‘भगतसिंह’ बिपिनचंद्रांचा आणि तुमचा-आमचा!

0
109

– दत्ता भि. नाईक

आपल्या देशातील एक प्रसिद्ध विचारवंत व लेखक म्हणून मान्यता पावलेले बिपिनचंद्र यांनी १९८८ साली एक पुस्तक लिहून प्रसिद्ध केले. त्यांच्या बरोबर मृदुला मुखर्जी, आदित्य मुखर्जी, के. एन्. पणीक्कर तसेच सुचेता महाजन ही मंडळीही या पुस्तकाचे सरलेखक आहेत. पुस्तकाचे नाव आहे- ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स’. यात बिपिनचंद्र या मुख्य लेखकाद्वारा बावीस लेख लिहिलेले असून पुस्तकात एकूण मिळून एकोणचाळीस लेख आहेत. स्वातंत्र्यसंग्रामावरील पुस्तक म्हटल्यावर त्यात क्रांतिकारकांचा उल्लेख आपोआपच आला. या पुस्तकातील बिपिनचंद्र यांनी लिहिलेला लेख क्रमांक २० याचे शीर्षक आहे ‘भगतसिंह सूर्यसेन ऍण्ड रिव्होलुशनरी टेररिस्ट’. या लेखात सर्व क्रांतिकारकांच्या व्यवहाराला क्रांतिकारी आतंकवाद या नावाने संबोधलेले आहे. हे पुस्तक दिल्ली विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते. त्यामुळे ते पुस्तक मोठ्या प्रमाणात विकले जाते व त्यातील लिखाणाचा विद्यार्थ्यांकडून शब्दशः व अक्षरशः अभ्यास केला जातो.

संतप्त तरुणांचा उत्साह वा प्रतिक्रिया नव्हे!

सरदार भगतसिंह याचा जन्म १९०७ मधला, जालंधर हे त्यांचे मूळ गाव. सरदार किशनसिंह हे त्यांचे वडील. त्याचे घराणे लायलपूर येथे स्थायिक झाले होते. हे स्थान देशविभाजनानंतर पाकिस्तानमध्ये गेले. भगतसिंह या बालकाचा जन्म झाला तेव्हाच इंग्रज सरकारविरुद्ध लढाई पुकारण्याच्या कारणावरून वडील किसनसिंह तसेच काका स्वर्णसिंह हे तुरुंगात शिक्षा भोगत होते. त्याच्या बालपणीच त्याचे दुसरे काका, पंजाबातील शेतकर्‍यांमध्ये त्याने सरकारविरोधी चळवळ पसरवली म्हणून त्याच्यावर अटक वॉरंट होते. ते चुकवण्यासाठी ते देशातून परागंदा झाले होते. तेथून ते गदर पार्टीसाठी काम करत होते. राजा रणजितसिंहाच्या सैन्यात त्यांचे पूर्वज मोठ्या पदावर होते. त्यांच्या घराण्याचा इतिहास शौर्य व पराक्रमाने खचाखच भरलेला आहे. त्यामुळे संकटांना सामोरे जाण्याचे नीतिधैर्य व जीवन तृणवत् मानण्याची वृत्ती त्यांच्या घराण्यातील सर्व जणांच्या नसानसांत भिनली होती.
१९२५ साली काकोरी कटातील फाशीची शिक्षा झालेले क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल, अशफाक्‌उल्ला खान, रोशनसिंह, लाहिरी यांना तुरुंगातून पळवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यात भगतसिंह यशस्वी झाला नाही. त्यांना फासावर लटकवल्यामुळे क्रांतिकारी चळवळ बंद पडली. असे वातावरण उत्पन्न होऊ नये म्हणून त्याने १९२६ साली नौजवान भारत सभेची स्थापना केली. याशिवाय हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे काम भगतसिंह आणि त्याच्या सहकार्‍यांकडून सुरू होते.
१९२८ साली सायमन कमिशन विरोधी सर्वत्र देशभर निदर्शने झाली. सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नाही म्हणून त्यावर बहिष्कार टाकावा व या कमिशनचे सदस्य जिथे जिथे जातील तेथे त्याविरुद्ध निदर्शने करायची, असे ठरले होते. लाहोर येथे अशा निदर्शनांच्यावेळी टिळक युगातील वयोवृद्ध नेते लाला लजपतराय यांच्यावर स्कॉट या पोलिस अधिकार्‍याने निर्ममपणे लाठीमार केला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या कृत्याचा बदला आपण घेतला नाही तर हे इंग्रज अधिकारी माजतील म्हणून चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंह यांनी लाहोर येथे पोलिस हेडक्वार्टरवर दबा धरून बाहेर पडणार्‍या सॉंडर्सवर गोळी झाडली व त्यात तो मरण पावला. ही केवळ प्रतिक्रिया नव्हती वा संतप्त तरुणांचा उत्साह नव्हता तर देशभर आदरास पात्र असलेल्या व्यक्तीला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा घेतलेला विचारपूर्वक बदला होता.
भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना २४ मार्च १०३१ रोजी फाशी देणार होते परंतु तुरुंग फोडून त्यांना पळवून नेण्याचा कट शिजल्याचा इंग्रज शासनाला सुगावा लागला व त्यांनी एक दिवस अगोदर म्हणजे २३ मार्चला त्यांना फासावर लटकावले. कुणालाही कल्पना येऊ नये म्हणून त्यांच्या प्रेताचे तुकडे तुकडे करून ते् गोणपाटात भरले व ते कुठेतरी जंगलात फेकून देण्याचा त्यांचा विचार होता. ही बातमीही सर्वत्र पसरल्यामुळे हुसैनीवाला येथे त्यांच्या प्रेतांवर दाहसंस्कार करण्यात आले.

मी कधीही दहशतवादी नव्हतो!

दुसर्‍या क्रांतिकारकाचा आतंकवादी म्हणून उल्लेख केलेला आहे तो म्हणजे सूर्यसेन. १८ एप्रिल १९३० रोजी सूर्यसेन अंबिकादास चक्रवर्ती, निर्मल सेन, गणेश घोष इत्यादी क्रांतिकारकांनी पूर्ण बंगालमधील चित्तगॉंग येथे इंग्रजांची शस्त्रे लुटून त्या सर्वांना संध्याकाळी क्लबमध्ये गाठून तेथेच यमसदनास पाठवण्याचे ठरवले होते. परंतु योजनेत एक मोठी चूक राहिली. तो दिवस म्हणजे गूड फ्रायडे होता आणि सर्व इंग्रज अधिकारी त्या दिवशी क्लबमध्ये न जाता प्रार्थना करत होते. परिणामी सर्व क्रांतिकारक पकडले गेले वा फासावर लटकावले गेले.
केवळ आतंकाचे वातावरण उत्पन्न करणे हा या क्रांतिकारकांचा हेतू मुळीच नव्हता. असे घडण्यास ज्या समाजासाठी आपण काम करतो तो समाजच आपल्याबरोबर येणार नाही याची या युवा क्रांतिकारकांना पूर्ण कल्पना होती. भगतसिंह हा तर नुसता स्वतंत्रता सेनानी नव्हता तर तो एक विचारवंत होता. १९३१ साली दिलेल्या निवेदनात सरदार भगतसिंह म्हणतो, ‘‘माझ्यापाशी असलेल्या सर्व शक्तिनिशी मला जाहीर करू द्या की मी दहशतवादी नाही आणि मी कधीही दहशतवादी नव्हतो.’’

सरकारी विद्वानांचा प्रचार

बिपिनचंद्र हे विद्वान गृहस्थ होते याबद्दल शंका नाही. अलीकडेच २०१४ साली त्यांचे निधन झाले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. सरदार भगतसिंह यांच्या संबंधाने त्यांनी बरेच संशोधन केल्याचा त्यांच्या समर्थकांकडून दावा केला जातो. त्यात तथ्यही असेल परंतू ते कॉंग्रेस पक्षाचे म्हणजे नेहरू घराण्याचे प्रतिनिधी म्हणून वावरत होते हे सर्वज्ञात आहे.
कॉंग्रेसने समाजवादी समाजरचनेचा स्वीकार केला आणि जे जे देशभक्तीला आवश्यक आहे त्याला शिक्षणातून डच्चू देण्यात आला. अकबराचे उदात्तीकरण करून महाराणा प्रतापला थिटे संबोधायचे. शिवाजीला फक्त मराठ्यांचा बंडखोर नेता बनवायचे. यासारखे उद्योग या पोसलेल्या विद्वानांनी केले. संत तुकारामाच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ‘मुदबख लिहिणे तेलतुपावर जगणे’ या प्रकारचे हे लोक. सरकारच्या कोणत्या ना कोणत्या समितीवर स्वतःची वर्णी लावून घेण्यात हे विद्वान तरबेज असतात.
१९८८ मध्ये गोवा विद्यापीठात आले असता याच विपिनचंद्र यांनी शिख संप्रदाय हा भारताचा खड्‌ग हस्त आहे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार आहे – असे वक्तव्य केले होते. उलट प्रश्‍न विचारणार्‍यांना यावेळी रोखण्यात आले होते कारण ते सरकारी विद्वान होते. शिख संप्रदाय व देशाचा खड्‌ग हस्त नसेल तर गुरुनी नेमके काय केले? याचे उत्तर त्यांच्याजवळ नव्हते. त्यांच्या हातात सरकारचा उदो उदो करण्यासाठी टाळ होते. त्यावेळी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी होते व त्यांच्या मताचा प्रचार करण्यासाठीच ते सरकारी खर्चाने फिरत होते.

खरा इतिहास शिकवला पाहिजे

गांधी-आयर्विन कराराची तयारी चालू होती व गांधी यांनी या करारात आयर्विनसमोर कोणकोणते मुद्दे ठेवावे यासंबंधाने चर्चा चालू होती. कुणीतरी भगतसिंह आदी तरुणांची फाशी रद्द करण्याची मागणी पुढे केली तेव्हा पं. नेहरू जोरात उसळून बोलले- ‘ते दिवस आता संपले!’ त्यामुळे याविषयावर कोणीही बोलले नाही. ही घटना शिरर या पत्रकार- इतिहासकाराने लिहून ठेवली आहे. तसे पाहता या तरुणांची ताबडतोब सुटका करावी अशी मागणी कोणीही करणार नव्हते. फक्त त्यांची फाशी रद्द करावी या साध्या मागणीला पं. नेहरूंनी विरोध का केला याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भगतसिंहसारखा उमदा विचारवंत मुक्त होईल व त्यामुळे त्यांच्या आसनाला धोका उत्पन्न होईल, ही भीति त्यांच्या मनात होती.
ही सर्व तरुण मंडळी गांधीजींच्या चळवळीत सहभागी होत होती. १९२२ साली अचानक चौरीचौरू प्रकरणाचा आधार घेऊन गांधीजींनी आंदोलन थांबवल्यामुळे हे सर्वजण सशस्त्र मार्गाकडे वळले. पाठ्यपुस्तकातून खरा इतिहास शिकवण्यावर स्वातंत्र्यानंतर जणू अघोषित बंदी होती. आर्य नावाचा कोणताही वंश नाही, हे सिद्ध झालेले आहे. तरीही भारतात आर्यांनी येथील संस्कृती नष्ट केली असा इतिहास अजूनही शिकवला जातो व याला विरोध केल्यास इतिहासाचे भगवेकरण चालू असल्याची हाकाटी पिटली जाते.
आता खरा इतिहास शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भगतसिंह हा आतंकवादी होता असे सांगणार्‍याच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली पाहिजे, भले ती माणसं कितीही उच्चपदावर असली तरीही! भगतसिंह एक निर्भेळ विचारवंत होता म्हणूनच एक क्रांतिकारक म्हणून १९१७ मधील रशियन क्रांतीचा त्याच्यावर प्रभाव असणे स्वाभाविक होते. त्याने स्वतः नास्तिक असल्याचे घोषित केले होते. त्याचा नास्तिकपणा सवंग नव्हता. तो एका सखोल विचार करणार्‍या विवेकवाद्याचा नास्तिकपणा होता. आपल्याकडे अभिमन्यूला कमी लेखणारे व हसन हुसेनच्या शहादतीचे उदात्तीकरण करणारे तसेच राजपूरच्या गंगेची थट्टा उडवणारे व झेव्हियरच्या नखातून रक्त येते असे सांगणार्‍याचे कौतुक करणारे तथाकथित नास्तिक आहेत. भगतसिंह हा त्यातला नव्हता. बिपिनचंद्रासारख्या विद्वानांचा भगतसिंह आतंकवादी असेल पण तुमचा- आमचा भगतससिंह देशाभोवती आपले जीवन कुरवंडून टाकणारा, क्रांतिकारक, परिवर्तनवादी, विवेकवादी विचारवंत होता. तो एक अभिजात देशभक्त होता. ज्या भगतसिंह आदी क्रांतिकारकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याचे कार्यक्षेत्र असलेले लाहोर आणि ज्या सूर्यसेन यांनी इंग्रजांच्या शस्त्रागारावर एल्गार केला त्याचे कार्यक्षेत्र असलेले चित्तगॉंग भारतात नाही याचीच खरी खंत क्रांतिकारकांच्या चाहत्यांच्या मनात असली पाहिजे.