गावोगावी पाणी वाचवण्याची मोहीम राबवूया

0
141

नरेंद्र मोदी
(भारताचे पंतप्रधान)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मनकी बात’ या कार्यक्रमात यावेळी जलसंवर्धनाचा विषय मांडला. पावसाच्या पाण्याला वाहून न जाऊ देता ते जमिनीत मुरविण्यासाठी अनेक कल्पनाही त्यांनी त्यात मांडल्या. ‘मनकी बात’ च्या त्या भाषणाचा हा संपादित भाग….

माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपणा सर्वांना नमस्कार. सुट्‌ट्यांच्या काळात अनेक गोष्टी करायचे आपण ठरवतो. कार्यक्रम आखतो आणि ह्या सुट्‌ट्यांच्या काळात हंगाम असतो आंब्याचा. म्हणून मनात येते की, आंब्याचा आस्वाद घ्यावा, असेही वाटते की दुपारी थोडी वामकुक्षी करता आली, तर बरं होईल. पण यावेळी कडक उन्हाळ्याने चहूकडे हा आनंद हिरावून घेतला आहे. देशभरात काळजीचे वातावरण असणे हे स्वाभाविक आहे. आणि त्यातही जेव्हा सतत दुष्काळ पडतो तेव्हा जलसाठे आटतात. कधी कधी अतिक्रमणामुळे, कधी मार्ग अरुंद झाल्यामुळे, अडथळे आल्यामुळे येणार्‍या जलप्रवाहात बाधा आल्यामुळे जलाशयात क्षमतेपेक्षा कमी जलसंचय होतो आणि वर्षांनुवर्ष हेच होत राहिल्याने जलधारण क्षमता कमी होते. दुष्काळावर मात करण्यासाठी, पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारे आपल्या पातळीवर प्रयत्न करतात. हे असले तरीही मी पाहिले आहे की नागरिकही यासाठी खूप चांगले प्रयत्न करतात. अनेक गावांमध्ये याबद्दल जागरुकता दिसते आणि पाण्याची खरी किंमत तेच जाणतात ज्यांनी जलदुर्भिक्ष्याच्या संकटाचा सामना केला आहे. अशा ठिकाणी पाणी वाचवण्याबद्दल संवेदनशीलता असते, आणि त्याबद्दल काही करण्याची सक्रीयताही असते.
काही दिवसांपूर्वीच मला सांगण्यात आले की महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायत आणि तिथल्या गावकर्‍यांनी पाणी हा विषय अत्यंत संवेदनशील रीतीने हाताळला आहे. पाणी साठवण्याची इच्छा असणारी अनेक गावे सापडतील, पण त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून पूर्ण पीक पद्धतीत बदल केला. अशी पिके, ज्यांना अधिक पाणी लागते. ऊस असो, केळी असोत, अशा पिकांची लागवड न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे ऐकायला फार सोपे वाटते, पण वाटते तितके हे सोपे नाही. सर्वांनी मिळून केवढा मोठा संकल्प केला असेल? एखाद्या कारखान्यात पाण्याचा वापर अधिक होत असेल, तर त्या कारखानदाराला तुझा उद्योग बंद कर, कारण त्याला जास्त पाणी लागते, असे सांगितले तर त्याचा काय परिणाम होईल, हे आपण जाणता. पण हे माझे शेतकरी बांधव, पाहा त्यांना वाटले, ऊसाला खूप पाणी लागते, मग ऊसाची लागवड करु नये. त्यांनी लागवड बंद केली आणि अशी फळे, भाज्या ज्यांना कमी पाणी लागते, त्यांची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तुषार सिंचन, ठिबक सिंचन, जलसंधारण, जलपुनर्भरण याबाबतीत त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आज हे गाव स्वबळावर उभे राहिले आहे.
मला कुणीतरी सांगितले की, मध्य प्रदेशात देवास जिल्ह्यात गोरवा ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीने प्रयत्नपूर्वक अभियान हाती घेतले ते शेततळ्यांच्या निर्मितीचे. सुमारे सत्तावीस शेत तळी त्यांनी बांधली. परिणामी भूजल पातळी वाढली, पाण्याचा स्तर वर आला. जेव्हा पिकांना पाण्याची गरज भासली तेव्हा पाणी मिळाले आणि मोठमोठाले आकडे त्यांनी सांगितले. शेतीपासून त्यांना मिळणार्‍या उत्पन्नात वीस टक्क्‌यांची वाढ झाली. पाण्याची बचत तर झालीच शिवाय पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होते.
जगभर असे सांगितले जाते की पिण्याचे शुद्ध पाणी ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचे कारण ठरते. आरोग्यही त्यामुळे उत्तम राहाते. कधी कधी असे वाटते की, जेव्हा भारत सरकार लातूरला रेल्वेने पाणी पोचवते, तेव्हा जगासाठी ती एक बातमी होते. हे खरे आहे की, ज्या वेगाने रेल्वेने हे काम केले त्याबद्दल रेल्वेचे अभिनंदन करायला हवे, पण ते गावकरीही अभिनंदनासाठी पात्र आहेत, मी तर म्हणेन की त्यांचे विशेष अभिनंदन करायला हवे. पण असे अनेक उपक्रम नागरिकांकडून राबवले जातात, जे कधी समोर येत नाहीत. सरकारने एखादी चांगली मोहीम राबवली तर कधी कधी त्याला प्रसिद्धी मिळते, पण आपल्या आजूबाजूला आपण पाहिले, तर लक्षात येईल की दुष्काळावर मात करण्यासाठी नवनवीन उपाययोजनांमधून लोक या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतात. कितीही संकटे येवोत, पण एखादी चांगली गोष्ट कळली तर सारं संकट दूर झाल्याची भावना मनात निर्माण होते हा मनुष्यस्वभाव आहे. यंदाच्या पावसाळ्यात १०६ ते ११० टक्के पाऊसमान असेल, ही शक्यता सर्वत्र कळली आणि ह्या बातमीने जणू एखादा शांती संदेशच सर्वांना मिळाला. पाऊस यायला अजून वेळ आहे पण चांगला पाऊस होणार ही बातमी चैतन्य घेऊन आली.
पण माझ्या प्रिय देशवासीयांनो, यंदा पाऊस चांगला पडणार ही बातमी आपल्यासाठी जितकी आनंद देणारी आहे, तितकीच आपल्या सगळ्यांसाठी एक संधी निर्माण करणारी आहे. एक आव्हान निर्माण करणारी आहे. गावागावांत पाणी वाचवण्यासाठी एखादी मोहीम आत्तापासूनच आपण हातात घेऊ शकतो का? शेतकर्‍यांना मातीची गरज असते. शेतात पिकांसाठी ती उपयोगी ठरते. मग गावातल्या तळ्यातला गाळ काढून तो आम्ही शेतात टाकला तर? शेतीसाठी फायदा होईलच त्याचबरोबर तळ्यात पाणी साठण्याची क्षमता वाढेल. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमधून, खताच्या रिकाम्या पोत्यांमधून दगड आणि माती भरुन आपण ते पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर टाकले तर? पाणी अडवता येईल का? पाणी पाच दिवस साठेल, सात दिवस साठेल, ते पाणी जमिनीत मुरेल. जमिनीतली पाण्याची पातळी वाढेल. आमच्या विहींरींमध्ये पाणी येईल. जेवढे पाणी अडवता येईल, तेवढे अडवायला हवे. पावसाचे पाणी, गावात पडणारे पाणी गावात राहील. सार्‍यांनी मिळून संकल्प केला, तर सामूहिक प्रयत्नांमधून हे शक्य आहे. आज आपल्यापुढे पाण्याचे संकट आहे. दुष्काळाची स्थिती आहे, पण येणारा महिना-दीड महिन्याचा काळ आपल्या हातात आहे.