‘सिंहा’ची सावध चाल

0
192

– गुरुदास सावळ
मगो पक्षाबरोबरची युती मार्च २०१७ पर्यंतच राहील असे संकेत भाजपाने दिल्याने मगो पक्ष बराच सावध झाला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपाबरोबर युती करूनही मगोला त्याचा फारसा लाभ झालेला नाही. युती करताना अनुसरण्यात आलेले तत्त्व मगोच्या हिताआड गेले. काही मतदारसंघांत मगोचे प्रमुख व निष्ठावंत नेते दुखावले गेले. श्रीधर मांजरेकर, शांबा गावस आदी प्रमुख नेत्यांचा त्यात समावेश होतो. भाजपा हा मोठा भाऊ असल्याने मगोला मवाळ भूमिका घ्यावी लागली. पर्यायाने त्यात मगोचेेे बरेच नुकसान झाले. तिकीट नाकारण्यात आलेल्या मगो नेत्यांनी बंडखोरी केल्याने मगो नेते तोंडघशी पडले. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी आताच रणनीती निश्‍चित करण्याचे मगो पक्षाने ठरविले आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत मगोचे तीन आमदार निवडून आले होते. सांताक्रूझ, केपे आणि दाबोळी या तीन मतदारसंघांत मगोचे उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत. युतीच्या घटक पक्षाने प्रामाणिकपणे काम न केल्याने मगोचे हे उमेदवार पडले असे मगो पक्षाला वाटते. केपे मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश शंकर वेळीप यांनी बंडखोरी केल्याने मगोचे प्रकाश अर्जुन वेळीप पराभूत झाले. प्रकाश शंकर वेळीप यांनी बंडखोरी करून वेळीपांची मते फोडली नसती तर कॉंग्रेसचे बाबू कवळेकर यांची डाळ शिजली नसती. सांताक्रूझमध्ये मगोने उमेदवार आयात केला होता. त्यामुळे मगो व भाजपा मतदारांनी त्याच्याकडे पाठ फिरविली. अर्थात त्याचा फटका मगोला बसला. दाबोळीत मॉविन गुदिन्होंच्या झंझावातासमोर मगोची डाळ शिजणे कठीण होते. मडकई आणि प्रियोळ या दोन मतदारसंघांत मगोची बाजू भक्कम होती. फोंडा मतदारसंघात मात्र मगोला भाजपाबरोबरच्या युतीचा लाभ झाला. युती नसती तर कॉंग्रेसविरोधी मतांचे विभाजन होऊन कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला असता. आगामी निवडणुकीत युती न झाल्यास फोंडा मतदारसंघात कॉंग्रेसचा विजय निश्‍चित दिसतो.
अनुसूचित जमातीसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात चार मतदारसंघ राखीव ठेवण्यात यावेत अशी मागणी ‘उटा’ या अनुसूचित जमाती महासंघाने केली आहे. प्राथमिक माहितीनुसार काणकोण, केपे, नुवे आणि प्रियोळ हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवले जाण्याची शक्यता आहे. काणकोण, केपे व प्रियोळ या तीन मतदारसंघांत अनुसूचित जमातीचे प्रमाण सर्वाधिक आहे. नुवे या मतदारसंघाबाबत अजून शंका आहे. लोकसंख्येचा अभ्यास केल्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेणार आहे. अर्थात तसा निर्णय घेण्यापूर्वी निवडणूक आयोग गोव्यात येऊन जाहीर सुनावणी घेईल. २०११ मधील जनगणनेचा आधार घेऊन हे मतदारसंघ निश्‍चित केले जातील. मार्च २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने मतदारसंघ निश्‍चित करण्याचे काम जून २०१६ पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. जनतेच्या हरकती मागवून जाहीर सुनावणी घ्यायची झाल्यास मतदारसंघ राखीव ठेवण्याचे काम आतापासूनच चालू झाले पाहिजे. त्यासाठी गोवा सरकारने निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे.
केपे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्यास कॉंग्रेसचे आमदार बाबू कवळेकर यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल. बाबू कवळेकर धनगर समाजाचे असले तरी त्या समाजाचा तांत्रिक कारणामुळे अजून अनुसूचित जमातीत समावेश झालेला नाही. प्रत्यक्षात गोव्यातील धनगर समाज हा खर्‍या अर्थाने मागास आहे. धनगर समाजाचे लोक डोंगरमाथ्यावर झोपड्या बांधून राहतात. शिक्षणात ते बरेच मागे आहेत. त्यांची घरे पक्की नाहीत. केवळ बोकडे पाळून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे त्यांचा अनुसूचित जमातीत समावेश व्हायला हवा होता. बाबू कवळेकर यांच्या कॉंग्रेस सरकारने त्यासाठी बरेच प्रयत्न केले. आताही त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मात्र अजून यश आलेले नाही. धनगर समाजाचा हा प्रश्‍न तांत्रिक स्वरूपाचा असल्याने बराच गुंतागुंतीचा आहे. येत्या दोन वर्षांत तो सुटू शकेल असे वाटत नाही. त्यामुळे प्रकाश शंकर वेळीप किंवा प्रकाश अर्जुन वेळीप यांपैकी एकाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल असे वाटते. जिल्हा पंचायत निवडणुकीत दोन्ही प्रकाश एकत्र आले आहेत. ही एकी त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दाखविली असती तर कॉंग्रेसचा एक आमदार कमी झाला असता.
प्रियोळ मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला तर मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे आसन धोक्यात येईल. ढवळीकर यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल. कुंभारजुवे मतदारसंघावर त्यांचे लक्ष असले तरी पांडुरंग मडकईकर यांनी मान्यता दिल्यासच ते शक्य आहे. मडकईकर यांनी प्रियोळमधून मगोच्या तिकिटावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात येईल. मडकईकर हे पूर्वाश्रमीचे मगो आमदार असल्याने ते हा प्रस्ताव मान्य करतील अशी अपेक्षा मगो नेत्यांना आहे. पांडुरंग मडकईकर प्रियोळमधून आणि दीपक ढवळीकर कुंभारजुवेमधून निवडणूक लढवतील. या दोघांनाही निवडून आणण्याची जबाबदारी ढवळीकरबंधू स्वीकारणार आहेत. पांडुरंग मडकईकर हे प्रियोळमधून सहज निवडून येऊ शकतात, कारण प्रियोळमध्ये त्यांचा बराच प्रभाव आहे. गोविंद गावडे यांनी त्यांना मदत केली तर हे काम बरेच सोपे होईल.
डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ हे तर मगोच्या कळपात दाखल झाल्यातच जमा आहेत. पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी मगोत यावे असे ढवळीकरबंधूंचे प्रयत्न आहेत. रोहन खंवटे यांचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबर अत्यंत चांगले संबंध होते. आता नव्या मुख्यमंत्र्यांकडून त्यांना हवे तेवढे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे ते आता मगोला जवळचे वाटू लागले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्यांचे सगळे प्रस्ताव विनाविलंब मंजूर केलेले आहेत. स्वबळावर परत निवडून येण्याची रोहन खंवटे यांची क्षमता आहे. मात्र मगोचे पाठबळ मिळाल्यास त्यांचा विजय अधिक सोपा होईल. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला त्यांनी मगोत प्रवेश केला तर आश्‍चर्य वाटायला नको. नरेश सावळ आणि रोहन खंवटे हे दोघेही मगोत आले तर मगोच्या आमदारांची संख्या किमान दोनने वाढेल.
पाळी मगो गटाध्यक्ष महेश गावस यांनी मगोचा राजीनामा दिलेला असला तरी पाळीचे तिकीट त्यांनाच देण्यात येणार आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या तीन वर्षांत आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणलेली असली तरी त्यांच्याशी दोन हात करण्याची क्षमता महेश गावस यांच्याकडे आहे. मगो-भाजपा युती कायम न राहिल्यास मयेतून मगोचे उमेदवार जिंकू शकतील अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मये निर्वासित मालमत्तेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी खास कायदा संमत करण्यात आलेला असला तरी कूळ व मुंडकारांना मालकी हक्क प्रदान करण्यासाठी सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत. कायदा संमत झाल्यावर त्याची कार्यवाही करण्यासाठी सरकारने कोणतीही पावले उचललेली नाहीत. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कुळ-मुंडकारांना मालकी हक्क मिळतील असे वाटत नाही. त्यामुळे भाजपा सरकारनेही आमची फसवणूक केली अशी मये गावातील लोकांची भावना झाली आहे. त्याचा लाभ मगोला मिळेल. डिचोली, साखळी व मये या तिन्ही मतदारसंघांत परत एकदा ‘सिंह’गर्जना ऐकू आली तर आश्‍चर्य वाटायला नको. निदान त्यादृष्टीने मगो नेत्यांचे प्रयत्न तरी चालू आहेत.
भाजपा-मगो युती आगामी निवडणुकीत तुटणार हे गृहित धरूनच मगो नेते कामाला लागले आहेत. मगोने स्वबळावर निवडणूक लढविली तर मगोला किमान १० जागा मिळतील असा मगो नेत्यांचा अंदाज आहे. कॉंग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळे कॉंग्रेसची बरीच मते मगोकडे वळतील असे त्यांना वाटते. जॉन फर्नांडिस यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर लुइझिन फालेरो पक्षाची पुनर्बांधणी करतील ही अपेक्षा फोल ठरली आहे. १९८० च्या सुमारास मगो पक्षाचे कार्यकर्ते कॉंग्रेसकडे वळले होते. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी मगो पक्षाच्या सगळ्या सरपंचांना आपल्या कार्यालयात बोलावून कॉंग्रेसचे सदस्य केले होते. आता कॉंग्रेस कार्यकर्त्यांना कोणीच वाली नसल्याने ते मगोकडे आकर्षित होऊ लागले आहेत. गोव्यात भाजपाचे सरकार असले तरी तात्त्विक मतभेद असल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते भाजपात प्रवेश करू शकत नाहीत. कट्टर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना भाजपात कधीच प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले कार्यकर्ते आता मगो पक्षात प्रवेश करू लागले आहेत.
या ना त्या कारणामुळे मगो पक्ष सोडून गेलेल्या सर्व माजी कार्यकर्त्यांनी स्वगृही परतावे असे आवाहन मगो पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे. गेल्या अनेक निवडणुकांत मगोचे दोन किंवा तीन आमदार निवडून येत आहेत. भाजपाबरोबर युती करूनही गेल्या विधानसभा निवडणुकीत मगोचे केवळ तीन आमदार निवडून आले. मगोजवळ चांगले उमेदवार नसल्याने पक्षावर ही पाळी आली याची जाणीव मगो नेत्यांना झालेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा धोका पत्करायचा नाही असे पक्षाने ठरविले आहे. त्यासाठी आतापासूनच आगामी निवडणुकीची तयारी चालू केली असून उमेदवारही निश्‍चित करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. २१ मतदारसंघांतून मगो पक्ष उमेदवार उभे करणार असून उमेदवारांची यादीही तयार होऊ लागली आहे. निवडणुकीला अजून दोन वर्षे असली तरी उमेदवार आताच निश्‍चित झाल्यास त्यांना काम करणे सोपे होईल असे मगो नेत्यांना वाटते. त्यासाठी पक्षाने निवडलेल्या एकविसही मतदारसंघांत सदस्यनोंदणी आणि पक्ष पुनर्बांधणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अर्थात ही मोहीम याआधीच सुरू झाली आहे. युती कायम ठेवा म्हणून भाजपाची मनधरणी न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा पक्का निर्धार मगोने केला आहे.