तीन मजली कार पार्किंग प्रकल्पाचे ९ रोजी उद्घाटन

0
76
  • ४५ कोटी रु. खर्च
  • ४६२ गाड्या पार्किंग करण्याची सुविधा
  • प्रवाशांसाठी लिफ्ट सुविधा.
  • जीटीडीसीएला मिळणार महसूल

गोवा पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळ यांनी पणजीत सांता मोनिका जेटीजवळ उभारलेल्या बहुमजली कार पार्किंग प्रकल्पाचे ९ मे रोजी उद्घाटन करण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी काल या प्रकल्पात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
९ रोजी उद्घाटन करून या प्रकल्पाचे सॉफ्ट ओपनिंग करण्यात येईल, मात्र खर्‍या अर्थाने पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प कार्यान्वित होईल तो मे महिन्याच्या मध्याला अशी माहितीही परूळेकर यांनी यावेळी दिली. १३,५५६ चौ.मीटर एवढ्या जागेत हा प्रकल्प उभा राहिलेला असून तो बांधण्यास ४५ कोटी रु. एवढा खर्च आला असल्याच ते म्हणाले.
या बहुमजली कार पार्किंग प्रकल्पात ४६२ गाड्या पार्क करता येतील. तळमजल्यावर ८७, पहिल्या मजल्यावर ८५, दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरही ८५, गच्चीवर (टेरेस) ८७ तर प्रकल्पाजवळच्या मोकळ्या जागेत अन्य ३३ गाड्या पार्क करता येतील. पणजी शहरातील वाहनांची वर्दळ व जटील बनलेली पार्किंग समस्या सोडवण्याच्या कामी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असे परूळेकर यांनी यावेळी सांगितले.
पार्किंग शुल्कासाठी अद्याप निविदा नाही
या पार्किंग शुल्कासाठी अजूनही निविदा काढण्यात आलेली नसून त्यामुळे पार्किंगसाठीचे दर सांगता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पार्किंग इमारतीत प्रवाशांसाठी २ लिफ्ट, शौचालये असतील. तसेच सुरक्षेसाठीचा भाग म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे, विजेची व्यवस्था असेल तसेच खास सुरक्षा व्यवस्थाही असेल. या प्रकल्पामुळे गोवा पर्यटन विकास महामंडळाला महसूल प्राप्त होणार असल्याचे परूळेकर यांनी सांगितले.
किनार्‍यांवरही पार्किंग प्रकल्प
कळंगुट, कोलवा व हणजूण या किनार्‍यावर गोवा पर्यटन विकास महामंडळाची जमीन असून या तिन्ही किनार्‍यांवरही असे बहुमजली कार पार्किंग प्रकल्प उभारण्याचा विचार असल्याची माहिती परूळेकर यानी यावेळी दिली.
यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई हेही हजर होते.