‘सुविधा एक्सप्रेस’ सुसाट…

0
179

रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी भाडेवाढ नाही
नव्या रेल्वेगाडयांची घोषणाही नाही
रेल्वेच्या कायापालटासाठी दीर्घकालीन कृती आराखडा
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल संसदेत वर्ष २०१५-१६ साठीचा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या या रेल्वे अर्थसंकल्पात कुठलीही प्रवासी भाडेवाढ करण्यात आलेली नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही नवीन गाडयांची घोषणाही करण्यात आलेली नाही. मात्र, प्रवाशांचा रेलप्रवास सुखकर व्हावा यासाठी विविध सुविधांची घोषणा रेलमंत्र्यांनी केली आहे. यापुढे प्रवाशांना चार महिने आधी रेल तिकीट आरक्षण करता येईल. नव्या रेलगाड्यांची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर केली जाण्याची शक्यता आहे.आगामी पाच वर्षांत भारतीय रेल्वेत बदल घडवून आणण्यासाठी या अर्थसंकल्पात चार उद्दिष्ट्ये व अकरा लक्ष्ये ठेवण्यात आली आहेत. प्रवाशांच्या साधन सुविधांमध्ये दीर्घकालीन आणि भरीव सुधारणा, सुरक्षित प्रवासाचे साधन म्हणून रेल्वेला विकसित करणे, क्षमतेत भरीव वाढ करणे, पायाभूत सुविधांचे अत्याधुनिकीकरण आणि रेल्वेला आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनवणे या चार मुख्य उद्दिष्टांच्या यशस्वीततेसाठी अर्थसंकल्पात पाच चालक धोरणे ठरवण्यात आली आहेत.
साडे आठ लाख कोटींची गुंतवणूक
भारतीय रेल्वेत येत्या पाच वर्षांत ८,५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यापैकी निम्मा पैसा विद्युतीकरण आणि रेल्वेमार्ग दुप्पट करणे आदींद्वारे रेल्वेच्या जाळयाची व्याप्ती वाढवण्यासाठी खर्च केला जाणार आहे असे प्रभू यांनी सांगितले.
प्रवासाआधी येणार एसएमएस
प्रवाशांना वेळेअगोदर गाडी सुटण्याची/येण्याची वेळ कळवण्याकरिता एसएमएस अलर्ट सेवा सुरू करण्यात येणार आहे, तसेच गाडी येण्यापूर्वी १५ ते ३० मिनिटे अगोदर एसएमएस अलर्ट पाठवला जाणार आहे. जम्मू-श्रीनगर मार्गावरील रेल-कम-रस्ते तिकिटाच्या धर्तीवर एकात्मिक तिकिट प्रणालीचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही श्री. प्रभू यांनी सांगितले.
ऑपरेशन फाईव्ह मिनिट
‘ऑपरेशन फाईव्ह मिनिट’ अंतर्गत विना आरक्षण प्रवास करणार्‍या प्रवाशांना पाच मिनिटांत तिकीट खरेदी करता येईल. सुधारित हॉट बटण, कॉईन व्हेंडिंग मशीन्स, सिंगल डेस्टिनेशन टेलर विंडोज या सुविधांमुळे वेळेची बचत होईल. अपंग प्रवाशांसाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर ते सवलतीच्या दरात ई-तिकीट खरेदी करु शकतील. तसेच बहुभाषिक ई-तिकिटिंग पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
महिला डब्यात सीसीटीव्ही
महिलांच्या सुरक्षेसाठी काही निवडक प्रमुख डब्यांमध्ये आणि उपनगरी गाडयांच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून
निवडक शताब्दी गाडयांमध्ये मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. सामान्य श्रेणीच्या डब्यांमध्ये तसेच स्लीपर श्रेणीच्या डब्यांमध्ये मोबाईल फोन चार्जिंगची सुविधा पुरवणार असल्याचेही रेलमंत्र्यांनी जाहीर केले. .
स्वच्छ भारत, स्वच्छ रेल
स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अभियान सुरू करणार, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोकण रेल्वेच्या धर्तीवर ऑटो रिक्शा आणि टॅक्सीचालकांना प्रशिक्षण देणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले. पुढल्या सहा महिन्यात रेलगाड्यांतील चादरींचा दर्जा आणि स्वच्छता सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असून दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेला चादरींच्या डिझायनिंगचे काम देण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.
ई – केटरिंग सुविधा
प्रवाशांना त्यांच्या आवडीचे जेवण निवडता यावे यासाठी १०८ गाडयांमध्ये प्रायोगिक तत्त्वांवर ई-केटरिंग सुविधा सुरु करणार असून तिकीटांचे आरक्षण करतानाच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर देता येईल. या प्रकल्पासाठी देशातील उत्तम खानपान सेवा एकत्रित आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न असल्याचे प्रभू म्हणाले. स्थानके आणि गाडया स्वच्छ ठेवण्यासाठी नवीन विभाग सुरू करण्याचा रेल्वेचा प्रस्ताव असून एकात्मिक स्वच्छतेसाठी व्यावसायिक स्वच्छता एजन्सींची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानकांवर अधिक सुविधा
ब दर्जाच्या स्थानकांवरही वाय फाय सुविधा पुरवली जाणार असून खासगी क्षेत्राच्या सहकार्याने स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. गेल्या वर्षीच्या १२० स्थानकांच्या तुलनेत यंदा आणखी ६५० स्थानकांवर नवीन शौचालये बांधणार असून रेलडब्यांमध्ये १७ हजार बायो टॉयलेट बसवली जातील अशी माहिती रेलमंत्र्यांनी दिली.
पर्यावरणपूरक पध्दतीने कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रमुख कोंचिंग टर्मिनलजवळ कचर्‍यातून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प आधी स्थापन केला जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी प्रकल्प उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नावीन्याला प्रोत्साहन
तंत्रज्ञान पोर्टल व्यतिरिक्त रेल्वेमध्ये अभिनवतेला प्रोत्साहन देण्यासाठी कायाकल्प मंडळ स्थापन करणार, देशातील चार विद्यापीठांमध्ये रेल्वे संशोधन केंद्र सुरू करणार, आयआयटी वाराणसी येथे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या नावाने रेल्वेचे अध्यासन केंद्र सुरु होणार अशी घोषणाही प्रभू यांनी केली. रेल्वेला पर्यावरणस्नेही बनवण्यासाठी १०० गाडया सीएनजी आणि डिझेल अशा दुहेरी इंधनावर रुपांतरित करणार असून एलएनजीवर चालणार्‍या गाडयांचा देखील विकास सुरू आहे. या गाडयांची आवाजाची पातळी आंतरराष्ट्रीय निकषांनुसार असेल असे ते म्हणाले.
जमिनींचे डिजिटल मॅपिंग
रेल्वेच्या जमिनींवरील अतिक्रमण टाळण्यासाठी जमिनींचे डिजिटाईज्ड मॅपिंग केले जाईल व कोणतेही अतिक्रमण झाल्यास अधिकार्‍यांना जबाबदार धरणार असल्याचा इशारा प्रभू यांनी आपल्या भाषणात दिला. श्वेतपत्रिका, व्हिजन २०३० डॉक्युमेंट आणि पंचवार्षिक कृती आराखडयासह मध्यावधी योजनांचा स्वीकार करणे, दीर्घकालीन आर्थिक सहाय्य आणि परदेशी तंत्रज्ञानासाठी प्रमुख हितधारकांबरोबर भागिदारी करणे, अंतिम मैलापर्यंत रेल्वेचे जाळे पसरवणे, स्थानकांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण असे संकल्प रेलमंत्र्यांनी जाहीर केले.
नियोजन खर्चात ५२ टक्के वाढ
यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प १००,०११ कोटी रुपयांचा असून त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१४-१५ साठीच्या अर्थसंकल्प ६५,७९८ कोटी रुपये इतका होता. यंदाच्या एकूण रेल्वे अर्थसंकल्पात केंद्र सरकारचा ४१.६ टक्के वाटा असून १७.८ टक्के अंतर्गत निर्मितीतून उपलब्ध करण्यात येत आहे.
विविध विस्तार योजना
मंजुरी मिळालेल्या ७००० किलोमीटरच्या दुसर्‍या/तिसर्‍या/चौथ्या मार्गाचे काम रेल्वे जलद गतीने करणार आहे, तसेच वर्ष २०१५-१६ मध्ये ८६८६ कोटी रुपये गुंतवणूकीतून १२०० कि.मी.चा मार्ग सुरू करणार आहे. २५०० कोटी रुपयांचे प्रकल्प बीओटी न्युईटीतत्त्त्वावर राबवले जाणार आहेत.
रेल फाटके बंद
३४३८ रेल्वे फाटके बंद करण्यासाठी ९७० ओव्हर ब्रिज/भुयारी मार्ग तसेच अन्य सुरक्षेसंबंधी कामांसाठी ६,५८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असेही रेलमंत्र्यांनी सांगितले.
एका नजरेत रेल अर्थसंकल्प :
र्‍ प्रवासी भाडेवाढ नाही
र्‍ ६० ऐवजी १२० दिवस आगाऊ आरक्षण
र्‍ १३८ व १८२ क्रमांक हेल्पलाईन
र्‍ प्रवाशांना एसएमएस ऍलर्ट
र्‍ ई केटरिंग सुविधा
र्‍ रेलगाड्यांची गती वाढवणार
र्‍ वेगवान तिकीट खरेदी
र्‍ एकात्मिक तिकीट सुविधा
र्‍ महिला डब्यात सीसीटीव्ही
र्‍ शताब्दी गाड्यांत मनोरंजन सोय
र्‍ जनरल व स्लीपर डब्यांत मोबाईल चार्जर
र्‍ ‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ’ भारत अभियान
र्‍ स्वच्छतेसाठी खास विभाग
र्‍ रेलगाड्यांत आकर्षक बिछाना
र्‍ डब्यांची फेररचना
र्‍ वरच्या बर्थवर चढण्यासाठी शिडी
र्‍ डब्यांमध्ये जैव स्वच्छतालये
र्‍ पेपरलेस तिकिटांवर भर
र्‍ एसएमएस हा पुरावा ग्राह्य
र्‍ एकात्मिक ग्राहक पोर्टल
र्‍ स्थानकांवर वाय फाय
र्‍ कचर्‍यातून ऊर्जानिर्मिती
र्‍ स्थानकांचे सुशोभीकरण
र्‍ मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन
र्‍ दिल्ली – मुंबई, कोलकाता एका रात्रीत
र्‍ खासगी क्षेत्राचा सहयोग
र्‍ काही गाड्या २६ डब्यांच्या
र्‍ जनरल डब्यांत वाढ करणार
र्‍ ज्येष्ठांना वाढीव खालचे बर्थ
र्‍ स्थानकांवर लिफ्ट व एस्कलेटर
र्‍ मालवाहतूक क्षमता वाढवणार
र्‍ निवडक मार्गांवर अपघातरोधक उपकरणे
र्‍ अतुल्य भारत पर्यटक रेलगाडी
र्‍ सहल कंपन्यांना खास डबे
र्‍ आणखी २०० आदर्श स्थानके
र्‍ गाड्यांत पेयजल दायक यंत्रे
र्‍ व्हील चेअरचे ऑनलाईन बुकींग
प्रवाशांसाठी हेल्पलाईन
प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संपूर्ण देशभरात १३८ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे, तर रेलसेवेसंबंधीच्या तक्रारींसाठी १८२ हा क्रमांक सुरू केला जाणार आहे. येत्या एक मार्चपासून हे क्रमांक कार्यान्वित होतील.
रेलगाड्यांचा वेग वाढणार
नऊ रेल्वे कॉरिडॉरचा वेग ताशी ११० वरून १६० तर १३० वरुन २०० किलोमीटर इतका केला जाणार आहे. यामुळे दिल्ली-कोलकाता आणि दिल्ली-मुंबई प्रवास एका रात्रीत पूर्ण होणे शक्य होणार आहे.
रेल्वे मालगाडयांचा सरासरी वेगही वाढवण्यात येणार आहे. रिकाम्या मालगाडयांचा वेग ताशी १०० किलोमीटर, तर माल असलेल्या रेल्वेचा वेग ताशी ७५ किलोमीटर इतका असेल. भारतीय रेल्वेच्या सर्व प्रमुख मार्गांवरील मालवाहतूक क्षमतेत वृध्दी करुन ती २२.८२ टन एक्सेल इतकी केली जाणार आहे.
रेलमंत्र्यांंनी मांडलेली चार उद्दिष्टे :
र्‍ १. ग्राहक सेवेत सुधारणा
र्‍ २. सुरक्षित प्रवास
र्‍ ३. क्षमतावृद्धी व आधुनिकीकरण
र्‍ ४. आर्थिक स्वयंपूर्णता
लक्ष देणार असलेली अकरा क्षेत्रे :
र्‍ १. प्रवासातील गुणवत्ता
र्‍ २. स्थानकांचा पुनर्विकास
र्‍ ३. क्षमतेमध्ये वृद्धी
र्‍ ४. रेल सुरक्षा
र्‍ ५. तंत्रज्ञानात सुधारणा
र्‍ ६. विकासासाठी भागिदारी
र्‍ ७. व्यवस्थापन प्रक्रियेत सुधारणा
र्‍ ८. संसाधने विकसित करणे
र्‍ ९. मनुष्यबळ विकास
र्‍ १०. ऊर्जासातत्य
र्‍ ११. पारदर्शकता