख्य अशा चारही मार्गांनी हवी- ज्ञान-कर्म-भक्ती – राजयोग. तसेच त्यांतील सर्व पैलू प्रत्यक्षात आचरणात आले पाहिजे. राजयोग हा एक अष्टांगयोग आहे. त्याची आठ अंगे आहेत- यम(पांच); नियम(पांच); आसन, प्राणायाम, प्रत्याहार – ही बहिर्रंगाची अंगे व ध्यान, धारणा, समाधी ही अंतरंग योगाची अंगे आहेत. बहुतेक व्यक्ती यातील काहीच तंत्रे करतात. मग संपूर्ण फायदा कसा मिळेल?
तिसरा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे – नियमितता. योग आपल्या जीवनाचा एक भाग होणे आवश्यक आहे. जसे- जेवण, आंघोळ, झोप, काम… प्रत्येक दिवशी योग करायलाच हवा. वेळेअभावी सर्व तंत्रे करणे शक्य नसेल किंवा कठीण असेल तर थोडी तरी मुख्य तंत्रे करायलाच हवीत. म्हणजे शरीर व मनाला त्याप्रमाणे वळण लागते. त्यामुळे योगाचे फायदे दिसायला लागतात. आम्ही जर दिवसाच्या चोवीस तासांचे व्यवस्थित नियोजन केले तर हे सहज शक्य आहे. आपण आजारी असलो, प्रवासात असलो, इतर कामात व्यस्त असलो तरी थोडा वेळ तरी सहजच योग करू शकतो. गरज आहे ती इच्छा होण्याची व योगशास्त्राला प्राथमिकता देण्याची!
चौथा आणखी एक मुद्दा – म्हणजे आपण योगसाधना किती काळापासून करतो? अनेक जण लगेच चांगल्या परिणामांची अपेक्षा करतात. कुठल्याही कष्टाचे फळ लगेच मिळत नाही. वेदकाळात सर्व व्यक्ती- स्त्री,पुरुष वयाच्या सहाव्या वर्षांपासून ऋषींच्या आश्रमात जात असत. तिथे इतर शास्त्रांबरोबरच योगशास्त्राचा अभ्यास नियमित करत असत. तसेच तिथे प्रशिक्षित शिक्षक असत. त्यामुळे बालपणातच व्यक्तीला वळण लागत असे. आज आपण तरुणपणी, उतारवयात योगाभ्यास सुरू करतो व लगेच फायदा मिळावा ही अपेक्षा करतो. हे बरोबर नाही. काही उदा. पाहिली तर हा मुद्दा समजू शकेल.
* आपण शाळेत लहानपणापासून जातो. आता तर तीन-चार वर्षाच्या मुलांना शाळेत पाठवतात. त्यांच्याकडून नियमित अभ्यास करवून घेतला जातो. त्यामुळे शिक्षणाचे परिणाम थोड्या प्रमाणात तरी दिसायला लागतात.
* आपण बी जमीनीत पेरतो. त्याला व्यवस्थित पाणी घालतो. मग त्याला हळुहळू अंकूर फुटतो. त्याचे छोटे रोपटे होते. त्यालाही नियमित पाणी व खत घालावे लागते. तेव्हाच ते झाड निसर्गनियमानुसार व्यवस्थित वाढते व मग ठरल्याप्रमाणे व ठरल्यावेळी फुलं व फळं मिळतात. आपल्याला पाहिजे म्हणून रोप लावल्याबरोबर फुलं व फळं मिळणे अशक्य आहे.
* लग्न झाल्यावर महिला गरोदर राहतात. इथेही सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या, घडल्या तर नंतर मुलाचा जन्म होण्यास नऊ महिने लागतात. स्वतःच्या इच्छेप्रमाणे काही होत नाही.
योगसाधनेचेदेखील तसेच आहे. शास्त्रशुद्धता, नियमितता, दीर्घता… असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत.
पाचवा मुद्दा आहे – जगभर अनेक संस्था योगशास्त्राचा प्रचार… प्रसार करतात. चांगली गोष्ट आहे. या सर्व संस्था वेगवेगळ्या प्रकाराने योग शिकवतात. जरी मूळ तत्त्वज्ञान योगशास्त्राचे असले तरी तंत्रांमध्ये थोडाफार वेगळेपणा दिसून येतो. याला काही हरकत नाही. पण नवा योगविद्यार्थी केव्हा केव्हा गोंधळून जातो. खरे म्हणजे गोंधळण्याची गरज नाही. शेवटी तंत्राचा परिणाम तोच असतो. त्यांतील मुख्य तत्त्व समजणे आवश्यक आहे. जसे धर्मांत वेगवेगळे मार्ग असले तरी धर्माचे मूळ तत्त्वज्ञान एकच आहे- मानवता. तसेच योगाचा मुख्य हेतू एकमेव आहे- जुळणे- शरीर, मन, आत्मा व परमात्मा!
काहीजण वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातात. शेवटी काय करावे व काय करू नये हेच त्यांना समजत नाही. त्यांना योगशास्त्राचे वेगवेगळे फायदे हवे असले तर त्यांनी प्रत्येक संस्थेच्या तंत्रातील त्यांच्या मनाला पटतील, त्यांना फायदा होईल अशी तंत्रे करायला हवीत. त्यासाठी थोडाफार योगतत्त्वज्ञानाचा अभ्यास आवश्यक आहे किंवा एकाच तंत्राचा उपयोग करायला हवा. जसे पाणी हवे असले तर पाणी मिळेपर्यंत एकाच ठिकाणी खणायला हवे. अनेक ठिकाणी एक एक फूट खणून पाणि मिळणे अशक्य.
मीसुद्धा विविध संस्थांच्या योगतंत्रांचा अभ्यास करतो. प्रत्येकाकडे चांगली तंत्रे मिळतात. त्यांचा मी माझ्या योगसाधनेसाठी उपयोग करतो. त्यामुळे मला अनेक चांगले चांगले फायदे मिळतात. योगाभ्यास करता करता माझ्या लक्षात एक महत्त्वाचा मुद्दा आला की योगशास्त्रात चार महत्त्वाचे पैलू आहेत- आहार-विहार-आचार-विचार!
आपण आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी योगाचा कसा उपयोग होईल या विषयावर विचार करीत आहोत. यात आता आहारावर आपला विचार चालला आहे. मानवी शरीर मुख्यतः शाकाहारासाठी बनवले आहे, हे आम्ही बघितले. पण एक मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे की फक्त शाकाहार केला तर आरोग्य संपूर्ण चांगले राहील याची खात्री नाही कारण आहारात विविध मुद्देदेखील बघायचे असतात.
आहाराचे प्रकार अनेक आहेत पण मूलतः आहार तीन प्रकारचे आहेत- सात्विक, राजसिक व तामसिक. यांपैकी सात्विक आहार सर्वतः उत्कृष्ट आहे. असा आहार म्हणजे निसर्गाच्या जवळ असणारा आहार- फळे, फळांचा रस, भाज्या, दूध… काही भाज्यांपासून आम्ही सूप आणि सलाद बनवू शकतो. पण दरवेळी भाज्या आपण तशा खात नाही. त्यात मीठ-मसाले घालून चवदार बनवतो त्यामुळे तो आहार राजसिक होतो. पण जास्त तिखट-तेलकट आरोग्यास चांगले नाही. तामसिक आहार तर शरीराला अपायकारकच असतो. त्यात शिळे अन्न तर जास्त हानिकारक!
अनेकवेळा जेव्हा महिला नोकरी करायला लागतात तेव्हा संपूर्ण आठवड्याचे जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवले जाते. दर दिवशी हे अन्न गरम करून घेतले जाते. हे अन्न तामसिक होते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थित राहत नाही. अन्न फक्त रुचकर असून चालत नाही.
त्याशिवाय आपण केव्हा व किती आहार घेतो हे बघायला हवे. आपण नाश्ता सकाळी घेतो पण तो बहुतेक वेळा कमी घेतो. दुपारचे जेवण थोडे जास्त घेतो आणि रात्रीच्या वेळी जरा मोकळे असतो तेव्हा भरपूर पोटभर जेवतो. ही पद्धत बरोबर नाही. नाश्ता भरपूर करायला हवा. दुपारचे जेवण थोडे कमी व रात्रीचे अगदी थोडे हवे. इंग्रजीत एक मार्गदर्शक म्हण आहे-
* नाश्ता राजासारखा; दुपारचे जेवण दरबारी लोकांसारखे व रात्रीचे जेवण भिकार्‍यासारखे. तसेच रात्रीच्या जेवणाची वेळही बघायला हवी. आदर्श वेळ म्हणजे रात्री सात वाजता. पण आजच्या जीवनात बहुतेकांना ही वेळ पाळणे अशक्यच आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की जेवढ्या लवकर जेवू तितके चांगले. हल्ली बहुतेक जण घरी उशिरा येतात. तदनंतर दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघतात व नंतर साडे-नऊ किंवा दहा वाजता जेवतात. त्यामुळे जेवणाचे पचन व्यवस्थित होत नाही. कारण ते लगेच झोपायला जातात.
सारांश ः आहाराचे प्रकार, तो घेण्याची वेळ या मुद्यांचा विचार करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.