सुदृढ त्वचेसाठी ‘मालिश’

0
189

– डॉ. पांडुरंग गावकर

पाणी टाकून भिजवलेले पीठ वा कणिक जशी मळतात, त्याप्रमाणे शरीराचा मांसल अथवा मेदयुक्त भाग हाताच्या पंजाद्वारे मळला जातो. यामुळे तणाव आलेल्या मांसपेशी कोमल होऊन स्थिर होतात. नस किंवा नड्यांचे विकार बरे होतात व आळसही दूर होण्यास मदत होते.

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ म्हणजे ‘पृथ्वी, आप, तेज वायू आणि आकाश ही पाच तत्त्वे ब्रह्मांडात आहेत. तसेच मनुष्याचे शरीरसुद्धा याच पाच तत्त्वांपासून बनलेले आहे. मानवी शरीराची रचना एखाद्या यंत्राप्रमाणे आहे, हे सत्य आपण सर्वांनी स्वीकारले आहे. आजच्या जीवनात या यंत्राचा वापर निष्काळजीपणे केला जातो, या विधानाची सत्यता पटण्यासारखी आहे. ज्याप्रमाणे यंत्रामध्ये अनेक लहानमोठे भाग एकत्र जोडलेले असतात आणि वेळोवेळी त्यांना तेल व वंगण दिले जाते जेणेकरून त्यांची कार्यक्षमता यत्किंचितही कमी होणार नाही. त्याचप्रमाणे मानवी शरीराच्या यंत्रास त्याच्या त्वचेतील छिद्राद्वारे वा नाडी शिरेद्वारे तेल पोहचवले जाते. या जाणिवेतून मालिश चिकित्सेचा जन्म झाला असावा. दिवाळीतील अभ्यंग मर्दन हा मालिश चिकित्सेचा उत्कृष्ट नमुनाच आहे. मनुष्याला जन्मजातच मालिश चिकित्सेची आवश्यकता असते. त्याचे शरीर धष्टपुष्ट ताकदवान व निरोगी होते. हाडेदेखील मजबूत बनून त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. ही मालिशची प्रथा मानवामध्ये प्राचीन काळापासून प्रचलित आहे. मनुष्याप्रमाणेच पशुपक्षीदेखील कळत नकळत मालिशचा उपयोग करत असतात. जेव्हा अंड्यातून पिल्लू बाहेर पडते तेव्हा त्याच्या शरीराची मालिश पक्षीण आपल्या पंखाद्वारे करते.
आता आम्ही मालिशचे किती प्रकार आहेत ते पाहणार आहोत. तेल मालिश, कोरडी मालिश, पायाची मालिश, थंड मालिश, पावडर मालिश, थंड-गरम मालिश, विजेची मालिश. तसेच मालिश करताना विविध पद्धतींचा वापर केला जातो.
* लयबद्ध हात चालविणे- या पद्धतीत आपला हात शिथिल ठेवून हलक्या पण लयबद्ध प्रमाणात दाब देत देत खालून वरपर्यंत जायचे असते. या प्रकारात शेवटपर्यंत एकाच गतीने मालिश करावी. रक्तप्रवाहातील दोष दूर करण्यासाठी तसेच नाडीत उत्तेजना निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होतो.
* थपथपी क्रिया (स्ट्रोकिंग) – या क्रियेत हात सैल सोडून अवयवावर थापट्या मारल्यासारखे करत रहावे. ही क्रिया पाठीवरून खालील भागाकडे अवयवावर, नाड्यांच्या समांतर डावीकडून उजवीकडे करावी. यामुळे शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते.
* चोळणे (पेट्रीसाज) – या क्रियेत मोठ्या स्नायूचा फुगीर भाग एका हाताने उचलून दुसर्‍या हाताने चोळावे. मांसपेशींना हातावरून उचलून मालिश करीत हृदयाकडे असे करीत जावे. मांसपेशी सशक्त बनविणे व त्यांचे विकार दूर करणे हा या प्रकारच्या मालिशचा प्रमुख फायदा आहे.
* मळणे (निडिंग) – पाणी टाकून भिजवलेले पीठ वा कणिक जशी मळतात, त्याप्रमाणे शरीराचा मांसल अथवा मेदयुक्त भाग हाताच्या पंजाद्वारे मळला जातो. यामुळे तणाव आलेल्या मांसपेशी कोमल होऊन स्थिर होतात. नस किंवा नड्यांचे विकार बरे होतात व आळसही दूर होण्यास मदत होते.
* घर्षण (फ्रिक्शन) – ही क्रिया पूर्ण शरीरावर केली जाते. बोटांना मोकळे ठेवून हाताद्वारे रगडून मालिश खालून वर हृदयाकडे लवकर लवकर करीत जावे. प्रत्येक अवयवावर किंचित दाब देऊन घर्षण करावे. यामुळे ग्रंथीची कार्यक्षमता वाढते. त्वचा सुदृढ व पुष्ट होऊन त्यास उष्णता मिळते. मांसपेशीतील ताण दूर होऊन शुद्ध रक्त प्रवाहित होते. या क्रियेचा उपयोग अर्धांगवात व संधिवाताच्या रुग्णांवर केले जातात. तसेच अर्धशिशी, एपिलेप्टीक फीट्‌सच्या रुग्णावरही याबरोबर शिरोधारा, पंचकर्म, नस्य या क्रियांचा उपचार करून अनेक पीडित रुग्णांना स्वस्थ केलेले आहे.
* कंपन क्रिया (व्हायब्रेशन) – यात प्रथम आपला हात ढिला ठेवून व आपल्या शरीराचा समतोलपणा राखून कंपन क्रिया करावी. यावेळी मालिश करणार्‍याचे मन एकाग्र व हातावर पूर्ण नियंत्रण असणे आवश्यक आहे. पोलिओ, सायटिका व इतर स्नायूंच्या रोगांकरिता ही क्रिया अत्यंत लाभदायक ठरलेली आहे. याखेरीज अंगठ्याचा दाब; हलका हात फिरवणे; उभी थपकी किंवा बुक्की मारणे; बेलन क्रिया; खोल थपकी; उभी व तेज बुक्की; बोटांनी ठोकणे आदी पद्धतींनी मसाजक्रिया किंवा मालिश उपयुक्त ठरलेली आहे.