साखळीतील आजच्या सभेविरुद्ध दडपशाही

0
124

>>सभा बारगळावी यासाठी मोफत कार्यक्रमांचे आमीष ः भाभासुमंचा आरोप

शैक्षणिक माध्यम प्रश्नावरील आंदोलनाचा एक भाग म्हणून भारतीय भाषा सुरक्षा मंचाने साखळी मतदारसंघातील देशी भाषाप्रेमींची सभा वसंतनगर – साखळी येथील वैश्य भवनाजवळील मैदानात आज संध्याकाळी ४.३० वाजता आयोजित केली आहे. ही सभा यशस्वी होऊ नये यासाठी सरकारकडून जोरदार दडपशाही सुरू असून आज साखळीतील वीजपुरवठा खंडित ठेवण्याचा निर्णय तीव्र प्रतिक्रियेमुळे रात्री उशीरा मागे घेण्यात आला. मात्र, लोकांना आकर्षित करण्यासाठी रवींद्र भवनात तमाशाचा मोफत कार्यक्रम आयोजित केला असून पाळी – कोठंबीत एका विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला आहे, परंतु एवढे अडथळे निर्माण केले गेले तरी शेवटी आजची सभा नक्कीच यशस्वी होईल असे भाभासुमंच्या नेत्या ऍड. स्वाती केरकर यांनी सांगितले.

भाभासुमंची ही सभा साखळीच्या रवींद्र भवनाच्या आवारात होणार होती. तसा रीतसर अर्ज एका महिन्यापूर्वी रवींद्र भवनच्या व्यवस्थापनाला देण्यात आला होता. त्यानंतर अनामत रकमेचा धनादेश देऊन त्याची पावतीही घेण्यात आली होती. परंतु दुसर्‍या एका कार्यक्रमाचे निमित्त करून ही परवानगी ऐनवेळी नाकारण्यात आली. ज्या नियमाचे निमित्त पुढे करण्यात आले, तो नियम येथे लागूच होत नसून, ज्या कार्यक्रमाचे निमित्त सांगण्यात आले होते तो कार्यक्रमही तेथे होणार नाही असे ऍड. केरकर यांनी सांगितले. ऐनवेळी सभेला परवानगी नाकारूनही सरकारचे समाधान झाले नसून नागरिक सभेला येऊच नयेत यासाठी रवींद्र भवनात तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पाळी कोठंबी येथील टागोर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला आहे. शिवाय शनिवारी दिवसभर साखळीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय झाला होता मात्र रात्री उशीरा भाषाप्रेमींच्या तीव्र प्रतिक्रियामुळे तो मागे घेण्यात आला आहे असे ऍड. केरकर यांनी सांगितले. खंडित वीजपुरवठा ३ मे रोजी करणार असल्याचे वीज खात्याने म्हटले आहे. देशी भाषाप्रेमींकडून भारतीय भाषा सुरक्षा मंचाला मिळणार्‍या उत्स्फूर्त प्रतिसादाचा सरकारने धसका घेतल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचे त्या म्हणाल्या.
आजच्या सभेला अपशकून करण्याचा वा अडथळे आणण्याचा सरकारने कितीही प्रयत्न केला, तरीही आजची सभा यशस्वी होईलच. चार हजार देशी भाषाप्रेमी या सभेला हजर राहतील असा विश्वास स्वाती केरकर यांनी व्यक्त केला. गावांतील मराठी – कोकणी शाळा बंद पडत चालल्या आहेत याची खंत जनतेला आहे. हा आमच्या संस्कृतीचा र्‍हास आहे हे लोकांना पटवून देण्यास भाभासुमं यशस्वी ठरला असून जनता भरभरून प्रतिसाद देत आहे, असे ऍड. केरकर म्हणाल्या. साखळी येथील भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आजच्या सभेसाठी आम्ही २८ मार्च रोजी रीतसर अर्ज केला होता. मग ऐनवेळी अर्ज केल्यास परवानगी कशी मिळेल, असे विधान मुख्यमंत्री कसे करतात असा सवाल भाभासुमंचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी केला. आम्हाला सभेसाठी परवानगी नाकारताना जे कारण पुढे केले गेले होते, तो कार्यक्रम तेथे होणार नसून वेगळ्याच नावाचा कार्यक्रम तेथे मोफत ठेवण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी
दिली.

दबाव – दडपणाला बळी न पडता सभेला या ः केरकर
भारतीय भाषा सुरक्षा मंचाची सभा साखळी नगरपालिकेच्या वसंतनगर येथील मैदानावर होणार असून त्यासाठी साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी भाभासुमंला पूर्ण सहकार्य केले असल्याची माहिती ऍड. स्वाती केरकर यांनी दिली. साखळी मतदारसंघातील सातही पंचायतक्षेत्रात भाभासुमंने समित्या स्थापन केल्या होत्या. तेथील देशी भाषाप्रेमींचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. सभेसाठी जिल्हाधिकार्‍यांची रीतसर परवानगीही मिळाली आहे असे त्यांनी सांगितले. हा लढा भाषा व संस्कृतीसाठीचा लढा असून देशी भाषाप्रेमींनी कोणत्याही दबाव – दडपणाला बळी न पडता या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
लोकशाहीत मत मांडण्याचा
सर्वांना अधिकार : मुख्यमंत्री

भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या नेत्यांना सभा घेण्यास कोणीही बंदी घातलेली नाही. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे असताना मंचाचे नेते सुभाष वेलींगकर यांनी स्वत:ला अटक करून घेण्याची भाषा बोलण्याची गरज काय? त्यांना अटक करण्यास कोण पुढे सरसावले आहे, असा सवाल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल केला.
काही व्यक्तींना आपण सार्वजनिक जीवनात मोठ्या स्थानावर नेऊन बसविले आहे. त्यांच्याविषयी काही बोलणे आपल्याला रूचत नाही. आपणही संघाचाच कार्यकर्ता असून रा. स्व. संघामुळेच आपण भाजपाचे काम करीत आहोत, असे पार्सेकर यांनी सांगितले. २०१४मध्ये प्रा. वेलिंगकर यांनी वर्तमानपत्रांत लेख लिहून सरकारच्या शिक्षण अनुदान धोरणास एक प्रकारे मान्यता दर्शविली होती, हे खरे काय? असा पत्रकारांनी प्रश्‍न केला असता, मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. व त्यावर भाष्य करणे टाळले.