गोव्यातील उद्योग जगताकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

0
100

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे गोव्याच्या उद्योग जगताने स्वागत केले आहे.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संदीप भंडारी म्हणाले की या अर्थसंकल्पात साधनसुविधा उभारणीसाठी निधीची चांगली तरतूद करण्यात आली आहे. देशातील महागाई नियंत्रणात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पातून ‘व्हीजन डॉक्युमेंट’च सादर करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी श्री. गौरीश धोंड म्हणाले की विदेशी पर्यटकांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ योजनेत आणखी दीडशे देशांचा समावेश करण्यात आलेला असल्याने त्याचा फायदा गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला होईल. देशातील वारसा स्थळांच्या विकासासाठी निधी देण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यात जुन्या गोव्याचा समावेश करण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सीआयआयचे माजी अध्यक्ष अतुल पै काणे यांनी रोजगारनिर्मितीवर या अर्थसंकल्पाचा भर असल्याचे सांगितले. उच्च शिक्षणासाठी कर्जाची तरतूद करण्यात आल्याने गरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे होईल असे त्यांनी सांगितले.
गोवा खनिज निर्यातदार संघटनेचे पदाधिकारी ग्लेन कालावमपारा म्हणाले की अर्थसंकल्पात खाणक्षेत्रासंबंधी कोणताही उल्लेख नाही हे दुर्दैवी आहे. निर्यात करात कपात अपेक्षित होती, पण ती करण्यात आलेली नाही. मात्र, ती पुढे केली जाऊ शकते असे ते म्हणाले.
दरम्यान, काळ्या पैशासंबंधी कायदा करणे पुरेसे नसल्याचे खासदार शांताराम नाईक यांनी म्हटले आहे. हा कायदा अस्तित्वात येऊच शकणार नाही. मोदी यांना यू टर्न करावे लागेल असे ते म्हणाले.