योगमार्ग – राजयोग

0
326

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना: २७७)
(स्वाध्याय – २५)
विश्‍वामध्ये प्रत्येक सजीव घटकाला शोध असतो एका सूक्ष्म गोष्टीचा- सुखाचा! मग तो घटक कोणताही असू दे – जसे वृक्ष, वनस्पती, पशू, पक्षी, कृमी, कीटक किंवा मानव. सुख मिळाले की त्याची वाढ चांगली होते. त्याचे आरोग्य चांगले राहते. त्याची कर्तृत्वशक्ती वाढते. ते आपली भावना विविध प्रकाराने व्यक्त करू शकते – विविध हावभाव करून, बोलून वगैरे. फक्त वृक्ष-वनस्पती बोलू शकत नाहीत किंवा हावभाव करू शकत नाहीत. तसे ते करतीलही. पण मानवाच्या बुद्धीच्या आकलनापलीकडील या गोष्टी आहेत.रामायणातील एका घटनेची या संदर्भात आठवण येते. सीता महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात होती तेव्हा इतर ऋषीकन्यांप्रमाणे वाळलेल्या काटक्या गोळा करत होती. तिच्याबरोबर जंगलात लव-कुशसुद्धा तिला मदत करत होते. पण ते सुक्या काटक्यांऐवजी झाडाच्या ताज्या हिरव्या फांद्या तोडत होते. आणि ज्या जागेवरून त्यांनी फांद्या तोडल्या होत्या त्या जागेवरून भळभळ द्रवपदार्थ निघत होता. लहान बालकांची चूक सीतेच्या लक्षात आली. तिने लगेच लव-कुश दोघांना समजावून सांगितले, ‘‘हे बघा, काटक्या पाहिजेच म्हणून जिवंत ताज्या फांद्या तोडायच्या नसतात. झाडाला दुखते. आपल्याला जखम झाल्यावर जसे रक्त वाहते तसे इथे बघा… झाडाला झालेल्या जखमेतून रस वाहतोय. त्याला दुःख झाले. तुमच्या हातून नकळत चूक झालेली आहे. तुम्ही झाडाची क्षमा मागा.’’
दोन्ही राजपुत्रांनी लगेच झाडाला नमस्कार करून क्षमा मागितली. त्याबरोबर काय आश्‍चर्य! झाड डोलू लागले. मातेने म्हटले, ‘‘बघितले, तुम्ही मनापासून प्रेमाने क्षमा मागितली म्हणून झाड आनंदाने डोलत आहे.’’ लव-कुशदेखील हसायला लागले.
आता झाड का हलले? मला माहीत नाही की त्या झाडाला खरेच सगळे समजले की वार्‍याच्या झोक्यामुळे ते हलले!! सांगणे कठीण. पण एक गोष्ट खरी –
* आपले सर्व पूर्वज निसर्गावर प्रेम करीत होते. त्यात भगवंताचे अस्तित्व बघत होते. प्रत्येक घटकाला आपल्यातलाच एक सदस्य मानीत होते. लहान मुलांना हे प्रेम समजावण्याची अशी छान पद्धत होती. पूर्वीचा मानव निसर्गाचे महत्त्व जाणून होता. त्याला सांभाळत तो राहात होता. आणि आज..?
तथाकथित हुशार, बुद्धिमान म्हणून मानला गेलेला आजचा मानव निसर्गाला जिंकू पाहात आहे. अशा तर्‍हेने स्वतःचाच नाश करून घेत आहे.
वृक्ष-वनस्पतींमध्ये प्राण आहे, भावना आहेत हे सत्य आजचे शास्त्रज्ञ देखील मान्य करतात. युरोपातील एका शास्त्रज्ञाने अनेक वर्षांपूर्वी एक छान प्रयोग केला-
* चार कुंड्यांमध्ये त्याने एकाच तर्‍हेची रोपं लावली. त्याच्या कुंड्या, त्यातील माती – एकसमान! दररोज तो रोपांना पाणी घालताना त्यांच्याशी बोलत असे. पहिल्या कुंडीतील रोपाला पाणी घातल्यानंतर तो कुरवाळीत असे. त्याच्याशी अत्यंत प्रेमाने बोलत असे. त्याचे कौतुक करत असे. म्हणत असे, ‘शहाणा बाळा, तू मोठा हो, मला फुले-फळे दे, तू चांगला आहेस!’
दुसर्‍या कुंडीतील रोपाला तो कुरवाळीत नसे पण प्रेमाने तशीच काही वाक्ये बोलत असे.
तिसर्‍या कुंडीतील रोपाशी तो जास्त बोलत नसे. फक्त म्हणत असे- ‘तू मोठा झाल्यावर मला फुले-फळे देणार!’
चौथ्या कुंडीतील रोपाला मात्र तो शिव्याच देत असे, ‘तुझे सगळे मलाच करावे लागते.. पाणी घालणे, खत घालणे, मला तुझ्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. का? तर तू म्हणे मला फुले-फळे देणार. केव्हा देणार तेव्हा देशील. पण आता तर मलाच त्रास ना!’
दिवस जात होते तसतशी ती सर्व रोपे वाढत होती. आश्‍चर्य म्हणजे पहिल्या कुंडीतील झाड भराभर वाढते होते. अगदी टवटवीत, प्रसन्न दिसत होते. दुसर्‍या व तिसर्‍या कुंडीतील रोपेदेखील वाढत होती. पण पहिल्या कुंडीतल्यासारखी नाही. आणि चौथ्या कुंडीतील रोपाची तर शोकांतिकाच झाली होती. तेदेखील वाढत होते पण अगदी बारीक, मरगळल्यासारखे ते रोप होते.
याचाच अर्थ वृक्ष-वनस्पतींनादेखील भावना आहेत. त्यांच्यात प्राण आहे.
कृमी-कीटक, पशू-पक्षी, मानव यांची गोष्टसुद्धा तशीच आहे. त्यांना भावना आहेत. त्या भावना ते व्यक्त करू शकतात. पण या सर्वांमध्ये आणखी एक वेगळी गरज आहे. त्यांना सुखाने राहण्यासाठी एक घर लागते. म्हणून ते विविध तर्‍हेच्या घरांमध्ये राहतात. काही माशा असतात त्या मातीपासून म्हणजे कण-कण माती आणून आपले घरटे झाडावर किंवा घराच्या भिंतीवर बनवतात. पुष्कळवेळा माणसाला त्याची अडगळ होते. तो सहज एका झटक्यात घर मोडून टाकतो.
मधमाशा तर छान घर बनवतात. त्यात त्या, म्हणजेच त्यांची राणी व तिचे कुटुंब सर्व राहतात. शास्त्रज्ञ सांगतात की त्यांच्यामध्येही छान योजना असते. त्या मधमाश्या पुष्कळ जरी असल्या तरी त्यांचे वेगवेगळे गट असतात. त्यांचे घर म्हणजे पोळे यासाठी सुरक्षित जागा शोधणारा गट, पोळे बनवणारा गट, मध कुठे आहे त्याचा शोध घेणारा गट, मध विविध ठिकाणांहून पोळ्यात आणणारा गट, सैनिक माशा. त्यांचेही काम वेगवेगळे व त्याप्रमाणे हुद्देही असतात. त्यात सर्वांत मुख्य म्हणजे राणी – ती एकच असते, जणू काय ती राजघराण्यातील असते. त्या राणीला गर्भवती करणार्‍या वेगळ्या मधमाश्या असतात. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ती गर्भवती झाली की ती राणी म्हणे त्या सरदार मधमाश्यांना मारून टाकते. कारण निसर्गच जाणे! कदाचित त्यांचा लैंगिक संबंध दुसर्‍या मादीशी येऊ नये म्हणून असेल. सारांश काय? तर एक स्वनियंत्रित एकत्र कुटुंब!!
अत्यंत कष्ट करून या मधमाश्या पावसाळ्यासाठी आपल्या स्वतःच्या निर्वाहासाठी मध एकत्र करतात. मग त्या पावसाळ्यात निश्‍चिंत असतात कारण त्यावेळी त्यांना बाहेर निघता येत नाही. पंख ओले झाले तर त्या उडू शकत नाहीत व मरून जातात. … आणि एक दिवस अशा या नांदत्या घरावर माणसाची नजर पडते. त्याला मोह होतो ते मध चोरण्याचा! मग तो विविध अघोरी कृत्ये करतो. वेगवेगळे उपाय करतो – खाली आग पेटवतो. त्या आगीत त्या माशा होरपळतात व मरून जातात. किंवा त्या माशीला पकडून दुसरीकडे नेऊन ठेवतो आणि एकदा राणी इतरत्र गेली की तिचे सर्व नागरिक म्हणे तिच्याकडे जातात व तिथे परत पोळे बनवतात. काही संस्था पोळे बनवण्यासाठी एक पेटी तयार करतात. त्या पेट्यात पोळे तयार होते. अशा या मध चोरण्याच्या वेगवेगळ्या तर्‍हा! आयुर्वेदानुसार मधामध्ये उत्तम औषधी गुणधर्म आहेत. म्हणूनच पंचामृतामधील ते एक महत्त्वाचा घटक आहे. हे सर्व योग्य वाटले तरी स्वार्थासाठी तो एक दरोडा किंवा चोरीच झाली ना? जर आपण संपूर्ण आयुष्यभर कष्ट करून मिळवलेले धन कुणीतरी चोरले किंवा बांधलेले घर मोडले किंवा बळकावले तर माणसाला कसे वाटेल? पण असा विचार स्वार्थांध माणूस करणार का? व कसा?
शाकाहार्‍यांमध्ये एक विशिष्ट गट आहे – ‘व्हेगन!’- हे लोक कुठल्याही प्राण्यांपासून मिळणारी गोष्ट उपयोगात आणत नाही – जसे दूध, मध, शिंगं, हस्तिदंत, चामडे, पादत्राणे, लोकरीचे स्वेटर व इतर कपडे…
अशा गोष्टी माहीत झाल्या की वाटते अत्यंत बलशाली मानल्या जाणार्‍या मानवाने कृमी कीटकांचादेखील विचार करावा. म्हणून स्वाध्याय आवश्यक आहे. कारण स्वाध्यायात ‘विचार’ प्रमुख आहे.