अपक्षांची गुढी!

0
120
लाटंबार्सेच्या भाजप उमेदवार शिल्पा नाईक यांना पराभूत करणारे संजय शेटये यांच्या समवेत जल्लोष करताना कार्यकर्ते. (छाया : विशांत वझे)

उत्तर गोव्यात महायुतीला १२, तर दक्षिणेत १३ जागा
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालाने सत्ताधारी भाजप – मगो – गोविपा महायुतीचा भ्रमनिरास केला असून त्यांना उत्तर गोव्यात केवळ १२ जागा मिळाल्याने बहुमतासाठी १ जागा कमी पडली, तर दक्षिण गोव्यात १३ जागांचे निसटते बहुमत प्राप्त झाले. या निवडणुकीत विरोधी आमदारांचे समर्थन प्राप्त झालेल्या अपक्ष उमेदवारांनीच खरी विजयाची गुढी उभारल्याचे दिसून आले आहे.
उत्तर गोव्यात भाजपने ज्या २३ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी केवळ ११ जागा जिंकता आल्या. मगोने उत्तरेत २ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी १ जागा जिंकली. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ १२ चा आकडा पार करू शकले नाही. याउलट अपक्ष उमेदवारांनी उत्तर गोव्यातील १३ जागांवर यश प्राप्त केले आहे.दक्षिण गोव्यात भाजपने ११ जागा लढवल्या, त्यापैकी ७ जिंकल्या, मगोने ७ जागा लढवल्या, त्यापैकी ४ जिंकल्या, गोवा विकास पक्षाने ५ जागा लढवल्या, त्यापैकी २ जिंकल्या. सरकारमधील दोघा आमदारांसाठी अपक्षांना सोडलेल्या दोन्ही जागांवर पाणी सोडावे लागले. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ जेमतेम १३ वर पोहोचू शकले. त्यामुळे दक्षिण गोव्यात १२ अपक्षांनी बाजी मारली.
तालुकानिहाय सविस्तर निकाल असा आहे:
र्‍ हरमल :
हरमल या नव्या मतदारसंघात तिहेरी लढतीत भाजपचे मांद्रे मंडल अध्यक्ष व उमेदवार अरूण बांदकर निवडून आल्याने तेथे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे वर्चस्व सिद्ध झाले. बहुतेक मतदानकेंद्रांवर भाजपने तेथे आघाडी घेतली.
र्‍ मोरजी :
मात्र, मोरजीमध्ये श्रीमती श्रीधर मांजरेकर यांनी भाजपच्या उमेदवार माया शेटगावकर यांना पराभूत केले हा भाजपसाठी हादरा आहे. श्रीमती मांजरेकर या पूर्वी मांद्रेमधून निवडून येऊन जिल्हा पंचायत उपाध्यक्ष बनल्या होत्या. मगो नेते श्रीधर मांजरेकर यांच्या त्या पत्नी. यावेळी भाजप – मगो युती झाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला व भाजपच्या अधिकृत उमेदवाराला त्यांनी धूळ चारली.
र्‍ तोरसे :
तोरसे मतदारसंघात भाजपचे उमेदवार व पेडणे भाजप मंडल उपाध्यक्ष रमेश राजाराम सावळ विजयी झाले आहेत. तेथे पंचरंगी लढत झाली होती. बाबू आजगावकर यांचे समर्थन लाभलेले उमेदवार ज्ञानेश्वर परब यांना सावळ यांनी पराभूत केले. ऍड. मुरारी परब, विठोबा परब व अमित सावंत यांनाही तेथे त्यांनी पराभवाची धूळ चारली.
र्‍ धारगळ :
धारगळमधील लढतीत पोलीस खात्यातील नोकरी सोडून राजकारणात आलेले तुकाराम हरमलकर निवडून आले आहेत. भाजपचे दीपक कळंगुटकर यांना तेथे तिरंगी लढतीत पराभव चाखावा लागला.

अनेक अपक्ष संपर्कात : मुख्यमंत्री
‘या निवडणुकीने खूप काही शिकवले’
जिल्हा पंचायत निवडणुकीस भाजप, मगो व गोवा विकास पार्टीच्या युतीला उत्तरेत १२ तर दक्षिणेत १३ जागा मिळाल्या. मात्र, अनेक अपक्षांनी संपर्क साधला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये युतीचेच अध्यक्ष निवडून येतील असे सांगून या निवडणुकीने आम्हांला खूप काही शिकविले. पुढील विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे, अशी कबुली मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
यापूर्वी जिल्हा पंचायतींवर भाजपला विशेष स्थान नव्हते. यावेळी चांगले स्थान मिळाले. दोन्ही पंचायती युतीला मिळाल्याने जिल्हा पंचायतींना अधिकार देण्यास मदत होईल. त्यादृष्टीकोनातून सरकार निश्‍चितच निर्णय घेईल, असे पार्सेकर यांनी सांगितले. लाटंबार्से, मोरजी, धारगळ या मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांचा पराभव का झाला, त्यासाठी अवसानघात कोणी केला याचाही अभ्यास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मगो-भाजप युती झाली नसती तर काय झाले असते, असा प्रश्‍न केला असता त्यावर जाहीर भाष्य करणे चुकीचे होईल, असे ते म्हणाले.