खरा चेहरा

0
156

आम आदमी पक्षाच्या बहुचर्चित राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतून आणि कार्यकारिणीतूनही अखेर प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची अत्यंत अपमानास्पदरीत्या हकालपट्टी झाली. आपल्याला पक्षाच्या राजकीय सल्लागार समितीतून बाहेर काढण्यात आले, तरी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्याला दिल्लीबाहेरच्या आप नेत्यांचे समर्थन मिळेल या आशेवर राहिलेल्या या दोन्ही नेत्यांचा पुरता भ्रमनिरास तर झालाच, शिवाय कथित हाणामारीलाही सामोरे जावे लागले. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आलेल्या मतदानात या दोन्ही नेत्यांचा रीतसर पराभव होणे इतपत ठीक झाले असते, परंतु ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या चेल्यांनी पक्षाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिलेल्या त्या दोघांना वागवले, ते पाहिले तर ‘आप’ च्या एकंदर ‘संस्कृती’विषयी चिंता वाटू लागते. इतर जुन्या राजकीय पक्षांमध्येही कधी घडला नसेल असा लज्जास्पद प्रकार ‘आप’ च्या बैठकीत घडला. या दोन्ही नेत्यांना जरब बसवण्यासाठी ‘बाऊन्सरां’ चा वापर झाल्याचा आरोप खरा असेल तर नेतृत्वाचा हा संघर्ष आता कोणत्या थराला गेला आहे त्याचे व्यथित करणारे दर्शन घडते. ज्या जनतेने एक वेगळा विचार मांडणारा आणि जनसामान्यांचा स्वतःचा पक्ष म्हणून आम आदमी पक्षाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले, तिच्या पाठीत सुरा खुपसण्याचा हा सारा उबगवाणा प्रकार आहे. अरविंद केजरीवाल हे स्वतः या सगळ्या झगड्यापासून अलिप्त असल्याचे भासवत असले, तरी त्यांच्या सुसंस्कृततेचा मुखवटा केव्हाच गळून पडला आहे. एका कार्यकर्त्याने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये केजरीवाल यांनी आपल्याच पक्षातील सहकार्‍यांविषयी जी काही भाषा वापरली आहे, ती त्यांच्यासारख्या ‘नेता’ म्हणवणार्‍याला मुळीच शोभादायक नाही. एखाद्या अंडरवर्ल्ड डॉनसारखी ती भाषा आहे आणि त्यातून मुखवटा गळून पडताना दिसतो. आम आदमी पक्षावर केवळ आपले आणि आपलेच वर्चस्व असावे हा केजरीवाल यांचा अट्टहास आहे आणि पक्षाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या एकेका नेत्याला प्रयत्नपूर्वक बाहेर काढण्याच्या खेळ्या ते आणि त्यांचा कंपू सातत्याने खेळतो आहे. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची आणि स्वतः अण्णांच्या स्वच्छ प्रतिमेची शिडी घेऊन केजरीवाल बघता बघता राष्ट्रीय नेते बनले आणि संधी मिळताच अण्णांचा स्पष्ट विरोध असताना त्यांच्यावरच लाथ मारून राजकीय पक्षाची स्थापना करते झाले. ‘आम आदमी’, त्याचे प्रश्न, त्याची उपेक्षा हेच केजरीवाल यांनी चतुरपणे भांडवल बनवले आणि अण्णांच्या आंदोलनाने कमावलेल्या ‘गुडवील’ चा राजकीय फायदा उपटण्यासाठी सज्ज झाले. त्यानंतरच्या काळात ज्यांनी ज्यांनी जरासा विरोधी सूर लावला, त्यांची पक्षातून यथास्थित हकालपट्टी झाली. किरण बेदी, कॅप्टन गोपीनाथ, शाझिया इल्मी, अशा एकेका सहकारी नेत्यापासून केजरीवाल यांनी धूर्तपणे फारकत घेतली आणि आता तर आजवर आपल्यासोबत राहिलेले प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव या दोघांवरही लाथ मारून मोकळे झाले. वास्तविक या दोन्ही नेत्यांनी पक्षनेतृत्वाला पाच गोष्टींची पूर्तता करण्याची विनंती केली होती आणि त्या मान्य असतील तर स्वतःहून राजीनामे सादर करण्याची तयारी दर्शवली होती, परंतु त्या गोष्टींवर राष्ट्रीय कार्यकारिणीत चर्चाही झाली नाही. जे पाच मुद्दे यादव व भूषण यांनी उपस्थित केलेले आहेत, ते काही वैयक्तिक स्वरूपाचे नाहीत. पक्ष माहिती हक्क कायद्याखाली आणावा, पक्षनेत्यांसंबधीच्या गंभीर तक्रारींची पक्षांतर्गत चौकशी व्हावी, महत्त्वाच्या निर्णयांवर ‘आप’ स्वयंसेवकांनाही सहभागी करून घ्यावे, गुप्त मतदानाने राष्ट्रीय कार्यकारिणी निवडावी या मागण्यांत गैर काय आहे? परंतु शूचितेची बात सांगणार्‍या केजरीवाल कंपूला हेही करता येत नसेल तर आजवर जी प्रवचने केजरीवाल महाराज झोडत होते, ती निव्वळ ढोंगबाजीच होती का असा प्रश्न ‘आप’ वर भरवसा ठेवणार्‍या जनतेला आज पडलेला आहे. अरविंद केजरीवाल आज ‘आप’चे सर्वोच्च नेते बनू पाहात आहेत. ज्या सामूहिकतेचे तत्त्व ते आजवर सांगत आले, ते कोठे गेले? परवाच्या बैठकीत तर अंतर्गत लोकपालांनाही अनुपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मग कसली आली पारदर्शकता? कुठे राहिली नीतीमत्ता?