निठारी हत्याकांड : कोलीला मृत्यूदंडाऐवजी जन्मठेप

0
116

दया याचनेवरील निर्णयास विलंबामुळे शिक्षेत बदल
निठारी हत्याकांडप्रकरणी दोषी ठरून मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या सुरेंद्र कोली याच्या शिक्षेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने बदल केला असून मृत्यूदंडाऐवजी त्याला जन्मठेप सुनावण्यात आली. दया याचनेच्या याचिकेवर निर्णय देण्यास विलंब लावल्याने हा बदल करणे भाग पडल्याचे न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे.मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व न्या. पी. के. एस. बाघेल यांच्या खंडपीठाने वरील निवाडा काल जाहीर केला. कोली याच्या दया याचनेवर निर्णय देण्यास खूप उशीर लागल्याने त्याला मृत्यूदंड ठोठावणे घटनाविरोधी ठरेल असे मत न्यायालयाने व्यक्त केले. २००६ सालच्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली होती.
या प्रकरणी पीपल्स युनियन फॉर डेमॉक्रेटिक राईट या बिगर सरकारी संस्थेने सार्वजनिक हित याचिका दाखल केली होती. त्यांनी दया याचनेच्या याचिकेवर निर्णय देण्यासाठी खूप विलंब झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना कोली याला मृत्यूदंड झाल्यास तो घटनेच्या कलम २१ चा भंग होणार असल्याचा दावा केला.
वरील संस्थेनंतर स्वतः कोली यानेही मृत्यूदंडाच्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका सादर केली होती. कोली याला विशेष सीबीआय न्यायालयाने १३ फेब्रुवारी २००९ रोजी मृत्यूदंड ठोठावला होता.