सभेचा संदेश

0
116

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या परवाच्या सभेला मोठी गर्दी दिसली. कर्नाटकातून मोठ्या संख्येने लोक आले होते असेही दिसले. त्यामुळे केवळ सभेला जमलेल्या गर्दीवरून या नवख्या पक्षाला गोव्यात सत्तापरिवर्तन घडवण्याएवढा जनाधार मिळाला आहे असे मानता येत नाही, तरी नीट संघटनात्मक बांधणी झाली, विविध सामाजिक विषयांना पक्ष व्यवस्थित भिडला, तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला एक नवे आव्हान ‘आप’ निर्माण करू शकतो. कॉंग्रेस पक्ष अजूनही पिछाडीवर असल्याने समर्थ विरोधी पक्षाची जी एक भली मोठी पोकळी राज्यात दिसते आहे, ती जागा भरण्यासाठी ‘आप’ च्या रूपाने एक नवा प्रतिस्पर्धी गोव्याच्या राजकारणात निर्माण झालेला आहे याचा बिगूल केजरीवालांच्या सभेने वाजवला आहे. विशेषतः ख्रिस्ती मतदारांना ‘आप’चा पांढरा रंग खुणावू शकतो. कित्येक वर्षे हा वर्ग कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार होता. गेल्या निवडणुकीत त्याने परिवर्तनासाठी मत दिले. परंतु सत्ताधार्‍यांवरची त्याची नाखुशी आता प्रकटू लागली आहे. त्यामुळे त्याला आपल्याकडे वळवण्याचा पद्धतशीर प्रयत्न ‘आप’ने चालवला आहे. परवाच्या सभेमध्ये त्या वर्गाची उपस्थितीही ठळकपणे जाणवणारी होती. विशेषतः दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती मतदारांना ‘आप’ ने मोहिनी घातलेली दिसते. त्यामागे कोणती शक्ती आहे ते स्पष्ट आहे. आज तरी स्थानिक पातळीवर ‘आप’ पाशी जनाधार असलेले नेते नाहीत. केवळ बुद्धिवादी व्यावसायिकांच्या बळावर या पक्षाची राजकारणात नवखी पावले पडताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाने देशाच्या राजकारणात एक नवी गोष्ट घडविली, ती म्हणजे सदैव राजकारणापासून चार हात दूर राहणार्‍या व्यावसायिकांची नकारात्मकता त्यांनी सकारात्मकतेमध्ये परिवर्तित केली आणि त्यांची पावले राजकारणाकडे वळवली. गोव्यातही राजकारणात उतरण्यास इच्छुक असलेल्या व्यावसायिकांची भाऊगर्दी ‘आप’ च्या गोतावळ्यात गोळा होऊ लागली आहे. येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी ती म्हणजे ‘आप’ला अनुकूल ठरेल असे वातावरण खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पक्षच आपल्या चुकांतून निर्माण करीत चालला आहे. स्वतःच्याच हातांनी पायावर कुर्‍हाड मारून घेण्याचाच हा प्रकार आहे. अरविंद केजरीवाल यांनी या सभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उक्ती आणि कृतीमधील विसंगतींवर नेमके बोट ठेवले. खाण घोटाळ्यासंबंधी कारवाई करण्यातील असमर्थता, कॅसिनो हटविण्याच्या आश्वासनाला फासलेला हरताळ, प्रादेशिक आराखड्याविना चाललेली भू रूपांतरणे आदी विषय त्यांनी उपस्थित केले. अगदी नारळाचा विषय आणि उगे येथील मद्यनिर्मिती प्रकल्पाचा विषयही केजरीवालांना पढवण्यात आल्याचे दिसले, मात्र, ज्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच भाजपाविरुद्ध दंड थोपटले आहेत, त्या शैक्षणिक माध्यमाच्या प्रश्नावर त्यांनी सोईस्कर मौन पाळले. केजरीवाल यांच्या टीकेचे लक्ष्य भाजप सरकारऐवजी मनोहर पर्रीकर होते, हाही ‘आप’च्या रणनीतीचा एक भाग आहे. पर्रीकरांच्या लोकप्रियतेचा खात्मा केल्याखेरीज भाजपावर मात करता येणे शक्य नाही हे त्यांना पुरते ठाऊक आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रामाणिक राजकारणाची ग्वाही केजरीवाल यांनी या सभेत दिली. परंतु दिल्लीत खुद्द ‘आप’ मधील मंत्री बनावट पदव्यांपासून भ्रष्टाचारापर्यंतच्या प्रकरणांत सापडले. पदे सोडावी लागली. तरीही कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराला विटलेल्या आणि भाजपाच्या दुटप्पीपणावर नाराज असलेल्या वर्गाला आकृष्ट करण्याचे व्यापक प्रयत्न येणार्‍या काळात ‘आप’ करू शकतो. बुद्धिवादी नेतृत्व आणि तळागाळात जाऊन काम करू शकणारे प्रशिक्षित कार्यकर्ते यांनी जर गोवा पिंजून काढला तर त्यातून गोव्यातील राजकीय समिकरणे उलटीपालटी होणारच नाहीत असे नाही. अर्थात, त्यासाठी ‘आप’ ला विविध सामाजिक मुद्द्यांना निसटता स्पर्श करण्याऐवजी त्या विषयांशी पूर्ण समरसता दाखवावी लागेल. केजरीवालांची सभा सत्ताधार्‍यांना भानावर आणील अशी अपेक्षा आहे. जनतेला सदासर्वकाळ गृहित धरता येत नाही हाच या सभेतून मिळालेला खरा संदेश आहे. पलीकडील मोकळी जागा नेहमी मोकळीच राहील असे नाही एवढे जरी भान सत्ताधारी भाजपाला आले असेल आणि दिल्लीसारखी एका स्कूटरवर बसून विधानसभेत जाण्याएवढी स्थिती येथे निर्माण होऊ नये असे वाटत असेल, तर स्वतःविषयीचा फाजील आत्मविश्वास आणि मतदारांना सदासर्वकाळ गृहित धरण्याची वृत्ती त्यागण्याची तयारी त्यांनी ठेवावी लागेल. जनताजनार्दनापुढे विनम्र व्हावे लागेल.