एफसी गोवा-कोलकाता पहिली उपांत्य लढत गोलशून्य

0
126
सॉल्ट लेक स्टेडियमवरील हिरो इंडियन सुपर लीग उपांत्य लढतीत ऍटलेटिको दी कोलकाताच्या जोसेमीने कॉर्नरकिकवरील चेंडू हेडरद्वारे असा ‘क्लियर’ केला.

यजमान ऍटलेटिको दे कोलकाता आणि एफसी गोवा या तूल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधील सॉल्ट लेक स्टेडियमवरील उत्कंठावर्धक हिरो इंडियन सुपर लीग स्पर्धेची पहिली उपांत्य लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.
एफसी गोवाचा युवा मध्यरक्षक रोमिओ फर्नांडिसला एक दोन संधी मिळाल्या पण कोलकाताचा गोलरक्षक एडेल बेटेने प्रतिस्पर्ध्यांची आक्रमणे समर्थपणे थोपविली.ऍटलेटिको दे कोलाकाताचे प्रशिक्षक अंतोनिओ हबास यांनी संघात चार बदल केले. फिक्रू टेफेरा, अर्नब मंडल आणि विश्‍वजीत साहा दुखापतीमुळे तर बलजीत सिंह साहनी निलंबनामुळे या सामन्यात खेळू शकले नाहीत. त्यांच्या जागी लुइस गार्सिया, राकेस मसिह, लेस्टर फर्नांडिस आणि संजू प्रधान यांनी खेळविण्यात आले.
एफसी गोवाचे प्रशिक्षक झिको यांनी संघात नऊ बदल करताना गेल्या सामन्यातील देवव्रत रॉय आणि यौनुस बेजेलॉन या दोघानाच फर्स्ट इलेव्हनमध्ये उतरविले.
सातव्याच मिनिटाला लुइस गार्सियाशी झालेल्या टक्करीत नारायण दास जखमी झाल्याने त्याच्याजागी पीटर कार्वाल्योला उतरविण्यात आले.
१७व्या मिनिटाला ब्राझिलियन सांतोसने सुंदर चढाईनंतर डाव्या फळीत मंदारला पास दिल्यावर त्याने पुढे मुसंडी मारताना देबनाथ आणि लेस्टला चकवीत रोमिओला क्रॉस दिला पण त्याचा फटका ‘सोइड नेट’वर आदळला. रोमिओला आणखी एक गोलसंधी मिळाली पण त्याचा फटका कोलकाताचा गोलरक्षक इडलने दुसर्‍या प्रयत्नात अडविला.
३८व्या मिनिटाला कोलकाताला संधी मिळाली पण राकेश मसिहचा प्रयत्न बेजेलॉनने रोखला.
उत्तरार्धात सहाव्या मिनिटाला कोलकाताला संधी मिळाली पण जॅकोब पोडानीच्या फ्रीकिकनंतर बोर्जा फर्नांडिसने दिलेल्या पासवर नॅटोने संधी गमावली.
एफसी गोवाच्या स्लेपिकाने मसिहच्या गचाळ बचावाचा लाभ उठवित चेंडू मिळविला पण नॅटो आणि देवनाथच्या अडथळ्यानंतर झेक स्ट्रायकरचा कमकुवत फटका निष्फळ ठरला. थोड्या वेळानंतर सांतोसच्या पासवर स्लेपिकाने आणखी एक संधी गमावली. ६९व्या मिनिटाला रोमिओ फर्नांडिसला नामी संधी मिळाली पण गोलरक्षक एडलने पुढे सरसावत त्याचा प्रयत्न थोपविला.
८१व्या मिनिटाला पाहुण्याना आणखी एक संधी मिळाली पण विक्रमजीतच्या पासनंतर स्लेपिकाने हाणलेला फटका थेट गोलरक्षकाच्या हाती गेला.
उभयतामधील सेकंड लेग उपांत्य लढत येत्या बुधवार दि. १७ रोजी गोव्यात होईल.