श्रीमंतांसाठी स्वयंपाक गॅस अनुदान बंदचे संकेत

0
99

अन्य काही निर्णयही शक्य : जेटली
सर्वांना स्वयंपाक गॅससाठी दिले जाणारे अनुदान श्रीमंतांना न देण्याबाबत केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांनी संकेत दिले आहेत.
‘भारताला आणखी एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल तो हा की माझ्यासारखे लोक आमचे स्वयंपाक गॅससाठी असलेले अनुदान घेण्यासाठी पात्र आहेत काय याबाबत’’ असे मत जेटली यांनी येथे आयोजित एका परिषदेवेळी व्यक्त केले. हे निर्णय आम्ही जेवढ्या लवकर घेऊ शकू तेवढे आमच्या कार्यपध्दतीला ते चांगले ठरेल. हे निर्णय आमच्या कार्यक्रम पत्रिकेवर आहेत असे ते म्हणाले.सध्या ग्राहकांना अनुदानित दरात ग्राहकांना दिल्लीत प्रत्येकी ४१४ रु. या दराने १२ सिलिंडर्स दिले जातात. त्यानंतरचा प्रत्येक सिलिंडर (१४.२ किलो) ग्राहकाला प्रत्येकी ८८० रु. या बाजार भावात खरेदी करावा लागेल असे त्यांनी सांगितले.
एकदा वरीष्ठ नेतृत्वाने राजकीय निर्णय घेतला की अत्यंत गुंतागुंतीचे निर्णयही सोपे ठरतील असा दावाही त्यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून अनेक निर्णय जटील बनून राहिले होते. परंतु नव्या सरकारने वेळ वाया न घालवता त्याबाबत ठोस निर्णय घेतले. आणि मला वाटते ते चालूच राहील असे ते म्हणाले. माल व सेवा कर याविषयीच्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या प्रस्तावाबाबत आपली बहुतेक तयारी झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण २६ वरून ४९ टक्क्यांवर वाढविण्याच्या प्रस्तावालाही आपले सरकार अनुकुल असल्याचे संकेत जेटली यांनी दिले.