योगमार्ग – राजयोग

0
321

(योगसाधना – २६०)

(स्वाध्याय – २८)

– डॉ. सीताकांत घाणेकर
‘स्वाध्याय’- फक्त तीन अक्षरी शब्द, पणविश्‍वाला बदलण्याची ताकद स्वाध्यायात आहे. म्हणूनच स्वाध्याय शास्त्रशुद्ध करायला हवा. तेव्हाच त्यांचे चांगले परिणाम दिसून येतील. त्यासाठी मानवाची बुद्धी स्थिर, प्रभावी असणे अत्यंत जरुरी आहे.
कठोपनिषदातील श्लोकामध्ये म्हटले आहे…
बुद्धिं तु सारथिम् विद्धि|
– बुद्धीला सारथ्याची उपमा दिलेली आहे. कुठल्याही वाहनाचा सारथी स्थिर असणे अपेक्षित आहे. मग ती गाडी असू दे किंवा विमान असू दे. नाहीतर रथ असू दे. या जगात वावरताना बुद्धी अशुद्ध होण्याची फार शक्यता आहे. शरीरावर घाण साचली किंवा पुष्कळ घाम आला की आम्ही लगेच स्नान करतो. बहुतेक वेळा साबण वापरून तो देखील शक्य असेल तर सुवासिक – मग तो महाग असला तरी चालेल. जसे शरीराला साबणाचे व पाण्याचे स्नान लागते तसेच बुद्धीलादेखील चांगले स्नान लागते.वैश्‍विक स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत प.पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात-
‘स्वाध्याय हे बुद्धीचे स्नान आहे.’
ते पुढे म्हणतात-
‘जीवन-विकासात आणि व्यवहारात बुद्धी पवित्र असली पाहिजे’. चांगल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी ती दृढ असली पाहिजे. आपण प्रलोभनांसमोर टिकून राहावे. विवेकी, दक्ष आणि कार्यकुशल असावे, याच्यासाठी प्रभूला आणि प्रभूच्या विचारांना समजणार्‍या बुद्धीची कोणत्या माणसाला गरज वाटत नाही? सर्वांनाच वाटते.
पू. शास्त्रीजींच्या सान्निध्यात उपनिषद व गीता यांचा नियमित स्वाध्याय करणार्‍याला अशी बुद्धी लाभते. जीवन जगण्याची एक आगळी दृष्टी येते.
ऋषी म्हणतात – ‘स्वाध्यायान्मा प्रमदः|’
– स्वाध्याय करायला आळस करू नका. स्वाध्याय नियमित करा.
या संदर्भात पांडुरंगशास्त्रीजी सांगतात-
‘‘विश्‍वातील कोणताही मानव ज्याला स्वतःच्या कल्याणाची तीव्र इच्छा आहे, ‘स्व’च्या उन्नतीची काळजी आहे, स्व-च्या उत्कर्षाची आंतरिक इच्छाआहे तो कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही देशातील अथवा कोणत्याही परिस्थितीत असला तरी स्वाध्यायाला विरोध करणार नाही. जो माणूस स्वतःच्या बुद्धीला विरोध करतो, स्वतःच्या ज्ञानाला विरोध करतो तोच स्वाध्यायाला विरोध करू शकतो. माणूस कदाचित नास्तिक होईल. पण तो निबुद्ध व्हायला तयार होणार नाही. शहाणपण म्हणजे बुद्धियुक्त व्यवहार, मननशील तो मानव! म्हणूनच बुद्धी प्रभावी हवी.’
महाभारतातील युद्ध फारच गुंतागुंतीचे होते. पांडव व कौरव दोघांच्याही बाजूने रथी-महारथी होते. कौरवांच्या बरोबर तर फार मोठे योद्धे, धनुर्धर होते – परशुराम शिष्य महापराक्रमी भीष्म पितामह, गुरू द्रोण, महारथी कर्ण, … पण पांडवांची खरी शक्ती होती – योगेश्वर श्रीकृष्ण! अर्जुनाने तर श्रीकृष्णाला सारथीच बनवून टाकले. क्षणोक्षणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपले ज्ञान, कौशल्य, युक्ती वापरून श्रीकृष्णाने अर्जुनाला व्यवस्थित मार्गदर्शन केले. त्याला विविध संकटांपासून वाचविले.
आमच्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक क्षणी विविध समस्या उद्भवतात. त्यामुळे इथेही बुद्धीचा योग्य उपयोग करून वेळोवेळी त्या संकटांवर उपयुक्त उपाय करणे अत्यावश्यक आहे. यासाठीच बुद्धी प्रभावी हवी. ती सारथीरूपाने हवी. तरच शरीररूपी जीवनरथ संकटांचा सामना करीत करीत इच्छित ठिकाणी पोहोचेल. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीला स्वाध्याय करणे अत्यावश्यक आहे.
ज्यावेळी संकटे येतात तेव्हा प्रत्येक प्राण्याला प्रेमाची गरज असते, त्यांना ऊब हवी असते.
पू. पांडुरंगशास्त्री प्रवचनात सांगतात- ‘‘समाजातील प्रत्येक मानव दुसर्‍या मानवाच्या उबेनेच मोठा होत असतो. पुष्ट होत असतो. आई-बापांच्या उबेने बालक लहानाचा मोठा होतो. मित्राच्या उबेने मित्राला आधार मिळतो तर पती-पत्नी परस्परांच्या उबेनेच पुष्ट होऊन जीवन जगतात.’’
‘‘स्वाध्यायीसुद्धा कृती भक्तीद्वारे मानवाला ऊब देण्यासाठी व त्याची ऊब घेण्यासाठी गावोगाव फिरत असतात. ज्ञानात भक्तीची दृष्टी येताच भगवंताबरोबरचे संबंध समजतात. संपूर्ण विश्‍वाचा निर्माता माझ्यात बसलेला आहे आणि माझ्याबरोबर राहून सुख-दुःखे भोगतो आहे याचे ज्ञान होताच माणसाची व्यसनमुक्तीही सहजपणे होऊ लागते. नियमित स्वाध्यायाद्वारे सत्‌श्रवण आणि सत्‌चिंतन होऊ लागल्यावर कोणत्याही प्रकारचे व्यसन राहत नाही. ते सुटतेच. सरळ उपदेशाची गरज पडत नाही. याचा अर्थ स्वाध्यायी इतरांच्या व्यसनमुक्तीसाठी गावोगाव जातात असे नाही तर ते स्वतःकडून कृतिभक्ती व्हावी या सद्हेतूने गावोगाव जातात. त्या भक्तीचा आनुषंगिक परिणाम व्यसनमुक्ती आहे.’’
भावनिक जीवनासाठी व मानव उत्कर्षासाठी उबेची कशी आवश्यकता आहे या संदर्भात शास्त्रीजी एक श्लोक सांगतात- ‘‘जीवो जीवस्य जीवनम्‌|’’
याचा अर्थ शास्त्रकार असा सांगतात- मोठा जीव लहान जिवावर जगतो. याचे उदाहरण ते देतात- मोठा मासा लहान माशाला गिळतो किंवा मोठे जनावर लहान जनावराला खाऊन मोठे होते. म्हणून जो बलवान असतो तोच या विश्‍वांत जगतो.
‘‘र्र्डीीीर्ंळींरश्र ेष ींहश षळींींशीीं’’.
शास्त्रीजी त्याला एक मधुर, सुंदर असे भावनिक वळण देतात. ते म्हणतात की लहान जीव मोठ्या जिवाच्या उबेने, आधाराने जगतो. उदा. कुठल्याही मातेच्या उबेने तिचे मूल मोठे होते. मग तो कुठलाही प्राणी, पशू, पक्षी किंवा मानव असू दे!
– छोटे बाळ आधी रांगते, तद्नंतर ते उठायचा व चालण्याचा प्रयत्न करते त्यावेळी वडील त्याच्या हाताला धरून त्याला चालवतात. हात सोडला व तो पडायला लागला की लगेच त्याला सांवरतात.
खरेच किती भाव, प्रेम भरला आहे या छोट्याशा कृतीत. महापुरुषांनी दिलेली ही सोपी साधी उदाहरणे वाचली की त्या वाक्याचा अर्थ कळतो. तसेच ऊब देणे म्हणजे काय हेदेखील कळते.
सुरुवातीला आठवड्यातून एक तास स्वाध्याय केंद्रात येणारा स्वाध्यायी भावपूर्ण व ज्ञानपूर्ण होतो. त्याला संस्कृती, देश, देव, महापुरुष यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची जाणीव होते. मग त्याला आपले कर्तव्य, दायित्व कळायला लागते. मग आपोआप तो स्वाध्याय कार्यांत हळूहळू गुंतायला लागतो. विविध प्रवृत्तींचा अभ्यास करतो आणि एक दिवस नियमित भावफेरीला, भक्तिफेरीला जायला लागतो. स्वतःबरोबर इतरांचा जीवनविकास साधण्याचा प्रयत्न करतो. स्वाध्याय-कार्याचे विविध परिणाम आपोआप दिसायला लागतात. त्यात व्यसनमुक्तीही आली.
पुण्याच्या एका भक्तीफेरीसाठी आम्ही गेलो होतो. तेव्हा एक स्वाध्यायी आपले तंबाखू खाण्याचे व्यसन आपोआप कसे सुटले याबद्दल सांगत होता…
– ‘मी एका फॅक्टरीत कामाला आहे. मला तंबाखू खाण्याचे व्यसन होते. गाल आतून सुजले होते. केव्हा केव्हा छोट्या जखमा व्हायच्या. डॉक्टरांनी सांगितले होते की – तंबाखू सोड नाहीतर गालाचा कर्करोग होणार. बायकोसुद्धा काळजीने प्रेमाने ओरडत होती. पण हे व्यसन सोडणे महाकठीण.
आमच्याकडे पांडुरंगशास्त्रींचे स्वाध्यायी नियमित यायचे. प्रेमाने गोष्टी सांगायचे. भगवंताने बनवलेले शरीर किती सुंदर व अद्भुत आहे हे समजवायचे. स्वतः भगवंत आपल्या हृदयात बसला आहे, असेही सांगायचे. मी त्यांच्याकडे बसायचो पण तंबाखू खायची लहर आली की लगेच बाजूला व्हायचो. तंबाखू गालाखाली घालून परत यायचो. पण त्यांनी केव्हाही व्यसनाबद्दल मला म्हटले नाही. भगवंताने दिलेले शरीर आपण व्यवस्थित सांभाळले तर त्याला देखील आनंद होतो, असे ते म्हणायचे.
एक दिवस त्यांनी आम्हाला श्लोक शिकवला-
‘‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती|
करमूले तू गोविंदम्, प्रभाते करदर्शनम्‌॥
मी तो नेहमी म्हणायचो. अर्थ थोडा समजला होता. एक दिवस मी तंबाखू चुन्याबरोबर मिसळण्यासाठी हातावर चोळत होतो. एवढ्यात ‘करमध्ये सरस्वती…’ हे लक्षात आले. म्हणजे ‘या सरस्वतीवर मी तंबाखू चोळतो’ अशी जाणीव झाली. मी हात झटकला. माझा तंबाखू जमिनीवर पडला. तेव्हापासून माझे तंबाखूचे व्यसन सुटले.
मी माझ्या बायकोला त्याबद्दल सांगितले. तिला आनंद झाला. पण ती लगेच म्हणाली ‘इतके दिवस मी सांगून तुमच्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि आता तंबाखू कसा सुटला?’
मी तिला म्हटले ‘चमत्कार आहे. स्वाध्यायींच्या प्रेमाचा आणि स्वाध्यायातील ज्ञानाचा.’
खरेच, आज संपूर्ण विश्‍वाला अशा प्रेमाची, उबेची अत्यंत गरज आहे. म्हणूनच स्वाध्याय करण्याची आवश्यकता आहे.