…तर जगात अधिक समृद्धी, शांतता : ओबामा

0
109
‘मन की बात’ कार्यक्रमात परस्परांशी संवाद साधताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी.

 ‘मन की बात’ मध्ये प्रतिक्रिया
समान मूल्यांच्या पूर्ततेसाठी भारत व अमेरिका यांची एकजूट झाल्यास जगात अधिक समृद्धी, शांतता आणि सुरक्षितता निर्माण होईल असा आशावाद अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी काल ‘मन की बात’ या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.गरीबी दूर करण्यासाठी मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अमेरिकेतील नागरिक प्रभावित झाले आहेत. भारतातील गरिबी निर्मूलन, महिला, सबलीकरण, वीज उपलब्धता या संदर्भातील मोदी यांच्या कार्याचा प्रभाव अमेरिकी नागरिकांवर आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
यावेळी मोदी यांनी अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्या समाजाला असलेल्या योगदानाविषयी विचारले असता ओबामा यांनी सांगितले की, आपल्या पत्नीच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याचा आपल्याला अभिमान आहे. आरोग्य क्षेत्रातील आव्हानांबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासह आम्हाला काम करायचे आहे असे ओबामा म्हणाले.
जगभरातील आरोग्य क्षेत्रातील साधनसुविधांची सुधारणा होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या वाटचालीची आपण प्रशंसा करतो असे ते म्हणाले. जे देश योग्य वेगाने या क्षेत्रात काम करीत नाहीत त्यांना या संदर्भात भारताकडून बरेच शिकता येईल असेही ओबामा म्हणाले.
आपल्या भाषणाची सुरुवात ओबामा यांनी ‘नमस्ते’ने केली. जेव्हा आपण अमेरिकेत परत जाईन तेव्हा आपण आपल्या मुलींना त्यांनी भारताची जशी कल्पना केली तसाच भारत हा एक अभूतपूर्व देश असल्याचे सांगेन. मुलींना भारतात यायचे होते. परंतु त्यांच्या परीक्षांमुळे ते शक्य झाले नाही. भारताची संस्कृती व इतिहास यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे असे ओबामा यांनी सांगितले.