जनता कॉंग्रेस प्रमाणेच भाजप सरकारलाही धडा शिकवील

0
90

काळापैसा प्रकरणी अण्णा हजारेंचा हल्लाबोल
भारतीयांनी विदेशी बँकांमध्ये साठवून ठेवलेला काळा पैसा भारतात परत आणण्याच्या आश्‍वासनास केंद्रातील भाजप सरकारने हरताळ फासल्यामुळे भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे नेते अण्णा हजारे यांनी काल सरकारवर जोरदार टीका केली. यामुळे जशी कॉंग्रेसला अद्दल घडवली तसाच धडा लोक भाजपालाही शिकवतील अशी तिखट प्रतिक्रिया हजारे यांनी व्यक्त केली.भाजपने काळ्या पैशाबाबत लोकांना दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्यात आलेले अपयश म्हणजे या पक्षाच्या सरकारने लोकांप्रती केलेला घोटाळाच असल्याचा दावाही हजारे यांनी केला.
सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे याआधी भ्रष्टाचारविरोधी चळवळीत असलेल्या अरविंद केजरीवाल व किरण बेदी यांच्यात चालू असलेल्या राजकीय चिखलफेकीत स्वतःला ओढवून घेण्यासही त्यांनी नकार दिला.
अण्णा म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपने आपले सरकार स्थापन झाल्यास १०० दिवसात विदेशात भारतीयांचा काळा पैसा भारतात आणण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात १५ रुपयेही जमा झालेले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता भाजप सरकारच्या या भूलथापांचा लोकांना उलगडा झाला असून लोक भाजपालाही धडा शिकवतील असे हजारे म्हणाले. आपल्या दृष्टीने अरविंद केजरीवाल किंवा किरण बेदी यांना काहीच महत्त्व नाही. त्यांच्याबाबत सोडून अन्य प्रश्‍न विचारा असे त्यांनी पत्रकारांना सुनावले.