विशेष संपादकीय – कडवे आव्हान

0
107

जिल्हा पंचायत निवडणुकीचे कालचे निकाल पाहता राज्यातील सत्ताधारी भाजप – मगो – गोविपाच्या महायुतीला ही निवडणूक बरीच जड गेलेली दिसून येते. पक्ष पातळीवर ही निवडणूक लढवून सत्ताधारी महायुतीचे प्राबल्य सर्व मतदारसंघांमध्ये आहे हे दाखवण्याचा अट्टहास पुरता अंगलट आला आहे असेच म्हणावे लागते. कॉंग्रेसने या निवडणुकीतून सुरवातीलाच अंग काढून घेतले नसते आणि अपक्ष आमदारांनी दिलेल्या संयुक्त विरोधी आघाडीच्या हाकेला ओ दिली असती, तर सत्ताधारी महायुतीला ही निवडणूक आणखी जड गेली असती. आमदार रोहन खंवटे, नरेश सावळ, विश्वजित राणे, पांडुरंग मडकईकर, बाबू कवळेकर वगैरेंनी आपापल्या मतदारसंघांमध्ये महायुतीचा वारू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांना त्यात बर्‍यापैकी यशही मिळाले. आमदार रोहन खंवटे यांनी तर सुकूर आणि पेन्ह द फ्रान्स या दोन्ही मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार निवडून आणले. विश्वजित राणे यांनी या निवडणुकीतही आपले बळ दाखवले. होंडा, पाळी, उसगाव – गांजे, केरी आणि नगरगाव या सर्व मतदारसंघांमध्ये त्यांनी महायुतीला पुरती धूळ चारली याची नोंद घेणे आवश्यक आहे. भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत असलेल्या लाटंबार्सेमध्ये शिल्पा नाईक पराभूत ठरल्या, त्याला भाजपचे एक ज्येष्ठ पदाधिकारीच अधिक कारणीभूत ठरले आहेत. पांडुरंग मडकईकर यांनी खोर्लीत आपल्या पत्नीला, तर शेजारच्या सेंट लॉरेन्समध्ये बंधूंना निवडून आणले. बाबू कवळेकरांनी बार्से आणि गिरदोळीत आपला प्रभाव दाखवला. मुख्यमंत्री पार्सेकरांसह भाजपच्या विविध मंत्र्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पार्सेकरांच्या हरमलमध्ये भाजपला भरघोस यश मिळाले, परंतु मोरजीमध्ये श्रीमती मांजरेकरांच्या विजयाने ती जागा मगोला न सोडण्याचा हट्ट भाजपाला पुरता भोवल्याचेही दिसून आले. पैंगीण राखले असले, तरी खोलाची जागा गमावणे हा क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना मोठा धक्का आहे. सहकारमंत्री महादेव नाईक शिरोडा राखू शकले नाहीत. दुसरीकडे आमदार किरण कांदोळकर, दयानंद मांद्रेकर यांनी मात्र आपले बालेकिल्ले अभेद्य असल्याचे कालच्या निवडणुकीत सिद्ध केले आहे. किरण कांदोळकर यांच्या योगदानाची दखल त्यामुळे पक्षाला घ्यावी लागेल. महायुतीचा घटक असलेल्या मगो पक्षाने आपल्या पक्षाला नवसंजीवनी देण्याची जी मोहीम चालवलेली आहे, तिचे गोड फळ त्यांना मिळालेले दिसते. मगोने उत्तर गोव्यात सांताक्रुझ व चिंबल या दोन जागा लढवल्या होत्या, त्यापैकी चिंबल तर त्यांनी राखलीच, शिवाय दक्षिण गोव्यात लढवलेल्या सात जागांपैकी बेतकी – खांडोळा, कुर्टी – खांडेपार, वेलिंग – प्रियोळ आणि कवळे या चार जागा जिंकून मगोने भरघोस यश मिळवले आहे. सांकवाळ, बार्से आणि उसगावची जागा त्यांनी गमावली असली, तरी मगोचे बालेकिल्ले अभेद्य आहेत आणि भाजपसाठी हा बोलका इशारा आहे. मिकी पाशेकोंच्या गोवा विकास पक्षाचा कसही या निवडणुकीत लागला होता. त्यांनी आपली पत राखली आहे. दक्षिण गोव्यातील ज्या पाच जागा गोविपाला दिल्या गेल्या होत्या, त्यापैकी बाणावलीत चर्चिलनी शह दिला, तरी राय व कोलवा त्यांनी कायम राखले. कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाली तरी बाबूश मोन्सेर्रात यांनी सांताक्रुझ आणि ताळगाव या दोन्ही जागा काबीज केल्या. आता त्यांची साथ घेण्याची भाजपची तयारी आहे का हे पाहावे लागेल. एकंदर चित्र पाहता अपक्ष आणि काही कॉंग्रेस आमदारांनी मिळून भाजपपुढे कडवे आव्हान उभे केले आणि त्याचा परिणाम निकालांवर झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. उत्तर गोव्यात स्पष्ट बहुमत न मिळणे ही पक्षासाठी मोठी नामुष्की आहे. दक्षिण गोव्यातही महायुतीला जेमतेम बहुमत मिळालेले आहे आणि त्यात मगोच्या यशाचा मोठा वाटा आहे. सत्तरीत राणे पिता पुत्रांचे, ताळगाव – सांताक्रुझमध्ये बाबूशचे, खोर्ली – सेंट लॉरेन्समध्ये मडकईकरांचे वर्चस्व अजून कायम असल्याचे दिसून आले. रोहन खंवटेंचे उपद्रवमूल्य वाढल्याचे व ते यापुढे अधिकृतपणे सरकारसोबत राहणार नसल्याचेही स्पष्ट झाले. लाटंबार्से, सुकूरच्या प्रतिष्ठेच्या जागांवर पक्षाला पाणी सोडावे लागले. खोला, शिरोडा अशा आपल्या मंत्र्यांच्या प्रभावक्षेत्राखालील जागा गमवाव्या लागल्या. मात्र, जिल्हा पंचायत निवडणूक ही राज्य सरकारच्या कामगिरीची निदर्शक मानता येत नाही, कारण सर्वत्र स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असतात, परंतु आमदारांचा मतदारसंघावरील वरचष्मा हा या निवडणुकीतील महत्त्वाचा घटक असतो. त्याचा लेखाजोखा आता भाजपने घेणे आवश्यक आहे. विशेषतः भाजपमध्ये तिकीटवाटपावरून उफाळून आलेली बंडखोरीही पक्षाला मारक ठरली आहे. महायुतीमुळे तिकीट कापले गेलेल्यांनी युतीच्या उमेदवारासाठी काम केले नसावे असा संशयही काही निकाल पाहता येतो आहे. भाजप आणि मगोमधील सुप्त संघर्षाचा परिणाम काही मतदारसंघांमध्ये पाहायला मिळाला आहे. ताळगावमधील अपयशाला भाजपचे स्थानिक नेते दत्तप्रसाद नाईक यांनी साबांखामंत्र्यांना अप्रत्यक्षपणे जबाबदार धरले आहे. आपले सरकार असूनही ताळगावच्या रस्त्यांचा प्रश्न सुटला नाही त्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोन्सेर्रात आणि भाजपच्या काही नेत्यांचे अंतर्गत साटेलोटे हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. आता बाबूश काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. उत्तरेत बहुमत मिळाले नसले आणि दक्षिणेत जेमतेम बहुमत मिळाले असले, तरी आज हाती सत्ता असल्याने उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींवर आपल्या गुढ्या उभारणे भाजपला विशेष कठीण जरी नसले, तरीही एकंदर निवडणूक पक्षाला येणार्‍या २०१७ च्या निवडणुकीची व्यूहरचना अधिक नेटकेपणाने करण्याचा आणि यावेळच्या चुका सुधारण्याचा महत्त्वाचा धडा देऊन गेली आहे. उत्तर गोव्यात भाजपने ११ जागा जिंकल्या खर्‍या पण १२ गमावल्या. दक्षिण गोव्यात ७ जागा जिंकल्या व ४ गमावल्या. दक्षिणेतील यशात मगोचा फोंडा तालुक्यातील घसघशीत प्रभावाचा मोठा वाटा आहे याचे भानही भाजपला ठेवावे लागेल. काही मंत्र्यांचा मतदारसंघांतील घटता प्रभावही पक्षाला विचार करायला लावणारा आहे हे निश्‍चित. पुरेशा तयारीविना ही निवडणूक पक्षपातळीवर लढवण्याचा निर्णय भाजप सरकारने घेऊन स्वतःच्याच पायांवर धोंडा मारून घेतला आहे असेच हा निकाल सांगतो आहे. अगदी मुख्यमंत्र्यांपासून संरक्षणमंत्र्यांपर्यंत निवडणूक प्रचारात उतरूनही त्याचा विशेष परिणाम दिसला नाही. स्थानिक परिस्थितीवरच मतदारांचा कौल प्रत्येक मतदारसंघात बेतलेला आहे आणि आलेले अपयश हे त्या त्या आमदाराचे अपयश आहे. आमदारांच्या भरवशावर सहज तडीस लागता येईल हा भ्रम फोल ठरला आहे. या निवडणुकीत खरी बाजी मारली आहे ती अपक्षांनी. विरोधकांचे पाठबळ घेत त्यांनी या निवडणुकीत कित्येक मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांना जो शह दिला तो लक्षवेधी आहे. अतिआत्मविश्वास कसा अंगलट येऊ शकतो त्याचा उत्तम दाखला म्हणूनच या निवडणुकीकडे पाहावे लागेल.