समुपदेशन गीतेतून ……. कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः|

0
170

– प्रा. रमेश सप्रे

 

अत्यंत लवचिक व उदार अशी समाजरचना प्रत्यक्षात येऊ घातलीय, आपण त्यात अडथळे निर्माण करण्याऐवजी ती अधिक प्रभावी व परिणामकारक बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. व्यास-वाल्मिकींना कुठल्यातरी कौटुंबिक पार्श्‍वभूमीचा संदर्भ देऊन आजही नि अजूनही विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी मानणार की सार्‍या मानवजातीच्या मार्गदर्शक, कुलगुरुपदी असलेले ‘ब्रह्मज्ञानी’ मानणार? द्रोणाचार्य-अश्‍वत्थामा-अर्जुन-एकलव्य-कर्ण हे प्रभावी क्षत्रिय नाहीत?

 

काही शब्दांचे शास्त्रग्रंथांच्या दृष्टींनी रूढ अर्थ नि जीवनाशी संबंधित असलेले अर्थ निराळे असतात. यात संस्कृत भाषेची समृद्धी दिसून येते तशीच आपल्या संस्कृतीची विविधताही प्रत्ययास येते. ‘संस्कार’ नि ‘कर्म’ हे असे महत्त्वाचे शब्द आहेत.

‘संस्कार’ म्हटलं की जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतर या कालावधीतले सोळा संस्कार लक्षात येतात. मग त्यांचे मत्र, विधी, उपचार, सोहळे किंवा सोपस्कार महत्त्वाचे ठरतात. पण जन्मतः जो दोन पायांचा शिंगंशेपूट नसलेला पशू असतो तो त्याच्यावर घरी, शाळेत, मंदिरासारख्या संस्थांतून विविध संस्कार घडतात. आजुबाजूचं वातावरण, संगत, समवयस्क मित्रमैत्रिणी यांच्याद्वारेही चांगले-वाईट संस्कार घडतात. घडत राहतात. त्यातूनच व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व घडत जातं. काही बाबतीत बिघडतही जातं. पण संस्कारांचं व्यक्तिमत्त्व विकास नि चारित्र्याची जडण घडण या दृष्टीनं खूप महत्त्व आहे ही गोष्ट माणसाला माणूसकी असलेला माणूस बनवण्यासाठी खूप महत्त्वाची असते. कारण माणूस (ह्यूमन बीइंग) तर आपण असतोच पण माणुसकी असलेला माणूस बनावं लागतं (बीइंग ह्यूमन). हा सध्याच्या काळाचा नि आपल्या वर्तनाचा विचार केला तर खूप महत्त्वाचा पैलू आपल्या जीवनाचा आहे.
‘जन्मना जायते शूद्रः, संस्कारात द्विज उच्यते|’ असं एक सूत्र सांगितलं जातं. याचा अर्थसुद्धा दोन प्रकारानं सांगितला जातो. जन्मानं सारे शूद्र असतात, संस्कारांमुळे (मुंजीसारख्या) त्यांचा दुसरा जन्म (द्विज) होतो. पण दात (जे पडून पुन्हा येतात), पक्षी जे अंड्यातून (पहिला जन्म), बाहेर येतात तो दुसरा जन्म असतो. पण हा बाह्यविचार झाला. केवळ एखादा विधी करून किंवा उपचारांमुळे माणूस आतून बदलत नाही. जानवं घालून, डोक्याचा घेरा (मुंडन) करून, लंगोटी घालून कोणी बटू ब्राह्मण (ज्ञानी) बनत नाही. ब्रह्मचर्य हे व्रत आहे तेजाचा, सामर्थ्याचा संग्रह करण्याचं, ज्ञान संपादन करण्याचं. इथंही ‘ब्रह्मचर्याश्रम’ व ‘ब्रह्मचर्य’ यात गोंधळ होतो. लग्न होईपर्यंत व्यक्ती ब्रह्मचर्याश्रमात असते पण ज्ञानोपासनेचं व्रत आजन्म पाळणारे तेजस्वी ब्रह्मचारी विरळाच!
या संदर्भात एक प्रसंग आहे. स्वातंत्र्यलढा परदेशात चालवणार्‍या मंडळीत स्वतःच्या बुद्धीनं, तळमळीनं व देशप्रेमानं तळपणार्‍या एका अलौकिक व्यक्तीच्या जीवनातला. व्ही. के. कृणमेनन हे त्यांच्या काश्मिर प्रश्‍नावर केलेल्या युनोमधल्या सर्वांत प्रदीर्घ भाषणामुळे गाजले. पण स्वातंत्र्यचळवळीतही इंग्लंडमध्ये राहून भाषण करून, पत्रकं छापून, वाटून त्यांनी मोठं कार्य केलं. एकदा त्यांचा परिचय करून देताना एक तेजस्वी ब्रह्मचारी (ब्रिलियंट बॅचलर) असा उल्लेख केल्यावर एकदम उठून, माइक हातात घेऊन ते म्हणाले, ‘माझ्या देशात ब्रह्मचारी या शब्दाभोवती तेजस्वी कार्य आहे – ज्ञानसाधनेचं, त्यागाचं, अथक परिश्रमाचं. या अर्थानं मी ब्रह्मचारी नाहीये फक्त अविवाहित (अन्‌मॅरिड) आहे. तर ब्रह्मचर्य हा आयुष्यभर चालू राहणारा ज्ञानसाधनेचा ध्यास आहे. प्रवास आहे. केवळ व्रतबंध-उपनयन किंवा मुंजीचा संस्कार (खरं तर सोहळा) केल्यानं व्यक्ती खर्‍या अर्थानं ‘द्विज’ बनत नाही. गायत्री मंत्राची उपासना, त्यावर चिंतन, त्यानुसार वर्तन या गोष्टी अपेक्षित असतात.
विवाहसंस्कारही केवळ सप्तपदी (किंवा हल्लीची बुफे पार्टी, फोटोशूटिंग इ.) नाही तर ‘धर्मे-अर्थेच-कामेच नातिचरामि|’ अशा शपथेचा संस्कार आहे ज्यात सहजीवन, सहमती, सहअनुभूती अपेक्षित आहेत.
तुकाराम, कबीर, नानक यांच्यासारख्या रोखठोक, बंडखोर संतांनी किंवा समाजसुधारकांनी अशा केवळ विधि-उपचारात अडकलेल्या संस्कारांची मर्यादा दाखवून दिलीय. ‘आचार प्रभवो धर्मः’ हे सूत्र त्यांना महत्त्वाचं वाटतं. धर्म, संस्कृती, मूल्यं यांचा संबंध केवळ ग्रांथिक पांडित्याशी किंवा पाठांतर, अस्खलित उच्चारणाशी नाही तर जिवंत आचरणाशी आहे. एकनाथ जेव्हा वाळूत पाय भाजतात म्हणून अतीव करुणेनं एका महाराच्या मुलीला उचलून घेतात तेव्हा केवळ विद्वान पंडितांच्या दृष्टीनं बहिष्कृत झाले तरी सर्वोच्च मानवधर्माच्या दृष्टीनं आदर्श माणूस ठरतात. पू. गोंदवलेकर महाराज जेव्हा रस्त्यात तडफडणार्‍या गाढवाच्या मुखात गंगोदक घालतात तेव्हा त्यांच्यावर टीका करणारे ‘गाढव’ असतात. स्वतः महाराज महान विभूती असतात. याच अर्थानं तुकोबा उच्चरवानं सांगतात-

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा| येरानि वहावा भार माथा॥

– जसे ‘संस्कार’ शब्दाचे भिन्न अर्थ होतात तसेच ‘कर्म’ या शब्दाच्या निरनिराळ्या अर्थांनीही गोंधळ उडतो. कर्म म्हणजे केवळ क्रिया नव्हे. त्यात हेतू मिसळला की ते कर्म बनतं. उदा. नुसतं श्‍वसन करणं ही नैसर्गिक, सहज क्रिया आहे, पण विशिष्ट उद्देशानं केलेला प्राणायाम हे कर्म आहे. याशिवाय कर्मसिद्धांत, कर्माचा नियम म्हणून एक स्वतंत्र विचार आहे. याला पूर्वजन्म- पुनर्जन्माची जोड देऊन कर्मविपाकाची कल्पना निघाली. यानुसार मृत्युसमयी कसं चित्र असतं?

धनभूमि राहील जेथल्या तेथपर्यंत | पत्नी येईल उंबरठ्यापर्यंत | आप्तमित्र स्मशानापर्यंत | देह चितेपर्यंत | … पुढे कर्म एकले साथीला॥

असं कर्म साठत जातं- ‘संचित कर्म’ … त्यातलं फळं भोगायला योग्य झालेलं कर्म बनतं ‘प्रारब्ध’… हे प्रारब्धकर्म घेऊन जीव जन्मतो, जगतो व मरतो. जगताना या जन्मात जी नवी कर्म केली जातात त्याचं बनतं ‘क्रियमाण’ ज्यातलं काही याच जन्मी भोगून संपतं तर काही कर्मं संचित कर्मात जमा होतात. – कर्माची फळं भोगताना साधा नियम म्हणजे चांगल्या कर्मांचं बनतं ‘पुण्य’ ज्याचं फळ असतं ‘सुख’; तर वाईट कर्मांचं बनतं ‘पाप’ ज्याचं फळ असतं ‘दुःख’. यापैकी दुःख कुणालाच नको असतं, सुख सर्वांनाच हवं असतं.
म्हणून सर्वांनी सर्वकाळ पाप टाळावं व पुण्य करावं. सद्वर्तन, सदाचरण, सदाचार यांचं महत्त्व यासाठीच असतं. पुढच्या जन्माचा विचार जरी केला नाही तरी या जन्मातलं उर्वरित आयुष्य दुसर्‍याची सेवा करण्यात, इतरांना सुख देण्यात, पुण्यकर्मं-सत्कार्यं करण्यात घालवावं हा संदेश या कर्मसिद्धांताचा महत्त्वाचा भाग आहे. सिद्धांत; पुनर्जन्म जरी मानले नाहीत तरी सद्वर्तनाचा संदेश व सदाचाराची प्रेरणा देणारा पैलू महत्त्वाचा आहे. असो.
हे सर्व गीतेत स्पष्ट सांगितलेलं आहे व त्यातून समाधानी जीवनाबद्दल भगवंतांनी समुपदेशन केलंय. दोन ठिकाणी चार वर्णांचा उल्लेख आलाय.
चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः|
हे सांगताना आपण समाजात गुणकर्मानुसार चार वर्ण निर्माण केले असं भगवंत सांगताहेत. काही प्रश्‍नच नव्हे तर शब्दप्रयोगसुद्धा आपल्याकडे अतिसंवेदनशील किंवा स्फोटक असतात. पु. ल. देशपांडे मार्मिकपणे म्हणायचे अनेक टँकर्सच्या मागे लिहिलेलं असतं-
मेरा भारत महान| अतिज्वालाग्राही किंवा स्फोटक.
(इंडिया इज ग्रेट. हायली इन्फ्लेमेबल).
‘चातुर्वर्ण्य’ हा शब्द किंवा संकल्पना (कन्सेप्ट) असाच स्फोटक आहे. पण शांत डोक्यानं विचार केला तर जगातील सर्व समाज चार वर्गांवर (चातुर्वर्ण्यावर) आधारित असतात. थोडक्यात पाहिलं तरी लक्षात येतं…
कोणत्याही काळी, कोणत्याही समाजात माणसांचे चार प्रमुख वर्ग किंवा गट असतात.
१. विचार करणारे, ज्ञान संपादन करणारे व त्याचं वितरण करणारे – ब्राह्मण.
२. समाजाचं (सामान्य लोकांचं) रक्षण करणारे (शोषण, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणारे)- यासाठी बल, सामर्थ्य संपादन करणारे व त्याचा विकास, विस्तार करणारे – क्षत्रिय.
३. विविध वस्तू, सेवासाधनं, संपत्ती निर्माण करणारे व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे – वैश्य.
४. सर्व प्रकारच्या सेवा तत्परतेनं करणारे- शुद्र.
आजही सर्व प्रकारच्या आर्थिक किंवा राजकीय प्रणाली असलेल्या देशात आपल्याला हे चार वर्ग (वर्ण) दिसून येतात. त्याला नावं निरनिराळी असू शकतात.
उदा. बुद्धिजीवी लोक (कॉग्निटिव्ह); बल – सामर्थ्यजीवी लोक (कोनेटिव्ह); अर्थ(उत्पादन)जीवी लोक (प्राडक्टिव्ह) आणि सेवाभावी लोक (ऍफेक्टिव्ह).
हे रूक्ष, अवघड वाटलं तरी यामागचा उद्देश महत्त्वाचा आहे. ‘चातुर्वर्ण्य’ ही व्यवस्था आहे भेद (विषमता, श्रेष्ठ-कनिष्ठता) नाही. यात ‘जन्मा’चा उल्लेख कुठेही येत नाही. जन्मावर आधारित असते ती जात किंवा जाति. दुर्दैवानं जातिभेदांमुळे शतकानुशतकं आपण आपलं सामाजिक व वैयक्तिक नुकसान करून घेत आलो आहोत.
आजन्म वैश्‍विकरणाच्या (ग्लोबलायझेशन) जमान्यातही एका बाजूला युवा वर्गाला जातीभेदांचं काही महत्त्व वाटत नाही. पण शासनाच्या आर्थिक व राजकीय विचारसरणीमुळे समाजाचा व्यवहार मात्र जाति-उपजाती यांच्यातील भेद-पोटभेद यावर आधारित होतोय. ही खरी राष्ट्रीय शोकांतिका आहे.
भगवंत गीतेच्या उपदेशाच्या अंती पुन्हा या विषयाला स्पर्श करताहेत. आपण बुद्धीला प्रमाण मानून योग्य विचार करावा अशी अपेक्षा यात आहे. काय म्हणताहेत भगवंत?
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परंतप |
कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः॥
अर्थ ः अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची आणि शूद्रांचीही कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांनी (स्वभावप्रभवैर्गुणैः) निरनिराळी केली गेली आहेत (प्रविभक्तानि). म्हणजे, स्वभावानुसार उत्पन्न झालेल्या गुणानुसार चार वर्णांची कर्मे वेगवेगळी बनतात. पुढे भगवंत चारही वर्णाच्या लोकांच्या प्रमुख कर्मांची तपशीलवार यादी देताहेत. त्या कर्मांचा विचार करण्यापूर्वी एका निराळ्या दृष्टिकोनातून या श्‍लोकातील समुपदेशनाकडे पाहू या. समुपदेशनात मार्गदर्शन व उपदेश असतो ज्याचा उद्देश सर्वांचं अधिकाधिक हित (कल्याण) साधण्याचा असतो.
ब्राह्मणाची ही कर्मं, क्षत्रियाची ही तर वैश्याची ही आणि शूद्राची ही कर्मं असा विचार करता येतो. त्यानुसारसुद्धा कर्म वेगवेगळी झाली तरी परस्परपूरक असतात. या चारही वर्गांचं एकमेकाशिवाय चालणार नाही. त्यांनी एकमेकांच्या आधारानं, सहकार्यानं आपला विकास साधला पाहिजे तरच समाजाचा विकास होईल. समाजातील सर्व गटांतील शारीरिक-मानसिक स्वास्थ्य कायम राहण्यासाठी परस्पर सहिष्णुता – सामंजस्य – समरसता हवी. अशी एकात्मतेची भावना नसेल तर राष्ट्र म्हणून भव्यदिव्य भाविकाल असणं शक्य नाही.
* यासाठी जरा उलट्या दिशेनं विचार केला तर समाजाच्या दृष्टीनं ते कल्याणकाही सिद्ध होईल. म्हणजे ब्राह्मणाची – वैश्याची ही-ही कर्मं असं म्हणण्याऐवजी ही कर्मं प्रामाणिकपणे, समर्थपणे करेल त्याला ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा वैश्य किंवा शूद्र म्हणायचं. जातीचा विचारच करायचा नाही. जात कोणतीही असू दे… एखादे शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य ‘ब्राह्मण’च तर सैन्यात विभिन्न अधिकारपदावर असलेले सारे क्षत्रिय त्याचप्रमाणे साधनसुविधा यांची निर्मिती व वितरण करणारे सर्व वैश्य आणि सर्व प्रकारच्या सेवा (सर्व्हिसेस) करणारे शूद्र. … यात सर्वांना समान महत्त्व असेल. एवढंच नव्हे तर स्वबळावर, कष्ट करून कोणालाही कोणत्याही वर्गाचा प्रतिनिधी बनता येईल. अत्यंत लवचिक व उदार अशी समाजरचना प्रत्यक्षात येऊ घातलीय, आपण त्यात अडथळे निर्माण करण्याऐवजी ती अधिक प्रभावी व परिणामकारक बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.
व्यास-वाल्मिकींना कुठल्यातरी कौटुंबिक पार्श्‍वभूमीचा संदर्भ देऊन आजही नि अजूनही विशिष्ट समाजाचे प्रतिनिधी मानणार की सार्‍या मानवजातीच्या मार्गदर्शक, कुलगुरुपदी असलेले ‘ब्रह्मज्ञानी’ मानणार? द्रोणाचार्य-अश्‍वत्थामा-अर्जुन-एकलव्य-कर्ण हे प्रभावी क्षत्रिय नाहीत?
या विचाराला नि त्यानुसार आचाराला जीवनात महत्त्व द्यायचं असेल तर आपण कर्णाचं जीवनविषयक तत्त्वज्ञान महत्वाचं मानलं पाहिजे. – ‘दैवायत्तं कुले जन्मः मदायत्तं तु पौरुषम्‌|’ … आपलं कर्तृत्व, पराक्रम हेच आपलं पौरुष आहे, म्हणजे माणूसपण आहे अन् देवपणसुद्धा!!