‘कर्ण’ ः शरीराचा दुर्लक्षित अवयव

0
611

– डॉ. मनाली म. पवार
गणेशपुरी-म्हापसा

 

सामान्यतः कर्णरोगावर तूप पिणे हा प्रयोग रसायनाप्रमाणे गुण देणारा आहे. कर्णरोग झालेल्या व्यक्तीने अतिव्यायाम करू नये. स्नान करताना कानात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. कानाच्या पाळीचा भाग मेंदूशी संबंधित असल्याने त्याठिकाणी कान टोचणे व कर्णभूषणे घालणे ही प्रथा रूढ आहे.

तान्ह्या बाळाला आंघोळीपूर्वी तैलाभ्यंग करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. कान, नाक, डोळे,
टाळू याठिकाणी तैलपुरण करून गरम पाण्याने आंघोळ घातली जायची. आज सगळे डॉक्टर तान्ह्या बाळाच्या कानात तेल न घालण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या मते कानात तेल घालण्याने इन्फेक्शन होऊ शकते. पण आयुर्वेदाप्रमाणे रोज एकदा कानात, नाकात, टाळूवर तैलाभ्यंग करून आरोग्यरक्षण करावे, असे सांगितले आहे. कानाविषयी विशेष सांगायचे म्हणजे पंचज्ञानेंद्रियांपैकी श्रोत्रेंद्रियांचे अधिष्ठान म्हणजे कान. तसेच पंचमहाभूतांपैकी आकाश महाभूताचा संबंध श्रोत्रेंद्रियाशी आहे. जेथे जेथे आकाश म्हणजे पोकळी आहे तेथे प्रत्येक ठिकाणी वायूचे सहचर्य असते. म्हणून कानाच्या आरोग्यासाठी कानात वात दोष वाढत तर नाही ना याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तेलासारख्या स्नेहद्रव्यांनी वाताचे शमन होते व कानाचे पोषण होते. म्हणूनच आयुर्वेद शास्त्राप्रमाणे कानात तेल घालण्यास सांगितले आहे.
आपण जेवढं लक्ष चेहर्‍याकडे देतो तेवढं लक्ष बहुधा कधीच कानांकडे देत नाही. तसे कान हा आपल्या शरीरातला दुर्लक्षितच अवयव होय. जोपर्यंत कान दुखत नाही किंवा ऐकू येण्याचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत आपले कानांकडे काही लक्ष जात नाही. सध्याच्या वाढच्या ध्वनीप्रदूषणाच्या काळात कानांची नीट काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर कमी ऐकू येणे, कान दुखणे, कानातून स्राव येणे, कानातून आवाज येणे, कानात अतिप्रमाणात मळ साचणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

कानाचे आजार ः

१) कर्णमल – कानाशी संबंधित अगदी सर्वसाधारण तक्रार म्हणजे कानात साचणारा मळ. खरे तर बाह्यकर्णनलिकेत बाहेरून काही पदार्थ शिरू नयेत आणि कानाचे रक्षण व्हावे यासाठी मेणचट द्रव पाझरण्याची नैसर्गिक यंत्रणा कानात कार्यरत असते. त्यामुळे कानात नेहमी ‘इयर बर्ड’ घालून कर्णमळ साफ करू नये. आंघोळीनंतर साध्या मऊ फडक्याने कानाचा बाहेरून दिसणारा सर्व भाग नुसता पुसला तरी मळ साठण्याची तक्रार दूर ठेवता येते. अन्यथा उगीचच मळ कोरत राहिल्यास तो तयार होण्याचे प्रमाणही वाढतच राहते आणि मग तो कानात साचत राहतो.
२) कान बांधणे – कानात वारा जाऊ नये म्हणून गरोदर स्त्रिया, प्रसूत झालेल्या स्त्रिया किंवा लहान बाळांमध्ये कान बांधण्याची एक प्रथा आहे. पण कानात वारा जात नसून थंड वातावरणामुळे मुळातच वाताचे स्थान असलेल्या कानांत वाताची वृद्धी होते व त्यामुळे कान दुखायला लागतात. तर कान झाकून घेतल्याने ऊबेची जाणीव होते व म्हणूनच कदाचित कानाला रुमाल किंवा स्कार्फ बांधण्याची प्रथा आहे. जुन्या काळातल्या स्त्रियांचा पदर नेहमी डोक्यावरून असायचा त्यामुळे आपसुकच कान झाकले जायचे.
३) कानात बाहेरची वस्तू जाणे – लहान मुले पेन्सील, वाटाणे, कागद, खडूचा तुकडा अशा वस्तू कानात घालतात. पण त्याचे मूळ कारण म्हणजे लहान मुले मोठ्यांचं अनुकरण करतात. मोठ्यांना जेव्हा ते कानात माचीसची काडी किंवा इयरबड घालताना बघतात तेव्हा मुलेही असे काही-बाही कानात घालतात. त्यामुळे मोठ्यांनाही अशी काही सवय असल्यास त्यांनी ती ताबडतोब सोडून द्यावी. अनेकदा उडणारे कीटक कानात गेल्याचे आढळून येते. कानातील मेनचट (चिकट) द्रव व्यवस्थित असेल तर त्याच्या वासानेच कीटक त्यांच्याकडे फिरकत नाहीत.
४) कर्णशूल – कर्णशूल म्हणजे कान दुखणे. कान व त्याच्या चहूबाजूंनी जेव्हा दुखायला सुरुवात होते तेव्हा त्याला कर्णशूल असे म्हणतात. बर्‍याच वेळा कान दुखण्याचा संबंध सतत होणार्‍या सर्दीशी असतो. प्रकूपित वायू कानाच्या ठिकाणी आश्रित होऊन कर्णशूल उत्पन्न करतो. कर्णशूलाबरोबर बर्‍याच वेळा डोकेदुखी असते. कधी कधी दाह, शोथ, ज्वर किंवा कानामध्ये खाज येणे यांसारखी लक्षणे दिसतात. उपेक्षा केली किंवा त्याची चिकित्सा न केल्यास कानांमधून स्राव यायला लागतो.
चिकित्सा ः स्थानिक स्नेहन व स्वेदन हीच या सर्व प्रकारात महत्त्वाची चिकित्सा आहे. सर्वच कर्णशूलांसाठी कर्णस्रोतसामध्ये असणारा अवरोध दूर करणारी चिकित्सा करावी लागते. अनेक वेळा कर्णगूथक हे वेदनेचे कारण असते. अशावेळी तेलाने कर्णपूरण करून मळ थोडासा मृदू करावा व कर्णधावन करून मळ काढून टाकावा. कर्णशूलासाठी व्याधी प्रत्यनिक अशा स्वरूपात वृश्‍चिक तेलाचा प्रयोग केला जातो. शतपाकी बला तेलाचे नस्यही उपयोगी पडते. पित्तज कर्णशूलामध्ये मृदू विरेचन उपयोगी पडते. तसेच चंदन, यष्टीमधुसारख्या द्रव्यांनी कानाभोवती लेप केल्याने लाभदायक ठरते. तापस्वेद, उष्णस्वेदाचाही कर्णशूलामध्ये उपयोग होतो. आधुनिक शास्त्रानुसार कर्णशूल उत्पन्न होण्याची अनेक कारणे आहेत. मध्यकर्ण शोथ (ओटायटीस मिडिया) हे याचे महत्त्वाचे कारण आहे. कृमीदंत, जंतवेष्टपाक आदि रोगांमध्ये संचारीवेदना (रेफर्ड पेन) होऊन कर्णशूलाची उत्पत्ती होताना दिसते. सर्दीसारख्या रोगात युस्टेचिअन ट्यूबद्वारा मध्यकर्णापर्यंत सूज येऊन कान दुखायला लागतो.
५) कर्णस्राव – शिरःप्रदेशी आघात होणे, पाण्यात फार वेळ डुंबणे, कर्णविद्रधीचा पाक होणे इ. कारणांमुळे वातादि दोषांचा प्रकोप होऊन कानातून स्राव वाहू लागतो. कानांवर आघात झाला असता केवळ रक्तस्राव होतो. पाण्यांत डुंबणे इत्यादी कारणांमुळे पाण्यासारखा स्राव होतो त्याचप्रमाणे कर्णविद्रधीचा पाक झाल्यास कानांतून पू येतो. काही वेळा कान अगदी कोरडा झाल्यासारखा वाटतो. परंतु काही वेळाने पुन्हा स्राव सुरू होतो.
चिकित्सा ः कानातून पू येत असल्यास हरितकी, लोध्र, लज्जालु, आमलकीसारख्या कषाय रसात्मक क्वाथाच्या रसाने कर्णपूरण करावे. त्यानंतर कान स्वच्छ पुसून घेऊन यष्टीमधु, धातकी, लोध्र, मंजिष्ठा यांनी सिद्ध केलेल्या तेलाने कर्णपूरण करावे. त्याचप्रमाणे मदन, अगरु, गुग्गुळ यांची धुरी कर्णप्रदेशी देणेही लाभदायी ठरते. अनेक दिवसपर्यंत वाहात असलेल्या कानांसाठी कपर्दिक भस्माचा स्थानिक प्रयोग चांगला होतो. आभ्यंतर औषधी प्रयोगात सूक्ष्म त्रिफळा, गंधक रसायन, वंग भस्म यांचा उपयोग करणे फायदेशीर ठरते.
६) कर्णनाद – कानातील स्रोतसामध्ये जेव्हा विकृत वायू स्थिर होतो त्यावेळी रोग्याला मृदंग, शंख, वेणुघोषाप्रमाणे विचित्र आवाज ऐकू येतात. त्यास कर्णनाद असे म्हणतात. हा आवाज मात्र रुग्णाला सोडून अन्य कोणालाही ऐकू येत नाही.
चिकित्सा ः कर्णनादांमध्ये स्थानिक स्नेह चिकित्सा ही महत्त्वाची आहे. कर्णपूरणासाठी सर्षपतैल वा अपामार्गक्षारतैल यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. माष तैल, महामाप तैल, नारायण तैल किंवा अणु तैलाचा बुहणनस्यासाठी उपयोग करावा. आभ्यंतर औषधी प्रयोगामध्ये ज्या मूळ रोगांमुळे कर्णनाद निर्माण झाला त्याची चिकित्सा करणे जरुरीचे ठरते. याबरोबर वातविध्वंस, समीरपन्नगरस यांसारख्या औषधी द्रव्यांचा उपयोग हितावह ठरतो. बला, अश्‍वगंधा, शतावरीसारख्या बल्य औषधांचाही उपयोग कर्णनादासाठी उपयुक्त ठरतो.
७) कर्णबाधिर्य – कर्णबाधिर्य म्हणजे बहिरेपणा. जेव्हा वायू स्वतंत्रपणे किंवा कफाने आवृत्त होऊन प्रकूपित होतो, त्यावेळी शब्दवह स्रोतसांचा अवरोध होतो व कर्णबाधिर्य उत्पन्न होते. कफ व वायु यांचा प्रकोपक आहार-विहार आणि कर्णनादाची उपेक्षा करणे यांमुळे कर्णबाधिर्य उत्पन्न होते. वार्धक्य व तत्‌जनित वातप्रकोप तसेच काही औषधांच्या सेवनानेही बहिरेपणा येतो. आयुर्वेदाप्रमाणे कर्णबाधिर्य हे केवळ वातज किंवा आवृत्तवातकृत असू शकते. प्रथम फक्त मोठ्याने बोललेले ऐकू येते. हळू बोलले असता ऐकू येत नाही. पुढे पुढे याची गंभीरता वाढत जाऊन अजिबात ऐकू येत नाही. आधुनिक शास्त्राप्रमाणे बहिरेपणा दोन प्रकारचा असतो. ध्वनीलहरींच्या वहनाशी संबंधित (कंडक्टिव्ह) किंवा त्यांच्या संवेदनांशी संबंधित (सेन्सरी न्यूरल). यातील पहिल्या प्रकारचा बहिरेपणा हा बाह्य किंवा मध्यकर्णाला इजा पोहचल्यामुळे होतो. बाह्यकर्णनलिकेत एखादी वस्तू अडकणे किंवा जोरदार मार लागल्याने बहिरेपणा येऊ शकतो व डॉक्टरी उपचाराने बरा होऊ शकतो. ध्वनिलहरींच्या संवेदनांशी संबंधित दोष असल्यास कृत्रिम उपकरणांचा वापर करावा.
अनेकदा बहिरेपणा जन्मजात असतो. हे बहिरेपण लवकर लक्षात येणे आवश्यक असते. मोठ्या आवाजाने दचकणे, आवाजाला प्रतिसाद देणे- डोळे मिचकावणे, तिसर्‍या महिन्यानंतर ओळखीच्या आवाजाकडे तोंड वळवणे अशा क्रिया मूल करत नसेल तर त्याच्या श्रवणक्षमतेची चाचणी करून घ्यावी. बहिरेपणा जन्मजात असेल व शस्त्रकर्माने तो दूर होण्यासारखा नसेल तेव्हा श्रवणयंत्रे आणि कर्णबधिरांसाठीच्या खास शाळांच्या माध्यमातून अशा मुलांचे पुनर्वसन करता येऊ शकते.
मेंदूज्वर, सेरेब्रल मलेरिया यासारख्या आजारातही श्रवणक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच सतत मोठा आवाज कानांवर आदळत राहिल्याने ध्वनिलहरी ग्रहण करण्याची क्षमता कान गमावून बसतो. अशा अंशिक बहिरेपणाकडे वेळीच लक्ष न दिल्यास कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते.
चिकित्सा ः स्थानिक स्नेहन, स्वेदन या व्याधिमध्येही महत्त्वाचे ठरते. संपूर्ण बाधिर्य येण्यापूर्वी वेळीच चिकित्सा करणे सोपे जाते. या अवस्थेत आयुर्वेद शास्त्राने रक्तमोक्षण सांगितले आहे. कर्णपुरणासाठी बिल्वतैल उत्कृष्ट कार्यकारी ठरते. बिल्वतैल कर्णपुरणासाठी सातत्याने वापरल्यास वृद्धावस्थेत होणारे बाधिर्य निश्‍चितपणे कमी होते. कर्णपुरणाबरोबर शिरोभ्यंग, नावननस्य आणि अन्य वातशामक उपचार हेही कर्णबाधिर्यासाठी उपयुक्त ठरतात.
सामान्यतः कर्णरोगावर तूप पिणे हा प्रयोग रसायनाप्रमाणे गुण देणारा आहे. कर्णरोग झालेल्या व्यक्तीने अतिव्यायाम करू नये. स्नान करताना कानात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
कानाच्या पाळीचा भाग मेंदूशी संबंधित असल्याने त्याठिकाणी कान टोचणे व कर्णभूषणे घालणे ही प्रथा रूढ आहे.