कोहिनूर हिर्‍याचा विषय लावून धरा!

0
179

– दत्ता भि. नाईक

गेल्या महिन्यात कोहिनूर हिर्‍यासंबंधाने भारत सरकारकडून परस्पर विरोधी विधाने केली गेल्यामुळे देशभर बरीच उलटसुलट चर्चा झाली. देशाच्या मानबिंदूंच्या पावित्र्याचे रक्षण करण्याच्या बाबतीत आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारपेक्षा सध्याचे नरेंद्र मोदी यांचे सरकार अधिक गंभीर असल्यामुळे त्यांचे चाहते तसेच विरोधक- सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कोहिनूर हा जगातील सर्वात मौल्यवान हिरा. तो सध्या ब्रिटिश राणीच्या मुकुटावर बसवलेला आहे. त्यामुळे तो परत मिळवणे वाटते तितके सोपे नाही. ज्या पद्धतीने तो नेला गेला आहे व ज्या तर्‍हेने सध्या विश्‍वशांतीसाठी नवीन वाद उकरून न काढण्याचे धोरण राबवले जात आहे ते पाहता या विषयावर अधिक खोलात जाऊन परिस्थितीचे अवलोकन करावे लागेल. बर्‍याच वेळेस सरकारी अधिकार्‍यांनी तयार केलेल्या अहवालावर मंत्र्यांना अवलंबून राहावे लागते. या कारणामुळेही हा गोंधळ झालेला दिसून येतो.

राजपुत्र दलिपसिंहाचे धर्मांतर

कोहिनूर हिरा भारतातून इंग्लंडमध्ये कसा गेला याचा थोडासा शोध घेतला तर खर्‍या घटनाक्रमाचा किंचित बोध होईल असे वाटते. लॉर्ड डल्हौसी हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारताचा गव्हर्नर जनरल होता तेव्हाची ही गोष्ट. त्यावेळी इंग्लंडची राणी होती व्हिक्टोरिया. या राणीसाहेबांनी त्यांच्या सरदारांना जगभर लूटमार करण्याची मुभा दिली होती. इंग्लंडजवळ जगात निर्यात करावे असे काहीच नव्हते तेव्हा लूटमार हा त्या देशाचा एकमेव धंदा होता.
पंजाबमध्ये राजा रणजितसिंह असेपर्यंत ब्रिटिश देशात हातपाय पसरू शकले नव्हते. राजा रणजितसिंहाच्या राज्यात पूर्वीचा आवेड पंजाब त्याचप्रमाणे वायव्य सरहद्द प्रांतही होता. त्याच्या मृत्यूनंतर शिखांचा पराभव करून राजा रणजितसिंह याचा अल्पवयीन राजपुत्र दलिपसिंह याचे धर्मांतर करून त्याला ख्रिस्ती बनवले गेले. राजाला ख्रिस्ती बनवले की प्रजा आपोआपच ख्रिस्ती बनते हा ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा युरोपमध्ये यशस्वी झालेला प्रयोग आजकाल धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणार्‍या इंग्लंडला भारतात राबवायचा होता. राजपुत्र दलिपसिंह ख्रिस्ती झाला की अख्खा शीख पंथ येशूला डोक्यावर घेऊन नाचेल अशी त्यांची अपेक्षा होती. त्याचे धर्मांतर केल्यावर या राजपुत्राकडून लॉर्ड डल्हौसी याने कोहिनूर हिरा त्याच्याकडून तो इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीच्या वतीने भेट म्हणून ताब्यात घेतला व तो आपल्या देशात रवाना केला. हा हिरा आणि राजपुत्र दलिपसिंह यांना बरोबर घेऊन डल्हौसी साहेब इंग्लंडला गेले. वाटेत हा हिरा कुणा चोर-दरोडेखोरांच्या हातात पडेल याची भीती त्याच्या मनात होती म्हणून तो आपले जहाज घेऊन सुवेझ कालव्याच्या मार्गे न जाता आफ्रिका खंडाला वळसा घालून अतिशय लांबच्या व जुन्या मार्गाने स्वदेशी गेला.
राजा रणजितसिंह हा केवळ शक्तिमान व बुद्धिमान नव्हता तर स्वाभिमानीही होता. मोगलांच्या ताब्यातील कोहिनूर हिरा त्याने स्वतःच्या ताब्यात घेतला होता. त्याचा स्वाभिमान वाखाणण्यासारखा होता. गझनीच्या महम्मदाने पळवून नेलेला गुजरातच्या सोमनाथ मंदिराचा दरवाजा त्याने परत मिळवून आणला आणि तो अमृतसरच्या सुवर्णमंदिरात वसवला, यावरून इतिहास स्वतःच्या बाजूने वळवण्याचे त्याचे सामर्थ्य दिसून येते.

पागोट्यांची अदलाबदल

जगातील सर्व लूटमार करणारे लोक कोहिनूर हिरा मिळवण्यासाठी धडपडत होते. तिसर्‍या पानीपतच्या युद्धास कारणीभूत ठरलेला अहमदशाह अब्दाली याने भारतात लूटमार करण्याकरिता व कत्लेआमचा आदेश देणारा नादिर शहा याच्या पागोट्यात कोहिनूर हिरा असेल असे वाटल्याने त्याच्याशी आपल्या पागोट्याची अदलाबदल केली होती.
लॉर्ड डल्हौसी याला स्वतःचे स्थान पक्के करायचे होते. त्यामुळे तो भारतातून प्रचंड प्रमाणात लूट त्याच्या देशात पाठवत असे. ताजमहालामधील सर्व हिरे-माणके याच काळात लंडनकडे रवाना झाली होती. रायगड ही शिवाजी महाराजांची राजधानी. पेशव्यांच्या काळात या स्थानाचे राजकीय महत्त्व राहिले नसले तरी रायगड किल्ल्याचे सांस्कृतिक महत्त्व जपले गेले होते. या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले होते. १८१८ साली पेशव्यांकडून मराठेशाही खालसा करून घेतल्यानंतर इंग्रजांनी रायगडावरील शिवाजी महाराजांचे सिंहासन उखडून टाकले. या सिंहासनाच्या खाली जमिनीत अनेक मौल्यवान रत्ने होती. ती सर्व इंग्लंडच्या राणीला भेट म्हणून पाठवण्यात आली.

कॉंग्रेसचा देशाभिमान कमी पडतो काय?

अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना कोहिनूर हिरा परत आणण्याचा विषय संसदेत आला होता. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी हा विषय चर्चेला येणार नाही याची काळजी घेतली. आंतरराष्ट्रीय राजकारणात सगळेच विषय एकदम चर्चेला आणले जाऊ शकत नाहीत. भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले की अशा प्रकारचे विषय उरकून काढले जातात आणि या सरकारकडून विशेष अपेक्षा आहे असे मत बर्‍याच विचारवंतांकडून उपस्थित केले जाते. आतापर्यंत जास्तीत जास्त काळ सत्तेवर असलेला कॉंग्रेस पक्ष हा प्रश्‍न का उपस्थित करू शकला नाही या प्रश्‍नाचे उत्तर कोणाजवळही नाही. देशाभिमान या विषयात कॉंग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षासमोर कमी पडतो असे यांना म्हणावयाचे आहे काय? एका बाजूने स्वातंत्र्यचळवळीत अग्रेसर असलेला व इंग्रजांकडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष म्हणून कॉंग्रेसचे कौतुक करायचे व राष्ट्रीय स्वाभिमानाचे विषय आले की भारतीय जनता पक्षाकडे पाहायचे या विचार करण्याच्या पद्धतीचे आश्‍चर्य वाटते.
युनेस्को ही युनोच्या अंतर्गत संघटना आहे. ही संस्था जगातील सर्व सांस्कृतिक अधिकारांचे रक्षण करते. या संस्थेने जगातील सर्व साम्राज्यवादी देशांनी लुटून आणलेल्या वस्तू त्या-त्या देशाला परत द्याव्या असा ठरावही केला आहे. इंग्लंडने या ठरावाला भीक घातलेली नसली तरी फ्रान्सने अशा प्रकारच्या त्या देशाच्या ताब्यातील वस्तू त्या-त्या देशाला परत केल्या आहेत. इंग्लंडच्या मनातून साम्राज्यवादाचा अहंकार पूर्णपणे निघून गेलेला नाही. आम्ही जगाला सुधारणेचा मार्ग दाखवण्यासाठी बाहेर पडलो आहोत असे त्यांना आजही वाटते. इंग्लंडच्या साम्राज्यवादी वृत्तीचे खरे वर्णन ज्येष्ठ साहित्यिक जॉर्ज बर्नाड शॉ याने यथार्थपणे केले आहे.
यापूर्वी जेव्हा कोहिनूर हिर्‍याच्या मालकीचा प्रश्‍न उपस्थित केला गेला तेव्हा पाकिस्ताननेही तो आपल्याला मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती, व इंग्लंडने दोन देश मागणी करतात म्हणून या विषयावर पडदाही टाकला होता. मुळात हा हिरा इंग्लंडला भारतातून नेला होता की पाकिस्तानमधून हा सर्वात मोठा अनुत्तरित प्रश्‍न आहे. ज्यावेळी पाकिस्तान अस्तित्वातच नव्हते तेव्हा नेलेली मालमत्ता पाकिस्तानला का म्हणून मिळावी, या प्रश्‍नाला उत्तर नाही. इंग्लंडमधील व्हिक्टोरिया व आल्बर्ट या दोन पुराणवस्तू संग्रहालयात भारतातून नेलेल्या अनेक वस्तू आहेत. त्यात शिवाजी महाराजांची भवानी तलवारही आहे. जन्माने कंगाल असलेला इंग्लंड लूटमारीच्या बळावर धनवान झाला. तो आता पुन्हा एकदा कंगाल बनण्यास तयार नाही हेच या सर्व प्रश्‍नांवरील उत्तर आहे.
सध्याच्या भारत सरकारसमोर अनेक प्रश्‍न आहेत. त्यातील कोहिनूर हिरा परत आणणे या प्रश्‍नास प्राथमिकता देणे शक्यही नाही. आतापर्यंतच्या सरकारांनी हा विषय थोडा थोडा लावून धरला असता तर शेवटचा हातोडा प्रधानमंत्री मोदींना मारताही आला असता, परंतु आंतरराष्ट्रीय क्षेत्रात युनोमध्ये सुरक्षामंडळात स्थान मिळवणे, चीनच्या दादागिरीला पुरून उरणे यासाठी माजी साम्राज्यवादी देशांच्या मदतीची अपेक्षा ठेवावी लागेल. विश्‍व आजही गोर्‍या कातडीच्या देशांच्या ताब्यात आहे आणि आपल्या सीमेवर उभे राहिलेले शत्रू यापैकी नाही. चीन व पाकिस्तानला तोंड द्यायचे असेल तर आताच त्यांच्याशी दोन हात करायची खुमखुमी दाखवून चालणार नाही. याशिवाय असे काही केलेच तर सर्व आघाड्यांवर युद्ध पुकारणार्‍या हिटलरशी मोदींची तुलना करण्यास आपल्याच देशातील विचारवंत मागेपुढे पाहणार नाहीत.

नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षाची डरकाळी

दि. १२ मे रोजी जगभरातील वृत्तसंस्थांनी नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांचे एक सनसनाटी वक्तव्य प्रसिद्ध केलेले आहे. या घटनेची पार्श्‍वभूमी अशी आहे. ११ मे रोजी इंग्लंडची राजधानी लंडन येथे एक भ्रष्टाचारविरोधी परिषद भरली होती. या परिषदेच्या पूर्वी इंग्लंडचे प्रधानमंत्री डेव्हिड कॅमरून यांनी इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) तसेच कँटर बरीच आर्च बिशप यांच्या उपस्थितीत नायजेरिया व अफगाणिस्तान हे दोन देश प्रचंड भ्रष्टाचारग्रस्त देश असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी याला उत्तर म्हणून म्हटले की, मी इंग्लंडकडून क्षमायाचनेची अपेक्षा करत नसून एका काळच्या आफ्रिकेत सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या नायजेरियाला लुटून नेलेली संपत्ती परत करावी अशी मागणी करतो. नायजेरिया सध्या ज्या प्रकारच्या संकटांचा सामना करते याचा विचार करता एवढे मोठे धाडस दाखवल्याबद्दल आपल्या देशातील सर्व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
एक दिवस असा येईल की इंग्लंड आपल्या देशालाही कोहिनूर हिर्‍याचा किंवा एकूणच लूटमारीचा विषय काढण्याची संधी देईल. आज आपले सरकार अडचणीत असेल, परंतु नेहमीच ही स्थिती राहील असे नाही. जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा जे सत्तेवर असतील त्यांनी हा विषय काढावा. सामान्य माणसाने ही मागणी चालूच ठेवली पाहिजे.