सायना ‘वर्ल्ड नंबर वन’

0
145
नवी दिल्लीतील सिरी फोर्ट येथे सध्या सुरू असलेल्या इंडियन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या कालच्या उपांत्य लढतीत खेळताना सायना नेहवाल.

इंडियन ओपन सुपर सीरिजच्या अंतिम फेरीतही धडक
भारतीय ‘फुलराणी’ सायना नेहवालने नवा इतिहास घडविताना बॅडमिंटनमधील जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू बनण्याचा गौरव प्राप्त केला. ‘ऑल इंग्लंड बॅडमिंटन’ विजेते प्रकाश पदुकोण यांच्यानंतर हा मान पटकवणारी ती दुसरी भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.काल २७५ हजार डॉलर्स पुरस्काराच्या इंडिया ओपन सुपर सीरिजच्या उपांत्य फेरीत ऑल इंग्लंड विजेत्या, स्पेनच्या कॅरोलिन मरिनला थायलंडच्या राशनोक इंटानोनकडून हार पत्करावी लागली आणि ती अग्रस्थानावरून घसरली.
सायनाने आपला विश्‍व क्रमांक एक साजरा करताना जपानच्या यूई हाशिमोटोवर सरळ सेटमध्ये बहारदार विजय मिळवित अंतिम फेरीत धडक दिली.
सिरी फोर्ट क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या प्रतियोगितेत, कॅरोलित मरिनच्या उपांत्य फेरीतील पराभवामुळे ‘वर्ल्ड नंबर वन’चा बहुमान प्राप्त झालेल्या, ऑलिंपिक कांस्य पदक विजेत्या सायनाने यूई हाशिमोटोवर उपांत्य फेरीत अवघ्या ४३ मिनिटात २१-१५, २१-११ असा विजय प्राप्त केला.
मी ‘वर्ल्ड नंबर वन’ बनले यावर माझा विश्‍वासच बसला नाही. प्रत्यक्ष माझे नाव झळकल्याचे पाहिल्याशिवाय हे खरे नव्हे असेच मला वाटत होते. हा दीर्घ प्रवास आहे आणि जणू स्वप्नच सत्यात साकारले, असे विश्वश्रेष्ठ महिला बॅडमिंटनपटू बनलेली सायना म्हणाली.
मे महिन्यापर्यंत मी ‘वर्ल्ड नंबर वन’ बनणार असे मला माझे प्रशिक्षक विमल सर सांगत होते. पण माझा विश्‍वास बसत नव्हता पण अखेर स्वप्न साकारले. या यशाबद्दल मी विमल सर आणि माझ्या पालकांची ऋणी आहे, असेही ती म्हणाली.
कॅरोलिन मरिनच्या पराभवामुळे २५ वर्षीय भारतीय महिला बॅडमिंटनपटू ‘वर्ल्ड नंबर वन’ बनलेली असली तरी अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात मंगळवारी होईल.