एका संन्याशाचे समर्पित जीवन

0
191

– अनिल पै, मडगाव
भारतीय समाजधारणोन्मुख संन्यस्त वृत्तीची परंपरा चालू ठेवण्याचे व्रत घेऊन पीठस्थ होताच श्री विद्याधिराजतीर्थ स्वामीजींनी मठाचे कार्य अधिकाधिक गतिमान व जीवनाच्या बदलल्या मूल्यांना पोषक बनविण्यासाठी योजनाबध्द कार्यक्रम आखले.
धर्मनिष्ठ व भगवंताची उपासना करणार्‍या आचार्य कुटुंबात जन्मलेले श्रीमद् विद्याधिराजतीर्थ हे मातापित्यांचे द्वितीय पुत्र. श्रीमद् द्वारकानाथतीर्थ स्वामीजींनी आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केली. यामुळे या तरुण विद्यार्थ्याचा आयुष्यक्रम एका रात्रीत बदलला. (संन्यासाश्रम दिन २६-२-१९६७).शिष्य म्हणून दीक्षा घेतल्यानंतर आरंभीच्या काळात खूप अध्ययन, मनन व चिंतन केले. पीठाधीशपदाची धुरा सांभाळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले. ही साधना आजतागायत अविरत चालू आहे, पण श्रीमद् द्वारकानाथतीर्थ स्वामीजी वृन्दावनस्थ झाल्यानंतर (२५-३-१९७३) श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामीजींवर अचानक संपूर्ण मठाचा भार येऊन पडला. (पीठारोहण ५-४-१९७३) केवळ एक मठ नव्हे तर मठाचे भारतभर विखुरलेले अनुयायी व एकंदर समाज यांना मार्गदर्शन करण्याची मोठी जबाबदारी स्वामीजींच्या शिरावर आली.
स्वामीजींनी ती किती समर्थपणे उचलली व मठाला कशी विज्ञानोन्मुख दिशा दिली, अनुयायांचे मठाकडील संबंध कसे दृढ केले ही गोष्ट सर्वपरिचित आहे. प्रथम पंचशताब्दी व नंतर सपादशताब्दी महोत्सव सोहळ्यात त्याचा खराखुरा साक्षात्कार घडला. सुसूत्र दिनचर्या व कामाचा उरक यामुळे सुरुवातीला ताण जरूर जाणवला, पण शिष्यवर्गातील जाणते लोक व अन्य मठाभिमानी यांचे सक्रिय सहकार्य लाभल्याने तो भार सुसह्य झाला.
मठ प्रामुख्याने एका संप्रदायाचा आहे. त्यादृष्टीने त्या समाजाची आध्यात्मिक व धार्मिक जागृती करून त्यामध्ये मंगल व उदात्त तत्त्वांचा विकास घडवून त्या समाजाला ऐहिक व पारमार्थिक सुखाचा मार्ग दाखविणे हे मठाचे मुख्य कार्य होय, परंतु आजच्या परिस्थितीत कोणत्याही संप्रदायाची सुखसमृध्दी समाजाच्या अन्य घटकांपासून अलग राहून साधता येत नाही म्हणूनच आजूबाजूचा समाजही सुखी असेल याची दखल मठाच्या अनुयायांनी घेतली पाहिजे, असे श्रीस्वामीजी म्हणतात.
समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन करणे, तंटे व कलहाचे वातावरण उद्भवल्यास त्यांचे निवारण करणे आणि हे सर्व अधिक प्रभावीपणे पार पाडता यावे यासाठी वैयक्तिक साधना अखंड चालू ठेवणे हे या पीठावर बसणार्‍यांचे जीवनकार्य आहे. स्वामीजींचे जीवन हे काही एका जागी बसण्याचे किंवा आरामाचे नसते. खुद्द स्वामीजींची घाईगर्दीची दैनंदिनी पाहिली तरी याची कल्पना येऊ शकते.
रोज पाच-सहा तास धार्मिक विधीत खर्च होतात. मठातील पाठशाळेवर ते जातीने देखरेख ठेवतात. सुदूर ठिकाणी असलेल्या मठांच्या कक्षेतील ३०/४० शाखा मठांचा कारभार सुव्यवस्थित चालावा म्हणून काळजी घ्यावी लागते. जेथे जेथे मठाचे अनुयायी आहेत, तेथे तेथे वेळोवेळी संचार करून त्यांच्यातील आत्मविश्‍वास बळकट करावा लागतो.
सपादपंचशताब्दी साजरा केलेल्या या मठापेक्षा किंवा तितकेच प्राचीन असे अनेक मठ आहेत. आपलाच मठ श्रेष्ठ, प्राचीन अशा अहंभावाचा लवलेशदेखील श्रीविद्याधिराजतीर्थ स्वामीजींमध्ये दिसत नाही. इतरांचा मोठेपणा कबूल करताना ते गांगरत नसतात की, स्वत:चा मोठेपणा सांगताना ते फुलूनही जात नसतात. एकेकाळी समाज समुद्रगमन हे पाप मानून, अशांना वाळीत टाकले जात असे. यासारखे प्रश्‍न समाजासमोर उपस्थित राहिले त्यावेळी मठाने पुढाकार घेऊन ते प्रश्‍न सोडविले.
या घटनेच्या संदर्भात श्रीस्वामीजी म्हणाले, ‘या प्रश्‍नांचा विचार करण्यासाठी श्रीइंदिराकांततीर्थ स्वामीजींनी वेलिंग मुक्कामी सर्व गौड सारस्वत ब्राह्मणांची एक महासभा बोलावली व त्या सभेत असे ठरले की, समुद्रगमन केलेल्यांनी अल्प प्रायश्‍चित घेतल्यावर त्यांचा स्वीकार व्हावा. हा ठराव संप्रदायाच्या तिन्ही पीठांकडे प्रेषित करण्याचेही ठरविण्यात आले आणि सर्वप्रथम श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधिशांनी ठराव स्वीकारून अशा लोकांस पुनीत करण्यास मान्यता दिली.’
सारस्वत समाजाला दिलेल्या एका संदेशात स्वामीजी म्हणाले, ‘सारस्वत समाज हा पुढारलेला, विचाराने प्रगल्भ व भौतिकदृष्ट्या प्रगत असा आहे. हा समाज कर्तृत्वशाली व स्वाभिमानी आहे. यापुढे या समाजाने आपल्या शक्ती, बुध्दी, कर्तृत्वाचा उपयोग एकंदर समाजाच्या विकासासाठी केला पाहिजे. शेष समाजापासून तो अलग राहू शकणार नाही व तसे करून चालणारही नाही. समाजाच्या अन्य घटकांना विश्‍वासात घेऊन त्याने त्यांच्याशी सलोखा निर्माण केला पाहिजे. यामुळे सारस्वत समाज तर विकसित होईलच, शिवाय एकंदर समाजाचे धुरिणत्व त्यांच्याकडे आपोआप चालत येईल. कर्तृत्ववान, समर्थ, बुध्दिमान वर्गाकडे समाजाचे नेतृत्व असणे हे एकंदर समाजाच्या हिताचे असते.
मठाने एकंदर समाजाच्या कल्याणासाठी अनेकविध सेवा सुरू केल्या आहेत. हुबळी, मुंबई येथे वैद्यकीय सेवा सोय उपलब्ध करून देण्यात आलेली असून तिचा लाभ सर्व जाती-धर्म-पंथांच्या लोकांना मुक्तपणे घेता येतो. याशिवाय मठाच्या जनकल्याणपर अशा अनेक योजना आहेत व या पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने साकारतील असा विश्‍वास स्वामीजींनी व्यक्त केला.
स्वामीजींच्या अंतर्मनात डोकावून पाहता आल्यास पाहावे या हेतूने श्रीगुरूपीठाच्या मातापित्यांविषयी आज स्वामीजींच्या मनात कोणती भावना आहे त्यांच्या दर्शनाने आज स्वामीजींना काय वाटते, ते जाणून घेण्याची आम्ही इच्छा व्यक्त केली असता स्वामीजींनी सांगितले की आपल्या मनात त्यांच्याविषयी आता शिष्यपरिवारांपैकी एक यापरती खास अशी कोणतीही भावना नाही. माता स्वामीजींना नमस्कार करीत नाहीत व वडील समोर श्रीमद् भागवत ग्रंथ ठेवून नमस्कार करतात, एवढाच काय तो फरक! आपले पूर्वाश्रमीचे मातापिता म्हणून त्यांना संस्थानातून काही द्यावे, त्यांचा संसारभार हलका करावा असे मनात देखील येत नसल्याने त्यांनी बोलून दाखविले.
आज मठसंस्थापनेचा ५४० वा वर्धापनदिन व श्रीमद् विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्या पीठरोहणाचा ४२ वा वर्धापन पर्तगाळ येथील मठात साजरा होत आहे. या समारंभात सायंकाळी ४ वा. कामत हॉटेलचे अध्यक्ष रामचंद्र रंगप्पा कामत यांना विद्याधिराज पुरस्कार, तर मंगळूर मठ कमिटीचे अध्यक्ष एस्. प्रभाकर कामत व चार्टर्ड अकाउंटंट गणपती कामत यांना जीवोत्तम पुरस्कार देऊन बहुमान करण्यात येणार आहे. ही सर्व समाज बांधवांना पर्वणी आहे.