सोरायसिस ः क्लिष्ट त्वचाविकार

0
802

– डॉ. मनाली महेश पवार, गणेशपुरी-म्हापसा

आजच्या काळात आठवड्यातून एकदा काय तर वर्षातून एकदासुद्धा कडू चव चाखली जात नाही. मेथी-कारल्यासारख्या भाज्या तर नावडत्या भाज्यांच्या यादीतच टाकलेल्या दिसतात. आपली जीवनशैली बदलली आणि त्याचबरोबर आरोग्याला हानी पोहोचवणार्‍या वेगवेगळ्या व्याधी उत्पन्न झाल्यात. ‘सोरायसिस’सारखा त्वचाविकार हा सुद्धा बदलत्या जीवनशैलीचाच परिणाम आहे.

गुढीपाडव्याला कडुनिंबाचा रस, दिवाळीला सातिंगणच्या सालीचा काढा तर दर रविवारी किरायत्याचा काढा किंवा रस असे कडू पदार्थ खायचे त्या काळचे लोक? तर आजी म्हणा किंवा वयस्कर मंडळी आजही सांगतात, की कडू पोटात घेतल्याने तारुण्यपिटिकासारख्या समस्या म्हणा किंवा इतर विकारांपासून शरीराला बाधा होत नसे. तसेच कडू प्यायल्याने पोट साफ रहायचे, भूक व्यवस्थित लागायची. एकंदरीत काय तर वमन, विरेचनसारख्या पंचकर्माद्वारे मुद्दामहून शरीरशुद्धी करण्याची गरजच भासत नसे. आजच्या काळात आठवड्यातून एकदा काय तर वर्षातून एकदासुद्धा कडू चव चाखली जात नाही. मेथी-कारल्यासारख्या भाज्या तर नावडत्या भाज्यांच्या यादीतच टाकलेल्या दिसतात. आपली जीवनशैली बदलली आणि त्याचबरोबर आरोग्याला हानी पोहोचवणार्‍या वेगवेगळ्या व्याधी उत्पन्न झाल्यात. ‘सोरायसिस’सारखा त्वचाविकार हा सुद्धा बदलत्या जीवनशैलीचाच परिणाम आहे.
आज सोरायसिसग्रस्त रुग्णांची संख्या वाढते आहे. भारतापेक्षा इतर प्रगत देशात ही संख्या झपाट्याने वाढते आहे. सोरायसिसचं निदान झाल्यानंतर प्रत्येक रुग्ण घाबरतो कारण आधुनिक वैद्यक शास्त्रातसुद्धा १००% व्याधी बरी होईल, अशी चिकित्सा नाही. रुग्ण बरा जरी झाला तरी पुन्हा व्याधी उद्भवणार नाही याची शंभर टक्के खात्री नाही. म्हणून पर्यायी काही रुग्ण आयुर्वेद शास्त्राकडे वळतात. आयुर्वेद शास्त्रानुसार ‘सोरायसिस’चे शुद्रकुष्ठापैकी एककुष्ठ, चर्मदल किंवा किटिभ या व्याधींशी लक्षणानुरूप साधर्म्य आढळते. व्यवहारात कुष्ठ म्हणजे ‘लेप्रसी’ जरी असले तरी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास कुष्ठ म्हणजे त्वचाविकार होय.

सोरायसिसची कारणे ः

* विरुद्ध अन्नपान – म्हणजे दुधाबरोबर फळे खाणे, मिल्कशेक किंवा फ्रूट सॅलडसारखे पदार्थ खाणे, दूध व मीठ घालून भात जेवणे. बर्‍याचवेळा लहान मुलांना भात दुधासोबत देतात व चवीसाठी त्यात मीठ घालतात. माशांचे जेवण जेवल्यावर लगेच दूध पिणे अशा प्रकारचे चुकीचे आहारातील मिश्रण त्वचारोगांना आमंत्रण देतात.
* गरम व थंड गोष्टींचा एकत्रित वापर करणे. गरम-गरम जेवताना फ्रीजमधील थंड पाणी पिणे, जेवल्यानंतर लगेच आईसक्रीम, कोल्ड्रिंकसारखे थंड पेय पिणे, सतत एसीचा उपयोग करणे, सर्व ऋतुंमध्ये सतत फॅन जोरात लावून फॅनची हवा घेणे. अशाप्रकारे शरीराला घामच येऊ न देणे.
* मसालेदार व तेलकट पदार्थ अतिप्रमाणात खाणे. उदा. वेफर्स, फास्टफूड, जंक फूड, बेकरी प्रॉडक्ट्‌स, मैद्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, नवीन अन्न, पिष्टमय पदार्थ, उडीद, तीळ, दूध व गूळ एकत्रितपणे खाणे.
* मल-मूत्र, उलटी, शिंक अशा वेगांना अडवून धरणे.
* अतिभोजनानंतर लगेच व्यायाम करणे.
* अपक्व पदार्थांचे सेवन करणे.
* दिवसा भोजन केल्यानंतर लगेच झोपणे. तसेच पूजनीय, आदरणीय अशा व्यक्तींचा अनादर करणे अशा प्रकारच्या विविध कारणामुळे सोरायसिससारखे त्वचाविकार उत्पन्न होतात.
‘निदानपरिवर्जन’ हीच कुठल्याही व्याधीची मुख्य चिकित्सा असल्याने वाचकांनी… आपण तर अशा प्रकारच्या कारणांचा अवलंब तर करत नाही ना?… याचा विचार करावा. यासाठी कारणांचे सविस्तर वर्णन मांडलेले असते. कारण ज्या गोष्टींमुळे विविध आजार निर्माण होतात त्या गोष्टींचा मुळात नाश केल्यास मनुष्य निरोगी राहायला मदत होईल.

सोरायसिसची लक्षणे ः

* त्वचेचा रंग लालसर-गुलाबी बनतो.
* त्वचेचे पापुद्रे निघतात.
* त्या जागेवर खाज येते, दुखते.
* बर्‍याच रुग्णांमध्ये सांधेदुखी व सांध्यांच्या विकृती उत्पन्न होतात.
* घाम फार येतो किंवा अजिबात येत नाही.
* थोड्याशा कारणांनीही व्रण उत्पन्न होतो व लवकर भरूनही येत नाही.
आयुर्वेदाप्रमाणे एककुष्ठ, चर्मकुष्ठ, कीटीभ या प्रकारच्या शुद्रकुष्ठाचा सोरायसिस म्हणून निदान केले जाते.
* एककुष्ठ लक्षणे – यामध्ये घाम बिलकुल येत नाही, कुष्ठ अतिविस्तृत असते, माशाच्या त्वचेप्रमाणे खवले त्यावर दिसतात. हे वात-कफ प्रधान कुष्ठ आहे.
* चर्मकुष्ठ लक्षणे – यामध्ये स्निग्ध व काळपट व्रण असतात, स्पर्श खरखरीत असतो. खाज सुटते. त्वचा फुटल्याप्रमाणे दिसते.

आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून रोगाची उत्पत्ती ः

प्रत्येक त्वचारोग हा तिन्ही दोषांच्या विकृतीमधूनच उत्पन्न होतो. पण सोरायसिसमध्ये वाताचे प्राधान्य व कफाचा अनुबंध असतो. वर उल्लेखिलेल्या विविध कारणांच्या सेवनाने अन्नाचे योग्य पचन होत नाही व आमनिर्मिती (अपाचित अंश) होते. याचा परिणाम पहिला रसधातू बिघडतो. त्याची अभिव्यक्ती त्वचेवर होते. तसेच रक्ताचा संबंध त्वचेच्या वर्णाशी असतो. मांसधातूपासून त्वचेची निर्मिती होते, त्यामुळे उत्तरोत्तर धातू बिघडल्यास त्याचे परिणाम त्वचेवर दिसतात.
मेदधातुमुळे शरीराची स्निग्धता राखली जाते. मेदाचे कार्य बिघडल्यास त्वचेवर कोरडेपणा येतो. मेदाचा सांध्यांच्या उत्पत्तीशी संबंध असतो त्यामुळे मेद बिघडल्याने अस्थी बिघडतात व म्हणूनच सांधेदुखीसारखी लक्षणे आढळतात. शरीरातील कमी-अधिक वेगवेगळ्या धातु-दुष्टीमुळे त्वचेवर वेगवेगळी कोरडेपणासारखी लक्षणे आढळतात.
उत्तरोत्तर धातुंच्या दुष्टीमुळे सार्वदेहिक शुक्रधातू व ओजाचीही दुष्टी होते. याच्या विकृतीमुळे त्वचेवर पापुद्—यांचे थर निर्माण झाल्यासारखी स्थिती उत्पन्न होते. मेद धातू बिघडल्याने स्वेदही बिघडतो व त्वचेवर जो योग्य ओलावा, स्निग्धपणा, मऊपणा पाहिजे तो बिघडतो. अशाप्रकारे दोष-धातू दूषित होऊन सोरायसिससारखे त्वचाविकार उत्पन्न करतात.

सोरायसिसवरील उपचार ः

व्याधी उत्पन्न करणारी कारणे, दोषांची दुष्टी, धातूंची विकृती, संप्राप्ती तसेच रोग्यांचे बलाबल यानुसार चिकित्सा करावी. दोषांची स्थिती पाहून व रोग्याचे बल पाहून प्रथम शोधनोपचार करावेत. पंचकर्मापैकी वमन (उलटीद्वारे दोष बाहेर काढणे) व विरेचनाचा उपयोग प्रथम करावा.
स्नेहन अर्थात पोटात घेण्यासाठी व बाहेरून लावण्यासाठी औषधीसिद्ध तेल-तुपाचा वापर करावा. त्वचा अतिशय कोरडी, खरखरीत, भेगा पडलेली व दुखत असल्यास पंचतिक्त घृताचा वापर करावा. डोक्याच्या त्वचेवर परिणाम झाल्यास नस्याचा उपयोग करावा. किटीभसारख्या प्रकारात तर रक्तमोक्षण म्हत्वाची चिकित्सा ठरते.
* औषधी द्रव्यांमध्ये गंधक रसायन हे एक उत्कृष्ट औषध आहे. गंधक उत्तम आमपाचक तसेच कृमीनाशक आहे. स्रोतोरोध नाहीसा करून खाज घालवते, कोरडेपणा येत नाही.
* गुडुचीघनवटी – गुडुचीतत्त्वासारखे दुसरे औषध नाही. गुडूची रसायनी म्हणून कार्य करते.
* रसमाणिक्य – कोरडेपणा, भेगा पडणे, खाज व दुखणे अशी लक्षणे असताना याचा विशेष उपयोग होतो.
* दोषांचे बल अधिक असल्यास समीरपन्नगसारखा कल्प वापरावा. वंग भस्मासारखे भस्मही विशेष उपयुक्त ठरते.
* औषधी कल्पांपैकी आरोग्यवर्धिनी, गंधकरसायन, सर्वांगसुंदर वटी, सूक्ष्म त्रिफळा, सारिवाद्यासव, खदिरारिष्ट यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.
अशाप्रकारे आयुर्वेदीय चिकित्सेचा वापर करून सोरायसिसवर मात करता येते. पण त्यासाठी दीर्घकाळ औषधोपचार व पथ्याचे काटेकोर पालन करावे लागते. तसेच परत परत रोग उद्भवू नये म्हणून रसायन चिकित्साही घ्यावी लागते. वैद्याच्या योग्य मार्गदर्शनाखाली चिकित्सा घेतल्यास रोग आटोक्यात आणता येतो.

सोरायसिसमधील पथ्यापथ्य ः

काय खावे –
– जुने तांदूळ, गहू, फुलके, ज्वारीची भाकरी.
– कडधान्यांमध्ये मूग, मसूर पथ्यकारक.
– भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, पडवळ, दुधीभोपळा, दोडके, गाजर.
– फळांमध्ये पपई, अननस, सफरचंद.
– पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, मुळा, ताकळा, शेवग्याच्या पाना-फुलांची भाजी.
काय खाऊ नये –
– बेकरीतील मैद्यापासून बनवलेले पदार्थ
– लोणचे, चिंच यांसारखे आंबट पदार्थ टाळावेत.
– इडली-डोसासारखे आंबवलेले पदार्थ टाळावेत.
– उसळी, चणे, वाटाणे, हरभरे, पावटे टाळावेत.
– गवार, वालपापडी, हरभरे, पावटे टाळावेत.
– चीज, पनीरसारखे पदार्थ टाळावेत.
– शीतपेये, आईसक्रीम, चॉकलेट, फास्टफूड, जंक फूड टाळावे.
– मीठाचा वापर कमी करावा.
योग्य आहारविहाराद्वारे पथ्याचे पालन करून योगोपचाराचा अवलंब करून. व्यवस्थित औषधोपचाराने पुन्हा उद्भवू नये म्हणून दिल्या जाणार्‍या रसायन चिकित्सेचा वापर करून सोरायसिसवर विजय मिळवता येतो. फक्त चिकित्सा ही दीर्घकाळ व वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावी.