‘आप’वरील आत्मसंकट

0
121

– दत्ता भि. नाईक 

गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना धूळ चारीत चौपन्न टक्के मते व विधानसभेच्या सत्तरपैकी सदुसष्ट मतदारसंघांवर विजयपताका रोवून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने (‘आप’ने) कॉंग्रेसला पूर्णपणे धूळ चारली, तर भाजपचा म्हणजेच नरेंद्र मोदींचा अध्वमेधाचा घोडा इंद्रप्रस्थ नगरीमध्ये रोखला. या घटनाक्रमामुळे सर्वच राजकीय निरीक्षकांच्या नजरा त्यांच्याकडे रोखल्या गेलेल्या असतानाच, गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांनंतर अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसच्या सहा आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला होता असा गौप्यस्फोट माजी आमदार राजेश गर्ग यांनी करताच पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ उठला, तो अजून शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत.होळीच्या मोसमात रंगांची उधळण चालू असतानाच रंगाचा बेरंग व्हावा असेच काही यावेळी घडले. राजेश गर्ग यांनी केजरीवाल यांच्या आवाजातील ध्वनिफित सर्वांसमोर वाजवून भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे पितळ उघडे पाडले. याचा परिणाम म्हणून मुंबईतील ‘आप’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पक्षाचा राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला. ज्या पक्षासाठी आपण रक्त आटवले, त्या पक्षाकडून अशा व्यवहाराची अपेक्षा नव्हती अशी त्यांनी राजीनामा देतेवेळी प्रतिक्रिया दिली.
संघटना चालवण्याचे कसब नाही
या सर्व घटनांची प्रतिक्रिया म्हणून दिल्ली राज्यातील करवालनगर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार कपिल मिश्रा यांनी ‘आप’चे ज्येष्ठ नेते शांती भूषण व प्रशांत भूषण पिता-पुत्र व योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी करावी यासाठी सह्या गोळा करण्याची मोहीम सुरू केली व त्याचा परिणाम होऊन या तिन्ही नेत्यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी दिली. पक्षविरोधी कारवाया केल्याचे आरोप त्यांच्यावर केले गेले. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी राजीनामा देताना प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे की, मागच्या निवडणुकीनंतर ‘आप’ने सरकार स्थापन केल्यास मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल असे आमचे म्हणणे होते, पण केजरीवाल सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर ठाम होते. आपल्यावरील आरोपांचे खंडन करत असतानाच या दोहोंनी पक्ष हा व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे असा टोमणाही मारलेला आहे.
दिल्लीतील सत्ता स्थिर करावी व नंतर हा प्रयोग यशस्वी करून देशभरातील राजकारणात भाग घ्यावा असे अरविंद केजरीवाल यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीतील अनुभवामुळे ते बरेच काही शिकले असावे. त्याचबरोबर हे लोण देशभर पसरवावे म्हणणारे लोकही पक्षात आहेत. रशियामध्ये क्रांती यशस्वी झाल्यानंतर लेनिनला जगभरात कम्युनिस्ट चळवळ पसरवण्याच्या कल्पनेचा विसर पडला, परंतु ट्रॉटस्की यावर समाधान मानायला तयार नव्हता. यावरून पक्षात भांडणे झाली व ट्रॉटस्कीला देश सोडून जावे लागले. इतिहास कुठे आणि कोणत्या रूपाने पुन्हा अवतरतो हे सांगता येत नाही. केजरीवाल यांनी स्वतः अराजकवादी असल्याचे घोषित केल्याचे वाचकांना स्मरत असेलच. त्यामुळे सर्वत्र बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून उभी राहिलेली ही चळवळ, दिल्लीत या चळवळीला लाभलेला पाठिंबा या जमेच्या बाजू सोडल्या तर संघटना चालवण्याचे कसब या नेत्यांना नाही हे फारच लवकर सिद्ध झाले आहे.
यशाचे विश्‍लेषण केले पाहिजे
दै. ‘लोकसत्ता’च्या १२ मार्चच्या अंकात संपादकांनी आपल्या अग्रलेखात अतिशय कडवट प्रतिक्रिया दिलेली आहे, ती अशी- ‘गाढव ज्याप्रमाणे अखेर उकिरड्यावर जाते, त्याप्रमाणे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मतभेदांचे उकिरडे जाहीरपणे फुंकायला अखेर सुरुवात केलीच. हे होणारच होते, फक्त अपेक्षेपेक्षा लवकर झाले इतकेच.’ ‘लोकसत्ते’सारख्या राजकीय वातावरणात वाहवत जाण्यापासून स्वतःला दूर ठेवणार्‍या दैनिकाची ही अधिकृत प्रतिक्रिया आहे. अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर बंगळूरूला निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी गेले, तेवढ्यात ही आरोप-प्रत्यारोपांची धूळवड उठली. यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी असे म्हटले की, एखाद्या वर्गाचा शिक्षक वर्गाबाहेर गेला असता त्यातील व्रात्य पोरांनी संपूर्ण वर्गाचा ताबा घ्यावा अशी ही घटना आहे.
‘आप’ला दिल्ली विधानसभेत जे यश मिळालेले आहे, याचे समर्थकांनी वा विरोधकांनी नीट विश्‍लेषण केलेच नाही. आपल्या देशात पूर्वी समाजवादी नावाचा पक्ष होता. त्यात पिपल्स वर्कर्स पार्टीचे विलीनीकरण केले गेले. त्यातून प्रजा समाजवादी पार्टी बनली. या पार्टीतही पुन्हा मतभेद झाले. त्यातून बाहेर पडलेल्या पक्षाने स्वतःला संयुक्त समाजवादी पार्टी हे नाव स्वीकारले. फुटून निघालेला म्हणजे विभक्त झालेला पक्ष संयुक्त कसा असू शकतो यावरही नामकरण करताना विचार झाला नाही. लोकशाहीवर निष्ठा असलेले असे हे लोक दिग्गज नेते होते. स्वयंप्रज्ञ विचारवंत होते. परंतु हे धड पक्षबांधणी करू शकले नाहीत. ‘आप’चीही हळूहळू हीच गत होणार नाही ना? ही भीती वाटते.
एककल्ली एकाधिकारशाही
पक्षाची ज्याप्रमाणे घोडदौड सुरू झाली ती पाहता अरविंद केजरीवाल हे नेतृत्व अतिमहत्त्वाचे ठरणे क्रमप्राप्त होते; परंतु त्यांनी सर्वेसर्वा बनावे याची अपेक्षाच नव्हती. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा परिपाक म्हणून सर्व कॉंग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टीची स्थापना केली होती व १९७७ मध्ये या पक्षाला केंद्रात सत्ताही प्राप्त झाली होती. परंतु अंतर्गत मतभेद व लाथाळ्यांमुळे हे सरकार पडले व पक्षही नेस्तनाबूत झाला हा इतिहास ताजा आहे. याच धर्तीवर अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे जन्माला आलेला हा पक्ष असाच चालला तर त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा ठेवणार्‍यांच्या पदरी घोर निराशाच पडेल. जयप्रकाश नारायण यांनी निवडणुकीनंतर पक्षाच्या अंतर्गत भांडणात लक्ष घालणे सोडून दिले. त्यांचे आरोग्य अतिशय बिघडले होते. अण्णा हजारे यांनी ‘आप’चे अंतर्गत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला नाही याचे प्रमुख कारण वेगळेच आहे. एकाहून एक विद्वान असलेली व त्याहूनही तसे समजणारी माणसे या पक्षात आहेत व ती त्यांचा वापर करत असली तरी त्यांचा सल्ला मानतीलच हे खात्रीलायकपणे सांगता येणार नाही, याची अण्णांना कल्पना आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांत मुसलमानांनी अकरा मतदारसंघांची मागणी केली असता केजरीवाल यांनी अकलेचे तारे तोडलेले दिसून येतात. मोदी हे जणू या देशातील मुसलमानांचे निर्दालन करायला निघालेले नेते आहेत असा जो कॉंग्रेस व डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी भ्रम निर्माण केला होता त्याचे केजरीवालही बळी पडलेले दिसतात. ज्यांनी हा भ्रम उत्पन्न केला ते सत्य जाणतात, पण काहीजण अफवांनाच बातम्या समजतात, त्यातला हा प्रकार आहे.
योगेंद्र यादव व प्रशांत भूषण हे बोलघेवडे म्हणून त्यांची संभावना केली जाऊ शकते. परंतु योगेंद्र यादव हे पक्षाचे प्रवक्ते होते हे विसरून चालणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर केजरीवाल यांनी पक्षाच्या संयोजक पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी मयंक गांधी यांनी केली होती, त्यावेळी अंजली दमानिया यांनी त्यांच्या या सूचनेला विरोध केला होता. आता हे दोघेही पक्षात नाहीत. माजी नौदलप्रमुख रामदोस यांना पक्षांतर्गत लोकपाल म्हणून नियुक्त केलेले आहे. हा त्या पक्षाचा वरकरणी पाहता फार मोठा धाडसी निर्णय होता. या लोकपालांनीच केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली व त्यांच्या एककल्ली एकाधिकारशाही कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेतला.
संजय सिंह हे ‘आप’चे एक महत्त्वाचे नेते. त्यांनी केजरीवाल यांना संयोजक पदावरून हटवण्याचे कारस्थान रचल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांसमोर नेण्याचे काम फुटिरांच्या चमूने केले आहे. केजरीवाल यांनी संयोजकपदाचा राजीनामा देण्याची इच्छा हा सर्व प्रकार होण्यापूर्वी व्यक्त केली होती, पण ती पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने फेटाळून लावली होती. हे सर्व खरे असले तरी दिल्लीतील यशाचे श्रेय एकट्याला मिळू द्यायचे नाही हा या सर्व प्रकारामागे हेतू लपलेला दिसून येतो.
देव जाले उदंड
‘आप’ला दिल्लीत अनपेक्षित जनाधार मिळाला तरी हा एक नेत्यांचा पक्ष आहे. जोपर्यंत सत्ता नव्हती तोपर्यंत नेतागिरीला वाव होता. देशाची अर्थव्यवस्था कशी असावी, परराष्ट्र धोरणात कोणते मुख्य विषय असावेत, यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर स्वतःची स्वतंत्र व वेगळी, पण आग्रही मते असलेल्या नेताजींचा हा पक्ष. पक्षांतर्गत शिस्त म्हणून काय असते याची यांना माहिती नाही असे म्हणता येणार नाही; परंतु आम्ही कॉंग्रेस वा भाजपासारखे नाही आहोत हे सिद्ध करण्यासाठी सतत मतस्वातंत्र्याचा उद्घोष करत राहण्याचे यांना वेड जडलेले आहे.
पक्षांतर्गत मतभेद सर्वच पक्षांत असतात, पण ते सर्वांच्या लक्षात येणार नाहीत यासाठी काळजी घ्यायची असते. वरदान मिळाले म्हणून काहीही होत नाही. ते वरदान नीटपणे वापरले गेले नाही तर त्याचे शापवाणीमध्ये रूपांतर होते. ‘आप’वरील हे संकट बाह्य संकट नसून ते आतूनच जन्माला आलेले आहे. एका परीने ही ‘आप’वर कोसळलेली आपबिती आहे. व्यक्ती-व्यक्तीला प्राप्त असलेले मतस्वातंत्र्य म्हणजे शिस्त सोडून वर्तन करण्याचे स्वातंत्र्य नव्हे हे ‘आप’मधील नेत्यांना माहीत नाही असे म्हणता येणार नाही. पण एकदा केजरीवाल हे राष्ट्रीय नेते बनले की त्यांचा वारू ‘आप’च्या आटोक्यात राहणार नाही, अशा मत्सराच्या भावनेमुळे ही बंडखोरी उफाळून आलेली असू शकते. ‘आप’मधील या परिस्थितीचे सार्थ वर्णन समर्थांच्या दासबोधातील खालील ओवीतून स्पष्ट होते-
देव जाले उदंड| देवांचे माजले भंड|
भूतादेवतांचे थोतांड| एकचि जाले॥