योगमार्ग – राजयोग

0
118

– डॉ. सीताकांत घाणेकर

(योगसाधना – २७२)

(स्वाध्याय – २० )

योगसाधना करण्याचे विविध हेतू आहेत. पण सर्वोच्चहेतू, अत्युच्च ध्येय म्हणजे आत्मज्ञान मिळविणे होय. त्या ज्ञानाचा उपयोग करून आत्मिक उन्नती करणे. पंचकोशातील अत्यंत सूक्ष्म असा आनंदमय कोश त्यापर्यंत पोचणे. मानवाच्या चिदानंद स्वरूपाचा अनुभव घेणे. पण ही प्रगती सोपी नाही व कठीणही नाही.
ऋषीप्रणित पद्धती अनुसरली तर प्रगतीकडे वाटचाल सोपी आहे. स्वतःच्या बुद्धीचा अहंकार ठेऊन आपल्या अल्प बुद्धीने योगसाधना केली तर कठीण आहे. उलट भलतीकडेच पोचण्याचा धोका आहे. म्हणून शास्त्रशुद्ध साधना अपेक्षित आहे. या साधनेचे एक अंग म्हणजे ‘स्वाध्याय’!
स्वाध्याय म्हणजे ‘स्व’चा सर्वांगीण विचार व विकास. या ‘स्व’मध्ये पाच गोष्टी येतात- शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार. या सर्वाचा अभ्यास करता करता त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. तरच ‘‘आत्मा’’ या सूक्ष्म तत्त्वाकडे व्यवस्थित वाटचाल होईल. आपल्यापैकी बहुतेकांना स्थूल शरीर व इंद्रियेच माहीत असतात. या दोन्हींवर आपले जास्त लक्ष असते. मुख्यत्वे करून या दोघांचे चोचले पुरवण्यातच सर्व आयुष्य संपून जाते. इंद्रियांचा वापर करून थोडा उपभोग करणे गैर नाही. पण संपूर्णपणे त्या भोगातच रममाण होणे जीवनविकासासाठी घातक आहे.
तथाकथित विद्वान, विचारवंत, ज्ञानी मन व बुद्धी या थोड्या सूक्ष्म घटकांकडे लक्ष देतात. पण अनेकवेळा त्यांचा संपूर्ण उपयोग आपल्या जीवनविकासासाठी करतील याची खात्री नाही. त्यामुळे अति सूक्ष्म अशा आत्मिक तत्त्वाकडे वाटचाल अगदी अल्प लोकच करताना दिसतात.
शरीर-इंद्रिये ते मन-बुद्धी ते आत्मा हा प्रवास स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे. म्हणूनच अष्टांगयोगामध्ये दोन विभाग आहेत – बहिरंग योग व अंतरंग योग.
* बहिरंग योगातील प्रथम यम-नियमांनंतर येतात ते पैलू म्हणजे आसन-प्राणायाम-प्रत्याहार म्हणजेच शरीर, श्‍वास, इंद्रिये यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची तंत्रे.
* अंतरंग योगात – धारणा, ध्यान व समाधी हे पैलू येतात.
बहिरंग योगामध्ये बाहेरील स्थूल अंगे मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरली जातात. तर अंतरंग योगामध्ये सूक्ष्म मनानेच मनावर नियंत्रण मिळवले जाते. असा हा स्थूल अंगापासून सूक्ष्म अंगापर्यंतचा प्रवास असतो. शेवटी समाधी अवस्थेमध्ये उच्च अशा आत्मिक आनंदाचा अनुभव व अनुभूती मिळते.
हा प्रवास समजणे व समजावणे जरा कठीण आहे. नियमित स्वाध्याय व योगसाधनेनंतरच या सूक्ष्म गोष्टी समजतात.
जीवनविद्या संस्थेचे प्रेरणास्रोत पू. वामनराव पै छान व सोप्या उदाहरणांनी सांगतात.
* जमिनीवर सुई पडली तर ती काढताना दोन बोटांची चिमूट केली तर ती सुई सहज उचलता येते.
* सुईमध्ये दोरा टाकताना दोरा वळून वळून टोंकदार करावा लागतो. तदनंतर डोळे अगदी बारीक करावे लागतात. म्हणजेच नजर सूक्ष्म करावी लागते.
अध्यात्मातील स्थूलाकडून सूक्ष्माकडील प्रवासातदेखील हेच अभिप्रेत आहे.
हे सर्व तत्त्वज्ञान वाचले की अशी प्रगती असंभव वाटते. पण महापुरुषांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वाध्याय केला तर अनेक गोष्टी हळूहळू समजायला लागतात.
पू. पांडुरंगशास्त्री यांच्या स्वाध्याय कार्यांत समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती आहेत. तसेच वित्ताच्या संदर्भात वचनावर त्यांचा संपूर्ण विश्‍वास आहे. कुठल्याही छोट्या-मोठ्या कार्यांसाठी गरज असते ती व्यक्ती आणि वित्ताची. स्वाध्याय प्रवृत्तीच्या संपूर्ण कार्यांत शास्त्रीजींचा एकच मानदंड आहे. तो खरोखर समजण्यासारखा आहे. स्वाध्यायी म्हणतात-
* वित्त किंवा व्यक्ती आलेली आहे किंवा पाठवलेली आहे. हे ते पाहतात. न मागता प्रभू पाठवतो ते धन आणि न बोलवता प्रभू पाठवतो ती व्यक्ती घेऊन ते कार्य करीत आहेत. देणारा किंवा येणारा क्वचित उत्साहात असतो, खुशीत असतो किंवा भावविवश असतो आणि देतो किंवा येतो. येथे कशाचा आग्रह किंवा धिक्कार नाही.
या संदर्भात शास्त्रीजी स्पष्टपणे सांगतात-
* माणूसही बोलावलेला नको, आलेला नको तर पाठवलेला पाहिजे. बोलावण्यात परप्रेरणा असते. आलेल्यात स्वप्रेरणा असते तर पाठविलेल्यात प्रभुप्रेरणा असते. वित्ताचेसुद्धा तसेच. भक्तिफेरीसाठी गावोगाव फिरणारा स्वाध्यायीसुद्धा अयाचक व्रत स्वीकारतो. व्रतामध्ये सिद्धांताची शुष्कता नाही तर एक अति उच्च पावित्र्याची भावना आहे. आम्ही कोणाचे काही घेत नाही, यात घमेंड नाही. त्याचप्रमाणे स्पर्शा-अस्पर्शाची भावनाही नाही. त्याचे एक शास्त्र आहे. बुद्धियुक्त ज्ञान आहे. मी जो प्रभुकार्यासाठी भक्तिफेरी करायला घराबाहेर निघालो आहे तो कोणाचे काही घेऊन काम करील तर माझ्या कर्माला, माझ्या कृतीला मूल्य (व्हॅल्यू) येणार नाही. ईश्‍वरावरील विश्‍वासाने जे कर्म करतो त्यात भक्तीची भावना आहे. जीवनविकासाचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे आमच्या कर्माची मूल्ये वाढतात. कोणाचा चहाचा कप घेऊनही मी माझ्या कर्माची किंमत मागणार नाही, घेणार नाही. हे आमचे व्रत आहे. ज्या कर्माची किंमत मागितली जात नाही त्या कर्माचे मूल्य वाढते.
विश्‍वात अनेक महापुरुष होऊन गेले, होताहेत व होणारही आहेत. हे सर्व ज्ञानी व तेजस्वी होते. त्यांनी आपल्या अनुयायींना जीवनविकासाचा मार्ग समजावला. हे अनुयायीदेखील त्यांनी दाखवलेल्या मार्गाने निघाले. अशाच हल्लीच्या काळातील एक महापुरुष म्हणजे पू. पांडुरंगशास्त्री आठवले. त्यांनी तर समजूतदार व तेजस्वी स्वाध्यायी तयार केले. स्वाध्याय परिवार- हा शब्दच गोंडस आहे. बोलका आहे.
या स्वाध्यायींची स्पष्ट धारणा आहे.
* जगदीश सर्व चराचर – ब्रह्मांड चालवतो. मग मी त्याच्यासाठी, त्याच्या कामासाठी पंधरा दिवसातून थोडा वेळ का घालवू नये? शक्तीचे, संपत्तीचे, वेळेचे समर्पण म्हणजेच एकादशी. वर्षांत चोवीस एकादशी येतात. किरकोळ एक-एक दिवसाने भरीव काम होत नाही. म्हणून जर शक्य असेल तर एकदमच सलग पंधरा दिवस प्रभुकार्यासाठी खेड्यापाड्यात जाऊन प्रभूचे आणि संस्कृतीचे विचार सांगेन असे स्वाध्यायींना वाटते. हा त्यांचा एकादशीचा उपवास जीवनाची घडण करणारा व मनाला संयमाकडे नेणारा ठरलेला आहे.
या स्वाध्याय परिवारात लाखो स्वाध्यायी आहेत. त्यांत मुले-तरुण, स्त्री-पुरुष आहेत, निरक्षर-साक्षर आहेत, गरीब-श्रीमंत आहेत, सर्व वर्णांचे लोक आहेत. या सर्वांच्या जीवनावर नियमित स्वाध्यायाचा परिणाम होताना स्पष्ट दिसत आहे. याची उदाहरणे अनेक आहेत. भारतातील अनेक राज्यात व विश्‍वातदेखील. त्यातील एक उदाहरण म्हणजे आदिवासींमधील हरिजनांचे…
* परंपरागत घेण्याचेच संस्कार ज्यांच्या रक्तात आहेत अशा आदिवासी, हरिजन वस्तीतही स्वाध्याय चालतो. हरिजन भगिनीही स्वाध्याय करतात. एका हरिजन वस्तीत भगिनींनी बारा महिने स्वाध्यायात कथन केलेल्या विचारांचे श्रवण केले. त्यानंतर गीताजयंतीचे पूण्यपर्व आले. त्या दिवशी पू. पांडुरंगशास्त्री त्यांच्या गावी उपस्थित होते. वेळ साधून त्या सर्व भगिनी त्यांच्याकडे गेल्या. आपल्या साडीच्या पदराच्या तिजोरीत ‘गाठी’ मारून ठेवलेल्या – जुन्या, घडी केलेल्या रुपया-रुपयाच्या नोटा बाहेर काढल्या आणि शास्त्रीजींसमोर ठेवून त्या म्हणाल्या-
* दादा, आमचेही जीवन प्रभूच चालवतो, तेव्हा त्या प्रभूच्या कार्यासाठी आम्हीही आपल्या मिळकतीचा भाग दिला पाहिजे. आपण याचा स्वीकार करावा.
‘अशी तेजस्वी जीवनकृती आजच्या कराल कलियुगात जणू रूक्ष वाळवंटात सापडणार्‍या जलाशयासारखी वाटते’. (संदर्भ- ‘एष पन्था एतत्कर्म)
खरेच, आज तथाकथित सुशिक्षित व श्रीमंतदेखील एवढे मोठे वैश्‍विक कार्य कसे चालते हा विचार क्वचितच करतात. अशा वेळी असे भावप्रसंग आशादायी ठरतात. स्वाध्यायींचे ‘‘भावसमर्पण’’ ते हेच. नियमित स्वाध्यायानंतरच असे विचार परिवर्तन आपोआप होत असते.