धेंपोचा सलग दुसरा विजय

0
75
सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना सगुण कामत.

सूत्रबद्ध गोलंदाजीनंतर कर्णधार सगुण कामतच्या ४९ धडाकेबाज धावांच्या जोरावर गतविजेत्या धेंपो क्रिकेट क्लबने गोवा प्रीमियर लीग स्पर्धेत आपले जेतेपद राखण्याकडे जोरदार पाऊल टाकताना सर्वोदय रॉयल्स संघावर ८ गडी राखून आकर्षक विजय मिळविला. धेंपोचा हा सलग दुसरा विजय ठरला. सगुणची सामानवीर पुरस्कारासाठी निवड झाली.सर्वोदय रॉयल्सकडून मिळालेले १३७ धावांचे विजयी लक्ष्य धेंपो क्रिकेट क्लबने केवळ २ गडी गमावत १७.३ षट्‌कांत १३८ धावा करीत पार केले. लक्ष्याचा पाठलाग करताना डावखुरा कर्णधार सगुण कामतने २९ चेंडूत ६ चौकार आणि २ षट्‌कारांच्या सहाय्याने ४९ धावांची धडाकेबाज खेळी करीत धेंपोला चांगली सुरुवात करून दिली. रायन डिसोझाला उचलून मारण्याच्या प्रयत्नात सगुण ईशान गडेकरकडे झेल देऊन बाद झाला. सगुण बाद झाल्यानंतर सर्वोदयने सामन्यावर पकड मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु रिगन पिंटो (३१) आणि मानसिंह निगडे (३४) यांनी तिसर्‍या विकेटसाठी अविभक्त ६५ धावांची भागिदारी करीत संघाचा विजय साकारला. रोहन बेळेकरने १७ धावा जोडल्या.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना सर्वोदय रॉयल्सने ६ गडी गमावत १३६ अशी धावसंख्या उभारली. स्नेहल कवठणकरने ६ चौकार व १ षट्‌काराच्या सहाय्याने ५१ धावांचे अर्धशतकी योगदान दिले. अंशुल कपूरने ३६, अब्दुल कादिरने १९ तर सौरभ बांदेकरने १२ धावा जोडल्या. धेंपोतर्फे मणी शंकर, अनिल चप्राना, व्हिजन पांचाल, ज्योकीम मोर्रिया व वेदान्त नाईक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.