मळा-मारूतीगड येथे आजपासून जत्रोत्सव

0
159
मळा-पणजी येथील मारुती गडावरील प्रसिद्ध मारुती संस्थानचा जत्रोत्सव आजपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई. (छाया : किशोर नाईक)

मारूतीगड, मळा पणजी येथील प्रसिद्ध श्री मारूतीराय संस्थानचा ८१ वा जत्रौत्सव सलग चार दिवस उत्साहात साजरा होणार आहे. सलग चारही दिवस मळा परिसरातून मारूतीरायांची पालखी मिरवणूक व मंदिरातील श्रींचा दर्शन सोहळा हे या जत्रौत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल.
आज गुरूवार दि. २९ जानेवारीपासून या चार दिवशीय प्रसिद्ध जत्रौत्सवाला पहाटे ५ वाजल्यापासून प्रारंभ होईल. प्रथम मंदिरात श्रींस अभिषेक व नंतर अन्य धार्मिक कार्यक्रम होतील. उद्या जत्रौत्सवाचा पहिलाच व प्रमुख दिवस असल्याने दरवर्षाप्रमाणे यंदाही येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळणार आहे. श्रींचे दर्शन सुरळीतपणे घेता यावे यासाठी आयोजन समितीतर्फे चांगली सोय केली असून टप्प्याटप्प्याने रांगेत मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना सोडण्यात येईल. काल रात्री उशीरापर्यंत मंदिर सजावटीचे काम चालू होते. यात मंदिरात खास आकर्षक फुलांची रंगबिरंगी सजावट, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आदींचा यात समावेश होता. उद्या रात्री उशीरांपर्यंत मंदिर परिसराबरोबर मळा भागही भाविकांच्या गर्दीने उसळणार असल्याने येथे उशीरापर्यंत पोलीस तैनात करण्यात येतील अशी माहिती उपलब्ध आहे. आज संध्याकाळी ७ वाजता मारूतीरायांची पालखी मिरवणूकीला श्री पांडुरंग मंदिराकडून सुरूवात होईल. येथून ही पालखी मिरवणूक मानसभाटपर्यंत फिरून परत मंदिरात विसर्जित होईल. यानंतर रात्री दर्शन तीर्थप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येईल.
दि. ३० व ३१ जानेवारी रोजी रात्री १० वाजता मळा परिसरातून श्रींच्या पालखीची मिरवणूक व रात्री येथील रंगमंचावर अनुक्रमे ‘दिल तो बच्चा’ व ‘टेन्शन फ्री’ हे नाट्यप्रयोग सादर होतील. दि. १ फेब्रुवारी रोजी मळा नागरीक प्रस्तूत ‘महाराजा’ हा नाट्यप्रयोग याच रंगमंचावर सादर होईल. तत्पूर्वी या परिसरातून पालखी मिरवणूक निघेल तरी या वार्षिक जत्रौत्सवाला मोठ्या संख्येने भाविकांना उपस्थिती लावून श्रींचे दर्शन, तीर्थप्रसाद तसेच अन्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजन समितीतर्फे कळविण्यात आले आहे.