चित्रपटांतून राष्ट्रीय एकात्मतेला हातभार : अमिताभ

0
192
दक्षिणी चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांना शतकमहोत्सवी पुरस्काराने सन्मानित करताना अमिताभ बच्चन. सोबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली.

४५ व्या इफ्फीचे शानदार उद्घाटन
चित्रपट माध्यमाने भारतातील विविध जाती व धर्मांच्या लोकांना एकत्र आणले व एका प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेला हातभारच लावला. वेगवेगळ्या जाती व धर्मातील लोक एका चित्रपटगृहात बसून चित्रपटाचा आनंद लुटतात. यावेळी कुणीही कुणाला कुणाची जात विचारत नाही, असे उद्गार सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काल इफ्फी उद्घाटन समारंभावेळी बोलताना काढले.यावेळी १०० वर्षे पूर्ण केलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा आढावा घेताना बच्चन म्हणाले की टीकेला पात्र ठरलेला भारतीय चित्रपट आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वत:ची छाप उमटू लागलेला आहे.
…म्हणून भारतीय सिनेमा आवडतो
एका रशियन रसिकाला एकदा आपण त्याला भारतीय सिनेमा का आवडतो असे विचारले असता भारतीय सिनेमा ओठावर हसू फुलवतानाच डोळ्यात आसू आणत असतो असे उत्तर त्याने दिले, असे बच्चन म्हणाले. काव्यात्मक न्याय एखाद्या व्यक्तीला मिळाल्याचे केवळ हिंदी सिनेमात पहायला मिळते म्हणून तो मला आवडतो असे माझे वडील हरिवंशराय बच्चन यांनी एकदा आपणाला सांगितले होते. असेही त्यांनी यावेळी सांगितले. १५ मिनिटांच्या भाषणात बच्चन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा आढावा तर घेतलाच शिवाय आता स्वातंत्र्याची फळे चाखणार्‍या गोव्यावर पूर्वी कुणी कुणी राज्य केले होते त्या इतिहासाचाही धावता आढावा घेतला. ‘लहरों से डरकर नौका पार नही होती, हिंमत करने वालों की कभी हार नही होती’ या आपल्या वडिलांच्या काव्यपंक्ती त्यानी यावेळी सादर केल्या.
१९१३ पर्यंत भारतात चित्रकला ही प्रमुख कला होती. नंतर दादासाहेब फाळके यानी चित्रपट निर्मिती सुरू केली. सत्यवादी राजा राजा हरिश्‍चंद्र यांच्या जीवनावर आधारित त्यांनी चित्रपट काढला. नंतर धीरेंद्र गांगुली, बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, हिमांशु रॉय, सत्यजीत रे सारख्या प्रतिभावंतानी भारतीय चित्रपटसृष्टीला योगदान दिल्याचे ते म्हणाले. प्रत्येक दशकात सिनेमा कसा बदलत गेला व समाजातील विविध विषय व समस्या याना सिनेमाने कशी वाचा फोडली ते उदाहरणासह त्यानी सांगितले. जातीयवाद, स्त्रियांवर होणारे अत्याचार, भ्रष्टाचार अशा विविध समस्या व विषयांना भारतीय चित्रपटानी हात घातल्याचे ते म्हणाले.
गोव्याची स्तुती
गोव्याची स्तुती करताना छोटेसे गोवा राज्य हे अत्यंत सुंदर असून ते स्वर्गासारखे आहे. आपल्या ‘सात हिंदुस्थानी’ या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यातच झाले होते. त्यानंर अन्य कित्येक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आपण गोव्यात आल्याचे ते म्हणाले. गोव्यातील विविधतेतील एकता आपणाला आवडते हे सांगायला ते विसरले नाहीत. त्याचबरोबर गोव्याच्या लोकांचे आदरतिथ्य आपणाला भावते. त्यामुळे मी गोव्यावर खूप प्रेम करतो हे कोकणीतून सांगायचा प्रयत्न करताना ‘म्हांका गोंय बरें लागता’ असे ते म्हणाले.
यावेळी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते शतक महोत्सवी पुरस्कार देऊन दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी यावेळी शाल देऊन रजनीकांत यांचा सत्कार केला.
पुढील वर्षांपर्यंत जागतिक दर्जाच्या सुविधा : पर्रीकर
यावेळी बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की आता गोवा हे इफ्फीसाठीचे कायम स्थळ बनले असल्याने येत्या वर्षीपर्यंत इफ्फीसाठी जागतिक दर्जाची साधनसुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यावेळी म्हणाले की गोव्यात चित्रीकरणासाठी मोठ्या संख्येने चित्रपट निर्माते येतात. चित्रीकरणासाठी लागणार्‍या सर्व सुविधा त्यांना येथे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार पावले उचलणार असल्याचे त्यानी यावेळी स्पष्ट केले. इफ्फीसाठी जागतिक दर्जाची साधनसुविधा निर्माण करण्याचे आव्हान आपल्या सरकारपुढे आहे व पुढील इफ्फीपर्यंत ही साधनसुविधा उभारण्यासाठी सर्व तो पर्यंत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
निर्माते, दिग्दर्शकांनी मोठे बनवले : रजनीकांत
शतक महोत्सवी पुरस्कार प्राप्त अभिनेते रजनीकांत यानी यावेळी मनोगत व्यक्त करताना हा पुरस्कार आपला नसून ज्या निर्मात्यानी व दिग्दर्शकानी आपणाला मोठे बनवले त्यांचाच पुरस्कारावर अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार देऊन माहिती व प्रसारण मंत्रालयाने आपला गौरव केलेला असून त्यासाठी आपण त्यांचा आभारी असल्याचे ते म्हणाले.
सर्वप्रथम केंद्रीय माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव बिमल जुल्का यानी प्रास्तविक केले. चित्रपट क्षेत्रातील सर्वांना एकत्र आणण्याचे इफ्फी हे एक व्यासपीठ असल्याचे ते यावेळी म्हणाले. चित्रपटांद्वारे समाजात क्रांती घडू शकते, असेही त्यानी यावेळी नमूद केले.
अभिनेत्री व नृत्यांगना शोभना पिल्ले व सहकार्‍यांच्या नृत्याचा एक बहारदार असा कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन व चरित्र अभिनेते अनुपम खेर यानी केले.
माहिती व प्रसिद्धी खात्याचे राज्यमंत्री राजवर्धन राठोड, मंत्रालयातील अन्य अधिकारी, चित्रपटसृष्टीतील विविध कलाकार, महोत्सवाचे ज्युरी सदस्य यावेळी हजर होते. बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या सोहळ्यात सुमारे ५ हजार रसिक हजर होते.

इफ्फी उद्घाटन क्षणचित्रे
४.१५ वा. अमिताभचे इफ्फीस्थळी आगमन झाले. तेव्हा इनडोअर स्टेडियममध्ये हजर असलेल्या सुमारे ५ हजार लोकानी एकच जल्लोष केला.
४.३० वा. रजनीकांत यांचे आगमन झाले. तेव्हाही प्रेक्षकानी स्टेडियम डोक्यावर घेतले.
हिंदीतून भाषण करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे अडखळले तेव्हा त्यांनी आपण हिंदीतून बोलण्याचा सराव करीत असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यानी हिंदी, इंग्लीश, कोकणी अशा तीन भाषांमध्ये चांगले भाषण केले.
रजनीकांत हे सपत्नीक आले होते. त्यांची कन्या सौंदर्या ही सुद्धा आली होती.
४ वा. सुरू होणार असलेला उद्घाटन सोहळा ५ वा. सुरू झाला व तो तब्बल पावणेदोन तास चालला.
पुरस्कार प्राप्त रजनीकांत यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी छान अशी त्यांच्या चित्रपटावरील दृश्ये यावेळी दाखवण्यात आली.
कॉंग्रेस नेत्यांनी इफ्फीवर बहिष्कारच घातला.
भाजपचे बहुतेक मंत्री व आमदार सोहळ्याला हजर होते.
सोहळ्याला भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.