इदं शरीरं कौंतेय क्षेत्रम् इति अभिधीयते …

0
478

– प्रा. रमेश सप्रे

‘संस्कृती’ या शब्दाकडे अनेक दृष्टीकोनातून पाहिलं जातं. त्यातली एक दृष्टी खूप छान आहे. संस्कृती म्हणजे मनाची मशागत म्हणजे शेती (कल्टिव्हेशन). प्रत्येकानं अशी शेती (कृषी) करायची म्हटलं तर प्रत्येकाच्या मालकीचं शेत हवं. भगवंताच्या मते असं शेत म्हणजे देह. ‘इदं शरीरं’ म्हणजे हे शरीर; ‘क्षेत्रं इति अभिधीयते’- शेत (क्षेत्र) म्हणवलं जातं. देहाला शेत म्हटलं की या शेताबद्दल, शेतीबद्दल सर्व ज्ञान असलेल्याला शेतकरी (क्षेत्रज्ञ) म्हटलं जातं. भगवंताचे शब्द आहेत-
इदं शरीरं कौंतेय क्षेत्रं इति अभिधीयते |
एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तत् विदः ॥
१३|१
आयुष्यभर केलेले प्रयत्न, प्रयास, प्रयोग म्हणजे शेती. ही शेती जेवढी जाणून-समजून केली जाते तेवढी जीवनाला समृद्धी लाभते. व्यक्तीला संस्कृतीचा लाभ होतो व ती सुसंस्कृत बनते.
प्रत्येक जीवाला देह (क्षेत्र) असतोच. पण त्याचं ज्ञान असलेला क्षेत्रज्ञ मात्र फक्त मानवच! या क्षेत्राची व्याप्ती किती असते? पंचवीस तत्त्वांचा बनलेला देह एवढी या क्षेत्राची व्याप्ती असते. ही पंचवीस तत्त्व म्हणजे पंचमहाभूतं; पाच ज्ञानेंद्रियं; पाच कर्मेंद्रियं; पाच विषय; त्रिगुण (रज-तम-सत्त्व) आणि मन, बुद्धी.खरं पाहिलं तर ‘इदं’ म्हणजे हे जे दिसतं ते सारं, शिवाय या सार्‍याची प्राथमिक माहिती व त्यावर आधारित ज्ञान प्राप्त करणार्‍या मन-बुद्धीचाही समावेश ‘क्षेत्र’ या संकल्पनेत होतो. इंद्रियांचे दोन प्रकार मानले जातात- एक ज्ञानेंद्रियं व दुसरा कर्मेंद्रियं. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही आहेत ज्ञानेंद्रियं व हात, पाय, मलमूत्र विसर्जनाचं इंद्रिय, पुनरुत्पादन (जननेंद्रिय) आणि पाचवं कर्मेंद्रिय आहे जिव्हा म्हणजेच वाणी.
आध्यात्मिक उपासनेच्या दृष्टीनं जीभ फार महत्त्वाची आहे. कारण ती आहे एक, पण कामं करते दोन. ज्यावेळी गोड-कडू-तुरट-खारट-तिखट-आंबट अशा सहा रसांचा स्वाद जीभ घेते तेव्हा तिला ‘रसना’ (रुची घेणारी, रस चाखणारी) म्हणतात. तर ज्यावेळी आतून बाहेर ती वाचा किंवा वाणी रूपात व्यक्त होते तेव्हा तिला ‘जिव्हा’ म्हणतात. म्हणून असं म्हटलं जातं की ज्यानं जीभ जिंकली त्यानं अर्धा परमार्थ जिंकला. कारण खाणं व बोलणं यावर नियंत्रण मिळवणं हा सुसंस्कृत होण्याचा उत्तम मार्ग आहे. ही खरी जीवनाचा (व्यक्तित्तत्त्वाचा) विकास साधणारी मशागत (शेती) आहे. शेत अर्थातच जीभ नि किती खायचं नि किती बोलायचं याचं नियंत्रण करणारा, त्यासाठी प्रयत्न व प्रयोग करणारा मन-बुद्धीचा उपयोग करणारा पण त्यांच्याही पलिकडचा आत्मा हा शेतकरी (क्षेत्रज्ञ) आहे. क्षेत्र अर्थातच आपली जीभ!
भगवंत अशा नियंत्रणाला ‘युक्त’ असा शब्द वापरतात. म्हणजे किती खायचं नि किती बोलायचं म्हणजे तना-मनाचं आरोग्य नि त्यातून निर्माण होणारं सुख प्राप्त होईल? अत्यंत योग्य (युक्त) प्रमाणात हे त्याचं उत्तर आहे. हे प्रमाण योग्य राखलं जावं यासाठी उपवास (युक्त आहार) नि मौन, एकांतवास (युक्त बोलणं). अशा गोष्टींची (व्रतांची) योजना आपल्या संस्कृतीत केलीय. सामान्य माणसाच्या मनावर या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा म्हणजे संयमाचा प्रभाव पडावा म्हणून पुराणं, त्यातील मौन-उपवास करून केवळ सिद्धी नव्हे तर अपूर्व शक्ती मिळवणार्‍या भक्ताच्या कथा नि जीवनातील उदाहरणं, दृष्टांत यांची वर्णनं आलीयत.
एक दृष्टांत पाहण्यासारखा आहे. बेडकाची जीभ तोंडात उलटी म्हणजे पुढच्या भागात चिकटलेली असते. त्यामुळे विशिष्ट अंतरावरून संपूर्ण जीभ बाहेर काढून क्षणात तो आपलं भक्ष्य पकडू शकतो. पण त्याला शब्द उच्चारणारी वाणी मात्र नाही फक्त आवाज आहे डरॉंव डरॉंव!
सापाच्या बाबतीत दुसरी गोष्ट आहे. म्हणजे जीभ तोंडाच्या मागच्या भागात चिकटलेली आहे पण पुढच्या भागात, टोकाकडे जीभ दुभंगली (स्प्लिट) आहे. म्हणून ‘हिस् हिस्’ सोडून कोणताही ध्वनी सर्प काढू शकत नाही. यामुळे बेडूक, साप यांनी ठरवलं तरी त्यांना नाम घेत येणार नाही, मंत्र म्हणता येणार नाही; त्यांना वाणीशक्ती लाभणार नाही. याचा उल्लेख करून संत विचारतात – ‘भल्या मानवा, तुझी जीभ व्यवस्थित जोडलेली आहे आणि दुभंगलेली नाही म्हणून तुला वाणीची देणगी लाभलेली आहे. निसर्गाच्या या वरदानामुळे तू आपल्या भाषेचा खूप विकास साधलायस. मग इतर असंख्य शब्द दिवसभर तुझ्या मुखातून बाहेर पडत असताना अधूनमधून देवाचं नाम तू घेत नाहीस?’
या प्रश्‍नाला उत्तर खरंच काय आहे? तशी बुद्धी होत नाही म्हणून; असं का तर बुद्धीच्या पलीकडील आत्मा या संदर्भात आग्रही नाही, आज्ञा देत नाही म्हणून. याचा अर्थ शेत आहे, अनुकूल परिस्थिती (जमीन -पाणी – सूर्यप्रकाश – अवकाश (स्पेस) असं सारं उपलब्ध आहे. तरीही शेती होत नाही कारण शेतकरी ‘बीज’ पेरतच नाही नि त्यामुळे पुढची नांगरणी -कापणी – मळणी कामं करण्याची आवश्यकताच नाही. गंमत अशी की हे सारं करतं ते ‘शेत (क्षेत्र)’ याखालीच येतं पण याचं ज्ञान असलेला आत्मा (क्षेत्रज्ञ, शेतकरी), प्रेरणाच देत नाही. पुरेशी इच्छाशक्ती देत नाही.
जिभेप्रमाणेच अन्य इंद्रियांची स्थिती आहे. डोळे नको ते, नको तेव्हा, नको तितकं पाहतात. बहुसंख्य लागलेलं दूरदर्शनचं व्यसन (ऍडिक्शन) हे याचंच उदाहरण आहे. यामुळे फक्त मनोरंजन व दर्शन (पाहणं) उरलंय; वाचन – मनन – चिंतन (खरं दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान) होतच नाही. याचा परिणाम म्हणजे शेती लावली तरी काळजी नाही, कष्ट नाहीत, वाढलेलं अनावश्यक तणं काढणं (नडणी) नाही. की इतर शेतीची कामंही नीट होत नाहीत. म्हणजे डोळ्यांनी जे जे पाहिलं जातं त्यावेळी मन-बुद्धी जवळजवळ सारं एकतर्फी स्विकारतात. त्यावर जागृत प्रतिक्रिया घडत नाही. पाहिलेल्याचं – वाचलेल्याचं मनन – मंथन होत नाही.
अशा प्रकारे नरजन्माची संधी नि नरदेहाचं अप्रतिम साधन मिळूनही साधना होत नाही कारण ‘साध्य, ध्येय’ निश्चित नाही अन् हे करण्याचं काम क्षेत्रज्ञ करतो तो पुरेसा प्रभावी नाही. इंद्रियं, त्यांचे विषयभोग यामुळे तो दबून गेलाय. त्या प्रभावावर काजळी साठलीय, गंज साठलाय. हे घासून पुसून स्वच्छ करणं अत्यावश्यक आहे. यालाच उपासना – आराधना – साधना – तपश्चर्या अशी वेगवेगळी नावं आहेत.
शिष्यांनी यावर उपाय काय म्हणजे साध्य ठरुनही संधी (माणसाचा जन्म) व साधन (मनुष्य देह) लाभूनही मनःशांती, आनंदप्राप्ती किंवा मुक्तीची अनुभूती का नाही? – असं विचारल्यावर समर्थ रामदास उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘अरे यावर उपाय आहे ना! उपासना – उपासना!’ – ‘उपासनेसंबंधी काही मार्गदर्शन, काही सूचना का करत नाही?’ असं शिष्यांनी उच्चारल्यावर समर्थ ठामपणे उद्गारले – ‘उपासकांसि सूचना? … अरे, उपासना – उपासना!’ फार मार्मिक उपदेश आहे… उपासना, अधिक उपासना हाच उपासनेविषयी मार्गदर्शनाचा अमोघ उपाय आहे. कारण असं मार्गदर्शन बाहेरून नव्हे तर आतून मिळावं लागतं. यासाठी अधिकाधिक अभ्यासाशिवाय (उपासनेशिवाय) दुसरा मार्गच नाही.
यासाठी मुख्यतः काय करायला पाहिजे? – हे सांगणारा एक मार्मिक प्रसंग समर्थांच्याच जीवनात घडलाय. एक संपूर्ण तप (वयाची चोवीस ते छत्तीस ही बारा वर्षं) समर्थ रामदास भारतभ्रमण करत राहिले. हिमालयात आत्मविसर्जन करण्याच्या (जीवन संपवण्याच्या) बेतात असताना अंतःप्रेरणेनं कार्य करण्याचा आदेश झाला व त्यानं भारले जाऊन समर्थ राष्ट्रकार्यासाठी योग्य भूमीचा शोध घेण्यासाठी हिमालयातून खाली उतरले. उत्तर भारतात औरंगजेबाची सत्ता होती. तो प्रदेश अर्थातच देशकार्यासाठी अनुकूल नव्हता. खाली दक्षिणेकडे आल्यावर महाराष्ट्रात महाबळेश्‍वरच्या एका डोंगरमाथ्यावर ते उभे राहिले. चौकशीअंती त्यांना समजलं की हा प्रदेश जरी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असला तरी त्या भागावर नियंत्रण हे शहाजी भोसले या मराठा सरदाराचं आहे. इथं जर आपला धर्म-संस्कृती-राष्ट्रभावना यांच्या पुनरुज्जीवनाचं कार्य सुरू केलं तर शहाजी विरोध तरी करणार नाही- असा विचार मनात येताच समर्थांनी मोठ्या अपेक्षेनं नि आत्मविश्‍वासानं चौफेर दृष्टी फिरवली. याचवेळी जवळच मेंढ्या चारत असलेल्या एका धनगरानं त्यांना पाहिलं. भगवी वस्त्र घातलेला एक तेजस्वी साधू उभा असलेला पाहून तो भोळाभाबडा मेंढपाळ समर्थांकडे आला. त्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, ‘साधुमहाराज, काही तरी उपदेश करा’. त्याची ती साधीभोळी भक्ती समर्थांनी पाहिली नि ते म्हणाले, ‘मनाच्या विरुद्ध वाग’. तसं पाहिलं तर जेमतेम तीनच शब्द. त्याचा अर्थ त्या साध्या मनाच्या धनगराला किती कळला असेल कुणास ठाऊक? पण आपल्यासाठी मात्र हा उपदेश, नव्हे समर्थांचा आदेश किती महत्त्वपूर्ण आहे.
समर्थ एका परीनं हेच सुचवताहेत की मनाची दिशा ही इंद्रियं, त्यांचे विषय व भोग अशी बाहेर जाणारीच आहे. या दिशेच्या विरुद्ध वागणं (यालाच योगशास्त्रात पतंजली मुनींनी ‘प्रत्याहार’ हा शब्द वापरलाय.) म्हणजेच क्षेत्रावर क्षेत्रज्ञाचं नियंत्रण असणं. मनाच्या विरुद्ध म्हणजेच पलिकडे असलेली बुद्धी व तिच्या पलीकडे अगदी आत आत असलेला आत्मा याच्या दिशेनं वागणं.
भगवंत हेच सुचवताहेत. जीवन ही शेती आहे. त्यात इंद्रियं, मन, बुद्धी ही साधनं आहेत. यांच्या साह्यानं विविध उपभोग, कर्मं आयुष्यभर करत रहावं लागतं. पण बाहेरची धावाधाव वन त्यातून होणारी तगमग, तळमळ, तडफड थांबवली तर पाहिजेच. पण विरुद्ध दिशेनं असलेली शांती, समाधान व आनंद यांची प्राप्ती करून घेतली पाहिजे.
गीतेतील या क्षेत्र – क्षेत्रज्ञ विचाराभोवती सर्व इंद्रियांसाठी म्हणजेच मन – बुद्धीसाठी उपदेशन दडलेलं आहे. यावर थोडं सहचिंतन-
* देह तर महत्त्वाचा आहेच, पाच ज्ञानेंद्रियं व पाच कर्मेंद्रियं यांच्या द्वारेच मुख्यतः शब्द (कान), स्पर्श (त्वचा), रूप (डोळे), रस (जीभ) व गंध (नाक) असे भोग किंवा अनुभव घेतले जातात. देहाची काळजी घेतली पाहिजेच ती यासाठी आपल्या जगण्याचं (लिव्हिंग) मुख्य माध्यम किंवा साधन देहच आहे.
* मनानं भावजीवन व बुद्धीनं विचारजीवन (लाइफ) समृद्ध होतं. हीच तर मानवाची विशेषता आहे. यातूनच सुधारणा (सिव्हिलायझेशन) व संस्कृती (कल्चर) यांचा विकास शक्य आहे. व मानवाने तो खूप साधलाही आहे. अजूनही हा विकास वेगानं सुरूच आहे. पण याही पलीकडे म्हणजेच अगदी आत आत्मतत्त्व (आत्मा) आहे. अन् हाच खरा देह – मनाच्या व्यापारांचा ज्ञानी आहे. स्वामीही आहे याची सतत जाणीव ठेवून जीवन धन्य कृतार्थ करणं हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे.
हा सारा विचार आद्यशंकराचार्यांनी प्रभावीपणे मांडलाय. ‘सर्वांत दुर्लभ अशा तीन गोष्टी म्हणजे मनुष्यत्व (मानवी देह) – मुमुक्षुत्व (मुक्तीची तीव्र इच्छा) नि महापुरुषसंश्रयः (म्हणजे सत्संग) ही त्रिवेणी म्हणजे आनंदी जीवनाची त्रिसूत्रीच आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. इंद्रियं – मन – बुद्धी लाभलेला देह (मनुष्यत्व) तर आपल्याला लाभलेलाच आहे. गीतेसारख्या ग्रंथातून मार्गदर्शन, समुपदेशन मिळवण्याचा आपला प्रयत्न ही मुमुक्षुत्वाचीच खूण आहे. अन् या गीताभ्यासात रंगून-रमून जाणं हाच खरा सत्संग (महापुरुष भगवंताचा साक्षात् सहवास) आहेच. मग मुक्तीच्या मार्गाला प्रयत्नपूर्वक, संकल्पपूर्वक लागल्यावर मुक्तीची अनुभूती निश्चितच आहे. हवीय फक्त सातत्यानं केलेली उपासना. ती करायची ना?