कोकणी समाजाचा अपूर्वाईचा उत्सव – शिगमो

0
534

– डॉ. पांडुरंग फळदेसाई
कोकणी समाजाला ‘शिगम्या’चे फार मोठे अप्रूप. आपल्या गावातील जत्रा किंवा गणेशचतुर्थीच्या सणापेक्षा शिगम्याच्या उत्सवात अधिक उत्साह. शिगमो म्हणजे ओसंडणारा उत्साह. जत्रा म्हटली की ती एखाद्या देवस्थानाच्या परिसरातील असते. त्यामुळे त्या जत्रोत्सवाला स्वाभाविकपणे मर्यादा पडतात. गणेशचतुर्थीसारखा सण घराघरांतून साजरा होतो. त्यामुळे त्याचे स्वरूप कौटुंबिक सणासारखे वाटते. कुटुंबातील जिव्हाळा, प्रेम, परस्पर संबंध दृढ करणारा तो सण. मात्र शिगमो हा संपूर्ण समाजाचा उत्सव आहे. त्यादृष्टीने तो खराखुरा लोकोत्सव आहे. कोकणी समाजाचा स्वयंपूर्ण असा सर्वसमावेशक उत्सव म्हणून आपल्याला शिगमोत्सवाकडे पाहावे लागेल.आतापर्यंत आपण शिगम्याला कष्टकर्‍यांच्या अभिव्यक्तीचा उत्सव मानत आलो. त्यात वावगे काहीही नाही. या लोकोत्सवात सर्वस्वी पुरुषांची मक्तेदारी असली, तरी त्यातील स्त्रीचे स्थान आपल्याला दुर्लक्षिता येणार नाही. त्याचप्रमाणे ‘धालो’ या संपूर्णतया स्त्रीवर्गाची मक्तेदारी असलेल्या पारंपरिक लोकोत्सवात पुरुषाचा सहभाग डोळ्यांआड करता येणार नाही. आम्ही लोककला आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांनी काही ठोकताळे ठरवून टाकलेले आहेत. त्यामुळे काही वेळा चुकीचे संकेत निघतात. आजवरच्या माझ्या शोधकार्यात मला हे सातत्याने जाणवत आले आहे. आमच्या पूर्वसुरींनी घालून दिलेल्या मार्गावरून चालताना आपण हवी तेवढी सावधगिरी बाळगत नाही. त्यामुळे काही वेळा चुकीचे निष्कर्ष आणि चुकीच्या संकल्पना पुढे दामटल्या जातात; आणि मग कालांतराने त्याच (चुकीच्या) संकल्पना प्रमाण मानल्या जातात. खास करून नुकत्याच संशोधनकार्यात उतरलेल्या नवअभ्यासकांसाठी तर त्या चुकीच्या संकल्पना प्रमाणभूत मानल्या जातात.
गोव्यात शिगमो उत्सवाला ‘शिमगोत्सव’ का म्हटले जाते याचे उत्तर तसा वापर करणार्‍या कोणाकडेही नाही. महाराष्ट्रात शिगम्याला शिमगा म्हणतात, म्हणून आम्ही शिगम्याला शिमगा म्हणतो!
आमच्या पूर्वजांच्या विचारगर्भतेविषयी आणि ज्ञानाविषयी मला सार्थ अभिमान आहे. भारतीय कृषिसंकल्पनेत सुगीचा हंगाम सर्वत्र साजरा केला जातो. पीक-पिकावळ घरात येऊन कुटुंब समृद्धीचा अनुभव घेते ती सुगी. म्हणूनच पं. हेमचंद्राच्या देशनामावलीत सुगीनंतर शेतकरीवर्ग साजरा करीत असलेला उत्सव म्हणजे ‘सुगीम्म.’ त्यावरून पुढे आला तो आपला शिगमो. या परंपरेचे भान ठेवूनच आपला शिगमो साजरा होत आला. एवढेच नव्हे तर ज्या उत्सवात संपूर्ण समाज सहभागी होतो त्याला शिगमा किंवा शिगमो म्हणण्याची प्रथा गोव्यात जुन्या काळापासून चालत आली आहे. उदाहरणच द्यावयाचे झाले तर एखाद्या देवस्थानातील सर्वाधिक महत्त्वाचा उत्सव हा त्या देवस्थानचा शिगमो असतो. सातेरीदेवीचा शिगमा कधी, असे विचारणारी मंडळी जशी आपल्याला भेटते तशीच सादोळशेचा, म्हणजे एखाद्या गावात साजरा केला जाणारा शिगमो कधी अशी विचारणा होते.
शिगमो आणि धालो उत्सवात कष्टकरी समाजातील अनुक्रमे पुरुष आणि महिला सहभागी होतात ही आपण मान्य केलेली संकल्पना. म्हणजेच सारस्वत किंवा ब्राह्मण वर्गातील लोक यात सहभागी होत नाहीत हे आपण धरून चालतो. या गोष्टींनादेखील अपवाद असतील याची कल्पना अनेकांना नसते. काणकोणमधील खोला या गावातील सारस्वत मंडळी शिगम्याच्या निमित्ताने रंबट (रोमट) काढतात. गळ्यात घुमटे आणि शामेळ अडकवून कांसाळ्याच्या तालावर पारंपरिक गीते गात तालगडी खेळतात. मोरूलेंचा प्रयोग करतात. त्यांच्या सुंवारीचा थाट काही आगळाच. आगस, शिरोटी, मलोरें येथे होणारे हे रंबट आमच्या पारंपरिक संकल्पनेला छेद देणारे म्हणता येईल.
गोव्यातील शिगम्याला जसे एक पावित्र्याचे अधिष्ठान आहे तसेच ते कोकणी समाज वसलेल्या केरळ, कर्नाटक किंवा कोकणपट्टीत आहे, याचे भान आम्ही अभ्यासकांनी राखायला हवे. या भागातील शिगमो हा एखाद्या पवित्र स्थळापासून सुरू होतो आणि परंपरेने ठरलेल्या स्थळावर त्याचे समापन होते. गोव्यात त्या स्थळाला ‘मांड’ असे म्हणतात. त्या स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येते. शिवाय या स्थळावर वावरण्यासाठी पारंपरिक नियम ठरलेले असतात. त्या नियमांचे विश्‍लेषण केले तर या शिगमोत्सवामागील पावित्र्याच्या अधिष्ठानाची कल्पना यावी. याशिवाय पारंपरिक शिगमोत्सवात काही नियम सर्वत्र पाळण्यात येत होते. शिगम्यासाठी नवीन कपडे शिवले जात. ते शिगम्यासाठी एकदा अंगावर चढवले की ते शिगमा संपेपर्यंत उतरवायचे नाहीत. शिगम्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाने समापन होईपर्यंत आपल्या घरी परतायचे नाही. प्रत्येकाने शिगम्याच्या समूहासोबत किमान पाच दिवस राहावे लागे. शिगम्याचे समापन झाले म्हणजे सर्व खेळगड्यांनी विहीर, तलाव, ओढा किंवा नदीवर जाऊन आंघोळ करायची. त्यानंतर पेटविलेल्या होळीतून म्हणजेच अग्नीतून पार व्हायचे. त्यानंतर हळदीच्या पाण्याचे शिंपण प्रत्येक खेळगड्यावर केले जाते. शिगम्यासाठी केलेले तात्पुरते अलंकार आणि सजावट, त्याचबरोबर तोणयोंसारख्या वस्तू ठरावीक ठिकाणी विसर्जित करायच्या. मांडा-गुरू किंवा मांडा-नासाला साकडे घालायचे. शिगम्याचा उत्सव त्याने मान्य करून घ्यावा, बालगोपाळांकडून किंवा ज्येष्ठांकडून काही अपराध झाल्यास किंवा न्यून राहिल्यास त्याबद्दलची क्षमायाचना करायची आणि पुन्हा पुढील शिगम्यापर्यंत ग्रामवासीयांचे रक्षण आणि सर्वार्थाने बरकत देण्याची विनवणी करायची, हे आजकालच्या शिगम्याचे स्वरूप आहे.
गोवा हे कोकणी समाजाचे मूळपीठ असल्याने आपल्याकडे शिगम्याला आगळेवेगळे महत्त्व आहे. परंतु ऐतिहासिक अपघाताने विस्तापित होऊन केरळ, कर्नाटक आणि कोकणपट्टीत स्थायिक झालेल्या कोकणी माणसांना या शिगम्याचे कोण कौतुक असते हे अनुभवायला हवे. गोव्यातील शिगमो साजरा करणारा समाज शिगम्याची उत्पत्ती परमेश्‍वराने केली असे मानतो. म्हणूनच त्यांच्या ‘जती’तून शिगम्याचे वर्णन पुढीलप्रमाणे येते ः
शिगमो रे शिगमो कोणे रचिला
ईश्‍वराच्या देवांनी गा शिगमो रचिला
मूर्तिकेच्या मातये देवांनी घुमटां केल्यां
खैरी वृक्षाचे देवांनी शेमेळ केल्या
काशें वोतून देवांनी कासाळीं केल्यां
चंदन वृक्षाच्यो देवांनी तोणयों केल्यां
भेडा वृक्षाचे देवांनी तुरे रे केल्यां
येंड्या वृक्षाचे देवांनी खुळखुळे केल्या
पांच पांडवां घरी देव खेळयासी गेल्या
कृषक समाजाला अभिप्रेत असलेले ईश्‍वर-देव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून सदासर्वकाळ उन्हातान्हात खपणारे आपले बांधव. ते जेव्हा पारंपरिक श्रृंगार करून गावातील अंगणात फेर धरतात तेव्हा तेच परमेश्‍वररूप असते. सगळे देव नवा पोषाख आणि अलंकार करून शिगमो खेळण्यासाठी बाहेर पडतात आणि गावातील प्रत्येक अंगणात विविध पदन्यासांद्वारे लोकनृत्यांचे सादरीकरण करतात. प्रत्येक नृत्यासाठी वेगळे लोकगीत साथीला असते. चौरंग गायन म्हणजे एखाद्या पुराणकथेचे सलग गायन. त्यावेळी सर्व खेळगडी गोलाकार फेर धरतात. कधी उजव्या बाजूने तर ठरावीक इशार्‍याबरहुकूम डाव्या बाजूने फेर चालू असतो. या गानकथेत कधी सीताहरणाचा प्रसंग येतो, तर कधी हस्तिनापूर राज्यात राज्य करणार्‍या पांडवांची कथा येते. कथा समाप्त होताच ‘ताळो’ खेळला जातो. यात दोनचार ओळींची लोकगीते असतात. मात्र नृत्य तुफान वेगात होत असते. हातातील टिपर्‍यांचा एकसंध आवाज आणि पायांतील खुळखुळ्यांचा नाद ही या नृत्यातील खासीयत असते. तालगडी, मोरुलो, थेंगयें, गोफाचे विविध प्रकार यांची शिगम्यात रेलचेल असते. हातातील तलवारी वेळावत केलेला वीरामेळ हा देवाचा मेळ मानला जातो. त्यामुळे प्रत्येक अंगणात वीरामेळाचा मान पहिला. त्यानंतर एकेका जमातीचा मेळ अंगणात आपली नृत्य-गायन-वादन कला पेश करतो. दक्षिण गोव्यातील अंगणात येणार्‍या मेळाचे समापन बहुतेक आरतीने होते. याला ‘जत’ असेही म्हणतात. या आरती-प्रदानचा विधी हा त्या कुटुंबातील कर्त्या स्त्रीने करावयाचा असतो. त्यामुळे तिच्याकडे पाहण्याचा सर्व खेळगड्यांचा दृष्टिकोन पवित्र आणि आदरयुक्त असतो. त्याचे प्रत्यंतर आपल्याला आरती-गायनाच्या शब्दांतून येते. पुढील आरतीत घरातील कर्त्या स्त्रीला द्रौपदीच्या स्वरूपात पाहण्यात येते.
पांच पंडवां दुरपदीन काय हो केला
न्हाऊन माखून तिणे आंगोळे केला
पितांबर सोवळ्याचो कासो घातीला
बावन बिरड्यांची चोळी आंगीं घातीला
नवलकशांचो हार गळ्यां घातीला
हस्तीदंती फणयेन माथें वुळयीला
शेवते मोगरे वेणी तिणे माथीं माळील्या
निडळा माजार लायीला कुकूम कस्तूर
सुवर्णाच्या ताटीं नारीन आर्त पूजिल्या
गंध अक्षत तिणे ताटीं ठेविला
बत्तीस पाना विडो नारीन आरतीं ठेविला
पांचव्या वातींचो दिवो आरतीं ठेविला
खेळत्या मांडार आरत धाडून दिला.
आरत हाडल्या तिणे आसवंत
अयवपण नांदू तुजें सासवंत
भले भले भले भले भले
अशा प्रकारे आरतीने शिगम्या मेळाचे अंगणातील समापन होत असते.
उर्वरित गोमंतकातील ‘रोमटां मेळ’ ही खासीयत आहे. तसेच ‘घोडेमोडणी’ किंवा तज्ज्ञांच्या मतानुसार ‘घोडेमांडणी’, खेळे, राधाकृष्ण नाच, करावल्यो, धनगरनाच यांचा प्रकर्षाने समावेश असतो. शेकडो खेळगड्यांचा समावेश असलेले रोमट ही शिगमोत्सवाची खासीयत होय. गावातील प्रत्येक कुटुंबातून किमान एक पुरुष या रोमटात सामील होतो आणि प्रचंड ढोल-ताशांच्या निनादात समरसून जातो. ‘होस्सय होस्सय’च्या गजरात रोमट गावातून निघते ते ग्रामदेवताच्या प्रथम दर्शनासाठी म्हणजेच नमनासाठी. म्हणून त्यांच्या ओठी असते गाणे- ‘हो हो किती आनंद झाला’ किंवा ‘विटेवरी उभा कटेवरी हात| काय मौजेचा पंढरीनाथ ॥
गोव्यात पुरुषवर्गाकडून साजरा केला जाणारा शिगमो केरळमधील कोकणी कुणबी समाजात पुरुष आणि स्त्रीवर्गाकडून वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पुुरुषमंडळी गोव्यातील आदिवासींसारखे डोक्यावर अबोलीचे झेले लांबवून व कासोट्याचे धोतर पैरण घालून घुमट आणि झांजा वाजवीत नृत्य करतात. त्यांची गीतेदेखील गोव्यातील आदिवासींसारखी.
शिगम्याचे वेळारी पोंगीर फुलेला
एक सायेचीं चेडवां खेळूंक आयलीं
मुगाय बाळे गो तू कालि इत्याक
शिगमो खेळूंक आयलें ना?
मेगेले भावा कालचो मुर्तू
त्या निमितीं आयलें ना
होळीच्या संध्याकाळी कुणबी सुवासिनी त्यांच्या कुलदेवाच्या देवळासमोरील जागेत गीत गात फुगड्या घालतात. त्या फुगडीनृत्याला ‘मोरोळी’ असे म्हणतात. त्यांची काही गीते विलक्षण वाटतात.
अर्थांके नार्यांके भूमी गेयी
भूमीर मांडिलो खेळू गे यो
मोरांणी मांडिलो खेळू गे यो
मोरू खेळताय राजांगणे
कर्नाटकातील किनारपट्टीत स्थायिक झालेल्या मच्छीमार समाजात जसा शिगमा लोकप्रिय आहे तसाच तो यल्लापूर, हल्याळ, शिर्सी भागातील दुर्गम जंगलात राहणार्‍या कोकणीभाषिक सिद्धी जमातीमध्येदेखील आहे. माविनकुर्वा या किनारी खेड्यातील मच्छीमार शिगम्यानिमित्त गळ्यात घुमटे अडकवून आणि हातात तोणयो घेऊन मर्दानी नृत्य करतात. त्यांच्या लोकगीतांत आणि सत्तरीतील रणमाल्याच्या धोंगाच्या तोंडी असलेले गीत यात मला कमालीचे साम्य आढळले. रणमाल्यातील गीताचे शब्द ः
आबोल्यांचो गोण तुज्या ताळयेर मुगो
चेडवा ताळयेर मुगो
भावोजी बोलयता तुका माळयेर मुगो
चेडवा माळयेर मुगो
माविनकुर्व्याच्या शिगमो गीताचे शब्द पहा-
आबोलीं माळ तुजे ताळयेर
मध्यानरातीं येतां चेडवा माळयेर
कोकणी बोलणारे कर्नाटकातील सिद्धी हे हिंदू, ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मात विखुरले आहेत. आश्‍चर्य म्हणजे हिंदू आणि ख्रिस्ती सिद्धी तेवढ्याच उत्साहाने शिगम्याची गीते गात शिगमो साजरा करतात. शिगम्याची नमनाची सुरुवात-
दी रे देवा बरे कल्पने
तुज्या नावान आराधने
आमगेल्या देवा गणोबा
कर्पूर फुलां तुका रे देवा
या गीताने होते. काही शिगमो सादरीकरणात केवळ घुमटवादनाच्या तालावर विविध पोषाख केलेली पात्रे येऊन वेगवेगळ्या पदन्यासांची अनुभूती देतात. त्यात गीतांना फाटा दिलेला असतो. फक्त घुमटवादन आणि नृत्य असा हा शिगमा असतो.
एकंदरीत कोकणी माणसाला शिगम्याबद्दलचे विलक्षण प्रेम दिसते. पारंपरिक लोकगीते, लोकवाद्ये आणि लोकनृत्ये यांची जपणूक आणि जोपासना करण्यात शिगम्याने फार मोठे योगदान दिले आहे. शिगमो नसता तर कोणी सांगावे, कदाचित आम्ही ‘रुटलेस’ होऊन भटकत राहिलो असतो?