कानपिचक्या

0
100

आपली भारतभेट आटोपून परत जाण्याआधी बराक ओबामांनी काही कानपिचक्या दिल्याच. ‘देशातील धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखाल तरच प्रगती साधाल’ असे ओबामा जाता जाता बजावून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या कार्यक्रमांमध्ये या किंवा कोणत्याही वादग्रस्त विषयावर ‘ब्र’ ही न काढलेल्या ओबामांनी सिरी फोर्ट प्रेक्षागारात विद्यार्थ्यांपुढे झालेल्या आपल्या भाषणात या कानपिचक्या दिल्या आहेत. भारतीय राज्यघटनेतील पंचविसाव्या कलमात सांगितलेले धार्मिक स्वातंत्र्यही त्यांनी उद्धृत केले हे उल्लेखनीय आहे. भारताशी मैत्रीचा आणि सहकार्याचा हात पुढे करतानाही काही बाबतींमध्ये तडजोड होऊच शकत नाही असा संदेशच जणू ओबामांनी अप्रत्यक्षपणे दिलेला आहे. दोन्ही देशांनी प्रसृत केलेले संयुक्त निवेदन असो किंवा भारत – अमेरिका मैत्रीचा दिल्ली जाहीरनामा असो, त्यात केवळ परस्पर सहकार्याची अविवादित क्षेत्रे कोणती असू शकतात त्यावर भर देण्यात आलेला दिसतो. गुंतवणूक संधी, द्विपक्षीय व्यापार, संरक्षण, अंतराळ संशोधन, आरोग्य, रेल्वे तंत्रज्ञान अशा विषयांमध्ये भारताशी हातमिळवणी करण्यास अमेरिकेने उत्सुकता दर्शविलेली आहे. अर्थात, त्यामध्ये त्या देशाचेही हित सामावलेले आहे हे विसरता येणार नाही. गेल्या सप्टेंबरमधील मोदींच्या अमेरिका भेटीच्या वेळी जे ‘व्हीजन’ व्यक्त करण्यात आले होते, त्याचेच पुढचे पाऊल ओबामांच्या भारतभेटीत टाकले गेलेले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताला पाठबळ, येथील साधनसुविधा निर्मितीमध्ये जागतिक बँकेचे सहकार्य मिळवून देण्यासाठी सहाय्य वगैरे आश्वासनेही ओबामांनी दिलेली आहेत. या सार्‍याच्या जोडीने गेली अनेक वर्षे लटकलेल्या भारत – अमेरिका नागरी अणुकरारातील अडथळे दूर सारण्याच्या दिशेने झालेली व्यापक सहमती ही ओबामांच्या भारतभेटीची एक मोठी उपलब्धी मानावीच लागेल. या सार्‍या क्षेत्रांमधील सहकार्यासंदर्भात ‘‘आपण आपल्या स्वप्नातल्या देशाला आकार देत असताना त्यात भागीदार होत असल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो’’ असे ओबामा म्हणाले खरे, पण हा मैत्रीचा असा हात पुढे करीत असतानाही भारतावरील जबाबदार्‍यांची जाणीव करून द्यायला मात्र ते अजिबात विसरलेले नाहीत. जागतिक हवामान बदलांसंदर्भात भारताने अमेरिका लादू पाहात असलेली निर्बंधित मानके स्वीकारावीत हा आग्रह ओबामांनी सोडलेला दिसला नाही. त्यासंदर्भात वेगाने पावले टाकणे ही भारताची जबाबदारी आहे याची आठवण ओबामांनी सिरी फोर्टमधील आपल्या भाषणात करून दिली आहे. या वर्षअखेरीस पॅरीसमध्ये होणार्‍या परिषदेपूर्वी भारताने त्या आघाडीवर प्रयत्न करायला हवेत असेच जणू त्यांनी सुचविले आहे. महिला आणि मुलींच्या हक्कांचे संरक्षण करा, मानवी तस्करीचा सामना करा अशा कानपिचक्याही ओबामांनी त्या भाषणात दिल्या आहेत. म्हणजेच अमेरिकेने सहकार्याचा हात जरी पुढे केलेला असला, तरी तो विनाशर्त नाही हेच जणू त्यांनी अप्रत्यक्षपणे बजावलेले आहे. ओबामांचे सर्वांत टोकदार वक्तव्य आले ते धार्मिक सहिष्णुतेच्या संदर्भात. ‘विकास’ आणि ‘सुशासन’ या दोन मुद्द्यांचा पुरस्कार मोदी सतत करीत आलेले असले, तरी उजव्या परिवारातील काही घटक सातत्याने धार्मिक मुद्दे उकरून काढून मोदींच्या पायांत पाय घालण्याचा सतत प्रयत्न करीत आलेले आहेत. मात्र, त्यासंदर्भात नापसंती असली, तरी आजवर अवाक्षर उच्चारण्याचे मोदींनी टाळलेले आहे. अशा कडव्या शक्तींना पायबंद घालण्याची गरज ओबामांनी सूचित केलेली आहे. गेल्या तीन दिवसांच्या गळाभेटींच्या शेवटी ओबामा मोदींना परखडपणे सत्य सांगून गेले आहेत, तेही अत्यंत स्पष्टपणे. दोन्ही देश ही दोन महान लोकशाही राष्ट्रे आहेत, दोन अजस्र अर्थव्यवस्था आहेत, दोहोंमध्ये सामाजिक वैविध्य आहे. हे दोन्ही देश अधिक जवळ आले तर जग अधिक समृद्ध, शांततापूर्ण आणि सुरक्षित बनेल हे खरे असले, तरी भारताने आपल्या सहिष्णुतेला सुरुंग लागू देता कामा नये, जागतिक हवामान बदलांसंदर्भातील आपली जबाबदारी निभवावी असे ओबामांनी मोदींना जाता जाता सुनावले आहे. शेवटी मैत्रीचा कितीही देखावा केला आणि गळ्यात गळे घातले, तरी महासत्ता ही महासत्ताच असते याची जाणीवच जणू त्यांनी करून दिली आहे.