यस्मात् न उद्विजते लोकः …

0
176

– प्रा. रमेश सप्रे
आदर्श भक्ताची लक्षणं सांगताना नारदमुनी म्हणतात – किती लक्षणं सांगू! यथा व्रजगोपिकानाम् ॥ (नारद भक्तिसूत्र). म्हणजे गोकुळातल्या गोपींच्या जीवनाकडे पहा की कळेल भक्ती म्हणजे काय ते अन् भक्त कुणाला म्हणायचं ते!
खरंच भगवंतांनी सांगितलेली सर्व भक्तलक्षणं जर कुणात असतील तर ती कृष्णवेड्या गोपींतच. कशी ते उदाहरणं घेऊनच पाहू या.
भगवंतानं गीतेच्या बाराव्या अध्यायात ही भक्तलक्षणं विस्तारानं सांगितलीयत. अध्यायाचं नावंच आहे ‘भक्तियोग’. या लक्षणांवरच आपण क्रमशः सहचिंतन करत आहोत. भगवंत पुढे सांगताहेत-
यस्मान्नोद्विजते लोकां लोकान्नोद्विजते च यः|
हर्षामर्षभयोद्वेगैः मुक्तो यः सच मे प्रियः॥

अर्थ – ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला उद्वेग होत नाही (यस्मात् लोकः न उद्विजते) अन् ज्याला कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग वाटत नाही; आणि जो आनंद(हर्ष), मत्सर(अमर्ष), भय, उद्वेग इ.नी रहित आहे तो (भक्त) मला प्रिय आहे.
इथं भगवंत उद्वेगाचा त्रिवार उच्चार करतात. उद्वेगाचा अर्थ वैताग, कंटाळा, तीव्र नकारात्मक भावना असा आहे. याचा जीवनातील समाधान, शांती, आनंद यांच्याशी जवळचा संबंध आहे.
ईशावास्य उपनिषदाचा प्रभाव गीतेतील विचारांवर निश्‍चित आहे. इतरही उपनिषदांचा आहेच म्हणून तर गीतेला ‘उपनिषदांचं उपनिषद’ (उपनिषत्सु) समजलं जातं. ‘ईशावास्य’ वृत्ती ही आनंदी जीवनासाठी यज्ञवृत्ती- एवढीच महत्त्वाची आहे. सदासर्वदासर्वत्र परमेश्‍वराचा वास आहे. सृष्टीतील कणन्‌कण, अणुअणू हे ईश्‍वराचं घर (आवास, निवास) आहे. (ईशावास्यम् इदं सर्वम्) हा भक्तीचा प्रमुख भाव तसेच ज्ञान-कर्म-ध्यान योगांचाही आत्मा मानला तर आदर्श मानवाची (ज्यात भक्त-ज्ञानी-कर्मयोगी-ध्यानयोगी सारे आले) लक्षणं सांगताना हे फार महत्त्वाचं तत्त्व मानलं पाहिजे.
अशा ईशावास्य-वृत्तीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यात ऋषींच्या मते या गुणाचाही अंतर्भाव आहे – ‘जो कोणालाही, कशालाही, केव्हाही कंटाळत नाही तो शंभर वर्षं आरोग्ययुक्त आयुष्य जगू शकतो.’
यात तन व मन या दोघांच्या आरोग्याचा उल्लेख होतो ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. हल्ली विशीतली माणसं तर पदोपदी क्षणोक्षणी ‘बोअर’ होत असतात. त्यांना सगळ्याचाच कंटाळा येतो. कामाचा, माणसांचा, स्वतःचा व जीवनाचाही तुफान कंटाळा येतो. त्यामुळे मोठ्या मानसिक ताणाला त्यांना सामोरं जावं लागतं. विशेष म्हणजे नोकरी, मोठा पगार, घरदार, वाहनं इ. गोष्टी अनुकूल असतानाही एक प्रकारचा उद्वेग त्यांना व्यापून टाकतो.
यावर सध्या अनेक विज्ञानशाखातही संशोधन चालू आहे. विशेषतः मनाच्या व्यवहारव्यापाराशी जोडलेल्या – मानसशास्त्र (सायकॉलॉजी), मनोरोगांचं शास्त्र (सायकॅट्री) तसेच मानववर्तनशास्त्र (ह्यूमन बिहेवियर) – अशा क्षेत्रात तर या संशोधनाला अग्रक्रम दिला जातो. कारण अशा वैतागातून, कंटाळ्यातून, बोअर होण्यातून मनावर खूप दडपण (टेन्शन) व ताण (स्ट्रेस) येतो. यातून मन खचणं (डिप्रेशन), नैराश्य, उदासीनता, विफलतेची भावना (फ्रस्ट्रेशन) यांचा जन्म होतो. विशेष म्हणजे यातलं बरचसं आपण तयार केलेलं असतं. कारण जीवनाचा, जीवनातील घटनांचा, संबंधांचा अर्थ सकारात्मक लावण्यासाठी आवश्यक ती विचारपद्धती घरात व शाळेत शिकवली जात नाही.
उदासीनता, वैताग यातून जन्माला येणारी नकारात्मकता (निगेटिव्हिटी) दूर झाल्याशिवाय मनःस्वास्थ्य व म्हणूनच मनःशांती लाभणार नाही.
अख्खी तरुण पिढी थोड्याफार प्रमाणात यानं ग्रासू लागलीय याचं एक कारण मुख्यतः त्यांच्या जीवनशैलीत, मोबाईल, संगणक इतर इलेक्ट्रॉनिक यंत्र(डिव्हायसेस); फेसबुक, द्विटर यासारख्या समाजाशी जोडणार्‍या सुविधा(सोशल नेटवर्किंग फॅसिलिटीज) याचा परिणाम म्हणून युवापिढी बाहेरून जगाशी चोवीस तास (खरं तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन) जोडलेली असते(इंटर कनेक्टेड) पण त्याचवेळी ती आतून स्वतःशी तुटलेली (डिस्कनेक्टेड) असते. या सर्वत्र आढळणार्‍या अनुभवाला विचारवंतांनी नाव दिलंय ‘इनर डिसकनेक्ट’ म्हणजे आतून तुटलेला, स्वतःपासून निखळलेला. रात्री आकाशात जसे निखळलेले तारे दिसतात. तशीच आजची तरुणाई निखळल्यासारखी झालीय हा फार मोठ्या चिंतेचा विषय आहे.
आपला भारत जगातलं सर्वात तरुण राष्ट्र समजलं जातं म्हणून आपल्या देशात तर एखादी भयंकर रोगाची साथ असंख्यांचा ग्रास घेत तांडव करताना दिसते तशी परिस्थिती येऊ घातलीय असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती नाही. यावर उपाय गीतेत सांगितलेल्या ग्रंथाप्रमाणेच प्रभावी ठरतील. मनोवैज्ञानिक दृष्टी गीता आपल्याला तिच्या समुपदेशनातून देते.
ज्यावेळी एकविसाव्या शतकातील मानवजातीपुढील मोठ्या आव्हानांची (चॅलेंजेस) किंवा समस्यांची (प्रॉब्लेम्स) चर्चा होते त्यावेळी सर्वप्रथम ‘मानसिक ताणां’चा उल्लेख सर्वत्र केला जातो अन् हे खरंही आहे. यावर उपाय काय?-
१) नुसतं ‘कंटाळू नका. वैतागू नका.’ असं म्हणून भागणार नाही. तर कामाचं स्वरूप, त्यात दिली जाणारी कमी वेळात जास्त साध्य करायची लक्ष्ये (टार्गेट्‌स) यातून मनावर प्रचंड ताण येतो. म्हणून कराव्या लागणार्‍या कामाचा निषेध न करता, त्याला आतून विरोध (रेझिस्टन्स) न करता त्याचा खुल्या मनानं स्विकार केला पाहिजे.
या संदर्भात एका साधूची गोष्ट मार्मिक आहे-
रात्री सर्व आटोपून हा साधू मठात ध्यानासाठी बसला. शांत प्रार्थना करत आत्मसंवादात मग्न व्हायचं हा त्याचा प्रिय नित्यक्रम होता. पावसाचा आरंभ काही दिवसांपूर्वी झाल्याने सर्व बाजूंनी बेडकांच्या ‘डरॉंव डरॉंव’ असा कर्णकटु ओरडण्याचा आवाज रात्रीच्या शांततेचा भंग करत होता. साधूच्या ध्यानात त्यामुळे व्यत्यय येत होता. अनेक वर्षांच्या ध्यान, प्रार्थना, चिंतन यामुळे त्याच्यात काही सिद्धी विकसित झाल्या होत्या. त्यानं वैतागून (उद्वेगून) खिडकीबाहेर डोकं काढून बेडकांना उद्देशून जोरात म्हटलं, ‘थांबा (स्टॉप)’. त्यासरशी सारे बेडूक एकदम ओरडायचे थांबले. नीरव शांततेत साधूनं ध्यानाचा प्रयोग प्रारंभला.
पण आता आत एक प्रश्‍न त्याच्या मनात थैमान घालू लागला. ‘त्या बेडकांना ‘थांबा’ म्हणणारा तू कोण? ते बेडूक त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या भाषेत देवाचं नाम घेत असतील, प्रार्थना करत असतील. तू ‘राम-राम’ म्हणतोस ते त्यालाच ‘डरॉंव डरॉंव’ म्हणत असतील’. ..या विचारामुळे साधू आतून आणखी व्यथित झाला.
काही विचार करून खिडकीतून डोकं बाहेर काढून बेडकांना उद्देशून तो म्हणाला, ‘गा! (सिंग)’ अन् तत्क्षणी सर्व बाजूनं बेडकांच्या ओरडण्याचा ध्वनी सुरू झाला. पण पूर्वी तो गोंगाट (नॉइज्) वाटत होता. आता तोच ध्वनी संगीत (म्यूझिक) वाटू लागला.
साधूनं त्या पार्श्‍वसंगीताच्या साथीनं ध्यान सुरू केलं. त्या दिवशी त्याचं ध्यान खूप सखोल नि शांत लागलं. नंतर विचार केल्यावर त्याच्या ध्यानात आलं. पहिल्यांदा माझी कोणती चूक झाली होती?’.. त्यांना ‘थांबा’ म्हणून सांगताना मी अकारण प्रतिक्रिया व्यक्त करत होतो (रिऍक्टिंग), त्यांना विरोध करत होतो (रेझिस्टिंग), त्यांच्याविषयी अनादर, असंमती व्यक्त करत होतो (रिझेंटिंग) … म्हणून मला त्यांच्या आवाजाचा त्रास होत होता.
नंतर मी माझ्यात काय सुधारणा केली? … मी त्यांचा ओरडण्याचा हक्क मान्य केला (ऍक्सेप्टिंग) एवढंच नव्हे तर त्यांचं कौतुक केलं (ऍडमायरिंग) आणि शेवटी चक्क त्यांच्या गाण्याचा आस्वाद घेऊ लागलो (ऍप्रिशिएटिंग)… मग सारं जग संगीतमय बनलं. नादब्रह्माचा अनुभव येऊ लागला. मन आनंदानं भरून गेलं.
आपण सार्‍यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. एकमेकाला स्विकारलं पाहिजे (ऍक्सेप्ट). परस्परांचं कौतुक केलं पाहिजे (ऍडमायर) तर प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीचा आस्वाद घेता येईल (ऍप्रिशिएट) नि जीवन आनंदानं भरून जाईल.
इथं असा प्रश्‍न विचारला जाईल की दुसर्‍याची कृती उद्वेगजनक असली तरी उद्वेग वाटू द्यायचा नाही? हे कसं जमायचं? यासाठी भगवंत पुढली लक्षणं सांगताहेत-
२) हर्ष – भक्तानं म्हणजेच चांगल्या माणसानं कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. अनेक घरातली ‘आई’ याचं उत्तम उदाहरण असतं. किती सहन करते बिचारी! तरीही स्वतः आनंदात राहण्याचा प्रयत्न तर करतेच पण इतरांना आनंदात ठेवण्याचाही यत्न ती करत असते. ‘दुसर्‍याच्या सुखात हर्ष मानणं फार मोठ्या मनाची खूण आहे.’
एकदा निकालाच्या (रिझल्ट) दिवशी शेजारचा माणूस पेढे घेऊन आला. त्याचा मुलगा नापास झाला होता तरी कसले पेढे? विचारल्यावर आनंदानं म्हणाला, ‘सर्व सोयीसवलती देऊनही माझा मुलगा नापास झाला. माझ्या ऑफिसात शिपायाचं (प्यून) काम करणार्‍याचा मुलगा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्याच्या वर्गात सर्वप्रथम आला म्हणून हे पेढे वाटतोय.’ हा खरा आनंद आहे.
यामुळे सदैव ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग’ असा अनुभव येईलच.
३) अमर्ष – म्हणजे मत्सर. दुसर्‍याचं चांगलं झालेलं न पाहवणं किंवा दुसर्‍याच्या उत्कर्षामुळे, प्रगतीमुळे स्वतः दुःखी होणं, सतत जळत राहणं – अशी वृत्ती असलेली व्यक्ती कधीही आनंद भोगू शकणार नाही. मग भक्तीचं तर सोडूनच द्या. भक्ती करत राहिलं तर अशा दुर्गुणांवर मात करता येईल.
४) भय – द्वैतातून भय निर्माण होते – असं एक वचन आहे. साधुसंतांना भय नसते, इतकंच काय पण ऋषिमुनींच्या आश्रमात भयमुक्त वातावरणात एरवी एकमेकांचे शत्रू असलेले वाघ-हरण, साप-मुंगूस यांसारखे प्राणीही गुण्यागोविंदानं राहात. ‘भय इथले संपत नाही’ किंवा ‘भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे’- अशा विचारातून जीवनातलं सर्वव्यापी, सर्वस्पर्शी भयच वर्णन केलेलं असतं. खरा भक्त मात्र या भयाच्या वर निर्भय अवस्थेत असतो. खरं तर तो त्याहीवरच्या ‘अभय’ (भयाचा स्पर्श होऊ न शकणार्‍या) अवस्थेत असतो.
सध्याच्या सर्वत्र पसरलेल्या ‘भय-ताणयुक्त’ अवस्थेतून ‘ताण-तणावयुक्त’ अवस्थेत जाणं हे ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अवस्थेत जाण्यासारखंच आहे. भगवंताच्या मते शुद्ध भक्ती हे त्याचं साधन आहे. त्यातून ‘अमृतत्व’ साध्य होतं. देहाचा नाश आहेच. मानव मर्त्य (मरणशील) आहे ते देहाच्या पातळीवर. मनबुद्धीच्या पातळीवर अमरत्व नव्हे अमृतत्व मिळवायला काय हरकत आहे? नाही तरी ‘मृत्योर्मा अमृतं गमय|’… ऋषींचा घोष आहेच ना?