योगमार्ग – राजयोग

0
184

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना – २५८)
(स्वाध्याय – २६ )
विश्‍वात प्रत्येक जण काहीतरी कृती करीत असतो.प्रत्येकाचा त्यामागचा हेतू वेगवेगळा असतो.आपल्यापैकी बहुतेक जण अनेक कृती कुठल्यातरी फळाच्या अपेक्षेने करतो. अगदी थोड्या व्यक्ती आपल्या कृतीमुळे स्वतःला व इतरांना सुख-आनंद मिळावे यासाठी करतात. काहीजण स्वतःचा व इतरांचा जीवनविकास व्हावा म्हणून कृतिशील असतात. संत-महापुरुष तर भगवंताचे विश्‍व व त्यातील सर्व घटक गुण्यागोविंदाने रहावेत म्हणून कर्म करतात. कृतीमागे प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ असतोच. पण ज्ञानी कर्मयोग्यांचा स्वार्थ दैवी असतो.
आपण कुठेही चारजण भेटलो की विश्‍व व त्यातील घटना यांवर चर्चा करतो. बहुतेक चर्चा जगातील समस्या, दुःख, दारिद्य्र, युद्ध-लढाया यांबद्दलच असते. गप्पा करता करता विविध मते, विचार पुढे येतात. या गोष्टी बहुतेकवेळा नकारात्मकच असतात. त्यातील काही विचार पुढे येतात. त्यातील काही विचार म्हणजे…* सरकारने यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. जगातील धुरीणांनी काहीतरी करायला हवे. आजचे युग हे कलियुग आहे त्यामुळे असेच होणार… सहसा विधायक उपायांवर चर्चा होताना दिसत नाही.
अनेक वर्षांपूर्वी मुंबई शहरातील एका ठिकाणी अशीच एक पार्टी चालली होती. शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तिथे आल्या होत्या. तिथेही अशाच विषयांना पूर आला होता. त्यावेळी एका व्यक्तीने थोडे वेगळे विचार मांडले. ती व्यक्ती होती मुंबईतील एक व्यापारी. त्यांनी म्हटले की मानवाने व्यवस्थित प्रयत्न केला तर अनेक वेळा वाईट गोष्टीतून चांगल्या घटना घडू शकतात. मग त्यांनीच हल्लीच घडलेल्या दोन घटनांचा उल्लेख केला.
१. गुजरातमधील नेमडा गावातील डाकू ना सुधारण्याबाबत.
२. दमणमधील एका स्मगलरच्या परिवर्तनाबाबत.
त्या पार्टीमध्ये एका बाजूला सिनेनिर्माते शाम बेनेगल बसले होते. त्यांनी या दोन्ही घटना ऐकल्या. ते पुढे आले व विचारले की तुम्ही ज्या गोष्टी बोलताहात त्या कुणी चांगल्या लेखकाने समाज परिवर्तनासाठी लिहिलेल्या कथा आहेत का? पण ज्यावेळी त्यांना सांगितले गेले की या सत्य घटना आहेत, त्यावेळी त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला.
श्री. बेनेगल म्हणाले की हे दोन्ही विषय सिनेमा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे समाजप्रबोधन घडेल. नंतर त्यांचा दुसरा प्रश्‍न होता की या घटनांविषयी त्यांनी कधीच ऐकले नाही आणि असे काम गुपचुपपणे करतो तरी कोण? या सर्व कार्याचा कर्ता-करविता आहे कुठे?
त्यावेळी त्यांना सांगितले गेले की असे विधायक कार्य पू. पांडुरंगशास्त्रींचे स्वाध्यायी अनेक वर्षे बिनबोभाटपणे करीत असतात. स्वतः शास्त्रीजींना व त्यांच्या स्वाध्याय परिवाराला कसल्याही प्रसिद्धीची अपेक्षा नसते. ते तर आपली भक्ती करतात. कर्मयोग करतात. असेच पुढे बोलता-बोलता जेव्हा बेनेगलांना कळले की शास्त्रीजी मुंबईतील गिरगावात राहून असे विधायक कार्य करतात तेव्हा तर त्यांना अधिकच आश्‍चर्य वाटले. ते म्हणाले की या घटनेवर त्यांचा सिनेमा काढायचा विचार आहे, तेव्हा त्यांना सांगितले गेले की त्यासाठी त्यांना श्रीपांडुरंगशास्त्रींना भेटावे लागेल.
निर्णय पक्का झाल्यामुळे श्री. बेनेगल शास्त्रीजींना भेटले. त्यांनी म्हटले की सिनेमा काढला तर आमच्या कार्याची प्रसिद्धी होईल. आज अशा विचारांची व कामाची विश्‍वाला फार गरज आहे.
शास्त्रीजी त्यांना म्हणाले- ‘‘आम्ही भक्ती करतो त्याची अशी प्रसिद्धी करण्याची आमची इच्छा नसते. तुम्हाला जर सिनेमा काढावा अशी प्रेरणा झाली आहे तर अवश्य काढा. पण माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही या घटना सविस्तर समजून घ्या. तसेच ज्या घडलेल्या आहेत तशाच लोकांसमोर आणा. त्यात कसलीही अतिशयोक्ती करू नका. त्याशिवाय कुठेही माझे नाव मोठाले बोर्ड लावून, माझी प्रसिद्धी करू नका. सारांश – शास्त्रशुद्ध संशोधन करून सिनेमा काढा’’.
शास्त्रीजींच्या इच्छेप्रमाणे शाम बेनेगलांनी तदनंतर आपली टीम पाठवून व्यवस्थित सर्व साहित्य तयार केले. स्वाध्याय परिवारातील ज्येष्ठ अनुभवी स्वाध्यायींकडून फेरतपासणी करून घेतली व शास्त्रीजींच्या आशीर्वादाने ‘‘अंतर्नाद’’ हा सिनेमा काढला. त्यातील दोन घटना अशा…
१. नेमडा गावातील डाकूची गोष्ट-
गुजरातमधील एका गावात काही स्वाध्यायी नियमित भक्तिफेरीला जात असत. त्या गावाच्या पलीकडे एका टेकडीवर एक गाव होते. चौकशीअंती स्वाध्यायींना माहीत झाले की ते गाव – नेमडा – डाकूंचे गाव आहे. ते डाकूसुद्धा खास कारण ते फक्त लग्नाच्या वरातीतील लोकांना लुटत असत. दुर्जनांचेही काही कायदे असतातच. ते डाकू नवरा-नवरीचे दागिने लुटत नसत, तसेच शक्यतो कुणाला जीवे मारीत नसत. भीतीमुळे त्या गावात इतर कुणीही जात नसत. ही सर्व माहिती कळल्यावर त्या गावात शहरातून येणार्‍या स्वाध्यायींची जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांनी ठरवले की पुढच्या भक्तीफेरीच्या वेळी नेमडा गावात जायचे. लोकांनी त्यांना समजावले तरी स्वाध्यायींनी काही ऐकले नाही. ते तर भगवंताचे कार्य करणारे लोक! त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्‍वास! त्यांना सत्य व चांगल्या मार्गाने जाण्यास कुणाचीही व कसलीही भीती वाटत नसे.
ठरल्याप्रमाणे स्वाध्यायी नेमडात गेले. तिथे अपेक्षेप्रमाणे डाकूंनी त्यांना अडवले. त्यांची चौकशी केली- कुठून आले, का आले वगैरे… स्वाध्यायींनी त्यांना सांगितले की ते त्यांना भेटायला आले आहेत- प्रेमाने! तीच त्यांची भक्ती आहे. डाकूंना ही गोष्ट विचित्र वाटली. त्यांच्यात आपापसात कुजबुज सुरू झाली. त्यांनी स्वाध्यायींना स्पष्ट बजावले की त्यांना गावात कुणालाही भेटायला मिळणार नाही आणि त्याची गरजदेखील नाही. असे म्हणून डाकूंनी त्यांना हाकलून लावले- एक सूचना देऊन की त्यातील कुणीही परत त्या गावात दिसता कामा नये.
तत्पूर्वी डाकू त्यांचे सामान तपासून बघतात.. त्यात त्यांना काही स्वाध्यायींची पुस्तके व गीता सापडते. तसेच काही साधे कपडे व खाण्याचे जिन्नस. त्या सर्व वस्तू ते ठेवून घेतात. स्वाध्यायी आल्या पावली त्यांना प्रेमाने नमस्कार करून निघून जातात.
इथे डाकूंना संशय येतो की हे लोक पोलिसांचे गुप्त हेर तर नाहीत ना? चौकशीअंती त्यांना समजते की तसे काहीही नाही. ते निरुपद्रवी स्वाध्यायी आहेत. ते फक्त गावात येऊन प्रेमाने गावकर्‍यांना भेटतात.
डाकूंना खात्री असते की असले लोक भित्रे असतात. ते पुन्हा काही गावात येणार नाहीत. पण होते उलटेच. ते स्वाध्यायी गावात येतात. पुन्हा डाकू त्यांना हाकलतात व पुन्हा न येण्याबद्दल बजावतात.
स्वाध्यायींचा निश्‍चय पक्का असतो. त्यामुळे ते परत नेमडामध्ये येतात. पण यावेळी एक स्वाध्यायी आपल्या पत्नीला घेऊन येतो. परत चौकशीअंती डाकूंना त्यांच्या निरुपद्रवी पणाची खात्री झालेली असते. म्हणून ते त्यांच्यावर नजर ठेवतात. पण परत पाठवीत नाहीत.
आता तर स्वाध्यायींना गावात प्रवेश मिळालेला असतो. ती महिला गावातील लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगते. श्लोक, गाणी शिकविते. प्रेमाने जवळ करते. ते दृश्य बघून त्या मुलांच्या आयांना बरे वाटते. हळूहळू ती महिला गावातील स्त्रियांना प्रेमाने भेटते. त्या सर्वांत आपसात प्रेम वाढते.
इथे पुरुषांना ही गोष्ट मान्य नसते. ते आपल्या पत्नींना या अशा भेटण्याला मनाई करतात. पण महिला काही ऐकत नाहीत.
तेवढ्यात एका डाकूचा पोलिसांची गोळी लागल्यामुळे मृत्यू होतो. महिला सद्विचार करीत असल्यामुळे त्यांना आपल्या पतींचा हा असला चोरीचा धंदा आवडत नाही. असेच दिवस, महिने जातात आणि शेवटी एक दिवस त्या पुरुषांनाही स्वतःच्या धंद्यांची लाज वाटते. ते सर्व बदलतात. तो संपूर्ण गाव स्वाध्यायी होतो.
आता ही गोष्ट पाच मिनिटात वाचून संपली व सिनेमामध्ये पाऊण-एक तासात. पण प्रत्यक्ष स्वाध्यायींना पुष्कळ वेळ लागला.
स्वाध्याय परिवारामध्ये मानव परिवर्तनाच्या अशा अनेक आश्‍चर्यकारक सत्य घटना आहेत. चमत्कारामुळे असे घडत नाही तर त्यासाठी लागतात अथक प्रयत्न… प्रेमपूर्वक शास्त्रशुद्ध स्वाध्याय.
क्रमशः