ज्येष्ठांनी कसे जगावे!

0
727

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
ज्येष्ठ म्हटल्यावर माणसाने साठी ओलांडली. एकदा का साठी झाली की त्यावर्षी थाटामाटात जन्मदिन साजरा करायचा. कुटुंबातील सर्व नातलगांनी एकदा यायचे. धूमधडाक्याने वाढदिवस साजरा करायचा व निघून जायचे. परत विचारपूस करण्यास कुणीही नाही. त्यानंतरचे वाढदिवस तर विसरूनच जायचे. हे होणे आहेच. त्यातून काहीतरी माणसाने शिकले पाहिजे. तेव्हा काय शिकावे? म्हातार्‍यांनी कसे जगावे?…
खरे म्हणजे बायका आपले वय लपवतात असे नाही. पुरुष मंडळीसुद्धा तेच करायला लागलेत. केस काळेभोर, चेहर्‍यावर ब्लिचिंग करून चेहरा फुललेला – अंगावर चांगले नीटनेटके कपडे – थोडाफार बॉडी स्प्रे – माणसाने कसे साफ व चोख राहिले पाहिजे. खिशाच पैसे असले तर ठीक आहे हो! नाहीतर केवळ पाच टक्के लोकच असे वागू शकतात. हे सगळे आम्ही सर्वसामान्यांसंबंधी बोलतोय. कुणी विचारेल, आजकाल सर्वसामान्य कुणीच नाही. फक्त सरकारी कागदपत्री मात्र सर्वसामान्य! नाहीतर बी.पी.एल. व ते कोण हे माहिती करून घ्यायला हवे तर वितरण संस्थेकडे चला. तिथल्या दुकानात (स्वस्त) येणारी माणसे सर्वसामान्य!! तर ज्येष्ठांनी कसे जगावे… हा विषय घेऊन तुमच्याबरोबर वार्तालाप करणे बरे होईल. एकदा वयाची साठी ओलांडली म्हणजे तो माणूस ऑफिशियली रिटायर झाला असा समज आहे. तो माणूस शारीरिकरीत्या थकला हे सर्व जाणतात. पण आपण थकलेलो नाही, हे सिद्ध करायचा तो प्रयत्न करतो. त्याने काय करावे?…
* कोणतातरी छंद जोपासावा :
सरकारी नोकरी, ऑफिसातील नोेकरी, कंपनीत नोकरी करण्याचा तर कोणालाही छंद नसतोच. नोकरीला लागल्यापासून सकाळी घरातून ऑफिसला व संध्याकाळी ऑफिसमधून घरी, हे वर्तुळ पूर्ण झाले, असे म्हणायचे. थकलो म्हणायचे व टीव्ही,समोर बसायचे. मग बाहेर जायचे नाव नको! रात्री जेवणानंतर झोपायचे. दिवस संपला… रात्रही गेली. परत सकाळी तेच वर्तमानपत्र… चालूच राहते. छंद जोपासण्याचा छंद नाही. अहो, छंद जोपासण्यास कुणाला वेळ आहे? कुणाकडे पैसे आहेत?
हे असे काही न बरळता, साठी येण्याअगोदर माणसांनी विचार करावा. पुढच्या आयुष्याचे वेळापत्रक ठरवून टाकायचे. छंद जोपासायचे. पहिल्यांदा फुकट छंदाचा विचार करू. बागेत काम करावे… झाडांना पाणी देणे, वरवरची छोटी छोटी कामे- शरीराला, सगळ्या सांध्यांना हलवत कामे करायची. वाचन करावे. पेपर, फुस्तके वाचावीत. शेजारी वाचनालय असले तर तुम्हाला खाद्य आहेच! काय वाचन करावे, हे ठरवा. मित्रांबरोबर बागेत किंवा पारावर बसा. चांगल्या गोष्टींवर चर्चा करा. उगाचच कुणाचीतरी टर्र उडवत, बोलत, वेळ घालवण्यासाठी चर्चा करणे चुकीचे आहे. विचारांची पातळी वाढवा. स्वतःविषयी बोला. सहचारी माणसाबरोबर आपल्या वयाला साजेशा विषयावर बोला. घरच्या कोणत्याही विषयावर सार्वजनिक रीत्या बोलणे रास्त ठरत नाही. छंद नसणारी माणसे… स्वतःचा वेळ घालवू शकत नाहीत… ती एकाकी पडतात.. तेव्हा उठा, छंद जोपासा!
* स्वतःच्या शरीराची काळजी घ्या :
कुठलाही आजार असला तर त्यावरची औषधे दररोज डॉक्टरी सल्ल्यानुसारच घ्या. वेळोवेळी रक्ताची तपासणी करून घ्या. मी तर असे म्हणेन वयाची ४०-४५ वर्षे झाली की हे सगळे करायला लागा. केव्हा केव्हा माणूस आपल्या कामात व प्रपंचात एवढा गुंतून जातो की स्वतःची काळजी घेण्याचे राहूनच जाते. वयाची कित्येक वर्षे धामधुमीत गेलेली असतात. तेव्हा शरीर रोगाने ग्रासलेले असते. हे होऊ न देणे- यातच आपले हीत आहे, असे समजा.
प्रथम स्वतःच्या शरीराला जपा. बाहेर रस्त्यावर, बाजारात फिरताना काळजी घ्या. हातापायाची बारकाईने हालचाल करा. वयोमानाबरोबर शरीराची नैसर्गिक झीज होते, हे जाणा. उगाचच दुसर्‍यांना दाखवायला म्हणून अतिशयोक्ती करू नका. माझी बायको, माझा मुलगा, मुलगी नेहमी म्हणतात… तुम्ही ना स्वतःची काळजी घेत नाही. तुम्ही काही आता तरुण राहिला नाहीत!! वगैरेऽऽ… हे सत्य आहे. त्यावर विचार व्हायला पाहिजे. माझ्या नातेवाइकांत एक ज्येष्ठात ज्येष्ठ माणूस आहे. त्यांना चांगले ऐकू येत नाही. चालही तेवढी बरोबर नाही. तरीदेखील सायकल चालवतात… स्कूटर चालवतात. गाडीही चालवू पाहतात. पंधरा वर्षांपूर्वी पार्टीनंतर गाडी चालवायला घेतली… व रस्तादुभाजकावर चढवली… जास्त काही झाले नाही… नशीब बलवत्तर!! नेहमीच नशीब तुम्हाला साथ देणार यावर विश्‍वास ठेवू नका. तर स्वतःची काळजी घ्या. डॉक्टरांना दाखवा. वयोमानाप्रमाणे शरीराची झीज होणे स्वाभाविक आहे.
* तुम्ही काय करायचे :
– सकाळी उठल्यावर नित्यनियमानुसार कामे करून जाणे.
– नाश्ता झाल्यावर बाजारात जावे. जवळची कामे जास्तीत जास्त वेळा चालत जाऊनच करावीत. पण रस्त्यावरील रहदारीत स्वतःची काळजी घ्यावी. रस्त्यावर चालताना, पाण्यातून जाताना, तिथे सोडलेल्या तेलावर पाय न ठेवता चालावे. डोळ्यांवरचा चष्मा ठीक प्रकारे लावून, ऊन जास्त असेल तर छत्री घेऊन जाणे योग्य ठरेल. सहसा दुपारचे व संध्याकाळचे कातरवेळी बाहेर पडायचे नाही.
– योग्य डॉक्टरी तपासणी करून, गोळ्या नियमानुसार नेहमीच्या ठिकाणी ठेवणे व घेणे. पाहिजे तर गोळ्या कशा घ्याव्या ते टेबलावर गोळ्यांसोबत लिहिणे. घेतल्यावर घेतल्याची खूण करणे. पुष्कळांना आठवण राहत नाही. घेतलेली गोळी परत घेतात. रक्तदाबाचा त्रास असेल तर वरचेवर रक्तदाब तपासून घ्यावा व त्याची नोंद करावी. मधुमेह असेल तर वरचेवर त्यासंबंधी रक्ततपासणी करून घेणे व नोंद ठेवणे. काही वेगळे व्हायला लागले तर लगेचच घरच्या लोकांना सांगावे. नाहीतर काहीतरी भयानक घडून जाईल व त्याचा त्रास सर्व कुटुंबाला होईल.
* वय वाढलेल्या म्हातार्‍या बायका तर कुणाचेच ऐकत नाही. रात्री त्यांना कितीतरी वेळा लघवीला जावे लागते. रात्री काळोखात लाइट लावल्याशिवाय जाण्याची वाईट सवय त्यांना लागलेली असते. तेव्हा थांबा… लाइट लावा.. काळोखात जाल तर पडाल… पडलात तर हातपाय मोडतील…हातपाय मोडले तर सर्वकाळ बिछान्यावरच थांबावे लागणार! घरातल्या माणसांना स्वतःची काळजी घ्यायला वेळ नसतो. त्यावर म्हातार्‍या माणसाची काळजी तो काय घेणार? तरी बरे, सौ. आहे किंवा शेजारी होती म्हणून ठीक झाले. खरे तर म्हातारपणी नवर्‍याची काळजी घेणे हे बायकांचे कामच आहे. नवरा बिछान्यावर पडल्यावर नवर्‍याची सेवा करणे बायकोला क्रमप्राप्त आहे. पण तिला ते झेपते का? मागे माझ्या शेजारी असाच एकटा एक-दोन वर्षे लकवा मारल्यामुळे बिछान्यातच होता… त्याचे सर्व विधी बिछान्यावरच व्हायचे… बायकोलाच ते करावे लागायचे. शेवटी तर अंगाला चट्टे पडले. त्यात पू (पस) भरू लागला. त्याचा मुलगा अरब देशात नोकरीला लागला. तो सुट्टीत घरी आला. डॉक्टरी सल्ला घेण्यासाठी मला त्याला तपासायला सांगितले. मी पाण्याची गादी (वॉटर बेड) आणायला सांगितली. बायको तर कित्येक वर्षांपासून त्याची सेवा करून थकून गेली होती. दोनच दिवसांनी बातमी समजली… तो वारला, म्हणून! उगाचच मनात शंका येत होती.
तेव्हा बिछान्यावर पडू देऊ नका. तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारी माणसे ही कालांतराने थकून जातील. ती वेळ येऊ देऊ नका!
* माणसाने पचेल तेच खावे :
वयोमानाप्रमाणे शरीराची झीज होणे हे साहजिकच आहे. तरुणपणी आम्ही खातो ते पचवतो, हे ठीक आहे. पण जोषात सगळे काही पचवणे जमत नाही. साधे जेवण, जास्त करून शाकाहारी जेवणच वाढत्या वयात घेणे सोयीस्कर ठरते. जेवणात शाकभाज्या, फळे, दूध, दुधाचे प्रकार असणे चांगलेच. मांसाहारी भक्तांनी स्वतःच्या जिभेवर नियंत्रण ठेवणे भाग आहे. किती खावे व किती वेळा खावे याचा विचार करावा. गोड पदार्थ वर्ज्य करावेत. साखर, गूळ आणि तेलाचा वापर जेवणात कमी असावा. सल्ला देणारी माणसे पुष्कळ भेटतात. योग्य तज्ज्ञांकडून योग्य तोच सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. फुकटचा सल्ला शरीराला बाधक ठरेल!!
एकदा एका व्यक्तीने फुकट सल्ल्यानुसार शौचास होत नाही म्हणून पाटणकर काढा घेतला. दोन-चार दिवस शौचास न झाल्याचे सांगत वाटीभर जास्तच घेतले. तर मग त्यांना एवढे शौचास लागले की शौचास बंद व्हायची औषधे… हॉस्पिटलात कॉटवर झोपून घ्यावी लागली. तेव्हा हे मात्र करू नका. फुकटचा सल्ला नकोच नको. ज्येष्ठांनी कसे जगावे यावर क्रमशः भेट चालूच राहील.