वाजपेयींना भारतरत्न प्रदान

0
127
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारत रत्न पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी. हा समारंभ त्यांच्या निवासस्थानी पार पडला.

भारताचे माजी पंतप्रधान व देशातील एक आदरणीय राजकीय नेते श्री. अटलबिहारी वाजपेयी यांना काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. आजवरची परंपरा मोडून राष्ट्रपतींनी श्री. वाजपेयी यांच्या नवी दिल्लीतील ६, कृष्णमेनन मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, सरसंघचालक मोहन भागवत, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आदींसह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
गेली काही वर्षे आजारी अवस्थेत असलेल्या ९० वर्षीय वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्याचा निर्णय मोदी सरकारने वाजपेयींच्या गेल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येस म्हणजे २४ डिसेंबरला घेतला होता. त्यांचा २५ डिसेंबर हा वाढदिवस ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णयही मोदी सरकारने घेतला होता.
‘‘अटलजींनी आपले जीवन भारत भक्तीला वाहिले. आज त्यांना ‘भारतरत्न’ ने सन्मानित केले जात आहे. ते माझ्यासारख्या असंख्य भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत’’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, गुलझारीलाल नंदा, राजीव गांधी यांच्यासह आजवर ४३ जणांना ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्यात आलेले आहे. वाजपेयी हे हा सन्मान प्राप्त करणारे सातवे पंतप्रधान आहेत.
१९९८ ते २००४ अशी पंतप्रधानपदाची पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले कॉंग्रेसेतर पंतप्रधान होते. मे ९८ मध्ये वाजपेयींच्याच पंतप्रधानपदाच्या काळात भारताने दुसर्‍यांदा अणुचाचण्या करून इतिहास घडवला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सरकारशी त्यांच्याच पुढाकाराने १९९९ साली ऐतिहासिक ‘लाहोर करार’ करण्यात आला होता.
अटलजी हे देशाचे एक उत्तुंग नेते आहेत. ते प्रखर राष्ट्रवादी व उत्कृष्ट संसदपटू, महान वक्ते, कवी व विचारवंत आहेत असे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल सांगितले.
वाजपेयी हे केवळ भारतीय नेतेच नाहीत, तर जगभरात त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते असे गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले.
‘या सन्मानास पात्र असलेले खरे महान राजकारणी’ अशा शब्दांत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीटरवरून वाजपेयींचे अभिनंदन केले, तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आदी अनेकांनी ट्वीटरवरून आनंद व्यक्त केला.
दिवंगत शिक्षणतज्ज्ञ व स्वातंत्र्यसैनिक पं. मदनमोहन मालवीय यांना येत्या ३० मार्च रोजी मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात येणार आहे.