गोंयच्या सायबाच्या पवित्र अवशेष दर्शन सोहळ्यास प्रारंभ

0
93
जुने गोवे येथे पवित्र अवशेष दर्शनानिमित्त प्रार्थनासभा व सेंट फ्रान्सिस झेवियरचे पवित्र अवशेष से कॅथेड्रल चर्चमध्ये नेताना. (छाया : किशोर नाईक)

खास प्रार्थना सभेस मंगळूरचे बिशप उपस्थित
जुने गोवे येथे काल सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांचे दर्शन पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी घेतले. शवदर्शन दि. ४ जानेवारीपर्यंत भाविकांना येथील से कॅथेड्रल चर्चमध्ये खुले ठेवण्यात आले आहे.सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेष दर्शनासाठी काल पहाटे पासूनच जुने गोवे येथे भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. चर्चच्यावतीने कालच्या या सोहळ्यानिमित्त सकाळी ९.३० वाजता खास प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. या प्रार्थना सभेला मंगळूरचे बिशप अलोएसियस तर गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव अन्य ज्येष्ठ धर्मगुरूंसमवेत उपस्थित होते.
सकाळच्या बॉसिलिका बॉंजिझस चर्चमध्ये प्रथम सायबाचे पवित्र अवशेष खाली उतरविण्यात आल्यानंतर तेथे प्रार्थनासभा घेण्यात आली व नंतर सन्मानपूर्वक हे शव मिरवणुकीने शेजारील से कॅथेड्रल चर्चमध्ये आणण्यात आले. दहा वर्षांनंतर गोंयच्या सायबाचे पवित्र अवशेष प्रदर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याने गोव्यासह शेजारील राज्यातील भाविकांनीही मोठी गर्दी केली होती.
अवशेष दर्शन सोहळ्यासाठी पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. से कॅथेड्रल चर्चमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत भाविकांनी सायबाच्या पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले. सर्वांना व्यवस्थितरित्या दर्शन घेता यावे यासाठी खास सोय केली आहे. अवशेषांच्या ठिकाणी खास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कालच्या या प्रमुख सोहळ्यानंतर दि. २४ पासून नोव्हेना व दि. ३ डिसेंबर रोजी वार्षिक फेस्त येथे साजरे होणार आहे.