विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

0
109

राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणाने आज सोमवार दि. २३ पासून गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होत असून ते दि. २७ पर्यंत चालेल. दि. २५ रोजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर राज्याचा २०१५-१६ साठीचा अर्थसंकल्प सादर करतील.मुख्यमंत्री पार्सेकर यांनी आपल्या या पहिल्याच अर्थसंकल्पात राज्यातील बेरोजगार युवकांचा विचार करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्याची तयारी केली आहे, तसे मुख्यमंत्र्यांनी जाहीरही केले होते. नोकर्‍या म्हणजे सरकारी नोकर्‍या हा युवकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. कोणत्याही परिस्थितीत खाजगी औद्योगिक प्रकल्पांमध्ये ८० टक्के गोमंतकीयांना सामावून घेतलेच पाहिजे व त्यासाठी नियमात तरतुदही करण्याची सरकारने तयारी ठेवली आहे. विद्यमान प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो मुख्यमंत्री असताना प्रत्येक प्रकल्पात ८० टक्के गोमंतकीयांना रोजगार देण्याचा विचार पुढे आला होता. त्यावेळी तसा निर्णय घेतल्याचेही सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे गोमंतकीय युवकांना औद्योगिक प्रकल्पांमध्ये आपल्याला स्थान मिळेल, असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात ८० टक्के गोमंतकीयांना सामावून घेण्याची तरतूद केलीच नव्हती. त्याचा गैरफायदा घेऊन खाजगी प्रकल्पात बिगर गोमंतकीयांनाच सामावून घेणे पसंत करीत आहेत. पार्सेकर यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गोमंतकीयांना सेवेत घेणार्‍या उद्योजकांना सवलतही देण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे दि. २५ रोजी सादर करण्यात येणार्‍या सरकारच्या अर्थसंकल्पाकडे शिक्षित बेकार युवकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात कॉंग्रेसची रणनिती कशी असेल यावरही लक्ष लागून आहे.